लेखांक – १ : निरोध वापरण्याची योग्य पद्धत

6,307

वेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी २४०० च्या वर प्रश्नांना आपण उत्तरं दिली. यामध्ये मासिक पाळी, गर्भधारणा, हस्तमैथुन, शिघ्रवीर्यपतन आणि गर्भनिरोधन यासंबधी सर्वाधिक प्रश्न विचारले गेले आहेत. तसेच अनेक प्रश्न हे गर्भनिरोधन, असुरक्षित संबंधातून निर्माण होणारी गर्भधारणेबद्दलची भीती, एका संबंधाच्या वेळी दोन निरोधचा वापर, संबंधाच्या वेळी निरोध फाटणे, गुदमैथुनाच्या वेळी कोणत्या स्वरूपाचे वंगण वापरावे या विषयांवरीलही होते. या मुद्द्यांवरील अनेक प्रश्न, गैरसमज, शंकाना आपण ‘प्रश्नोत्तरे’ या विभागाच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. खालील लेखमाला ही एका अशाच महत्वाच्या मुद्द्यावर बेतलेली आहे. आणि तो म्हणजे निरोध कसा वापरावा? हा लेख पुरुषांसाठीचा निरोध वापरण्याची योग्य पद्धत कोणती, तो वापरत असताना काय काळजी घ्यावी आणि मुख्य म्हणजे वापरलेल्या निरोधची विल्हेवाट कशी लावावी याबद्दल आपल्या वाचकांना योग्य माहिती देईल.

पुरुष-निरोध वापरण्याची योग्य पद्धत

१. निरोधच्या वेष्टनावरची वस्तू कालबाह्य होण्याची तारीख (‘एक्सपायरी डेट’) तपासा. जर निरोध कालबाह्य झाला असेल तर तो वापरू नका. दुसरा वापरा. इतर कोणताही निरोध उपलब्ध नसेल तरच कालबाह्य झालेला निरोध वापरा.

२. जर तारीख वाचता येत नसेल, तर निरोध पाकिटात सरकवण्याचा प्रयत्न करा. तो सहज सरकत असेल तर निरोध वापरण्यास हरकत नाही असं समजा, जर निरोध पाकिटात सहजपणे सरकत नसेल तर त्यातील वंगण वाळलं आहे. तो निरोध शक्यतो वापरू नये.

३. निरोधाचं पाकीट फाडायच्या अगोदर पाकिटातला निरोध एका बाजूला सरकवावा व दुसऱ्या बाजूनं (ज्या बाजूला निरोध नाही) पाकीट फाडा म्हणजे पाकीट फाडताना तुमचं नख लागून निरोध फाटणार नाही.

४. निरोध पाकिटातून काढल्यावर त्याच्यावर फुंकर मारून तो कोणत्या दिशेने उलगडायचा हे बघून घ्या.

५. लिंग पूर्ण उत्तेजित झाल्याशिवाय लिंगावर निरोध चढवू नका, अन्यथा तो लिंगावर नीट बसत नाही.

६. निरोधच्या टोकात हवा साठलेली असू शकते. तशीच हवा ठेवून जर निरोध लिंगावर चढवला तर संभोग करताना निरोध फाटू शकतो म्हणून निरोधचं टोक चिमटीत पकडा म्हणजे हवा बाहेर पडेल व तशीच चिमूट पकडून निरोध लिंगावर चढवा.

७. निरोध लिंगावर पूर्णपणे चढवा. अर्धवट चढवू नका.

८. संभोग करताना निरोध फाटलाय अशी शंका आली तर लगेच थांबा व लिंग बाहेर काढा. नवीन निरोध चढवा व मगच संभोग परत सुरू करा.

९. वीर्यपतन झाल्याबरोबर लिंग ताठ असतानाच निरोधची कड पकडून लिंग व निरोध (योनी/गुदातून) बाहेर काढा.

१०. लिंगावरून निरोध काढताना वीर्य योनी किंवा गुदावर सांडणार नाही याची काळजी घ्या.

११. निरोधला गाठ मारा.

१२. निरोध कचरयाच्या कुंडीत टाकून द्या. संडासात टाकू नका. संडास तुंबू शकतो.

१३. गुदमैथुन केल्यानंतर योनीमैथुन करणार असाल किंवा योनीमैथुनानंतर गुदमैथुन करणार असाल तर संभोगाचा प्रकार बदलतेवेळी न चुकता निरोध बदलायची खबरदारी घ्यावी.

निरोध व्यवस्थित वापरला तर संभोगाच्या दरम्यान निरोध फाटायची शक्यता अंदाजे २% ते ३% असते.

डबल निरोधचा वापर:

काही जणं सुरक्षिततेसाठी डबल निरोधचा वापर करतात. दोन निरोध वापरायचे की नाही याबद्दल दुमत आहे, काहीजण सांगतात की एका वेळी एकच निरोध वापरावा. जर  वापरले तर एकावर एक निरोध घासून निरोध फाटायची शक्यता असते. काहीजण सांगतात, की ‘आम्ही डबल निरोध वापरतो. त्यातला एक फाटला तरी दुसऱ्यामुळे संरक्षण मिळतं.’ दोन निरोध वापरल्यानं पुरुषाला संवेदनशीलता कमी जाणवते.

संदर्भ : वरील संंपादीत लेख बिंदूमाधव खिरे, समपथिक ट्रस्ट यांच्या ‘मानवी लैंगिकता’ या पुस्तकातून घेतला आहेत.

Comments are closed.