गोष्ट शरीराची… मनाची… सत्र ५.

0 1,014

लिंगभाव

या सत्रात मुला-मुलींनी, स्त्री-पुरुषांनी कसं असावं यासंबंधीचे समाजात असणारे काही नियम, कल्पना मांडून त्याबाबत चर्चा केली आहे. मुलगी म्हणजे नाजूक, मुलगा म्हणजे शूर. मुली प्रेळ, माया करणाऱ्या तर मुलं रागीट, तापट. मुलींसाठी भातुकली आणि मुलांसाठी क्रिकेट. स्त्री म्हणजे सुंदर, घरची लक्ष्मी, पुरुष म्हणजे कर्ता, जबाबदार… अशा अनेक अलिखित नियमांचा मागोवा घेत असतानाच मुला-मुलींना स्त्री-पुरुषाच्या शरीरात असणाऱ्या सारखेपणाची आणि फरकांची माहिती देण्यात आली आहे. पण समाजात केल्या जाणाऱ्या लिंगाधारित भेदभावाला मात्र हे फरक कारणीभूत ठरू शकत नाहीत हेही ठामपणे मांडण्यात आलं आहे. या भेदांचा उगम फार दूर जाऊन उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारे समजून घेता येतो. काळाच्या ओघात स्त्रियांकडे घर सांभाळण्याची आणि मुलांना वाढवण्याची भूमिका कशी आली असेल याचा मुलांसोबत विचार करता येतो.

लिंगभेदामुळे मुलगा-मुलगी, स्त्री-पुरूष दोघांवरही मर्यादा येतात. त्याचे परिणामही त्यांना सहन करावे लागतात. पण मुलांच्या तुलनेत मुलींवर फार मोठ्या प्रमाणावर बंधनं घालण्यात येतात. त्याचा सर्वच बाबींवर परिणाम होतो. काय खायचं, कसं रहायचं, काय कपडे घालायचे, सगळ्यावरच. काय शिक्षण घ्यायचं यावरही त्याचा परिणाम होत असतो. स्त्रियांसाठी उपलब्ध करिअर, नोकऱ्या, त्यातील मोबदला/पगार आणि पुढे जाण्याच्या संधी या सर्वांचाच लिंगभावाशी संबंध असतो. अगदी जन्माआधी लिंगनिवडीपासून ते वाढीच्या वयापर्यंत आणि पुढेही हे होतच असतं. खेळ, करमणूक, विश्रांतीबाबत हे भेद होतच राहतात. मोठेपणी कामाच्या ठिकाणी आणि लग्नाबाबतही स्त्रियांना हा दुय्यम दर्जा अनेकदा सहन करावा लागतो.

वयात येताना मुलं जिज्ञासू बनत असतात. शरीरात, मनात बदल होत असतात आणि त्याबद्दल ते सतत काही ना काही प्रश्र्न विचारत असतात. पण अगदी याच काळात त्यांना जास्त बंधनं सहन करावी लागतात. मुलग्यांशी बोलू नका, पाळी आली ना… आता काही पदार्थ खाऊ नका, बाहेरही जास्त वेळ राहू नका, इत्यादी. याच काळात अभ्यासाचा आणि चांगले गुण मिळवण्याचा ताणही असतो. मुलांना जरा जास्त स्वातंत्र्य, मोकळीक मिळते. पण जे मुलगे मुलगा असण्याच्या, धाडसी, शूर, रफ ऍण्ड टफ अशा चौकटीत बसत नाहीत त्यांना मात्र या काळात खूप त्रास होऊ शकतो. त्याचा त्यांच्या स्वप्रतिमेवर आणि आत्मविश्वासावर परिणाम होत असतो. म्हणूनच लिंगभेद काही अदृश्य सामाजिक प्रश्न नाहीये. आपल्याला सर्वांनाच आणि आपल्या मुलांनादेखील त्याचे परिणाम भोगावे लागत असतात. आपल्या क्षमतांचा पूर्ण विकास करायचा असेल तर आपल्याला हे भेद, ही बंधनं पार करून पुढे जायला हवं. अगदी लहान वयापासूनच आपण समानतेची कास धरायला हवी. पालक, शिक्षक, संवादक म्हणून आपण मुला-मुलींना समानतेनं वागवायला सुरूवात केली पाहिजे.

कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्याबाबतच्या धारणा फार कमी वयात शिकल्या जातात. पण अगदी लहानपणापासून जर लिंगभेदाला विरोध केला, त्याबाबत मुलांच्या मनात प्रश्न उभे केले तर तेही त्याचा सारासार विचार करू शकतात आणि घरात तसेच घराबाहेर बदलांना सुरूवात करतात. घरी आईला स्वयंपाकात, घरकामात मदत करणं किंवा बहिणीला अभ्यासात मदत करणं, खेळात सहभागी करून घेणं तर घराबाहेर छेडछाडीचा, हिंसेचा उघडपणे विरोध करणं आणि स्वतःचं काम स्वतः करणं असे बदल मुलं-मुली करू लागतात.

एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे लिंगभेद सर्व जाती-धर्मात, गरीब-श्रीमंतात आणि सगळ्याच समाजांमध्ये होत असतात. आमच्या घरी असं काही नसतं किंवा आमच्या समाजात काही असं करत नाहीत अशी अनेक उत्तरं मुलांकडून येतात. काही परिस्थितीत हे भेद स्पष्टपणे, उघडपणे दिसून येतात तर काही ठिकाणी ते फारच नकळत होत असतात.

समज-गैरसमज तथ्य
मुलगे शक्तिशाली असतात तर मुली नाजूक असतात. मानवाच्या उत्क्रांतीत स्त्रिया आणि पुरुषांध्ये काही फरक झाले आहेत. शरीराच्या आकारात, ठेवणीत आणि रचनेत झालेले फरक काम, आहार इत्यादी परिस्थितीतून झाले आहेत.

पण एकूण पाहता, सगळे पुरुष सगळ्या स्त्रियांपेक्षा ताकदवान नसतात. काही स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त वजन उचलू शकतात, वेगात पळू शकतात किंवा चांगलं खेळू शकतात. मुलगे आणि मुलींमध्ये जन्मतः सारख्याच क्षमता किंवा कौशल्ये असतात. जर मुला-मुलींना शिक्षणाच्या, आहाराच्या, खेळाच्या, विश्रांतीच्या सारख्या संधी मिळाल्या तर त्यांच्या क्षमता आणि कौशल्यं सारखेपणानं विकसित होऊ शकतात.

म्हणूनच सरसकट सगळे मुलगे ताकदवान असतात आणि सगळ्या मुली नाजूक अशी धारणा करणं गैर आहे. त्यातही ताकद म्हणजे फक्त शरीर सौष्ठव किंवा स्नायूंची ताकद नसते. डोक्यावर पाण्याचे घडे किंवा जळणाचा भारा रोजच्या रोज वाहून नेणाऱ्या स्त्रिया आपण सगळीकडे पाहतो. यासाठी ताकद लागत नाही? पण या कष्टाला ताकदीचं काम मानलं जात नाही. उलट त्या नाजूक असतात या धारणेुळे त्या पुरुषांपेक्षा कमी काम करतात असं गृहित धरून त्यांना मजुरी/मोबदला कमी दिला जातो. अशा सरसकट धारणांमुळे मुली किंवा मुलग्यांबाबत साचेबद्ध प्रतिमा तयार होतात. त्यातून फायदे तर नाहीतच पण तोटेच अधिक होतात.

 

संदर्भ : वरील संपादित सत्र तथापि ट्रस्टच्या ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या अंध किशोरवयीन मुला-मुलींसाठी (१०-१६ वयोगट) प्रकाशित केलेल्या संचातील पालक व शिक्षकांसाठीच्या मार्गदर्शिकेतील आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.