अगस्त्य व लोपामुद्रा – लैंगिकता आणि संस्कृती २

ऋग्वेद आणि रामायण-महाभारतात उल्लेख झालेले अगस्त्य मुनी हे एक अचाट व्यक्तिमत्व म्हणून आपल्यापुढे येते. समुद्रात लपलेल्या राक्षसांच्या नाशासाठी त्यांनी समुद्र प्राशन केला अशी एक कथा आहे, तिचा संबंध भाद्रपद महिन्यानंतर दक्षिण आकाशात उगवणाऱ्या अगस्त्य नक्षत्राशी जोडला जातो. या महिन्याखेरीस पावसाळ्याचा भर ओसरतो आणि त्याच सुमारास हे नक्षत्र उदय पावते, म्हणून ही कथा रचली असावी. या अगस्त्य मुनींचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी विंध्य पर्वत ओलांडून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याचा मार्ग तयार केला आणि नंतर ते दक्षिणेत स्थायिक झाले. त्यामुळे त्यांना दक्षिणेतलेच समजले जाऊ लागले. अर्थात काही तमिळ विद्वानांच्या मते, अगस्त्य हे मूळचे दाक्षिणात्य असले पाहिजेत.

यांच्या जन्माची कथा वैचित्र्यपूर्ण आहे. मित्रा आणि वरुण हे देव यज्ञ करीत असताना उर्वशी ही अप्सरा तेथे येती झाली. तिच्या  अप्रतिम  लावण्याने मोहित होऊन हे दोघे कामातुर झाले आणि त्यांचे वीर्य पतन झाले. ते पडले एका कुंभात आणि त्यामधून वसिष्ठ आणि अगस्त्य हे जन्माला आले, अशी कथा आहे.

अगस्त्य मुनींची पत्नी लोपामुद्रा ही विदर्भातील राजकन्या होती. त्यांच्या विवाहाबद्दल दोन प्रवाद आढळतात. एक म्हणजे अगस्त्य हे तापसी आणि वैभवात वाढलेली लोपामुद्रा यांचा संसार सुखाचा होईल की नाही याबद्दल तिच्या मातापित्यांना साहजिकच दाट शंका होती. लोपामुद्रेने त्यांना पटवून दिले की मुनींचे तपोधन अपार आहे आणि काळाच्या ओघात तिचे तारुण्य ओसरल्यावर त्यांचे पुण्यच कामी येणार आहे. दुसऱ्या प्रवादानुसार विवाहानंतर लोपामुद्रा ही अरण्यात वास्तव्यास तयार होत नाही आणि हवे तसे तोलामोलाचे वैभव मिळाल्यासच विवाहपूर्तता होण्यासाठी आवश्यक असणारा  शरीरसंबंध करू देईन अशी अट घालते. अर्थात मुनिवर्य मग संसारात परत येऊन तसे वैभव मिळवितात. पुढे त्यांचा संसार सुखाचा झाला असावा.

त्यांच्या शरीरसंबंधाविषयी ऋग्वेदात एक आणि महाभारतात वेगळी अशा दोन गोष्टी सापडतात.  ऋग्वेद हा वेद वाङ्मयातील पहिला ग्रंथ आहे.  त्याच्या रचनेचा काळ आजपासून किमान ३५०० वर्षे धरला जातो.  निसर्गशक्तीच्या विविध रूपांना देवदेवता कल्पिण्याचा तो काळ होता. या देवतांचे स्तुतिपर वर्णन या हजाराहून अधिक सूक्तांमध्ये आले आहे. निसर्गाच्या शक्तीचे आणि आश्चर्यकारक घटितांचे वर्णन करणारी सूक्ते निरनिराळ्या ऋषिमुनींनी रचलेली आहेत. पहिल्या मंडळातील सत्तावीस सूक्ते ही अगस्त्य ऋषींच्या नावे आहेत. त्यातील पहिली चौदा सूक्ते ही इंद्र आणि मरुद्गण याना उद्देशून रचलेली आहेत. मग येते 179 क्रमांकाचे सूक्त. ज्याची देवता आहे रती ! त्यानंतरची पाच अश्विनीकुमार यांच्यासाठी आणि बाकीची इतर इष्टदेवतांसाठी आहेत.

हे जे 179 क्रमांकाचे सूक्त आहे त्यात लोपामुद्रा आणि अगस्त्य यांचा संवाद आहे आणि तो ऐकणाऱ्या त्यांच्या शिष्याचे स्वगत देखील आहे.  म्हणजे एकूण देवदेवता यांच्या स्तुतिपर रचनेपेक्षा अगदी निराळे असे हे सूक्त दिसते. त्यातला संवाद पाहा :

लोपामुद्रा म्हणते,” कित्येक वर्षांपासून रात्री अशाच सरतात आणि मग सकाळ होते आहे. माझी गात्रे आता वयानुसार शिणू लागली आहेत. उभयता धडधाकट असताना पुरुषाने पत्नीजवळ जावे हे उचित नव्हे काय? पूर्वी जे सत्यनिष्ठ आणि व्रतस्थ मुनी होऊन गेले, त्यांनीदेखील पत्नीशी समागम केला होता.”

यावर अगस्त्य म्हणतात, “आपले व्रताचरण वाया गेलेले नाही. देवांच्या कृपेने आपण आपल्या कामना यथेच्छ पुरवू शकतो आणि असेच जोडीने आपण सर्व संकटांवर मात करू शकतो. या कारणामुळे म्हणा किंवा इतर कशाने, पण आता कामेच्छा प्रबळ होऊन माझ्या तपाचरणावर तिने मात केली आहे. लोपामुद्रा आता पतीच्या निकट येऊ शकते.”

दोघांची वक्तव्ये संयमाने केलेली असल्याने सूचक आहेत. एक लावण्यवती मध्यमवयीन स्त्री आपल्या पतीला आपली तडफड सांगते आहे. मला कामेच्छा आहे पण ती वेळीच पूर्ण झाली नाही तर मी कायम अतृप्त राहीन.  माझी गात्रे त्यांचा घाट काळाच्या प्रवाहात गमवून बसतील आणि तुमची देखील शक्ती क्षीण होत जाईल.  तपस्येमध्ये मग्न असल्याने माझी तगमग तुमच्या लक्षात येत नाहीये. म्हणून मला हे तुम्हाला सांगावे लागत आहे. माझे हे गाऱ्हाणे समजू नका पण मागणे मात्र नक्की आहे.  या साऱ्या गोष्टी लोपामुद्रा सूचित करीत आहे.

मुनिवर्य तात्काळ प्रतिसाद देतात. आपण अगदी रास्तपणे आपल्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत आणि त्याबद्दल तुला संकोच बाळगण्याचे यत्किंचित कारण नाही. माझ्या तपस्येच्या आड ही गोष्ट बिलकुल येत नाही कारण त्यामुळे तर आज आपण इथवर पोहचू शकलो.  तू माझे लक्ष वेधून घेताच मला ही जाणीव होत आहे की कामवासना ही माझ्यात वास करीत आहेच आणि ती अशा काही वेगाने उफाळून येत आहे की मला तिला शरण गेल्याशिवाय तरणोपाय नाही.

असे पतिपत्नीमधील संभाषण झाल्यानंतर पुढे काय घडले असणार हे सांगणे नलगे !

हे संभाषण कानावर पडलेला शिष्य चकित आणि संभ्रमित न झाला तरच नवल! मग तो स्वतःला दटावतो की पतिपत्नींचे हे अंतरंगातील निकट गुज ऐकण्याचे पाप सोमप्राशनाने धुवून निघो.  शिवाय तो स्वतःला बजावतो की मनुष्यमात्र हा बहुविध कामनांनी व्यापलेला असतो, भले त्याने कितीही तपस्या केलेली असो!

देवदेवतांबरोबर अगस्त्य मुनींचा संवाद हा अ-लौकिक पातळीवरचा तर आपल्या पत्नीबरोबरची नाजूक गुजगोष्ट  ही लौकिक पातळीवरची. तरीदेखील हा संवाद त्यातल्या शिष्याच्या निरीक्षणासकट ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळात समाविष्ट झाला हे महत्त्वाचे आहे. निसर्गदत्त शक्तींचा वावर हा आपल्या सभोवताली बाह्य जगात केवळ होत नसून आपले मनोव्यापार हे देखील निसर्गदत्त आहेत आणि त्यांचे नियमन किती मर्यादेपर्यंत होऊ शकते हे आपण जाणले पाहिजे. हे त्यातून सूचित होते.

लोपामुद्रा म्हणते आहे की, मी तुम्हाला तुमच्या तपस्येमध्ये आणि व्रताचरणामध्ये कायम साथ दिली आहे. पण शरीराला निसर्ग क्रम आहे आणि मनामध्ये निसर्गदत्त कामप्रेरणा आहे. तिला मी अडवू शकत नाही आणि अडवू इच्छित देखील नाही.  समागम प्रकृती धड असताना केला तर त्याचे सुख मिळण्याची शक्यता, नाही तर त्याचा त्रास व्हायचा. तसेच तुमची तपस्या आणि कामनापूर्ती यामध्ये काही विरोध नसावा, कारण पूर्वी तापसी जनांनी संतती प्राप्त केली ती समागमामुळेच. अर्थात येथे अगस्त्य मुनींचा जन्म कसा झाला त्याची कथा अडचण निर्माण करू शकते. कारण मित्र आणि वरुण या देवांना उर्वशीच्या लावण्याने काममोहित केल्याने त्यांचे स्वतःवरील नियंत्रण सुटले.

कदाचित तोच धागा अगस्त्य मुनींच्या वर्तनात आपल्याला दिसतो. तेदेखील म्हणतात की लोपामुद्रेबरोबर समागम करण्याच्या कल्पनेनेच माझे चित्त विचलित झालेले आहे. म्हणजे कामप्रेरणा ही इतकी प्रबळ मानवी प्रेरणा आहे की ती सर्व नियंत्रणे धुडकावून आणि बंधने तोडून सुसाट धावू शकते. या तिच्या शक्तीला वळण आपण देऊ शकतो पण थांबविण्याचा प्रयत्न केला तर तीच शक्ती विध्वंसक ठरू शकते हे अगस्त्य मुनींना उमगले आहे. म्हणून निसर्गाविरुद्ध न जाता, आपल्या उभयतांच्या प्रकृतीचे आणि प्रेरणेचे भान राखून उभयतांनी जोडीने समागम सुख उपभोगायचे आहे. शारीरिक कृतीच केवळ नव्हे तर इच्छापूर्ती ही त्यातून झाली पाहिजे हे या सूक्तांतून सूचित झाले आहे.

या सूक्तातली शिष्याची उपस्थिती ही एक लक्षणीय बाब आहे. पतिपत्नीचे अंतरीचे गुज ही सर्वस्वी त्यांची व्यक्तिगत जागा आहे आणि तिचे अतिक्रमण हे अनवधानाने घडले तरी पाप आहे याची जाणीव शिष्याद्वारे सर्वांना करून दिली आहे.  तरी यातून शिष्य काय ग्रहण करतो, तर त्याला ही जाणीव होते की मर्त्य मानव हा आपल्या निसर्गदत्त शारीरिक प्रेरणांना टाळू शकत नाही.

वेदांची रचना झाली तो काही शतकांचा मोठा कालखंड होता. या कालखंडात नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने निसर्गशक्तीची जाणीव झालेली होती. तसेच मानवी समूहांचे स्थलांतर, संघर्ष आणि सहजीवन या घडामोडी अधिकाधिक घडू लागल्या होत्या. वेदांमध्ये स्त्रियांच्या समाजातील स्थानाबद्दल जे उल्लेख आहेत, त्यावरून असे दिसते की, त्यांना पित्याच्या संपत्तीत काही मिळे, त्यांना यज्ञात पतीसमवेत बसण्याचा अधिकार होता आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर असे. राजांनी आपल्या राजकन्यांचा विवाह ऋषीमुनींशी करून देण्याचे अनेक उल्लेख आढळतात. या सर्वांवरून असे दिसते की, आपली व्यथा पतीला सांगताना लोपामुद्रेला संकोचही वाटला नाही किंवा लढाऊ आवेश देखील तिने आणलेला आपल्याला दिसत नाही. तिचा आपल्या कामभावनेचा सरळ आणि प्रांजळ स्वीकार आणि उच्चार ही या सूक्तातून व्यक्त झालेली एक महत्त्वाची बाब आहे.

फोटो साभार (PC) : https://blogs.navbharattimes.indiatimes.com/

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap