त्या दुपारी आकाशला त्याच्या कॉलनीत राहणाऱ्या काही छोट्या दोस्तांनी थांबवलं. ही सगळी मुलं त्यांच्या लहानपणापासून त्याचे दोस्त असले तरी आता ते मोठे झाले होते… मोठे म्हणजे सोळा सतरा वर्षांचे…. त्यांच्यातलं कोणी अकरावीत होते तर कोणी बारावीत… आणि ते कॉलेजमध्ये जायला लागल्यापासून गेल्या कित्येक महिन्यात त्यांच्या निवांत अशा भेटीगाठी होत नव्हत्या…आकाशला पण काम असायचं…तो लहान मुलांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओचा कार्यकर्ता होता आणि द्विपदवीधर झाल्यानंतर आता एमबीए पण करत होता. पण त्याहीपेक्षा या मुलांना त्यांच्या मनातलं हवं ते शेअर करण्यासाठी तो त्यांचा हक्काचा ‘आकाशदादा’ होता. त्यामुळे आता या सगळ्यांना बघताच त्याने गमतीने विचारले.
“अरे, काय विशेष? आज सगळी दोस्त मंडळी एकदम गठ्याने माझ्याकडे कशी काय?”
“आम्हाला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे….तुला वेळ आहे का?” मुलांनी गंभीरपणे विचारलं.
आकाश खरं तर काहीतरी चेष्टेत बोलणार होता पण सगळ्यांचे गंभीर चेहरे बघून त्याने स्वतःला आवरलं.
“हो…हो…तुमच्यासाठी मला नेहमीच वेळ असतो, तुम्हाला माहीत आहे ना? बोला, काय बोलायचं ते सांगा…”
मुलांना खूप प्रश्न आणि शंका होत्या आणि त्यामुळे कुठेतरी निवांत बसून त्यांना बोलायचं होतं. आकाशने मग त्यांना आपल्या घरीच बोलावलं. तसेही आता यावेळी त्याच्या घरात त्याचे आई, बाबा, बहीण कोणी नसायचं आणि आजोबा आपल्या खोलीत विश्रांती घेत असायचे. सगळे आकाशच्या घरात आले आणि चुळबुळत एकमेकांकडे बघायला लागले.
“अरे, बोला ना…तुम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे ना?” आकाशने सुरुवात केली.
पण कोणालाच विषय कसा सुरु करायचा ते समजत नव्हतं. या दोस्तांमध्ये काही मुली पण होत्या. त्यांच्याकडे बघत आकाश म्हणाला, “ऋजुता, मीरा, अनन्या, सई…तुम्ही तरी बोला.”
ऋजुता जरा धीर करून म्हणाली, “आकाशदादा, आम्ही जसं कॉलेजमध्ये जायला लागलो ना तसं सगळंच बदलायला लागलंय…”
“म्हणजे?”
“म्हणजे तू आम्हाला आम्ही मोठं होत असताना वेळोवेळी मार्गदर्शन केलं, मोठं होणं म्हणजे काय ते समजावून सांगितलं, आमच्या शरीरातले, मनातले होणारे बदल आम्हाला सांगितले, मुला-मुलींमध्ये हेल्दी मैत्री असू शकते हे पण सांगितलं…त्यामुळे आम्ही सगळे जण खूप मोकळे झालो पण आम्ही कॉलेजमध्ये गेलो आणि…”
आता अक्षयला पण त्याला काय म्हणायचं ते सापडलं, “हो, रे दादा…आम्ही कॉलेजमध्ये जायला लागलो, जातोय…पण तिथं मात्र सगळंच बिनसल्यासारखं वाटतंय…”
“असं झालंय तरी काय?” आकाशने काळजीने विचारलं…
मग सगळ्याच मुलांनी आवेगाने, जोशाने आणि उत्कटतेने त्याला जे काही सांगितलं त्यावरून आकाशला कळले की कॉलेजमध्ये त्यांना जे काही मित्र मैत्रिणी मिळाले होते, त्यांच्यात आणि या मुलांच्यात वैचारिकदृष्ट्या खूप अंतर होतं.
त्या मित्र मैत्रिणींचे कोणी ना कोणी गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड होतेच, काही जणांनी या पण मुला-मुलींशी ते नातं जोडण्याचा प्रयत्न केला होता पण या मुलांनी त्याला सभ्यपणे नकार दिला होता. त्यामुळे मग त्यांना बरेच टॉन्ट आणि टॅग मिळाले होते. या मुलांनी पण त्यांच्या ग्रुपमध्ये सामील व्हावं म्हणून त्यांच्यावर प्रेशर आणायचा प्रयत्न केला होता. गोष्टी आता एवढ्या पुढे गेल्या होत्या की या मुलांनी अजून सेक्स केला की नाही हे पण ही मुलं विचारत होती आणि केला नाही हे कळल्यावर यांची हेटाई सुरु झाली होती.
अर्थात त्या ग्रुपमधली काही मुलं मुली अशीही होती की गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असूनही त्यांनी अजून सेक्स केला नव्हता. पण त्यांनाही सेक्स करण्याची इच्छा होती. फक्त त्यांच्या मनात सध्या हा गोंधळ होता की, सेक्स करावा की करू नये? केला तर कधी करावा? सेक्स करण्याचं काही विशिष्ट वय असतं का?
आता हा विषय बोलला जातोय म्हटल्यावर सगळीच मुलं जरा मोकळी झाली. सिद्धार्थ म्हणाला, “आकाशदादा, माझा एक क्लासमेट मित्र तर केव्हापासून मला सारखा विचारतोय की, माझी गर्लफ्रेंड दहावीत आहे. आमचं गेले एक वर्ष प्रेम चालू आहे. मी तिच्या बरोबर सेक्स करू का ? आम्ही दोघे फिरायला जातो तेव्हा किस् आणि इतर गोष्टी करतो. तिचे वय अजुन 18 पूर्ण नाही. पण तिची तब्येत चांगली आहे. मी तिच्याबरोबर सेक्स केला तर काही प्रॉब्लेम नाही ना येणार ? ती माझ्याबरोबर सेक्स करायला तयार आहे.”
“आकाशदादा,” आता आनंदला पण जरा जोर आला, “आमच्या कॉलेजच्या ग्रुपमधला एक मित्र मला पण सेम असंच विचारत असतो…त्याच्या नात्यातली एक मुलगी म्हणे त्याच्या मागे लागलीये, ती त्याला सेक्ससाठी विचारत असते. माझा हा मित्र सतरा वर्षांचा आहे आणि ती सोळा वर्षांची आहे…त्याचं म्हणणं आहे, ती त्याला सारखं प्रोव्होक करत असते. तिच्या अंगाला हात लावायला सांगत असते…आणि…आणि…” आनंद जरा अडखळला…
“बोल, बोल…” आकाशने त्याला धीर दिला. “इथे आपणच तर आहोत आणि मी तुम्हाला या बाबतीत बोलायला कधीही लाजायचं नाही असं मागेच माहिती देताना सांगितलंय…हो, ना…”
“हो…” आनंद म्हणाला, “पण ही गोष्टच अशी आहे ना, म्हणजे ती मुलगी त्याला जे करायला सांगते, ते त्याने मला खूप ओपनली सांगितलंय…आणि असं वाटतं आपण एका मुलीची बदनामी तर करत नाही ना? कारण मी काही तिला ओळखत नाही…”
“डोन्ट वरी, तू फक्त तो काय म्हणतो आहे ते मला सांगतो आहेस…आणि आपल्याला ते कळायला तर हवंय ना, तरच आपल्याला त्याला मदत करता येईल नाही का?”
“ओके, सांगतो…मित्र म्हणतो की ती त्याला सारखे तिचे स्तन पकडायला सांगते…मित्र तिला खूप समजावतो पण ती ऐकत नाहीये. त्यामुळे तो मला सारखा विचारतोय की मी तिच्या बरोबर सेक्स करू का?” आनंद एका दमात म्हणाला…
हे ऐकल्यावर सगळीच मुलं थोडी कावरीबावरी झाली. आकाशने सगळ्यांना धीर दिला.
“ओके, ओके…म्हणजे यासाठीच तुम्ही सगळे काळजीत होता आणि म्हणून मला भेटायचं होतं?” आकाशने विचारलं.
“हो…” सगळ्यांनी एका सुरात माना डोलावल्या…
“ठीके, आपण बोलू या विषयावर…” आकाशने त्यांना आश्वासन दिलं… “आणि अगदी डिटेलमध्ये प्रत्येक मुद्दा घेऊन बोलू…तुम्हाला काही शंका असल्या तर त्याही तुम्ही विचारा…”
मुलांनी माना डोलावल्या.
“सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचे हे मित्र म्हणतात की आम्हाला सेक्स करायचा आहे तेव्हा त्यांना खरोखरच तो करायचा आहे का हे त्यांनी आपापल्या मनाशी अगोदर तपासून बघायला हवं….” आकाशने सुरुवात केली.
“म्हणजे?” सईने विचारलं, “त्यांना करायचा असतो म्हणूनच ना ते तसं म्हणतात…माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी पण असंच म्हणत असतात…नाही का ग?” तिने ऋजुता, मीरा, अनन्याकडे बघितलं.
त्या ‘हो’ म्हणाल्या. आकाश जरासा हसला…
“मित्रांनो, सेक्स करायचा आहे असं म्हणणं आणि तो करण्याची खरंच इच्छा आहे का हे बघणं यात फरक आहे. असं बघा, मोठं होत असताना जसे शरीरात आणि मनात बदल व्हायला लागतात तसं काय, काय होतं हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. आपण मोठे व्हायला लागतो तेव्हा काही खास लोक आपल्याला आवडायला लागतात. आपण जेव्हा त्यांच्याबरोबर असतो किंवा त्यांचा विचार करत असतो तेव्हा आपल्या शरीरात ‘कुछ – कुछ’ व्हायला लागतं. मग अशावेळेस आपण एकमेकांशी नुसतं बोलून, कधी हातात हात घेऊन, कधी नुसतं शेजारी बसून तर कधी एकमेकांच्या अवयवांना स्पर्श करून, कधी चुंबन घेऊन, कधी मिठी मारून आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाटतंय ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे सेक्सचा एक भाग आहे पण हे म्हणजे सेक्स नाही.
त्यामुळे जर दोन जोडीदार आपापसात या गोष्टी करत असतील तर याचा अर्थ हे दोघे सेक्स करायला तयार आहेत असा होत नाही. त्याला जर एका किंवा दोन्ही जोडीदारांनी संमती समजली तर गोंधळ होण्याची शक्यता असते. ते या गोष्टी करतात याचा अर्थ दोघे एकमेकांबरोबर खूश आहेत, कम्फर्टेबल आहेत असाही बऱ्याचदा असू शकतो. सेक्स ही खूप आनंद देणारी, स्पेशल, पण गुंतागुंतीची आणि कधी कधी आपल्याला खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. म्हणूनच बघा ना, जेव्हा तुमचे मित्र मैत्रिणी तुम्हाला आम्ही सेक्स करू का असं विचारतायेत याचाच अर्थ त्यांच्या मनाची अजून तयारी झालेली नाहीये. कोणतीतरी गोष्ट, भीती, प्रेशर त्यांना मागे खेचते आहे. ही गोष्ट, भीती, प्रेशर काय आहे याचा त्यांनी नीट विचार करायला हवा.”
क्रमश:
( या लेखाचा पुढील भाग ६ ऑक्टोबर रोजी प्रकाशित होईल. )
चित्र साभार: www.wikihow.com
No Responses