ऋग्वेदातील यम आणि यमी संवाद – लैंगिकता आणि संस्कृती भाग ३

- आशुतोष इंदुमती प्रभुदास

1,791

इतिहासाचार्य राजवाडे यांनी “भारतीय विवाह संस्थेचा इतिहास” लिहून आपल्या इतिहासातल्या कित्येक अज्ञात गोष्टी, रूढी व चालीरीती प्रकाशात आणल्या. त्यांचे विखुरलेले लेख त्यांच्या मृत्यूनंतर पन्नास वर्षांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. समाजाच्या उत्क्रांती आणि प्रगतीमध्ये जुन्या चाली बदलत जाऊन तेथे नवीन रूढी प्रस्थापित होतात आणि काही विशिष्ट गतिनियमांवर आधारित हा विकासक्रम चालू राहतो. याबद्दल राजवाडे सुरुवातीलाच आपली भूमिका स्पष्ट करतात :

“मित्राला किंवा अतिथीला स्वस्त्री संभोगार्थ देण्याची चाल पुरातनकालापासून पाणिनीच्या काळापर्यंत भारतीयांमध्ये होती. सध्याच्या आपल्या नीतीप्रमाणे पाहता ही चाल आपणास नीतीबाह्य व चमत्कारिक वाटते. परंतु या उत्क्रमिष्णु जगतात सर्वच वस्तूंना जंगमत्व असल्याने नीती ही वस्तू देखील उत्क्रमिष्णु आहे; स्वयंभू, स्थाणू किंवा स्थिर नाही. त्या त्या काळी ती ती चाल नीतिमत्तेची समजली जाते. तो काळ पालटला व समाजात बदल झाले म्हणजे ती जुनी चाल नीतिबाह्य व चमत्कारिक भासू लागून तिची गणना गर्ह्य वस्तूत होऊ लागते.” (पान क्र. 30, तिसरी आवृत्ती 1989)

ज्या काळात कुटुंबसंस्था अस्तित्वात नव्हती, त्या काळात माणसे टोळी – कळप करून राहत असत आणि नाती नसल्याने सर्रास स्त्री पुरुष समागमावर निर्बंध नव्हते. जशी कुटुंब ही कल्पना आकार घेऊ लागली त्याबरोबर सहोदर म्हणजे एकाच आईची मुले – भाऊ बहिणी – अशी नाती निर्माण होऊ लागली. पूर्वी प्रचलित असलेल्या निव्वळ स्वैर स्त्री आणि पुरुष संबंधावर निर्बंध येऊ लागले. हे स्थित्यंतर घडत असताना निर्माण झालेल्या ताणतणावाचे प्रतिबिंब ऋग्वेदातील  दहाव्या मंडळातील दहाव्या सूक्तातील प्रसिद्ध ‘यम यमी‘  संवादात पडलेले दिसते.

यम आणि यमी ही एकमेकांचे भाऊबहीण. पण यमीच्या मनात यमाबरोबर समागम करण्याची इच्छा जागृत होते आणि ती म्हणते : “तू माझ्याशी पतीभावाने वाग आणि माझ्या ठायी आपल्या बापाचा नातू उत्पन्न कर.”  म्हणजे स्त्रीला शरीरधर्माप्रमाणे होणारी कामवासना यमीला जाणवत आहे आणि समाजाने निर्मिलेल्या कौटुंबिक नात्याला ही वासना छेद देत आहे हे यमीला ठाऊक आहे. पण कामेच्छा तिला स्वस्थ बसू देत नाही.

यम तिला सांगतो की तिऱ्हाईत व्यक्ती या पती-पत्नी होतात आणि आपल्या बहिणीला मी तिऱ्हाईत समजू शकत नाही आणि पुन्हा आपल्यावर श्रेष्ठमंडळींचे लक्ष आहेच. पण यमी हे समजून घेण्याच्या मनःस्थितीत नाही. ती उत्तरते : “देवांच्या मनात तू संतती द्यावीस असे आहे,  म्हणून तू आणि मी मनाने एक होऊ या आणि मग तू माझा भार्या म्हणून स्वीकार कर.”

“जे आपण कधी मनात आणले नाही ते भलतेच अपकृत्य आता करावयास तू मला सांगते आहेस ?  आतापर्यंतच्या शुद्धाचरणाला विटाळून टाकायचे ?  मग आपल्या उदात्त नात्याचे काय ?” यम पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो.

“अरे, जो सर्व प्राणिमात्रांना जीवरूप देणारा परमेश्वर त्यानेच तर आपणा दोघांना एकाचवेळी मातेच्या उदरात सहचर म्हणून टाकले नाही काय ? त्याची इच्छा टाळणे कुणालाच शोभत नाही. आपला समागम हा पृथ्वीलोक आणि स्वर्गलोक यांना म्हणून तर संमत आहे” यमी आपली कामेच्छा कशी अवाजवी व अनैतिक नाही हे पटवून देत आहे.

“आपल्या जन्मवेळच्या गोष्टी कोण सिद्ध करणार?  आज जे नीतिनियम प्रचलित आहेत तेच ग्राह्य धरले पाहिजेत. पुरुषाला जाळ्यात ओढण्यासाठी काहीबाही सांगावेस तू ? वा रे वा! ” यम हा काही केल्या वश होत नाही.

“हे पाहा यमा, तुझ्याबरोबर शय्यासोबत करण्याच्या कल्पनेने मला भारून टाकले आहे. मी पत्नी म्हणून सर्वस्व तुला अर्पण करण्यास उत्सुक आहे. तेव्हा आता रथाची दोन्ही चाके जशी एका वेगात भरधाव पळतात,  तशी तू मला गती दे.”

यम पुन्हा तिला बजावतो : “हे पहा, देवांचे दूत सदैव चौफेर लक्ष ठेवून आहेत. तेव्हा माझा नाद सोड आणि लवकर कुणी दुसरा गाठ आणि त्याजबरोबर हवे तिथे भरधाव जा. “आता इथे आपल्याला हे कळू शकत नाही की यमाला देखील समागम हवा आहे पण तो आदेश मोडू इच्छित नाही का खरेच त्याला हा समागम निषिद्ध वाटतो आहे. यमाशिवाय हे कोण खरे सांगू शकणार ?

“सूर्याची दिवसरात्र निर्माण करणारी दृष्टी तुजवर पडो आणि तुझा प्रकाश निरंतर पसरत राहो. पृथ्वी आणि स्वर्गलोकात आपले हे आप्तयुगुल रममाण होवो. यमा तू आता विसर ते भावाबहिणीचे नाते!”, यमी काही आपला हेका सोडत नाही.

“पुढे मागे न जाणो भाऊबहीण समागमासारखे निषिद्ध वर्तन करण्यास कचरणार नाहीतही, पण माझ्याच्याने ते होणे नाही. म्हणून तू आता एक पती शोध जो तुझ्या दंडावर विसावेल” यमाने पुन्हा निक्षून तिला सांगितले.

“जेव्हा एखाद्या स्त्रीला कुणी पती राहिला नाही, तर मग तिला पुरुष भाऊ म्हणून हवाय का?  विनाशाची वेळ आल्यावर मग ती बहीण म्हणून उरणार आहे का ?  मी हे सर्व प्रेमापोटी बोलत आहे. प्रेमच मला हे सर्व बोलण्यास भाग पाडत आहे. तेव्हा आता जवळ ये आणि मला घट्ट मिठीत घे.”  यमीने आणखी एकदा विनवून पाहिले.

“हे पहा,  मी काही केल्या तुझ्या अंगास हात लावणार नाही. कारण ते पाप आहे. तुझे सुख तुला अन्यत्र मिळवावे लागेल. मजकडून तुला ते मिळणे नाही.”

“यमा, असा कसा रे तू बुळा निघालास ? तुझ्यात ना कुठली भावना ना काही हिंमत! जशी एखादी वेल झाडाच्या बुंध्याला वेटाळून टाकते, तशी कुणीतरी तुझ्या कमरेला घट्ट आवळून टाकेल”  उद्विग्न होऊन शेवटी यमी आपल्या भावाला फटकारते.

“अन्य कुणाला तू अवश्य मिठी मारावीस आणि त्यानेही तुला विळखा घालावा. तू त्याचे मन जिंकावेस आणि त्यानेही तुझे चित्त हरण करावे आणि अशा प्रकारे तुमचे मीलन मंगल व्हावे, हीच माझी कामना आहे”  या यमाच्या उक्तीने ऋग्वेदाच्या या सूक्ताची सांगता होते.

इतिहासाचार्य राजवाडे यांना या संवादावरून असे वाटते की “पुरातनकाली बहीणभावंडांचा समागम रानटी आर्य लोकांत प्रचलित होता व ऋग्वेदकाळी तो गर्ह्य समजला जाऊ लागला होता” (पान क्र. 50, 1989 आवृत्ती) म्हणजे स्वैर लैंगिक संबंधापासून काही एक लैंगिक नियमन करण्यापर्यंत समाजाची मानसिकता निर्माण झाली होती. परंतु यमी या नियमनाला छेद देऊ पाहते आहे. तिच्या लेखी कामभावना ही शरीरधर्माला अनुसरून उत्पन्न होते, ती स्वायत्त आहे आणि म्हणून तिची पूर्तता होणे आवश्यक आहे. अतृप्त कामवासना ही विनाशक आहे, त्यामुळे नियम बाजूला सारून पूर्वीच्या प्रमाणे भावाने बहिणीशी समागम करण्यात काही गैर नाही, असे ती मानते.

यम हा कामप्रेरणेला नाकारत नाही, उलट “तू इतरांबरोबर संबंध कर” असे तो परोपरीने यमीला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतो. समाजाने त्याज्य समजलेला संबंध मी कदापी पत्करणार नाही,  असे स्पष्टपणे तो आपल्या बहिणीला बजावतो.

चालून आलेला शरीरसंबंध नाकारतो, तो कसला आलाय पुरुष, अशा आशयाचे वाक्ताडन यमी आपल्या भावाला करते. तिला यमाने दिलेले उत्तर लक्षणीय आहे. ज्या दोघांनी समागम करायचा, त्या स्त्रीपुरुषांनी परस्परांची मने  जिंकली तर त्यांचे युगुलजीवन मंगलमय होईल, असे यम तिला सांगतो. त्याचा गर्भितार्थ असा की ‘तू भले मला शरीर संबंध नाकारण्याबद्दल दूषण देशील, पण केवळ स्वैरपणे शरीराचा भोग घेण्यात कसला आलाय पुरुषार्थ? पुरुष आणि स्त्री दोघे माणूस म्हणून समागम करू पाहतात तेव्हा शरीराबरोबर मने एकरूप होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे.

समाजाचे स्थित्यंतर होत असताना लैंगिकतेचे नियमन आणि लैंगिक संबंधाविषयीचा दृष्टिकोन कसा होता या दोन्ही अंगांनी पाहण्यासाठी ऋग्वेदातील “यम – यमी “ संवाद महत्त्वाचा आहे.

picture credit : https://commons.wikimedia.org/wiki/File:Yama_%26_Yami_03.jpg

Comments are closed.