मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या जीवनातलं एक मोठं स्थित्यंतर. ते तिच्यासाठी जसं अवघड तसंच तिच्या जोडीदारासाठीही. या लेखातून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आनंद शिंदे सागंतात – झटकून टाका मेनोपॉजच्या काळातल्या सहजीवनाविषयीचे गैरसमज!
त्रांनो सिम्पोझियम, वर्कशॉप वगैरे शास्त्रीय आखाड्यांमध्ये मी अनेक वेळा खालील प्रश्न ऐकला आहे, तो असा – “काय हो, स्त्रियांना मेनोपॉज येतो तर पुरुषांना का येत नाही?” ज्याला हा प्रश्न विचारला जातो ती व्यक्ती गालातल्या गालात हसते, कारण मेनोपॉज या शब्दाची व्युत्पत्ती मेनो म्हणजे मासिक पाळी व पॉज म्हणजे विराम किंवा निवृत्ती अशी असल्याने पुरुषांबाबत हा प्रश्न निकालात निघतो. हुश्श! सुटलो बाबा, असे तुमचे उद्गार असतील. पण थांबा. हा प्रश्न विचारणारी व्यक्ती अज्ञ नसते. ती म्हणत असते, स्त्रियांना इस्ट्रोजेन उर्फ स्त्री संप्रेरक कमी पडते तसे या वयोगटातील पुरुषांना टेस्टोस्टेरॉन म्हणजे पुरुष संप्रेरक का नाही कमी पडत? प्रश्न अवास्तव नाही. पुरुषांनाही आवश्यक असणारे टेस्टोस्टेरॉन ६० वर्षांनी थोडे कमी पडू लागते व त्या दृष्टीने त्यांचा ‘अॅन्ड्रोपॉज’ सुरु होतो, हे खरे आहे. पण मेनोपॉज आणि अॅन्ड्रोपॉजमध्ये एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे नाट्यमयतेचा. मेनोपॉज ही तुलनात्मकरीत्या वेगाने होणारी अभावात्मक प्रक्रिया आहे, त्याउलट पुरुष संप्रेरकांची पातळी कमी होणे हे चक्क २० ते ३० वर्षे चालणारी अतिसंथ प्रक्रिया आहे.
आता पुरुषांनाही त्रास असतात हे कळल्यावर मित्रांनो तुम्हाला भीतीयुक्त उत्सुकता असू शकते की काय काय होणार आहे? यादी फार लांबडी नाही, पण वजनदार मात्र आहे. ५०-५५च्या पुढे स्नायूंचे आकारमान आणि ताकद कमी होते, समागमातील आवेग कमी होतो. व्यवहारातील जिगर, आग्रहीपणा कमी होतो. पोट सुटते. हे सर्व होतेच असे नाही पण होऊ शकते. याच्या जोडीने अशी जाणीव होऊ लागते की बऱ्याच गोष्टी कायमच्या राहून गेल्या, करिअर अजून चांगले करता आले असते, किंवा वाटेवरची कित्येक गुलाबपुष्पे हुंगायची राहून गेली वगैरे वगैरे. ह्याच्या जोडीला रिटायरमेंट, मुलांची करियर अथवा लग्नं, घरबांधणी अशा खळबळ माजवणाऱ्या बाबी एकत्रितपणे अंगावर येतात. अर्थात या सर्वाचा तुमच्या अॅन्ड्रोपॉज किंवा पुरुष संप्रेरकांच्या लेवलशी काही संबंध नसतो; पण असे वाटते की हे सर्व वजन उचलताना पूर्वीइतके बळ असते तर जरा बरे झाले असते. नियमित आहार व नियमित व्यायाम घेत असाल, धूम्रपान व अतिरिक्त मद्यपान टाळले असेल तर आपणास शक्तिहीन वाटण्याचे काहीच कारण नाही. याउलट अनेक जणांना या वयात तरुणपणाची दुसरी लाट अंगावर फुटली आहे असं वाटू लागतं.
असो. मित्रांनो, वरील विवेचन तुमच्या एकट्याच्या परिस्थितीबाबत आहे. परंतु आपली जोडीदार, पत्नी मेनोपॉजल आहे हे आपण जाणता का? मेनोपॉज म्हणजे काय तर तिच्या स्त्रीबीजांचा साठा संपून ती आता जननक्षम राहिली नाही व तिची मासिक पाळी बंद झाली आहे किंवा होणार आहे. तुम्ही म्हणाल ठीक आहे, मला त्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही. अहो हा मामला पूर्णपणे नैसर्गिक आहे. तुमच्या ऑब्जेक्शन घेतल्याने तो थांबणार नाही. मित्रांनो उलट तुम्ही या खळबळीच्या काळात पत्नीस समजावून घेतलेत तर पुढील सहजीवनाचा तो भक्कम पाया ठरेल.
सहजीवनाचे एक अंग आहे समागम. रजोविरामानंतर समागम बंद होतो का? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. या काळात या प्रकारची ओढ मात्र कमी जास्त होऊ शकते. म्हणजे काहींना जास्त इच्छा होईल तर काहींना कमी. दोन्ही गोष्टी नैसर्गिक आहेत व त्यांची योग्य ती स्पष्टीकरणं आहेत. परंतु समागम बंद मात्र नक्कीच होत नाही. याबाबत एक गोल्डन रूल आहे, ‘यूज इट ऑर लूज इट’. या कालखंडात योनीमार्गातील शुष्कपणा त्रासदायक ठरतो. डॉक्टर त्यासाठी वंगणात्मक मलमं देतात पण मुख्य मुद्दा असतो तो दोघांनी एकमेकांशी बोलण्याचा. तुमच्या लिंगामधील ताठरपणा काहीसा कमी वाटतो व वीर्यपतन पूर्वीपेक्षा झटकन होते हे काही लपत नाही. मग तोंडानं ते पत्नीशी बोललात तर फार रिलीफ वाटेल. ‘त्यात काय एवढे, असे होऊ शकते’ हे तिच्या तोंडून ऐकलेत तर तुमचा न्यूनगंड क्षणात नाहीसा होईल. अन्यथा हा न्यूनगंड सर्व मजाच घालवून टाकतो. योनीमार्गाचा कोरडेपणा मलमे लावण्याआधी थोडे धीराने घेतल्यास आपोआप दूर होतो हे आपण जोडीने पाहू शकतो. मेनोपॉजमध्ये योनीमार्गाचा रक्तपुरवठा कमी झालेला असतो. त्यामुळे प्रत्यक्ष समागमाआधी जास्त वेळ उद्दीपन करणे योग्य ठरते. अर्थात हा शोध तुम्ही दोघे एकमेकांशी संवाद साधत असाल तर आपोआप लागेल. त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. तेव्हा मंडळी बोला एकमेकांशी.
तुमच्या पत्नीचा या कालखंडातील मुख्य चिंताविषय असतो ‘मी यांना पूर्वीसारखी आकर्षक वाटते की नाही?’ बरे हे स्पष्ट विचारता येत नाही. विचारले तर उडवाउडवी किंवा अप्रामाणिक उत्तरे मिळतील काय अशी तिला भीती असते. तर मित्रांनो याबाबत आपल्या पत्नीला स्पष्ट संकेत देणे ‘हो पूर्वी इतकीच तू आकर्षक आहेस’ फार जरुरी आहे. प्रेम दर्शविण्याच्या अनेक पद्धती ४५-५०च्या पुरुषास काय सांगायच्या? तेव्हा उशीर करू नका. आजचा चांगला मुहूर्त आहे.
सहजीवन फक्त बेडरूमपुरते नसते. या वयात एकत्र राहण्यासाठी कारणे शोधली नाहीत तर दिवसभराचे व्याप तुम्हा दोघांना दूर दूर ठेवतील व फक्त झोपण्यापुरते बेडरूममध्ये भेटणे उरेल. रोज ४५ मिनिटे एकत्र एरोबिक्ससाठी, फिरायला बाहेर पडा. बोलणेही होईल व व्यायामही होईल. पत्नीच्या मेनोपॉजबद्दल जागरूक व संवेदनक्षम बना, मग बघा काय जादू होते ती!
(संपादित)
साभार – ‘मेनोपॉज- रजोनिवृत्तीविषयी समग्र माहिती’ ले. डॉ. आनंद शिंदे, एम डी (स्त्री रोग तज्ज्ञ , ज्ञाननयन प्रकाशन)
No Responses