नकार कसा द्यायचा?

0 1,040

एखाद्या नात्याला किंवा प्रस्तावाला होकार देणं जसं महत्त्वाचं तसंच आपल्याला नकोशा असणाऱ्या बाबीला नकार देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. एखाद्या प्रसंगात किंवा परिस्थितीत आपल्याला अवघडल्यासारखं होत असेल, असुरक्षित वाटत असेल किंवा भीती वाटत असेल तर तुम्हाला नाही म्हणण्याचा किंवा नकार देण्याचा अधिकार आहे. काही वेळा तुमच्यासोबत असणाऱ्या मित्र-मैत्रीण किंवा तर कोणत्याही व्यक्तीबद्दल तुम्हाला काही शंका येऊ लागते. त्या व्यक्तीचा नक्की हेतू काय आहे हे समजेनासं होतं. त्या प्रसंगात नक्की काय घडणार आहे किंवा त्या समोरच्या व्यक्तीच्या मनात नक्की काय आहे याबाबत तुमची खात्री पटत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीला होकार देण्यापेक्षा सावधपणे एक पाऊल मागे घेतलेलं कधीही चांगलं. कधी कधी तुमचे मित्र मैत्रिणी तुम्हाला अशी काही गोष्ट करण्याचा आग्रह करत असतील जी तुम्ही आतापर्यंत कधीही केली नाही आणि ती तुम्हाला मान्य नाही. कदाचित तुमचा जोडीदार तुम्हाला त्याच्या किंवा तिच्यासोबत रात्री राहण्याचा आग्रह करत असेल. तुम्हाला तुमचे मित्र खूप जवळचे आहेत. तुमच्या जोडीदारावर तुमचं मनापासून प्रेम आहे. अशा वेळी तुम्ही नकार कसा देणार? विचार करा.

खूप जवळच्या नात्यांमध्ये किंवा प्रेमामध्ये तुमचा नकार तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगावा लागतो. एखाद्या मागणीमुळे, आग्रहामुळे जर तुमच्या मनात भीती निर्माण होत असेल, अपराधीपणाची भावना तयार होत असेल तर त्या प्रस्तावाचा किंवा त्या मागणीचा फेरविचार करा. तुम्ही नकार दिलात तर त्याचे नक्कीच काही परिणाम होतील. पण नको त्या प्रसंगात अडकण्यापेक्षा त्या परिणामाचा मुकाबला करणं कधीही चांगलं.

मुली नाही म्हणतात म्हणजे त्यांना होकार द्यायचा असतो आणि त्यांना पटवता येतं असा समज पसरवण्यात आला आहे. पण नाही याचा अर्थ नाही असाच असतो. आणि ते तितक्याच ठामपणे सांगणं आवश्यक असतं.

 

नकार देण्याचा सराव करण्यासाठी काही युक्त्या

 • स्पष्ट शब्दात सांगा – नाही म्हणजे नाही.
 • लिहून काढा आणि संबंधित व्यक्तीला द्या.
 • शांतपणे, नम्रपणे सांगा – ‘मला नाही वाटत, मला हे जमेल.’
 • सांगा – ‘मला जरा विचार करावा लागेल.’
 • अगदी ठाम राहा – उद्धटपणे बोलू नका.
 • स्पष्ट सांगा – ‘नाही, मला वेळ नाही.’

 कसं बरं नाही म्हणायचं?

शरीराची भाषा समोरच्याला चटकन लक्षात येते. कधी कधी शब्दांपेक्षा शरीराच्या माध्यमातून तुम्ही जास्त स्पष्टपणे नकार देऊ शकता.

 • ताठ उभं रहा आणि काही पावलं मागे सरका. असं केल्याने तुम्हालाच जरा स्पष्टपणे विचार करता येईल.
 • समोरचा पाहू शकत नसेल तर आवाजातून तुमची नापसंती तुम्ही जाणवून देऊ शकता.
 • काही योग्य प्रसंगांमध्ये उदा. तुमची लहान बहीण किंवा मैत्रीण उगीच हट्ट करत आहे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट द्यायची नाहीये, अशा वेळीदेखील नाही म्हणायचा सराव करा.
 • जबरदस्ती अगदी नकळतदेखील होऊ शकते. दबावाला बळी पडू नका. आणि तुमच्या इच्छेप्रमाणे गोष्टी करा.
 • आपल्या इच्छेविरुद्ध कोणत्याही गोष्टी करायला तयार होऊ नका. तुम्हाला मान्य असेल तरच काही गोष्टी करायला तयार व्हा. संबंधित व्यक्तीच्या वागण्यात फरक पडला नाही तर एखाद्या वयाने मोठ्या असणाऱ्या, विश्वासातील व्यक्तीची मदत घ्या.

आवडीच्या गोष्टी आवर्जून करणं जसं गरजेचं, तसंच नावडत्या गोष्टी करायला नकार देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे हे लक्षात असू द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.