मैथुन शिल्पे – लैंगिकता व संस्कृती ८

 

‘मिथुन’ या संस्कृत शब्दाचा अर्थ नर आणि मादी यांची जोडी व मैथुन म्हणजे जोडीने करण्याची कृती, अर्थात संभोग. मैथुन आणि त्याचे निरनिराळे प्रकार दाखविणारी शिल्पे भारतात अनेक ठिकाणी, मुख्यतः मंदिरांच्या भिंतींवर आढळून येतात. त्यातले सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मध्य प्रदेशातील खजुराहो येथील हिंदू, बौद्ध आणि जैन मंदिरांचा समूह. खजुराहो झाशीच्या आग्नेयेला सुमारे १७५ किमी अंतरावर आहे. अशाच अनेक प्रकारची शिल्पे गुजरातमधील मोढेरा येथील सूर्य मंदिरात, नेपाळमधल्या पाटणच्या मंदिरात तसेच कर्नाटकातील ऐहोळ जवळच्या हुचिमल्लीगुडी आणि ओडिसामधल्या कोणार्कच्या सुप्रसिद्ध सूर्य मंदिरात पाहावयास मिळतात. म्हणजे उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व भारतातल्या या मंदिरांमध्ये मैथुन शिल्पे एका कालखंडात निर्माण झालेली दिसतात. (पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातल्या त्रिकोना किल्ल्याजवळच्या एका गुहेत तथापिचे अच्युत बोरगावकर यांना अलीकडे एका मैथुन शिल्पाचे अवशेष सापडले). या शिल्पांचे देशीविदेशी पर्यटकांना आकर्षण असते पण त्या शिल्पांचा आणि त्यांच्या मागच्या सामाजिक सांस्कृतिक प्रवाहांचा इतिहास उलगडणे हे अभ्यासकांना आव्हान ठरत आले आहे. त्याच्या जोडीला ओडिशामधील भूर्जपत्रावरील “कृष्णलीला “ या पोथीत आणि राजस्थानमधील राजपूत शैलीतील चित्रांमध्ये काही मैथुन चित्रे सापडली आहेत.

शरीराच्या अवयवांचे मैथुन स्थितीतील उघडेवाघडे चित्रण (पॉर्न ) हे आधुनिक जगात गेल्या दीडदोनशे वर्षात कायद्याने दंडनीय ठरविण्यात आले होते. आता काही देशात हे निर्बंध प्रौढांसाठी सैल करण्यात आले आहेत. इंटरनेटमुळे अश्लीलता विरोधी कायद्यांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यात नव्याने माहित होणारी प्राचीन मैथुनशिल्पे ही पुराणमतवादी विचारधारेसमोर समस्या म्हणून उभी राहतात.

जगाच्या इतर भागांमध्ये देखील इतिहासकाळात मैथुनाचे चित्रांकन झाल्याचे पुरावे दिसतात. मेसोपोटेमिया (सध्याचा ‘इराक’) मधील प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांमध्ये आणि वस्तूंवरती मैथुन चित्रे दिसून आली. ‘असुर’ या ठिकाणच्या ‘इनना’ या देवतेच्या मंदिरात स्त्री-पुरुष संभोगाचे उघड चित्रण झाल्याचे नमुने सापडले होते. ‘इनना-इश्तर‘ ही त्या संस्कृतीतील एक प्रमुख आणि शक्तिशाली देवता होती. लावण्य, प्रेम, कामोपभोग, सत्ता, संग्राम या सर्व गोष्टी ‘तिच्या’ अधीन समजल्या जात. ‘इनना’चा संबंध नंतर आलेल्या ग्रीक देवता अफ्रोडायटी (लावण्य) आणि अडोनीस (पौरुष), जसे आपल्याकडील कामदेव आणि रती, यांच्याशी जसा जोडला जातो, तसाच काही संशोधकांनी तिच्या सिंह या वाहनामुळे आणि शक्तिदायिनी रूपामुळे दुर्गा या भारतीय देवतेशी जोडला आहे. ऋग्वेदातील इंद्र-इंद्राणी संवादातून जसा कामोपभोगात लपलेला स्त्री-पुरुष सत्तासंघर्ष आपल्या नजरेस येतो तसाच तो इननाच्या प्रतिकात  आपल्याला आढळतो. इनना या देवतेभवती खूप काही कथा-काव्य-साहित्य नंतरच्या काळात रचले गेले, या गोष्टीवरून तिच्या केंद्रस्थानाची आपल्याला कल्पना येते.

इजिप्तमध्ये सापडलेल्या इतिहासपूर्व ११५० च्या सुमारास तयार झालेल्या शृंगारिक भूर्जपत्रावर ९ अवस्थांतील स्त्री-पुरुष मैथुनाची चित्रे सापडली. हे भूर्जपत्र इटलीमधील तुरिन येथील संग्रहालयात उपलब्ध आहे. अशाच प्रकारची मैथुनशिल्पे ग्रीक लोकांमध्ये प्रचलित असावीत. कारण पॅन हा त्यांचा अर्धा माणूस आणि अर्धा अज म्हणजे बकरा असलेला वनदेव हा बकरीबरोबर संभोग करतानाचा पुतळा उपलब्ध आहे. मॅसिडोनिया या ग्रीसच्या उत्तर भागात राहणाऱ्या टोळ्यांमध्ये मैथुनाची चित्रे चलनावर उमटविण्याची पद्धत होती. ती थेसॉस बेटावरच्या लोकांनी उचलली आणि अशी चित्रे चांदीच्या नाण्यांवर ठसविली. त्या  चित्रांमध्ये सॅटा हा आपल्याकडील किन्नरांच्या जातकुळीतला घोड्याचे कान आणि शेपूट असलेला मनुष्यप्राणी कामोत्तेजित अवस्थेमध्ये एका अप्सरेला उचलून पळताना दाखविला आहे. किन्नरांप्रमाणेच सॅटा हा भाबडा आणि अप्सरांचा प्रेमिक दाखविला जातो. कदाचित तो रांगड्या कामवासनेचे प्रतिक बनला असावा. ही रौप्य नाणी इतिहासपूर्व पाचव्या शतकातील समजली जातात.

स्थापत्य, मूर्ती आणि चित्रे यांचा उगम हा क्षणभंगुर आणि मर्त्य जीवनापलीकडे अमरत्व मिळविण्याच्या  आकांक्षेतून झाला असावा आणि नंतर आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन तसेच आपल्या दैवताचे आराधन हे हेतूही त्यात मिसळले गेले असावेत. आधुनिक काळात कलास्वाद, जीवनातील अर्थपूर्णता, समाजमनाला चालना देणे आणि व्यवहारांना आकर्षक बनविणे हे आणि अशासारखे अनेक हेतू या कलाप्रकारामध्ये आपल्याला दिसून येतात. जगभरात मैथुनक्रियेचे चित्रण प्राचीन काळात झालेले आपण पाहतो. त्यामुळे त्या मागच्या हेतूंचा शोध अभ्यासकांनी विविध प्रकारे घेतला आहे. या सर्वांमध्ये खजुराहोच्या मैथुनशिल्पांबद्दल बराच खल झाला आहे आणि होत आहे.

भारतातील मैथुन चित्रणाचे वैशिष्ट्य हे आहे की, ते सर्वस्वी दगडात घडविलेले शिल्पकाम आहे, इतर कोणतेही माध्यम जसे लाकूड वा धातू ( जगात इतरत्र आढळणारे) त्यासाठी वापरलेले नाही. याचा संबंध असा आहे की हे खर्चाचे काम राजाश्रयाने झालेले आहे. दुसरे म्हणजे ही जवळपास सर्व शिल्पे आपल्याला मंदिरांमध्ये सापडतात. भांडीकुंडी, दिवे इ. ऐहिक व्यवहाराच्या वस्तू जशा ग्रीक रोमन काळात किंवा जशी चित्रे मध्ययुगीन युरोप अमेरिकेत अशा चित्रणासाठी निवडली तसे न होता भारतात त्यांचा संबंध धार्मिकस्थळांशी जोडलेला दिसतो. युरोपातील काही चर्चमध्ये अशी काष्ठ शिल्पे दिसतात, पण अपवादानेच. आणखी एक अपवाद म्हणजे इंग्लंड मधील काही चर्चमध्ये आढळणारी ‘सीला ना गिग्स “ या नावाने ओळखली जाणारी लज्जागौरीशी साधर्म्य दाखविणारी शिल्पे. भारताच्या उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम भागात मैथुन शिल्पे असणारी मंदिरे उभारली गेली ती साधारणपणे एकाच कालखंडात म्हणजे वर्तमान गणनेच्या दहाव्या आणि अकराव्या शतकात.

चंदेल वंशीय राजांनी २० चौ. किमी परिसरात या दोनशे वर्षाच्या कालखंडात एकूण ८५ देवळे बांधली असे समजले जाते. त्यापैकी पंचवीस आता अस्तित्वात आहेत. बाराव्या शतकात दिल्लीच्या सुलतानाच्या आधिपत्याखाली हा भूप्रदेश आल्यावर बाकीच्या देवळांची वाताहत झाली असावी. १८३८ मध्ये बर्ट नावाच्या ब्रिटिश मुशाफिराला ही देवळे दाखविण्यात आल्यानंतर खजुराहो हे जगाला माहीत झाले. एकूण शिल्पांपैकी केवळ १० टक्के शिल्पे ही मैथुनाच्या विविध क्रिया दाखविणारी आहेत. ती देवळांच्या बाहेरील भिंतींवर आहेत आणि कोणतीही भीडभाडं न बाळगता त्यांची निर्मिती करण्यात आली आहे . प्राण्यांबरोबरचे मैथुन सुद्धा शिल्पबद्ध केले गेले आहे .

या शिल्पांचे मंदिर प्रांगणातील स्थान काहींच्या मते, तंत्रोपासक कौल कापालिक पंथाशी निगडित असले पाहिजे कारण एक तर खजुराहोच्या परिसरात या पंथाचे अस्तित्व त्या काळात होते आणि शिल्पातील कित्येक पुरुष हे हातात दंड कमंडलू घेतलेले किंवा मुंडण केलेले, यज्ञोपवीत धारण केलेले असे दाखविलेले आहेत. काहींच्या हातात व गळ्यात रुद्राक्षमाला आहेत.  या पंथांमध्ये पंच ‘म’कार (मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा व मैथुन) हा उपासनेचा भाग समजला जातो आणि त्याला यथासांग क्रियाकर्माचे स्थान मिळते. या मताबद्दल अडचण ही आहे की, कापालिक हे गळ्यात कवट्यांची माळ घालतात. तसे कापालिक या शिल्पांमध्ये दिसत नाहीत. तसेच भुवनेश्वर वा उज्जैन येथे जी या कौलाचारी पंथांची भैरव मंदिरे आहेत तिथे आपल्याला मैथुन शिल्पे पाहायला मिळत नाहीत. कौलाचारी साधना ही उघडपणे नव्हे तर गुप्तपणे करावयाची असते. शिवाय या पंथाचा ‘शिल्प प्रकाश ‘ नावाचा जो ग्रंथ आहे, त्यात जोडप्याची मूर्ती ही मैथुनामध्ये दाखवू नये असे स्पष्ट म्हटले आहे. शाक्त पंथीयांची चौसष्ट योगिनींची मंदिरे खजुराहो, भेडाघाट व राणीपुर झरियल येथे आहेत, तेथे देखील आपल्याला मैथुन शिल्पे आढळत नाहीत. त्यामुळे केवळ तंत्रोपासनेत मैथुनाला एक मध्यवर्ती स्थान आहे. या कारणाने खजुराहो चा तंत्रोपासनेशी संबंध लावणे तर्कसंगत वाटत नाही.

या उलट ज्या मंदिरात मैथुनशिल्पे आहेत ती मंदिरे वैष्णव, सूर्योपासक पंथ आणि जैन धर्म यांची आहेत. त्यात खजुराहो शिवाय गुजरात, कर्नाटक, ओडिशा आणि नेपाळमधल्या अनेक मंदिरांचा समावेश होतो.

दुसरे एक मत असे आहे की, ही मैथुनशिल्पे मंदिराचे सौंदर्य वाढविण्यासाठी केलेले नक्षीकाम आहे. त्याला आधार ‘समरांगण सूत्रधार’ या स्थापत्य विषयक ग्रंथातील एका पदाचा दिला जातो. त्यात असे म्हटले आहे की “झाडाच्या फांद्यांखाली रतिक्रीडेत रममाण झालेले स्त्री-पुरुष मंदिरांच्या भिंतींवर दाखवावे“. हा एकमेव अपवाद सोडता इतर ‘शिल्प प्रकाश‘, वराह विहीर यांची बृहतसंहिता व हयशीर्षपंचरात्र या ग्रंथांमध्ये दाराच्या चौकटी सुशोभित करण्यासाठी पक्षी, वेली, कुंभ आणि युगुले दाखवावीत असे म्हटले आहे. पण युगुल जरी प्रेमिकांचे असले तरी मैथुन हा सर्वस्वी निराळा प्रकार आहे. शिवाय इथे मैथुनशिल्पे ही केवळ दाराच्या चौकटींवर नाही तर पूर्ण भिंती व्यापून राहिली आहेत. लक्षणीय गोष्ट अशी आहे की, ‘शिल्पप्रकाश’ कर्ता असे नमूद करतो की, स्त्रीप्रतिमा ही सुशोभीकरणासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे मैथुनचित्राचा उपयोग सौंदर्यवर्धनासाठी केला असल्याची शक्यता मावळते.

आणखी एक स्पष्टीकरण असे पुढे केले जाते की, वात्स्यायनाच्या कामसूत्रात दिलेल्या मैथुन क्रिया इथे चितारल्या आहेत. पण असे करण्याचे प्रयोजन काय हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कामसूत्रावरच्या भाष्यकारांनी असे नमूद केले आहे की, मंदिर व तत्सदृश पवित्र स्थाने तसेच वर्दळ असणारी विश्रामगृहे या ठिकाणी मैथुन करणे निषिद्ध आहे. त्यामुळे वात्स्यायनाचे नाव घेऊन ही मैथुनशिल्पे कोरली असण्याची शक्यता धूसर होते.

काही पाश्चात्य संशोधकांनी या शिल्पांसाठी उपनिषदातील तत्त्वज्ञानाचा आधार शोधला आहे. बृहदारण्यक उपनिषदातील दाखले देऊन असे सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे की, मैथुन शिल्पातून साधकांना जीव शिव ऐक्याचा स्थलकालातीत मोक्ष अनुभव घेण्याचा संदेश व्यक्त होत आहे. या अनुभवासाठी त्या उपनिषदात स्त्री-पुरुष मैथुनाचे रूपक वापरले गेले आहे, म्हणून हा निष्कर्ष काढला जातो. अडचण एवढीच आहे की, या शिल्पांमध्ये थेट मैथुन सोडून असाधारण लैंगिक क्रिया दाखविणारी बरीच शिल्पे आहेत. त्यांच्या प्रयोजनाचा मुद्दा शिल्लक राहतोच. त्यामुळे मैथुनशिल्पे  ही एका भावातीत अवस्थेचे प्रतिक आहेत असे निखळपणे म्हणता येत नाही.

ही मैथुनशिल्पे व्यावहारिक पातळीवर मंदिरातील देवदासींच्या समागमक्षमता प्रकट करीत असाव्यात अशी एक शक्यता दिसते. त्याकाळात देवदासी प्रथा सर्वत्र स्थिरावलेली होती. त्यांनी मंदिरात नृत्य गायनादी कला सादर करून देवतेची सेवा करायची आणि त्यामधून प्रत्यक्षात राजे राजवाडे यांचे रंजन करायचे असा क्रम होता. सातव्या शतकातील चिनी प्रवासी ह्यू एन त्सांग, राजतरंगिणी कर्ता कल्हण यांचे ग्रंथ तसेच अनेक शिलालेखांमधून देवदासींचे उल्लेख मिळतात. मंदिरांमधील शिल्पांमध्ये नर्तकी, वादक इ.च्या चित्रणावरून त्यांच्या मंदिरातील भूमिकेकडे स्पष्ट निर्देश होतो.

या देवदासींचा उदरनिर्वाह कसा चालत असे? तत्कालीन प्रवासवर्णनांवरुन असे अनुमान बांधता येते की, या देवदासी ठराविक रक्कम पुजाऱ्याकडे सुपूर्त करून आपला मंदिरात कला सादर करण्याचा हक्क राखून ठेवीत असत. ही रक्कम धनिक वर्गाकडून गोळा करण्यासाठी त्या व्यक्तिगत किंवा गटाने त्या धनिकांचे कामक्रीडेसह सर्व प्रकारे रंजन करण्यास बांधील असत. काही देवदासी अशाप्रकारे संपत्ती गोळा करून त्यांनी देवळाला देणग्या दिल्याची उदाहरणे शिलालेखात सापडतात. पेशवाईत देखील नायकिणीने देवस्थानाच्या देखभालीचा हक्क आपल्याकडे असल्याचा दावा पेशव्यांकडे केल्याचा उल्लेख पेशवे दप्तरात सापडतो.

मोठ्या तीर्थक्षेत्रात देवदासींची संख्या शेकड्याने असे आणि यात्रेकरू, व्यापारी आणि वाटसरू यांच्या वर्दळीने राजाच्या तिजोरीत चांगली भर पडत असे. परंतु या देवदासी प्रथेला संन्यासी आणि ब्राह्मण वर्गाचा विरोध होता. राजा जोजलदेव याने त्याबद्दल असे म्हटल्याचा उल्लेख आहे की, उत्सवप्रसंगी जो कोणी, मग तो संन्यासी, पंडित किंवा ज्येष्ठ असो, देवदासींच्या नाचगाण्याला आक्षेप घेईल, त्याचा राज्यकर्त्याने बीमोड केला पाहिजे. देवदासी या अखंडसौभाग्यवती असल्याने शुभसूचक समजल्या जात. कलागुणसंपन्न देवदासींचा मान मोठा असे. त्यामुळे काही शिल्पात त्यांना कमळावर विराजमान झालेले दाखविले आहे.

मंदिराच्या बाह्य भागावर मैथुनशिल्पे दाखवून त्या मंदिरसमूहाची देवदासीरुपी संपन्नता व्यक्त केली जात असावी हा तर्क आहे. उत्तरेकडे मुस्लिम धर्मीय राजसत्ता अस्तित्वात आल्यावर मंदिराचा आश्रय सोडून हा देवदासी कलावतींचा समूह कलावंतीण बनून राहिला.

या मैथुनशिल्पांमध्ये संन्यासी मंडळींचे चित्रण करून एकप्रकारे त्यांचा विरोध बोथट करण्याचा धाडसी प्रयत्न असू शकेल काय? कारण भगवी वस्त्रे धारण करून भोंदूगिरी करणारे त्या कालखंडातही अस्तित्वात होते. त्यांना या शिल्पांमधून सर्वार्थाने उघडे पाडले असेल काय?

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap