मासिक पाळी कधी येणार किंवा अन्डोत्सर्जन कधी होणार हे आपलं आपल्याला समजू शकतं असं तुम्हाला जर कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? किंवा मासिक पाळीच्या चक्रामध्ये गर्भधारणा नेमकी कधी होऊ शकते हे कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय समजू शकतं हे तुम्हाला खरं वाटेल का?
हे पूर्ण खरं आहे. आपल्या मासिक पाळीच्या चक्रात काय होतंय, गर्भधारणा कधी होणार असं सगळं आपल्याला समजू शकतं. फर्टिलिटी अवेअरनेस म्हणजेच जनन जागरुकता हे स्वतःचं शरीर, संवेदना आणि शरीराच्या प्रतिक्रिया समजून घेण्याचं एक कौशल्य आहे. स्वतःच्या शरीरातले सूक्ष्म बदल आणि खुणा, जाणिवा, भावना आणि संवेदना समजून घेणं, स्वतःची लैंगिकता आणि जननक्षमता याबाबत जागरुक असणं म्हणजे फर्टिलिटी अवेअरनेस किंवा लैंगिकता व जनन जागरुकता.