Masik pali asked 7 years ago

Me ipl goli khaly nantr 1 divas nantr masikpali lambvanchya goli goli khtli 3 divas ani maze masik date 1 hoti ani mala ajun pali nahi ali …..ani me masik pali lambgoli 3 divas getli

2 उत्तर
Answer for Masik pali answered 7 years ago

गर्भधारणा झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रेगंसी टेस्ट करा. मेडिकलच्या दुकानात प्रेग्नसी कीट मिळते त्याचा उपयोग करून तुम्हाला गर्भधारणा आहे की नाही हे पाहता येईल. नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. थोडे दिवस पाळीची वाट बघा.तुमच्या प्रश्नामध्ये तीन गोष्टी आहेत. एक तर आय पिलचा वापर, पाळी लांबविण्याच्या गोळ्यांचा वापर आणि तिसरे म्हणजे पाळी वेळेत आली नाही. या तीनही मुद्द्यांविषयी बोलूयात.

१. आय पिल हे इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापरावायचे गर्भनिरोधक आहे त्याचा नियमित उपयोग करणं चांगलं नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे, या गोळ्या शरीरातील संप्रेरकांना(हार्मोन्सला) प्रभावित करतात. म्हणजे नैसर्गिकरित्या हार्मोन्समध्ये होणार्‍या बदलामध्ये कृत्रिम अडथळा निर्माण करतात. यामुळं तात्पुरत्या स्वरुपात डोकेदुखी, मळमळणं, उलटी होणं, स्तनांमध्ये दुखणं इत्यादी किंवा मासिक पाळीच्या तारखा मागे-पुढे जाणं असे परिणाम दिसू शकतात. या गोळ्य़ा नियमित स्वरुपात घेतल्यामुळं भविष्यातील गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. शिवाय मासिक चक्रावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, गर्भनिरोधन करणे ही फक्त स्त्रीची जबाबदारी नाही. कंडोम हे पुरुषांसाठी सहज उपलब्ध असलेले आणि अगदी सहजा सहजी वापरता येणारे गर्भनिरोधक उपलब्ध आहे. परस्पर संमतीने गर्भनिरोधक वापरणे कधीही योग्य.

गर्भनिरोधकांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील माहिती वाचा.

https://letstalksexuality.com/contraception/

२. पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यात घाण, अपवित्र असे काहीही नाही. त्यामुळे पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेऊ नयेत. याविषयीचा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/medicines-for-delaying-menstruation/

३. पाळी अनियमित होण्याची गर्भधारणेव्यतिरिक्त इतरही कारणे असू शकतात. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.

आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.

काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.

अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.

टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 19 =