कथा अर्जुन -उलुपीची – लैंगिकता आणि संस्कृती १

रीति रिवाज, रूढी, रूपके, समजुती, कल्पना, विचार आणि मूल्ये या सर्वांचा “ संस्कृती” या संकल्पनेमध्ये समावेश होतो.  प्रत्येक समाजाच्या ऐतिहासिक अनुभवाचे प्रतिबिंब  ‘संस्कृती’  मध्ये पडलेले असते. समाज हा जितक्या प्रमाणात गतिशील असतो त्या प्रमाणात संस्कृती सुद्धा प्रवाही असते. त्या अर्थाने भारतीय संस्कृती ही देखील प्रवाही राहिली आहे. अर्थात या आपोआप घडणाऱ्या गोष्टी नसून त्यासाठी मानवी प्रयत्न आवश्यक असतात. सामाजिक परिवर्तन आणि सांस्कृतिक बदल हे बदलत्या वास्तवाचे आकलन करून घेऊन निश्चित दिशेने केलेल्या वाटचालीतून होत असतात. आजच्या काळात निकोप स्त्री पुरुष संबंध जोपासण्यासाठी आपल्याला त्यासंबंधीच्या सांस्कृतिक कल्पना कशा विकसित झाल्या हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी या लेखमालेचा प्रपंच आहे. प्राचीन काळापासून आतापर्यंत लैंगिकतेबद्दलच्या कल्पना, रूपके, मिथके कशी बदलत गेली हे आपण पाहणार आहोत.

महाभारताच्या वनवासपर्वात अर्जुन -उलुपी कथानक आले आहे. ते आपण मुळातून पाहू या.

“बळकट बाहूंचा अर्जुन मोठ्या लवाजम्यासह अरण्यात प्रयाण करता झाला. नद्या आणि तळी असलेल्या नयनरम्य प्रदेशातून त्यांची मार्गक्रमणा चालू होती. गंगोत्रीपाशी आल्यावर येथेच तळ टाकावा असे अर्जुनाने ठरविले. आपल्याबरोबर आलेल्या लोकांसह तेथे वस्ती केल्यावर अर्जुनाने खूप सारे यज्ञ आरंभिले, ज्यामुळे तो सर्व प्रदेश गजबजून गेला.

एके दिवशी अर्जुन नित्याप्रमाणे आन्हिके करण्यासाठी गंगेच्या प्रवाहात उतरला. आन्हिके संपवून अग्नीला आहुती देण्यासाठी तो बाहेर येऊ लागताच त्याला पाण्यातून कोणी पकडल्याचे लक्षात आले. ती होती तिथल्या नाग राजाची राजकन्या उलुपी.  आधीच योजल्याप्रमाणे तिने अर्जुनाचे अपहरण करवून त्याला आपल्या महालात आणले. तेथे त्याच्यासाठी एक होमकुंड तयार ठेवले होते.  नित्यकर्मानुसार अर्जुनाने तेथे आहुती दिली व उलूपीकडे वळून तिला तो विचारू लागला : “हे रूपवती, हा काय भलताच अविचार तू केला आहेस? हा रमणीय प्रदेश कोणता, त्याचा अधिपती कोण आणि तू कोण हे तरी मला कळू दे.”

त्यावर उलुपी उत्तरली : “ऐरावत वंशातील कौरव्य नामक नागाधिपतीचा हा प्रदेश आहे. मी त्यांची कन्या उलुपी. हे पुरुषसिंहा, तुला जलप्रवाहात उतरताना पाहताक्षणी मदनबाधा झाल्याने माझी मती गुंग झाली. हे निष्पाप नरश्रेष्ठा मी अविवाहित आहे. तुझ्यामुळे मी काममोहित झाले आहे, तेव्हा आज मजसाठी, कुरुकुलदीपका, तू तुझे सर्वस्व द्यावेस व माझी इच्छापूर्ती करावीस.’

तेव्हा अर्जुनाने तिला समजावले: “हे ऋजुभाषिणी, युधिष्ठिराच्या आज्ञेने एक तप ब्रह्मचर्यपालनाचे आचरण करण्यास मी बद्धआहे. आपल्या इच्छेनुसार वागण्याची मुभा मला नाही. परंतु हे जलविहारिणी, तरीसुद्धा तुझी कामनापूर्ती करणे शक्य असल्यास मी त्यास तयार आहे. मी आयुष्यात कधी खोटे बोललो नाही. तेव्हा नागकन्ये तुझे समाधान करताना माझा व्रतभंग

अथवा असत्यवर्तन कसे होणार नाही ते मला सांग.”

मग उलुपी म्हणाली :” हे पंडुसुता, तुझ्या भटकंतीचे आणि ज्येष्ठ बंधूने दिलेल्या ब्रह्मचर्य पालनाच्या आदेशाचे कारण मला ठाऊक आहे.  तुम्हा पाचही बंधूंचे असे आपसात ठरले होते की एकजण द्रौपदीसह  एकांतात असताना चुकून जरी दुसरा तिथे आला तर त्याने बारा वर्षे ब्रह्मचर्य पाळायचे. म्हणजे तुमचे व्रत आहे ते द्रौपदीसाठी घालून घेतलेल्या बंधनासाठीच. माझी मागणी मान्य केल्याने तुझ्या माथी कुठलाही कलंक लागत नाही. आणखी असे पहा की तुझ्यासारख्या विशाल नेत्राचे एका दुःखिताला वेदनामुक्त करणे हे कर्तव्य नव्हे काय? मला माझ्या व्यथेपासून सोडविण्याने तुझ्या शीलास कोणताही तडा जात नाही. उलट माझा प्राण वाचवल्याचे पुण्य अल्पशा दोषापेक्षा पुष्कळ जास्त  ठरेल. पार्था, खरेच मी मनोमन तुला भजते आहे रे !  म्हणून तू स्वतःला माझ्याकडे सोपवणेच युक्त ठरेल. पूर्वीच्या पोक्त माणसांनी हाच सल्ला दिला आहे की अनुरक्त झालेल्या स्त्रीचा अव्हेर कदापि करू नये. तू  जर असे केले नाहीस तर मला प्राणत्याग करावा लागेल.  माझा प्राण वाचविल्याने तुला मोठे पुण्य लाभेल. नरवीरा, मी तुझा आसरा मागते आहे.  कुंतीपुत्रा, तू नेहमी दुःखी-कष्टी-निराश्रितांना वाचवितोस. म्हणून मी कामवेदनेने तळमळून तुझे माझ्या आसवांनी आराधन करीत आहे. तेव्हा माझ्या मनाप्रमाणे तू वागणे उचित ठरेल. म्हणून स्वतःला माझ्या स्वाधीन कर.”

अशा प्रकारे नागकन्येने पाचारण केल्यावर कुंतीपुत्र अर्जुनाने तिच्या सर्व कामनांची पूर्ती केली आणि आपल्या गुणांचा उत्कर्ष साधला. सूर्योदयाबरोबर तो नागमहालातून निघून उलुपीसह  गंगापात्राजवळील आपल्या वसतिस्थानाकडे परतला. त्याचा निरोप घेऊन  ती शीलसंपन्न उलुपी आपल्या प्रासादाकडे निघून गेली. जातेवेळी तिने अर्जुनास वर दिला की कोणताही भूजलचर प्राणी त्याला आव्हान देऊ शकणार नाही.

***

हे कथानक वाचल्यावर मला काही गोष्टी जाणवल्या. तुम्हालाही काही जाणवतील. त्या वेगळ्या असल्या तर अवश्य आम्हाला पाठवा.

उलुपी ही आपल्या कामेच्छेबद्दल स्वतःशी प्रामाणिक आणि इतरांशी कमालीची प्रांजळ आहे. अर्जुनाच्या प्राप्तीसाठी ती  अपहरणाची योजना आखते, याचा अर्थ त्या योजनेत तिने इतरांना सामील करून घेतले आहे आणि त्यांना तिच्या भावनांची माहिती असणार आहे .   अर्जुनाला  महालात आणल्यावर ती  कोणताही आडपडदा न ठेवता आपला हेतू प्रकट करते. त्याची संमती मिळविण्यासाठी तिचा प्रयत्न आहे.  त्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ती युक्तिवादाचा आधार घेते.  तो किती सबळ किंवा पोकळ हा मतभेदाचा मुद्दा असू शकतो.  परंतु तिच्या लेखी अर्जुनाचे मनोमन सहकार्य कामसुखासाठी आवश्यक आहे.  लक्षणीय बाब ही आहे की कामसुखाची प्राप्ती  झाल्यावर दुसऱ्या दिवशी उलुपी अर्जुनाला यथासांग निरोप देते आणि वरदान देऊन स्व-गृही परतते. आपले संबंध हे सातत्यहीन आहेत याची तिला प्रथम पासून जाणीव आहे आणि म्हणून कटुता न ठेवता अत्यंत प्रसन्नपणे ती वास्तवाचा स्वीकार करताना आपल्याला दिसते.

आपले एका कामोत्सुक रमणीने अपहरण करावे याबद्दल अर्जुनाला काय वाटले असेल याच्या कल्पनाविलासात गुंतण्यापेक्षा तो या कृत्याला “ अविचार “  म्हणतो. या अपराधाचा अतिशय सौम्य शब्दात केलेला उल्लेख हे दर्शवितो की त्या काळात अशा तऱ्हेचे स्त्रीने केलेले पुरुषाचे अपहरण हे असाधारण कृत्य होते.  उलुपीच्या अपराधापेक्षा तिचे धाडस अर्जुनाला भावलेले दिसते.

आता अर्जुनाची परिस्थिती काय आहे, तर बारा वर्षे ब्रह्मचर्य पालन करण्याचे व्रत म्हणजे एक जबरी शिक्षा आहे. तिच्यापासून मन हटविण्यासाठी योग याग, होम हवन आदी उपायांचा अवलंब अर्जुन करत आहे. पण उलुपीच्या रूपाने जीवन त्याला रतिसुखाचे निमंत्रण देत आहे.  द्रौपदीच्या सुखात नकळत विघ्न तू ठरलास, तर आता उलुपीच्या कामसुखात कळून सवरून विघ्न का ठरतोस , असेच जणू कामदेव त्याला विचारत आहे.  मी कामवेदनेने तळमळत आहे असे उलुपी अर्जुनाला सांगते. कामप्रेरणेचे जीवनातील स्थान त्यामधून अधोरेखित होते असे मला वाटते.  अर्जुनाचा प्रतिसाद तितकाच प्रामाणिक आहे. ‘मलाही तुझ्यासमवेत समागम करावा वाटतो, पण मला माझ्या बंधूला दिलेल्या वचनाचा भंग करायचा नाही  आहे. मला या पेचातून सोडव,’ असे म्हणून तो  एक प्रकारे उलुपीच्या बुद्धीची कसोटी पाहतो. फक्त  स्वतः च्या  कामेच्छा भागवणारी स्त्री ती नाही, तर कामसुखाच्या उत्कर्षासाठी परस्पर संमती आणि समादर यांची गरज जाणणारी उलुपी ही एक विचक्षण नारी आहे हे त्याला पटल्यावर तो समागमास तयार होतो.  अर्जुन हा एकपत्नीव्रती नाही हे येथे स्पष्ट आहेच.

अर्जुन कुरुवंशीय तर उलुपी ही नागवंशीय पण वंशभेदाचा लवलेशही त्यांच्या संबंधाच्या आड येत नाही हे देखील विशेष आहे.

महाभारताचा काळ आजपासून ३००० वर्षे पूर्वीचा धरला तर त्या  काळातील लैंगिकतेबद्दलच्या कल्पना काय होत्या याची काहीशी कल्पना महाभारतातील अर्जुन – उलुपी प्रकरणावरून येऊ शकते.  स्त्रियांना कामभावना असतात आणि त्यामुळे त्यांना लैंगिक अधिकार असतात ही एक महत्त्वाची बाब या प्रकरणावरून अधोरेखित होते.  तसेच स्त्रीपुरुष संबंधातील लैंगिक आकर्षणाचे स्थान ही त्या समाजाने मान्य केल्याचे या  कथेतून दिसून येते.

अर्थात या कथेतील दोन्ही प्रमुख  पात्रे त्या त्या समाजाच्या सत्ताधारी वर्गाचे प्रतिनिधी आहेत.  त्यामुळे लैंगिकतेबद्दलची त्यांची मूल्ये सर्व समाजासाठी लागू होती असे सरसकट मांडता येणार नाही.  समाजातील वर्ग घटकानुसार सांस्कृतिक मूल्ये आकार घेतात आणि त्यांना एकत्र बांधण्यासाठी शास्ते आणि शास्त्रे यांना धडपड करावी लागते. सत्ताधारी वर्गातील स्त्रियांना असलेले लैंगिक  अधिकार  सर्व सामान्य स्त्रियांना असतीलच असे सांगता येत नाही. 

चित्र साभार: https://www.exoticindiaart.com/, https://www.dollsofindia.com/

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap