ऋग्वेदाच्या रचनेनंतर शे पाचशे वर्षांच्या काळात म्हणजे ख्रिस्तपूर्व ९०० ते १००० वर्षांत यजुर्वेदाची रचना होत गेली. त्यामध्ये प्रामुख्याने यज्ञ, होम हवन आदी विधी कसे करायचे याचे तपशीलवार वर्णन केले आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांनी असे दाखवून दिले की, आदिम काळातील प्रथा व पद्धती जशाच्या तशा यज्ञ प्रसंगात वापरण्यावर संहिताकारांचा भर होता. त्याचा परिणाम असा झाला की, जंगली अवस्थेतील काही लैंगिक व्यवहार हे देखील काही यज्ञ प्रकारात नाट्य रूपात वठविले जात असत. जंगली अवस्थेत अपवादात्मक परिस्थितीत स्त्रियांना पशूंसमवेत संभोग करू दिला जात असे. तो प्रकार अश्वमेध यज्ञाच्याबाबत नाट्यरूपात यजमानस्त्रिया कशा वठवीत याचे उघडेवाघडे वर्णन शुक्ल यजुर्वेद संहितेच्या तेविसाव्या अध्यायात आले आहे, ते राजवाडे यांनी उद्धृत केले आहे. आजच्या काळात अश्लील ठरणारे, अंगावर शहारे येतील असे ते वर्णन आहे. परंतु त्या काळाचा विचार करता लैंगिक व्यवहार उघड्यावरून एकांतात येण्यास सुरुवात झाल्याचा तो काळ होता. स्थायी शेती पद्धती रूढ होत असताना जमिनीची मालकी व कुटुंब संस्था अस्तित्वात येत होती आणि जोडीने लैंगिक व्यवहार नियंत्रित होत होते. लैंगिक आकर्षणाचा अमर्याद परिसर कुटुंब संस्थेच्या परिघात पूर्ण नसला तरी, काही प्रमाणात बंदिस्त होत होता. परिघाबाहेरचे लैंगिक व्यवहार कसे नियमित करायचे हा प्रश्न त्याहीवेळी समाजापुढे होता.
अंदाजे इसवी सनाच्या दुसऱ्या ते चौथ्या शतकात वात्स्यायनाने “कामसूत्र” हा ग्रंथ लिहून लैंगिक व्यवहारावर एक अनोखा प्रकाश टाकला. कामभावना, शृंगाररस आणि लैंगिक व्यवहारांवरचा जगातील सर्वात प्रसिद्ध असा हा ग्रंथ आहे. १८८९ मध्ये रिचर्ड बर्टन यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद पाश्चात्य जगापुढे आणला, तो लपत छपतच. कारण तत्कालीन व्हिकटोरीयन नीतिमत्तेच्या चौकटीत कामभावना व शृंगार याबद्दल बोलणे हे सर्वथैव त्याज्य होते. १८५७ च्या अश्लील प्रकाशन प्रतिबंध कायद्याचा फटकारा बर्टन यांनी आधीच्या “अनंग रंग” पुस्तकाच्या अनुवादावेळी अनुभवला होता. मुद्रकाने काही प्रकरणे छापून झाल्यावर काम थांबविले होते. कारण त्याला भीती वाटली की, हे पुस्तक अश्लील ठरून त्याला तुरुंगाची हवा खावी लागेल. या पुस्तकात संदर्भ दिला होता तो वात्स्यायनाच्या कामसूत्राचा. म्हणून बर्टन आणि त्याचा मित्र मुंबई इलाख्याचा मुलकी अधिकारी असलेला अर्बथनॉट या जोडगोळीने कामसूत्राची प्रत शोधण्याचा उपक्रम सुरु केला. शेवटी पंडित भगवंतलाल इंद्र यांच्याकडे ती मिळाली आणि त्यांनी केलेल्या गुजराती अनुवादावरून शिवराम परशुराम भिडे या गृहस्थांनी तिचा इंग्रजी अनुवाद सिद्ध केला. बर्टन यांनी त्यावरून हात फिरवून थोडी फार रंगसफेती केली आणि प्रकाशन करताना AFF आणि BFR या नावाने केवळ खाजगी वितरणासाठी २५० प्रती छापल्या. अश्लीलतेच्या कचाट्यात सापडू नये म्हणून हा उद्योग करावा लागला. प्रकाशक म्हणून एका कपोलकल्पित “कामशास्त्र सोसायटी” चे नाव घालण्यात आले. बर्टनने असे प्रतिपादन केले की, जी जी वास्तव तथ्ये निरीक्षणाच्या कक्षेत येतात, त्यांचा तर्कशुद्ध विचार करून जे निष्कर्ष निघतात त्यांना ‘शास्त्र ‘ म्हणून संबोधण्यात येते. मग स्त्री पुरुष संबंधांचा खासगी, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर तथ्याधारित विचार हा “कामशास्त्र” या संज्ञेस पात्र ठरावा.
पौर्वात्य विद्यांच्या अभ्यासकांना एक दुर्मिळ, चिरंतन मूल्य असणारे ग्रंथरत्न, प्रौढ रसिकांना रसराज शृंगाराचा अनमोल नजराणा आणि नीतिमार्तंडांपुढे एक शास्त्रीय अभ्यास अशा तऱ्हेची वात्स्यायनाच्या रचनेची चातुर्यपूर्ण मांडणी बर्टन बहाद्दराने केली. ब्रिटनमध्ये त्या काळात अश्लीलतेविरोधी वातावरण का तयार झाले होते याविषयी नंतर पाहू.
वात्स्यायनासमोर वाचकवर्ग आहे तो नुकत्या वाढू लागलेल्या शहरातील सुस्थितीत असलेला तरुणवर्ग, ज्याला सुसंस्कृत आणि परिपूर्ण जीवन जगण्याची इच्छा आहे! पैसे कमावण्यासाठी अनुकूल परिस्थिती, मनोरंजनासाठी उपलब्ध साधने आणि समानशील मित्र परिवार असणारा हा वर्ग आहे. धर्म, अर्थ आणि काम हे मानवी जीवनाचे तीन भाग आहेत. हे तिन्ही उद्देश सफल करायचे असतील तर पुरुषाने शास्त्राला अनुसरून, नियमांचे पालन करून आणि संयम राखून सुखप्राप्ती केली पाहिजे असा वात्स्यायनाचा दृष्टिकोन दिसून येतो.
काम म्हणजे इंद्रियसुख जे प्राप्त करून घेण्यासाठी मन पाचही इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयाच्या प्राप्तीसाठी उद्युक्त करते. जसे अंगांगाला स्पर्श, डोळ्यांना सुंदर दृश्य, जिभेला चवदार पदार्थ, कानाला सुरेल गाणे आणि नाकाला सुगंध मिळावा यासाठी मन इंद्रियांना चालना देते. स्त्री पुरुष हे एकमेकांच्या सहवासात रममाण होतात, तेव्हा देखील पंचेंद्रिये एकत्र काम करीत असतील तर सुखाची परमोच्च पातळी गाठता येते. कामसुख हा एक सर्वांगसुंदर अनुभव असला पाहिजे आणि म्हणून तो एक उच्च दर्जाचा कलाविष्कार समजला जावा. असे सौख्य मिळविणे ही एक कला आहे, त्यासाठी काही कौशल्ये अवगत करावी लागतात आणि या सर्वामागे काही अनुभवसिद्ध सूत्रे आहेत, अशी वात्स्यायनाची भूमिका आहे. काम हा मानवी जीवनाचा एक उद्देश मानला तर त्याचा परलोकाशी संबंध नसून इहलोकातील सौख्याशी तो निगडित आहे. नैतिक आचरण करून हे सौख्य मिळविता येईल, हा कामसूत्रामागील विश्वास आहे.
कामसूत्राच्या सात विभागापैकी फक्त दुसऱ्या विभागातील दहा प्रकरणात संभोगक्रियेविषयी तपशीलवार वर्णन आहे. त्यामागचा उद्देश प्रियकर-प्रेयसी यांनी परस्परांच्या सुखाकडे अत्यंत बारकाईने लक्ष द्यावे हा आहे. परंतु या दुसऱ्या भागाकडे नको इतके लक्ष गेली शंभरहून अधिक वर्षे दिले गेले आहे आणि दिले जात आहे. याचे कारण लैंगिकता आणि तिचा दैहिक आविष्कार या गोष्टी दडपून टाकण्याकडे समाजाचा कल असतो. त्याचा परिणाम असा झाला आहे की, “कामसूत्रे” म्हणजे संभोगक्रियेचे सचित्र गाईड हा समज प्रचलित होऊन बळकट झाला आहे. या भागात वात्स्यायनाने कामभावना उददीपित कशी करावी, आलिंगन, कुरवाळणे-बोचकारणे-चावे घेणे, संभोगक्रिया, पूर्वक्रीडा व उत्तरक्रीडा या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. कामसूत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तृतीय पंथीयांच्या लैंगिकतेचा उल्लेख या भागातील नवव्या प्रकरणात आला आहे. तसेच आणखी एका प्रकरणात समलैंगिकतेचा निर्देश वात्स्यायनाने केला आहे.
तिसरा भाग हा स्त्रीला पत्नी म्हणून कसे वश करून घ्यावे याबद्दल आहे. चौथा हा पत्नीची कर्तव्ये आणि अधिकार यासंबंधी आहे तर पाचवा इतर विवाहित स्त्रियांना वश करून घेण्याबद्दल आहे. परस्त्री बरोबर समागम हा धर्मशास्त्रात निषिद्ध, अर्थात पाप समजला जात असताना “कामसूत्रात” हा विषय का घेतला असावा? विवाहसंस्थेच्या उगमापासून विवाहबाह्य संबंध ही अल्पांशाने का होईना वस्तुस्थिती बनून राहिली आहे. कोणत्या परिस्थितीत असे संबंध अपरिहार्य बनतात, हे संबंधित स्त्रीपुरुषच जाणू शकतात. समाजाला मान्य नसलेल्या वर्तनाची किंमत त्यांना चुकवावी लागते. आपण हेही बघतो की, सत्ताधारी व श्रीमंत मंडळी याबाबतीत समाजाची पर्वा करीत नाहीत. सत्ता आणि संपत्ती यांच्या जोरावर हव्या त्या स्त्रीला वश करण्याच्या खटाटोपात पुरुष गुंतलेले समाजात आढळतात. गेल्या शतकातील नामवंत अमेरिकन मुत्सद्दी हेनरी किसिंगर म्हणत असत की, सत्ता ही कामोत्तेजक असते. Power is an Aphrodisiac.
आयुर्वेदात कामज्वरावर उपाय म्हणून परस्त्रीसंभोग सुचविला आहे. आधुनिक विज्ञान असे सांगते की, सत्ता आणि संभोग या दोन्हीमुळे टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकात वाढ होऊन मेंदूच्या इच्छापूर्ती जाळ्यामध्ये संदेशवाहकाची भूमिका बजावणाऱ्या डोपामाईन नामक रसायनाची क्रिया गतिमान होते. परिणामी, कामेच्छा पूर्ण करण्याची ओढ सत्ताधारी स्त्रीपुरुषाना स्वस्थ बसू देत नाही. असे पुरुष समोर ठेवून वात्स्यायनाने हा पाचवा भाग रचला असावा.
सहावा भाग हा गणिकांसाठी आहे. त्यांनी आपले वर्तन व्यवसायाला पोषक कसे होईल हे सांगण्यासाठी वात्स्यायनाने सहा प्रकरणे खर्ची घातली आहेत. पैसे घेताना तडजोड करू नये हे सांगण्याबरोबर कोणत्या प्रकारच्या पुरुषांना टाळावे, त्यासाठी कोणत्या युक्त्या वापराव्या हे सल्ले द्यायला वात्स्यायन विसरत नाही.
कामसूत्राचा गेल्या दीड शतकातला प्रवास हा प्रामुख्याने पाश्चात्य जगात झालेला आहे. आपल्याकडे इंग्रजी भाषक सुशिक्षित सोडले तर “कामसूत्रा”चा प्रसार फारसा झालेला नाही. लैंगिकतेच्या बाबतीत प्राचीन भारतात निखळ प्रामाणिकपणा होता आणि नंतरच्या मध्ययुगीन व इंग्रजी अमदानीच्या काळात त्याची जागा दडपशाहीने घेतली असा एक विचार “कामसूत्रा”च्या आधारे मांडला जातो. कामसूत्राकडे चटकदार करमणूक आणि चांगली अभिरुची वाढवणारा ग्रंथराज असे दोन्ही तऱ्हेने पाहणारे वाचक आहेत. त्यात बहुसंख्य कोण हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
एकूण प्राचीन काळी भारतात “सुवर्णयुग “ होते, स्त्रियांना स्वातंत्र्य व समानता होती आणि लैंगिक व्यवहारात मोकळेपणा आणि स्वीकार होता, असे चित्र रिचर्ड बर्टनच्या “कामसूत्रा”च्या अनुवादातून पुढे येत होते. परंतु प्राचीन भारताची म्हणून सांगितलेली सर्व वैशिष्ट्ये ही आज अभ्यासकांच्या वर्तुळात विवाद्य समजली जातात. विशेषतः कामसूत्राकडे बारकाईने पाहिले तर हे लक्षात येते की, वात्स्यायनाने स्त्रियांची गणना आणि विभागणी त्यांच्या पुरुषांबरोबरच्या लैंगिक संबंधानुसार केली आहे. स्त्रीपुरुष समानतेच्या तत्त्वावर “कामसूत्र” रचलेले नाही.
स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य मिळाले तर पुरुषांची अधिसत्ता धोक्यात येईल, या जाणिवेने त्यांच्यावर लैंगिक बाबतीत निर्बंध लादण्याचे प्रयत्न इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात होऊ लागले. औद्योगिक क्रांतीनंतर मुद्रण, पुस्तक प्रकाशन, शिक्षण प्रसार या क्षेत्रातून स्त्रियांसाठी ज्ञानाची कवाडे उघडी झाली. स्त्रिया शैक्षणिक आणि सेवा क्षेत्रात सहभाग घेऊ लागल्या. लैंगिक आकर्षण ज्यायोगे वाढेल असे सर्व आचार विचार नियंत्रणाखाली आणण्यासाठी अश्लील प्रकाशन प्रतिबंध कायदा हा १८५७ मध्ये मंजूर करण्यात आला. तसे केले नाही तर लैंगिक आकर्षणाच्या जोरावर स्त्रिया पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढतील ही भीती धर्म मार्तंडांना कायम वाटत आली आहे. “कामसूत्रे” इंग्रजीमधून खाजगी वितरणासाठी प्रकाशित करण्यात बर्टनचा हेतू इंग्लंडमधील लैंगिकतेबद्दलच्या दृष्टिकोनाला धक्का देणे हा होता.
“कामसूत्र” उल्लेखनीय ठरते ते दोन गोष्टींसाठी – स्त्रियांना कामेच्छा असतात, हे फार पूर्वी भारतात ओळखण्यात आले आणि दुसरे म्हणजे वात्स्यायनाने कामव्यवहाराकडे पाहण्याची एक वेगळी सौंदर्यदृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न केला.
2 Responses
खुपच सुंदर माहीती आहे
धन्यवाद सर, आपण केलेल्या कौतुकामुळे आम्हाला काम करायला उर्जा मिळते.
असेच वेबसाईटवर प्रेम करत राहा अन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोहोचवा.