१. वयाच्या या टप्प्यावर सेक्सची इच्छा होणं अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. एखाद्या व्यक्तीला जोडीदार नसेल किंवा जोडीदार असूनही समोरच्या व्यक्तीची इच्छा/संमती (कोणत्याही व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवताना त्या नात्यातील प्रेम, विश्वास, आदर, संमती, सुरक्षितता आणि पारदर्शकता महत्वाची आहे.) नसेल तर हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो. या स्वाभाविक क्रिया आहेत. मुलं-मुली, स्त्री-पुरुषही हस्तमैथुन करतात. जोपर्यंत स्वतःला दुखापत होत नाही किंवा रोजच्या कामात अडथळा येत नाही तोपर्यंत हस्तमैथुनात काही धोका नाही. याविषयीचा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
याविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत तेदेखील वाचा.
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/
२. आपल्या पुरुषसत्ताक समाजामध्ये पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांना आवश्यक ते स्वातंत्र्यही आहे. परंतू असे पर्याय वापरावेत की नाही? ही प्रत्येकाने ठरविण्याची बाब आहे. फक्त नात्याने नवरा-बायको असलेल्यांमध्येच लैंगिक संबंध असू शकतात असं अजिबात नाही. पण एखाद्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवताना त्या नात्यातील प्रेम, विश्वास, आदर, संमती आणि पारदर्शकता महत्वाची आहे. फक्त संभोग (सेक्स) करण्यासाठी कोणाला तरी तयार करणं या दृष्टीकोनावर मात्र विचार व्हायला हवा. विविध नात्यांमध्ये लैंगिक संबंध असू शकतात. किंबहुना नाती तयार झाल्यानंतर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी विचारता येवू शकतं. मात्र फसवणूक करून, खोटं बोलून, जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र लैंगिक संबंध ठेवताना दोघेही सज्ञान (१८ वर्ष पूर्ण) आहेत का? दोघांचीही ठेवढीच इच्छा, ओढ आणि संमती आहे का? लैंगिक संबंध सुरक्षित आहेत का हे लक्षात घेणं महत्वाचं आहे.
कोणताही निर्णय घ्या आणि त्याची जबाबदारी देखील… स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा…