दोन राजपुत्र आणि दोन राक्षसी – लैंगिकता आणि संस्कृती ५

- आशुतोष इंदुमती प्रभुदास

2,189

मानववंशशास्त्रातील अलीकडचे संशोधन असे सांगते की, भारतातील लोकांमध्ये निरनिराळ्या वंशांचे मिश्रण झालेले दिसून येते. या शास्त्राच्या दृष्टीने पाहिले असता, निग्रॉइड (आफ्रिका), मंगोलॉइड (चीन मंगोलिया), ऑस्ट्रेलॉइड (आग्नेय आशिया) आणि कॉकेशोईड (आजचा युरोप) या वंशांची एतद्देशीय सरमिसळ गेल्या काही हजार वर्षांपासून चालत आली आहे. या वंशामध्ये नानाविध उप आणि पोटप्रकार काळाच्या ओघात निर्माण झाले. परंतु आपल्याला जो रामायण आणि महाभारत यामधून ज्ञात इतिहास आहे, तो मात्र सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीचा आहे. या कालखंडात पश्चिम आणि वायव्य दिशेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणावर जनसमूहांची स्थलांतरे झाली असावीत.

या जनसमूहांना देव, दैत्य / दानव, राक्षस, असुर आणि वानर असे संबोधिले गेले आहे. देव म्हणजे उत्तरेकडील,  दैत्य म्हणजे पश्चिमेकडचे, वानर म्हणजे जंगलात निवास करणारे जनसमूह आणि राक्षस म्हणजे विषुववृत्तीय दाक्षिणात्य असावेत असे ढोबळमानाने मानता येईल. रामायण आणि महाभारत ही मुळात उत्तरेकडील स्वतःला देव समूहातील मानणाऱ्या कविगणांनी रचलेली महाकाव्ये आहेत. आंतरवंशीय सरमिसळ होण्याचा प्रकार हा प्रदीर्घ काळापासून चालत आला आहे.  या सरमिसळीचा गाभा म्हणजे आंतरवंशीय स्त्रीपुरुष संबंध आणि त्यातून निर्माण होणारी संतती होय. त्यासाठी विवाहबंधन हे सुरुवातीच्या काळात आवश्यक नव्हते.

देवगणातील कवींनी रचलेल्या रामायण आणि महाभारतात देव आणि राक्षस यांच्यातील स्त्रीपुरुष आकर्षणाच्या कथा आंतरवंशीय संबंधांवर प्रकाश टाकतात.

आपण अर्जुन उलुपी कथानकात पाहिले की, नागवंशीय उलुपीने अर्जुनाकडे केवळ शरीरसुखाची मागणी केली होती, ती सुद्धा एका रात्रीसाठी. यम आणि यमी संवादात यमीला भावाबरोबर विवाह होणे अतर्क्य आणि अशक्य असल्याची जाणीव बहुधा असावी. कारण ती शरीरसुख हे संततीसाठी हवे असल्याचे सूचित करते. ही विवाहबाह्य शरीरसंबंधाची उदाहरणे झाली. नंतरच्या काळात विवाह संबंधांची उदाहरणे येतात. त्या सर्वामध्ये आपला वंश श्रेष्ठ आणि राक्षस वंश कनिष्ठ,  क्रूर,  कुरूप आणि मायावी असा समज प्रबळ दिसतो. स्वकीय सोडून इतरांबद्दल प्रतिकूल आडाखे बांधणे हा आपपरभाव या कथांमधून स्पष्ट दिसतो. त्याचबरोबर पुरुष श्रेष्ठ आणि भोक्ता तर स्त्री कनिष्ठ आणि मालमत्ता या भावाने स्वकीय स्त्रीला परकीय पुरुषाबद्दल आकर्षण वाटले तर ते स्वकीय पौरुषाला खचितच भूषणावह नाही. उलट परकीय स्त्रीला स्वकीय पुरुषाबद्दल आकर्षण वाटले तर ते स्वकीय पौरुष आणि तेदेखील देखणे पौरुष याचे निदर्शक मानले जाई. त्यामुळे या कथा सर्व राक्षसगणातील स्त्रीला देवगणातील पुरुषाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाबद्दल आहेत.

रामायणात राम आणि लक्ष्मण यांना शूर्पणखा ही राक्षसकन्या भेटते असे कथानक आले आहे. सकाळची आन्हिके उरकून राम दाट सावलीखालील आपल्या कुटीत सीता आणि लक्ष्मण यांना निरनिराळ्या कहाण्या सांगत आहेत. अशा वेळेस रावणाची बहीण शूर्पणखा ही धिप्पाड राक्षसकन्या त्या परिसरात येते आणि तिची नजर रामचंद्रावर पडते आणि त्याच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने ती मोहित होते. वाल्मिकी तिचे वर्णन करताना रामाचे देखणेपण आणि तिची कुरूपता यांची खुबीदार तुलना करतात. जसे, ‘तिचे भेसूर डोळे तर प्रभूंची लोभस दृष्टी’.  शूर्पणखा रामाला या राक्षसांच्या आधिपत्याखालील प्रदेशात निवास करण्याचे प्रयोजन विचारते. राम प्रांजळपणे आपल्या वनवासाचे कारण कथन करून तिला विचारतो की, तू दिसतेस मायावी राक्षसगणातील, तर येथे कशासाठी आली आहेस आणि तुझा परिचय काय? त्यावर  शूर्पणखा उत्तरते, ”महाराज रावण आणि त्याचे महाकाय भाऊ कुंभकर्ण,  विभीषण आणि दूषण-खर यांची मी बहीण. हवे ते रूप धारण करून हवे तिथे मी संचार करू शकते. मला कुणी अटकाव करू शकत नाही. तेव्हा या खप्पड सीतेला सोड आणि माझा पत्नी म्हणून स्वीकार कर. नाही तर मी असे करते की, तिला आणि तुझ्या भावाला मारून त्यांचे भक्षण करते. म्हणजे आपला मार्ग मोकळा होईल. मग आपण दोघे या रमणीय प्रदेशात मनसोक्त विहार करू“.

प्रभू रामचंद्र तिला सौम्यपणे सांगतात की, सीता ही इतकी निष्पाप प्रेमळ पत्नी मला लाभली आहे की, तिची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. तर तू हा माझा भाऊ लक्ष्मण जो रूपगुणसंपन्न आणि तरुण आहे, त्याला आर्जव करावेस. तो सर्वार्थाने योग्य पुरुष आहे. त्याबरोबर लक्ष्मणाकडे वळून आपला स्वीकार करावा असे त्यास शूर्पणखा सांगते.

लक्ष्मण हा तिचे मायावी रूप लक्षात घेऊन चाणाक्षपणे तिला सांगतो की, मुळात मी माझ्या भावाचा दास बनून राहिलेलो आणि अशा दासावस्थेतल्या पतीची तू दासी होणार?  छे छे, तुझ्यासारख्या उच्च  कुळातल्या युवतीला हे कसे मानवावे?  त्यापेक्षा तू माझ्या भावाची धाकटी पत्नी का होत नाहीस?  तुझी कांती नितळ आहे आणि काया तर किती कमनीय! काळाच्या प्रवाहात त्याच्या पहिल्या पत्नीची गात्रे सुकून जातील आणि मग तुझ्यासम रमणीशिवाय तो जाईल कोठे?  लक्ष्मणाचे हे संभाषण उपरोधाने भरलेले आहे हे त्या राक्षसीच्या लक्षात येत नाही. आपल्या सौंदर्याविषयीचा तिचा वृथा अभिमान आणखी वाढतो व ती सावलीखाली सीतेसह विश्राम करीत असलेल्या रामचंद्राकडे जाते आणि त्याला म्हणते,  “वय सरून गेलेल्या,  तारुण्य ओसरून गेलेल्या या स्त्रीला तू अजून कवटाळून बसावेस?  यौवनाचा बहर जिच्या अंगांगावर फुलतो आहे, अशा माझ्याकडे दुर्लक्ष करावेस? नाही ते काही नाही, मी आताच्या आता या खप्पड सटवीला तुझ्या डोळ्यादेखत गिळून टाकते,  म्हणजे मग आपल्याला कुणी अडवू शकणार नाही.”  असे म्हणत ती सीतेकडे झेपावणार, इतक्यात रामचंद्र तिला अडवतात आणि मग लक्ष्मणाला बजावतात की, अशा तऱ्हेने या जंगली जमातीतील लोकांशी चेष्टा केल्याचा भयंकर परिणाम तू आताच पाहिलास. आता या हिंस्र् स्त्रीला काही ना काही प्रकारे विद्रूप केल्याशिवाय येथून जाऊ देऊ नकोस. त्याबरोबर त्वेषाने उसळून लक्ष्मण आपल्या तलवारीने शूर्पणखेचे नाक आणि कान छाटून टाकतो. शूर्पणखा वेदनेचे चीत्कार करीत जंगलात निघून जाते.

या कथानकात एक गोष्ट अधोरेखित होते. स्त्रीपुरुष संबंधात त्या काळात शारीरिक आकर्षण हे नुसते महत्त्वाचे होते असे नाही, तर कवी कथेतील पात्रांकरवी या कमनीयतेचा उच्चार करण्यास कचरत नसत. दुसरी गोष्ट वाल्मीकींच्या वर्णनातून पुढे येते ती अशी की, शारीरिक सौंदर्याच्या कल्पना यादेखील आपापल्या वंशाला धरून असतात. धिप्पाड राक्षसी ही राक्षसगणामध्ये त्यांच्या कल्पनेनुसार सुंदर असू शकते आणि तिच्यावर देवगणातील सौंदर्य कल्पना आरोपित केल्या तर  तीच कुरूप दिसू लागते. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते हे प्लेटोचे सुप्रसिद्ध वचन येथे लागू पडते. वंशश्रेष्ठतेच्या कल्पना वर्णभेदाला कसा जन्म देतात हे लक्षात येते. याला छेद देणारी कथा महाभारताच्या आदिपर्वात येते.

हिडिंब या नरभक्षक राक्षसाची हिडिंबा ही बहीण. तिच्यावर कामगिरी येते आपल्या भावासाठी पांडवांना भक्ष्य म्हणून जाळ्यात ओढण्याची. पण भीमाला पाहताक्षणी ती त्याच्या प्रेमात पडते  आणि असा विचार करते की, भक्ष्य म्हणून होणारी तृप्ती ही अल्पकाळ राहणार पण पती म्हणून याचे सहवाससुख हे प्रदीर्घ काळ आपल्याला मिळेल,  सबब भावाच्या भक्ष्याचा विचार दूर लोटलेला बरा. मग ती राक्षसगणाला अवगत असलेल्या मोहिनीतंत्राचा वापर करून लावण्यवतीचे रूप धारण करते आणि भीमाजवळ जाऊन ते सारे कोण कुठले इ चौकशी करून हिडिंब या नरभक्षक राक्षसाची आपण बहीण असल्याचे त्याला सांगते आणि आपल्यावर सोपविलेली कामगिरी उघड करते. त्याचबरोबर सांगते की, ‘तुझ्या सामर्थ्य आणि पौरुषावर मी भाळले आहे आणि कामदेवाने आपल्या मदनबाणाने मला इतके घायाळ केले आहे की, पती म्हणून फक्त तुझाच मी विचार करू शकते. म्हणून मला होकार दे, मग तुझ्या स्वजनांना माझ्या भावापासून सुरक्षित ठेवण्याची  जबाबदारी माझी.’  त्यावर भीम आपण कुठल्या राक्षसाला भीक घालत नसून त्याचा पूर्ण निःपात करण्यास आपण समर्थ असल्याचे सांगतो. तसेच ‘तू आहेस मोहक लावण्यवती, पण तुझ्यासाठी मी माझ्या कुटुंबरक्षणाच्या कर्तव्यापासून ढळू शकत नाही,  हेही तिला बजावतो.

इतक्यात हिडिंब तेथे येतो आणि आपल्या बहिणीने धारण केलेले रमणी रूप पाहून ती भीमावर अनुरक्त झाल्याचे त्याच्या लक्षात येते आणि त्याचा क्रोध अनावर होतो. कारण तिचा मोह आपल्या कार्यात अडथळा आणीत आहे असे त्याला वाटते. राक्षस आपल्या बहिणीवर चालून जाणार तेव्हा भीम त्याला सांगतो, ”या काममोहित तरुणीला कशापायी दोष देतोस?  कामदेवाने तिला घायाळ केले आहे म्हणून ती माझ्याबरोबर मिलनास उत्सुक झाली आहे.”

त्यानंतर हिडिंब राक्षसाबरोबर तुंबळ झुंज होऊन भीम त्याला यमसदनास पाठवितो. या दरम्यान हिडिंबा सर्व वृत्तांत कुंतीला कथन करते. हिडिंबच्या वधानंतर सर्व पांडव जवळच्या नगरीकडे प्रयाण करु लागतात तेव्हा ती पांडवांच्या मागोमाग जाऊ लागते. भीम तिला अडवतो आणि सांगतो की, राक्षसगणाचे मायावी कौशल्य दाखविण्याच्या भानगडीत पडशील तर तुला तुझ्या भावापाठोपाठ लगेच धाडू शकतो. इथे युधिष्ठिर मध्ये पडतो आणि भीमाची समजूत काढतो: “शरीर रक्षणापेक्षा धर्मरक्षण महत्त्वाचे आहे. जी आपल्याला इजा करू शकत नाही, तिला तू मारणार?”  त्यावर हिडिंबा कुंती आणि युधिष्ठिर यांना कामज्वराने आपण भीमावर अनुरक्त झालो असून त्याने स्वीकार न केल्यास आपला प्राणत्याग अटळ आहे असे सांगते. आणि जर कुंतीने भीमाबरोबर आपला संबंध जोडला तर, आपण त्याला आपल्या प्रदेशात घेऊन जाऊ आणि विशिष्ट काळानंतर पांडवांकडे परत आणून सोडू,  असेही वचन देते.

इथे हिडिंबा जे स्वतःविषयी सांगते,  ते लक्षणीय आहे : मी राक्षसकुळात जन्मलेली, पण सुशील आहे,  मला न जादूटोणा येतो न मी आहे निशाचर. माझी कांती देवांसारखी आहे. हे सारे ती सांगते अशासाठी की, भीमाने तिचा स्वीकार करावा. युधिष्ठिर आणि कुंती या दोघांना हे पटते आणि ते भीमाला तिचा स्वीकार करण्यास फर्मावतात आणि भीम तिच्याबरोबर वनविहारास निघून जातो. अटी दोन असतात. एक म्हणजे सूर्य आकाशात असेस्तोवर भीम हिडिंबेबरोबर राहणार आणि सूर्यास्तानंतर तो पांडवनिवासी परत येणार. दुसरे, भीम हिडिंबेला सांगतो की, ज्यावेळेस तिला भीमापासून पुत्रप्राप्ती होईल, त्यानंतर भीम हा तिच्या सहवासात राहणार नाही. पुढे भीमापासून तिला एक मुलगा होतो, त्याचे नाव घटोत्कच. त्याचे पुढे वेगळे कथानक महाभारतात येते.

दोन राजपुत्र आणि दोन राक्षसकन्यांच्या या दोन कथा  स्त्रीपुरुष तसेच देव आणि राक्षस यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकतात. दोन्हीत राक्षसकन्यांना देवगणांतील राजपुत्रांना पाहताक्षणी शारीरिक आकर्षण उत्पन्न होते. राजपुत्रांचे तेज,  सामर्थ्य आणि देखणेपण त्यांना मोहवून टाकते. आपल्या भावना त्या निसंकोचपणे व्यक्त करतात आणि पत्नी म्हणून आपला स्वीकार व्हावा अशी मागणी करतात.

पण शूर्पणखेकडे एक राक्षसकन्या म्हणून पाहिले जाते. राक्षसवंशातील म्हणून तिची शारीरिक वैशिष्ट्ये ही कुरूप ठरतात. लक्ष्मण तिची टर उडवतो,  पण त्यातही तो अपेक्षा व्यक्त करतो ती, पत्नी तारुण्यसंपन्न असावी अशी. राम मात्र पत्नी निष्पाप आणि प्रेमळ असण्याला महत्त्व  देतो. शूर्पणखा ही राक्षसी असल्याने तिला हिंस्र्र दाखविले आहे. म्हणूनच ती सीतेवर झडप घालण्यास उद्युक्त होते. लक्ष्मणाचा नंतरचा हिंसाचार हा संरक्षणात्मक असल्याने तो समर्थनीय ठरतो.

हिडिंबा मात्र आपले राक्षसपण न लपविता आपल्यात देवगणाला अनुरूप गुण असल्याचे सांगते.  त्यात आपली कांती उजळ असल्याचा उल्लेख प्रामुख्याने येतो. कामदेव हा वंशभेद न करता स्त्री पुरुषांची मने घायाळ करीत संचार करतो हेही सूचित करते. तिला संबोधताना भीम आणि युधिष्ठिर तिच्या सौंदर्याचा उल्लेख  “तन्वंगी“  असा करतात. त्यामधून राक्षसी ही सुंदर असू शकते हे वास्तव व्यक्त होते.

दोन्ही कथांमध्ये देवगणातील समूह हे राक्षसांच्या आधिपत्याखालील प्रदेशात अपरिहार्य कारणाने आलेले आहेत. राक्षस स्त्रिया देव पुरुषांकडे आकर्षित होतात पण समूह म्हणून त्यांचे संबंध हे शत्रुभावाकडे जातात आणि शेवट राक्षसांच्या पराभवात होताना दिसतो. तसा तो झाला तरी मिश्र संबंधातील संतानप्राप्तीमुळे घटोत्कचाच्या रूपाने आंतरवंशीय सरमिसळीची प्रक्रिया चालू राहते.

चित्र साभार : https://www.bonobology.com/mahabharatas-bhima-may-have-married-the-most-modern-woman-ever-find-out-who/

Comments are closed.