गोष्ट शरीराची… मनाची… सत्र ६.

0 1,145

वयात येताना

वयात येताना किंवा मोठ्ठं होताना शरीरात जसे बदल घडतात तसेच अनेक बदल आपल्या मनात घडत असतात. या काळात स्वतःची स्वतंत्र ओळख तयार होत असते. आपला स्वभाव, आपल्या आवडी-निवडी, आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं या सर्वांचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. त्यामुळे याबाबत जागरूक असणं गरजेचं आहे. स्वतःबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल माझ्या काय कल्पना आणि भावना आहेत हे समजून घेतलं तर स्वतःला समजून घेणं सोपं जातं. आपलं शरीर, दिसणं, असणं या सगळ्याचा स्वीकार केल्यामुळे आपण स्वतःबद्दल मोकळे होऊ शकतो. आपल्या स्वभावातल्या काही बाबी, जसं राग, लाजाळूपणा आपल्याला आवडत नाहीत. या सर्व बाबी आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं आणि आपण स्वतःबाबत कसा विचार करतो यावर परिणाम करतात.

इतर लोक आपल्याला काय म्हणतात यावर अनेकदा आपली स्वतःबद्दलची प्रतिमा अवलंबून असते. त्यामुळे समाजातल्या प्रचलित प्रतिमांप्रमाणेच आपण स्वतःबद्दल विचार करायला लागतो. त्याचा कधी कधी आपल्या स्व प्रतिमेवर विपरित परिणाम होतो. अपंगत्व असणाऱ्या मुलांबाबत हे अधिक प्रकर्षाने घडतं. अपंगत्वाबाबत आपल्या समाजात अजून जास्त संवेदनशीलता येण्याची गरज आहे. शरीराबद्दलच्या साचेबद्ध कल्पनांमुळे अपंगत्व असणाऱ्या मुला-मुलींना टीकेला सामोरं जावं लागतं. त्याचाही त्यांच्या स्व प्रतिमेवर विपरित परिणाम होऊ शकतो.

वयात येतानाच्या काळात याबाबत आपण जास्त संवेदनशील असणं आवश्यक आहे. कारण याच काळात मुलांना त्यांच्याविषयी जास्त चांगलं वाटण्याची गरज असते. वयात येणं हा निसर्गनियम आहे. प्रत्येक सजीवाच्या वाढीच्या अवस्था / टप्पे असतात. प्रत्येक टप्प्याचे काही ना काही वैशिष्ट्य असते. कुमारवय ही मूल ते तरूण होण्याची प्रकिया आहे. वयात येण्याच्या या काळाला कुमारवय म्हणतात. मुलांच्या तुलनेत मुली लवकर वयात येतात. मुलग्यांसाठी हा काळ साधारणपणे 11 ते 15 वर्षे आहे तर मुलींसीठी हा काळ 9 ते 13 वर्षे असा आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार यात थोडाफार बदल होऊ शकतो.

वादळी म्हणून ओळखला जाणारा हा काळ मुला-मुलींमध्ये भावनिक आंदोलनं निर्माण करतो. मुख्यतः व्यक्ती म्हणून स्वत्वाची जाणीव होण्याचा हा काळ असतो. बदलत्या शरीराबरोबरच मनही बदलतं. आतापर्यंत शिकलेली सर्व कौशल्यं, विचार, पद्धती परत जोखून नव्याने तयार होत असतात. आणि त्यातून नवा स्वभाव घडत असतो. शरीरात अनेक बदल झपाट्याने होतात. उंची,  वजन वाढणे,  हाडांना,  स्नायूंना मजबूती येणे,  खूप भूक लागणे,  मुरूम-पुटकुळ्या येणे,  शरीराचा आकार बदलणे,  काखेत, जांघेत केस येणे असे बदल मुलगा व मुलीत सारखेच होतात. पण काही बदल फक्त मुलग्यांमध्ये होतात तर काही मुलींमध्ये होतात. आवाज फुटणे,  दाढी – मिशा येणे,  वृषणांची वाढ होणे,  वीर्य तयार व्हायला सुरुवात होणे,  झोपेत कधी तरी वीर्य बाहेर येणे हे बदल मुलग्यांमध्ये होतात. मुलींमध्ये शरीराला गोलाई येणे, स्तनांची वाढ,  मासिक पाळीची सुरूवात असे बदल दिसून येतात.

स्वतःच्या आणि इतरांच्या शरीराबाबतचं आकर्षण,  भिन्नलिंगी किंवा समलिंगी व्यक्तीबाबतचं आकर्षण, चिडचिड होणे, राग येणे, आई-वडिलांशी न पटणे,  मित्र-मैत्रिणींसोबत जास्त काळ घालवावासा वाटणे असे मानसिक बदल दिसून येतात. क्षणात एक मूड तर क्षणात दुसरा मूड असणे,  टोकाच्या भावना,  एकटं रहावंसं वाटणे,  धाडसी वृत्ती,  कुणाशीच न पटणे असे भावनिक बदल जाणवतात. हे सगळे बदल नैसर्गिक आणि स्वाभाविक आहेत.

याबद्दल मोकळेपणाने बोललं जात नाही. त्यामुळे कुमारवयातील बदलांना सामोरे जाताना निर्माण होणाऱ्या उत्सुकता,  भीती,  अपराधीपणा,  राग,  गोंधळ अशा भावना मुलांना हाताळता येत नाहीत. त्यातून अनेक समस्या उभ्या राहतात. शारीरिक,  मानसिक वाढीच्या या टप्प्याची शास्त्रीय माहिती मुलांना योग्य पद्धतीने दिली गेली तर पुढे उद्‌भवणाऱ्या समस्यांचे प्रमाण कितीतरी पटीने कमी होईल.

विशेषतः मुलींची पाळी सुरू झाली की त्यांच्यावर अनेक सामाजिक बंधनं लादली जातात. ज्या काळात नवनव्या गोष्टी पाहण्याची आणि जाणून घेण्याची ऊर्मी तयार होते त्याच वयात त्यांच्यावर अनेक बंधनं लादली जातात. शिक्षण बंद केलं जातं किंवा खेळ, विशेषतः मैदानी खेळांमध्ये भाग घेण्याबद्दल आक्षेप घेतला जाऊ शकतो. यामुळे मुलींच्या मनात पाळीबद्दल आणि एकूणच मोठं होण्याच्या प्रकियेबद्दल नकारात्मक विचार तयार होऊ शकतात. ते दूर व्हावेत,  पाळी आणि वयात येण्याच्या प्रकियेबद्दल शास्त्रीय माहिती मिळावी, त्याबद्दलचे प्रश्र्न विचारण्याची, एखादा आजार झाला असल्यास त्यावर उपाय करण्याची तयारी व्हावी या दृष्टीने या विषयांवर मुला – मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणं आवश्यक असतं.

 

समज-गैरसमज

तथ्य

मासिक पाळी विटाळ, घाण, पाप, अपवित्र आहे. मासिक पाळीच्या काळात शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर टाकलं जातं. हा गैरसमज आहे. बाळाच्या जन्मासाठी निसर्गाने केलेल्या अनेक गोष्टींपैकी मासिक पाळी ही एक शरीरप्रकिया आहे. गर्भधारणा झाली तर गर्भाच्या पोषणासाठी दर महिन्याला स्त्रीच्या गर्भाशयात रक्ताचे अस्तर तयार होत असते. जेव्हा या रक्ताच्या अस्तराची शरीराला गरज नसते (म्हणजेच जेव्हा गर्भधारणा होत नाही) त्यावेळी हे रक्त मासिक पाळीच्या रूपात ठराविक काळाने योनिमार्गातून बाहेर टाकले जाते. गर्भधारणा झाली तर या अस्तरावरच बाळाचे पोषण होणार असते. मग ते रक्त घाण किंवा अशुद्ध कसे असू शकेल? म्हणूनच मासिक पाळी विटाळ, घाण, पाप, अपवित्र नसून ती बाळाच्या वाढीसाठी केलेली शरीरातील योजना आहे.
वाईट विचारांमुळे झोपेत वीर्य बाहेर येतं. हा गैरसमज आहे. वीर्य बाहेर येणं हे केवळ लैंगिक स्वप्न किंवा लैंगिक भावनेमुळे होतं असं नाही. वयात येताना (कुमारवयात) असं व्हायला लागतं.

 

आपण काय शिकलो?

1.    समाजातील साचेबद्ध प्रतिमा आपल्या स्व प्रतिमेवर परिणाम करत असतात. मात्र आपण आपली स्वतःची प्रतिमा इतरांच्या मतांवर अवलंबून ठेवता कामा नये.

2.    वयात येणे ही निरोगी शरीरप्रकिया आहे. वयात येताना आपल्या शरीरात आणि मनात अनेक बदल होतात.

3.    मुलांच्या आणि मुलांच्या शरीरात वयात येतानाच्या काळात काही शारीरिक आणि मानसिक बदल व्हायला लागतात.

 

संदर्भ : वरील संपादित सत्र तथापि ट्रस्टच्या ‘गोष्ट शरीराची… मनाची…’ या अंध किशोरवयीन मुला-मुलींसाठी (१०-१६ वयोगट) प्रकाशित केलेल्या संचातील पालक व शिक्षकांसाठीच्या मार्गदर्शिकेतील आहे. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.