कौमार्य चाचणीची ऐशीतैशी! – प्रियंका तमाईचेकर

1,403

कंजारभाट या भटक्या जन जाती प्रवर्गात येणाऱ्या समाजातल्या ‘मुलींची’ लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची परंपरा आजही चालू आहे. ती ‘खरी’ की ‘खोटी’ ठरवण्याची पद्धत आजतागायत पाळली जाते. या कुप्रथेविरुद्ध या समाजातल्याच काही तरुणांनी आवाज उठवायला सुरुवात केली. त्यासाठी समाजातल्याच लोकांच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस त्यांना करावं लागत आहे, त्यासाठी त्यांना मारहाणही झाली आहे. या देशातल्या लोकांनी आपल्यापाठी उभं राहावं, असं आवाहन हे तरुण करत आहेत. आपल्या समाजातलं हे जळजळीत सत्य कंजारभाट समाजातल्याच एका तरुणीच्या शब्दांत…

मी प्रियंका (२६) राहणार पिंपरी पुणे. स्वतंत्र भारत देशाची  नागरिक. लहानपणापासून आमच्या कंजारभाट समाजातील अनेक प्रथा बघत मोठी झाले. तेव्हा अर्थ कळायचे नाहीत, पण जसजशी मोठी होत गेले तसतशा कुठल्या प्रथा कशासाठी हे लक्षात येऊ लागलं. त्यापैकी एक कुप्रथा म्हणजे कौमार्य चाचणी! जी मी फक्त आमच्या समाजात पाहिली. वय लहान असल्याने ही परीक्षा नेमकी काय, कशासाठी हे कळत नसायचं. लग्न तर होतच होती, पण कधी त्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी  बिर्याणी खायला घातली जायची तर कधी मुलीला मारहाण केली जायची. नंतर कळलं की बिर्याणी खायला घालणं हे कौमार्य परीक्षा पास झाल्याचं लक्षण तर मारहाण म्हणजे कौमार्य परीक्षेत नापास होणं!

लग्न झालं की त्या रात्री नवरा पांढरीशुभ्र चादर घेऊन नवरी असलेल्या खोलीत जातो. बिछान्यावर ही चादर पसरली जाते. शरीरसंबंध झाला की त्या चादरीवर रक्ताचा डाग पडणं सक्तीचं. ते झालं नाही की ती नवरी ‘खोटी’. जे काही असेल ते घेऊन तो नवरा मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीच्या बाहेर येतो. पंच मंडळी निवाडय़ाला बसलेलीच असतात. ते विचारतात, ‘रात्री जो माल तुला दिला होता, तो कसा? खरा की खोटा?’ इतक्या गलिच्छ भाषेत त्या नव्या नवरीचा अपमान केला जातो, आजही एकविसाव्या शतकात!

ज्या क्षणी मला या चाचणीविषयी कळले, तेव्हा मला धक्काच बसला. शाळेत शिकलेलं स्त्री-पुरुष समानतेचं मूल्य आठवलं आणि प्रश्न निर्माण झाला की इथे समानता कुठे आहे?  तेव्हाच ठरवलं की एके दिवशी मी या घाणेरडय़ा प्रथेचा विरोधात पाऊल उचलणार. आज मी या प्रथेविरोधात आवाज उठवला आहे आणि सुदैवाने माझ्यासारखा विचार करणारे अनेक तरुण-तरुणी या समाजात आहेत आणि माझ्या साथीला उभे आहेत. खरे तर अनेकांना आमच्या बरोबर यायचं आहे परंतु कुटुंबाच्या दबावामुळे आणि समाजातील लोकांच्या भीतीमुळे ते समोर येऊ शकत नाहीयेत. पण मला खात्री आहे, हळूहळू सगळ्यांनाच आमच्यावरच्या या अन्यायाचं सत्य कळेल आणि तेही आमच्याबरोबर उभे राहतील.

अर्थात यासाठी समाजातल्या लोकांचा आणि काही नातेवाईकांचा प्रचंड विरोध आहे. माझ्या वस्तीमध्ये राहणारे लोक सध्या अशा पद्धतीने बघतात किंवा वागतात की मी एखादा गुन्हाच केला आहे. याची शिक्षा माझ्या भावालाही झालीय. वस्तीत होणाऱ्या क्रीडास्पर्धामध्ये त्याला भाग घेऊ दिला जात नाहीये. थोडक्यात, आमच्या जातपंचायतीने बहिष्कृत करण्याआधी समाजातले लोकच मला आणि माझ्या कुटुंबाला बहिष्कृत केल्यासारखे वागवत आहेत. या गोष्टीचं फार वाईट वाटतं की, ज्या समाजातल्या मुलींच्या स्वाभिमानासाठी मी झगडत आहे, त्याच समाजाचे लोक मला आणि माझ्या ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’ ग्रुपमधल्या प्रत्येकाला ‘समाजद्रोही’, ‘समाजकंटक’ म्हणत आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या समाजातील उच्चशिक्षित आणि अशिक्षित दोघांनाही ही कौमार्य चाचणी बंद व्हायला नको आहे. कारण त्यांच्या मते, ही चाचणी महत्त्वाची आहे. ती जर नाहीशी झाली तर समाजातील मुली बिघडतील आणि मर्यादेत राहणार नाहीत. अशा विचारसरणीच्या लोकांना मला प्रश्न विचारावासा वाटतो की, विज्ञान किंवा वैज्ञानिक कारणे कंजारभाट समाजातल्या मुलींना लागू होत नाहीत का? मुळात ही जी पद्धत आहे ती विज्ञानाच्या निकषावर रास्त नाही. कारण यौनपडदा फाटण्यासाठी मुलीचं धावणं-खेळणं, सायकल चालवणं, अपघातही कारणीभूत असू शकतात.  हे या लोकांना कधी कळेल? आणि मुलांच्या कौमार्याचं काय? मुलाचं कौमार्य टिकलेलं आहे का, हा प्रश्न त्यांना कोण विचारणार? म्हणजे अगदी सती प्रथेपासून ते २०१८ मध्ये चालू असलेल्या कौमार्य चाचणीपर्यंत मुलींवरच अन्याय का? आम्ही मुली या स्वतंत्र भारताच्या नागरिक नाहीत का? स्त्रीत्वाचा अपमान करणारी ही प्रथा आहे ती बंद व्हायलाच हवी. देश, जग कुठून कुठे चाललं आहे आणि आम्ही मात्र मुलीच्या कौमार्याची परीक्षा घेत आहोत, हे कधी थांबणार?

कौमार्य चाचणीबरोबरच बालविवाह, शुद्धीकरण आणि इतरही अन्यायकारक प्रथा कंजारभाट समाजात आहेत आणि त्याचा न्यायनिवाडा केला जातो तो म्हणजे जातपंचायतीमार्फत. कुणी अधिकार दिले त्यांना? भाट समाजातली ही कुठल्याही प्रकारचा आधार नसलेली न्याय व्यवस्था बंद होणे फार गरजेचे आहे. मुळात ही कौमार्याची परीक्षा कशासाठी? मुलींनी व्यभिचार करू नये म्हणून. का?  प्रत्येक मुलगी वयात आली म्हणजे व्यभिचार करणार असेच यांना वाटते का?  व्यभिचार म्हणजे काय? याचा नेमका अर्थ तरी या लोकांना माहीत आहे का?  या घाणेरडय़ा प्रथा बंद होणं जरुरी आहे, अशा प्रथा ज्या कोणाचंही भलं करत नाहीत. त्याच्या विरोधातच आम्हाला हा लढा लढायचा आहे.

कंजारभाट समाजातील काही युवा ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’च्या चळवळीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. कौमार्य चाचणीच्या विरोधातलं एक पाऊल म्हणून ‘स्टॉप द वि रिच्युअल’ ही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एक चळवळ आमच्याच समाजातल्या विवेक तमाईचेकरने सुरू केली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याच तरुणांनी या गोष्टीला वाचा फोडावी, असं त्याला वाटलं आणि त्याने स्वत:पासून सुरुवात केली. त्याने ‘स्टॉप द वि रिच्युअल’ या ग्रुपद्वारे कंजारभाट समाजाच्या तरुणांना जोडून त्यांच्यामध्ये या कुप्रथेविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी, त्यांची मतं मांडण्यासाठी, चर्चा करण्यासाठी हे एक माध्यम निर्माण केलं आहे. या माध्यमाच्या पलीकडे जाऊन जातपंचायत आणि सामाजिक बहिष्कार याविरोधी कायद्यातील तरतुदींबद्दल प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याने काही तरुणांना सोबत घेतले आहे. समाजातील शोषक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समाजातील युवांनी उचललेलं हे एक संघटित पाऊल आहे. हे पाऊल आता यशाच्या दिशेने, मुक्तीच्याच दिशेने पडायला हवे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतीय राज्यघटनेने दिलेला स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल २१, भाग ३ अन्वये खासगी अधिकार (राइट टू प्रायव्हसी) हा प्रत्येकासाठी आहे. जो अधिकार या समाजात सर्रास पायदळी तुडविला जात आहे. त्यावर आता गंभीरपणे निर्णय व्हावा.

या चळवळीमध्ये सक्रिय असणारा अक्षय तमाईचेकर म्हणतो की, ‘आज २१व्या शतकातसुद्धा अशा प्रकारच्या कुप्रथांना आपला समाज खोटय़ा प्रतिष्ठेसाठी कवटाळून बसतो याहून लांच्छनास्पद दुसरी कोणती बाब नाही. पुरोगामी म्हणविणाऱ्या व शाहू, फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार असलेल्या आपल्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या गोष्टी या सर्रास घडत आहेत आणि त्याकडे आपला सुशिक्षित, पुढारलेला समाज व शासकीय यंत्रणा कानाडोळा करताना दिसत आहे. हे थांबायला हवे. महिला सक्षमीकरणाच्या युगात आजही हा समाज स्त्रियांच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष देण्याऐवजी तिच्या कौमार्य परीक्षणात, जातपंचायतीत अडकून पडलाय. खरी चीड तर तेव्हा येते जेव्हा ही जातपंचायत स्वत:चं असं संविधान बनवते ज्याला समाजात ‘काळी किताब’ असं म्हटलं जातं आणि त्यात लिहिल्या गेलेल्या अनिष्ट प्रथांना आजही थारा देते. म्हणूनच ‘स्टॉप द वि रिच्युअल’ या चळवळीच्या माध्यमातून हे जातपंचायतीद्वारे चालवल्या जाणाऱ्या या जुलमी प्रथा आणि परंपरांना मूठमाती देण्याचा आणि जाती निर्मूलनाचा आम्ही ठाम निश्चय करत आहोत.’

आम्हाला या कुप्रथेतून बाहेर पडण्यासाठी समाजाची साथ हवी आहे, कारण आमच्याच समाजातली आमची म्हणवणारी माणसं आमच्या विरोधात गेली आहेत. आम्हाला बहिष्कृत करू पाहात आहेत. खाली दिलेल्या फेसबुक पेज लिंकवर क्लिक करून आमच्या चळवळीला तुमचा पाठिंबा जाहीर करा, आम्हाला बळ मिळेल या स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या कुप्रथेच्या विरोधात लढण्याचं!

साभार : दैनिक  लोकसत्ता मधून 

फेसबुक लिंक  – https://www.facebook.com/stoptheVritual/

 

Comments are closed.