राधा आणि कृष्ण यांनी भारतीय जनमानसावर एक अद्भुत मोहिनी घातली आहे. या युगुलाचे कथानक सुरू होते, साधारण वर्तमानगणनेच्या दहाव्या शतकात एका शृंगारिक तंत्रोपासना स्वरूपात आणि त्याला आध्यात्मिक कलाटणी मिळते ती पंधराव्या शतकात. मग भक्तिसंप्रदायात हे कथानक स्थिरावते आणि आजही विविध कलांमधून ते कलाकारांना नवनवीन आविष्कारासाठी खुणावत राहते. या कथानकामध्ये वास्तवाचा अंश कमी आणि कल्पनेचा जास्त असल्याने त्यांना ढोबळपणे मिथक असे म्हटले जाते. राधा आणि कृष्ण या ऐतिहासिक व्यक्ती होत्या का, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्यांच्या व्यक्तित्वात किती आणि कसे रंग भरले गेले हा शोध बरेच काही सांगून जातो. कृष्ण ही महाभारतात पांडवांचा साह्यकर्ता, अर्जुनाचा सखा-सारथी, पार्थसारथी या भूमिकेत आणि भगवद्गीतेत योगेश्वर या रूपात तळपणारी व्यक्तिरेखा आहे. मात्र महाभारतानंतर येणारया हरिवंशातला कृष्ण, भागवत पुराणातला कृष्ण, बौद्ध व जैन साहित्यातला कृष्ण या व्यक्तिरेखा बरयाच अंशी वेगळ्या आहेत. यावरून काय दिसते तर मुळातल्या व्यक्तित्वात काही आकर्षण होते, त्याचा आधार घेऊन विविध रंग कथा आणि आख्याने यांच्या माध्यमातून त्यात भरण्यात आले. मिथक तयार करण्याचा हेतू हा जनसामान्यांच्या मूल्यकल्पना, आचारविचार यांना काही दिशा, काही वळण देण्याचा असू शकतो. पण ही मिथके जेव्हा जनमानसाची पकड घेतात, तेव्हा ती कल्पिते कुठे तरी सुप्त आशा-आकांक्षांना वाट करून देतात. अन्यथा लोकांना फार काळ त्या कथानकाचे आकर्षण वाटत राहणे संभवत नाही. सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक आल्बर कामू म्हणतो की, मिथके आपल्यात प्राण भरण्यासाठी कल्पनाशक्तीला निमंत्रण देत असतात.
राधा ही व्यक्तिरेखा पाचव्या शतकात रचलेल्या हरिवंश या ग्रंथात नाही, तसेच दहाव्या शतकात रचलेल्या भागवतपुराणातही नाही. मात्र भागवतात कृष्णाच्या गोपींसमवेत केलेल्या क्रीडांचे वर्णन आहे. त्यातली कुणी एक सुंदरा मनामधे भरली, असा उल्लेख नाही. या सुमारास प्राकृत म्हणजे सामान्य लोकांच्या बोलीभाषेत (पंडितांच्या संस्कृत भाषेत नव्हे) रचलेल्या साहित्यात राधा हे पात्र दिसू लागते. बाराव्या शतकात ओडिशामधील जयदेव कवीने संस्कृतमध्ये रचलेल्या गीत गोविंद काव्यामधून राधेला जे एक अनोखे स्थान मिळाले ते आज आठशे नऊशे वर्षांनंतरही अढळ राहिले आहे. कृष्णाच्या जोडीने तिच्या नावाचा जप होतो. गीतगोविंद मधील पदांचा नृत्यामध्ये आविष्कार करणारा ओडिसी हा अभिजात नृत्यप्रकार गणला जातो. साहित्य आणि सर्व ललित कलांमधून नव्हे तर धर्मउपासनापंथामधूनही राधाकृष्ण या युगुलाने जे स्थान मिळविले आहे, ते संस्कृतीच्या इतिहासात अभूतपूर्व आहे. या मिथकाला प्रतिष्ठित करण्याचे काम जयदेव कवीने गीतगोविंद मधून केले.
जयदेव कवीचा जन्म ओदिशातील पुरी जवळच्या एका खेड्यातला. पुरीमधल्या मंदिरातील पद्मावती नावाच्या देवदासीवर त्याचे प्रेम बसून ते दोघे विवाहबद्ध झाले. ही गोष्ट त्याच्या कुटुंबियांना मानवली नसावी. मंदिरातील नृत्याराधनेचे काम देवदासींकडे असे. पद्मावतीच्या नृत्यकलेला पोषक असे काव्य गीतगोविंदमध्ये आपल्याला दिसते. जयदेवाची संस्कृत भाषेतील काव्यरचना त्यामुळे गेय-कर्णमधुर आणि चित्रमय आहे. तत्कालीन पंडितांनी तिला “क्षुद्रकाव्य” असे हिणवून बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला.
गीतगोविंदाच्या बारा अध्यायांमध्ये राधा-कृष्णाचे कथानक उलगडत जाते. प्रत्येक अध्यायाला कृष्णाच्या भावावस्थेचे निदर्शक असे शीर्षक दिलेले आहे. सुरूवात होते ती एका हर्षोत्फुल्ल अवस्थेत, मग क्रमाक्रमाने उल्हसित, मोहक, उत्सुक, आतुर होणारा कृष्ण आपल्याला दिसतो. मग काही तरी बिनसते आणि दोघांमधे बेबनाव निर्माण होतो. कृष्णाचे चित्त राधेबद्दल विचलित होते. पण लवकरच त्याला भाव उमगतात आणि तो मनधरणी करायला तयार होतो. तो सारे चातुर्य पणाला लावून तिचे प्रणयाराधन करतो. राधेचा रूसवा जाताच कृष्ण तिच्याबरोबर मीलनाचा आनंद लुटतो आणि दोघेही त्या प्रेमोत्कट अवस्थेत एकरूप होतात. जयदेवाने या सर्व काव्यरचनेत शृंगाररस भरभरून लुटला आहे, असे कुठलीही अतिशयोक्ती न करता म्हणता येईल.
सुरवातीचे पद पाहू या.
नंद, कृष्णाचा पालक-पिता, राधेला सांगतो आहे, “आभाळात ढग दाटून आले आहेत. पुन्हा ही तमालवृक्षांची आधीच गडद असलेली झाडी आणि त्यात हा भाबडा कान्हा! तर तू याला नीट घरापर्यंत नेऊन सोड.” या आज्ञेनुसार ही राधाकृष्णांची जोडी निघाली. त्यांनी वाटेत, ठिकठिकाणी, झाडाझुडपात ज्या कामक्रीडा केल्या त्या धन्य होत्या. (अर्थात त्यांचे वर्णन ऐकून तुम्ही आम्ही धन्य व्हावे).
पहिल्याच पदात जयदेवाच्या धाडसाची कल्पना यावी. पुढे श्रोत्यांना तो सांगतो की, श्रीकृष्णाविषयी तुमच्या मनात प्रेम ओसंडून वाहत असेल आणि स्त्री-पुरुषातील रमणीय संबंधाविषयी तुम्हाला कुतूहल असेल तर जयदेवाच्या काव्याचा आस्वाद घ्या. म्हणजे जयदेवाच्या लेखी हरी हा ईश्वरस्वरूप आहे आणि परमोत्कट प्रेमाच्या अवस्थेत तो मनुष्यमात्रासाठी प्रकट होतो. स्त्रीपुरुष यांच्यातील अत्युत्कट प्रेम कामक्रीडा आणि समागमातून व्यक्त होत असताना जे परतत्त्व अनुभवास येते, त्याकडे जयदेव निर्देश करीत आहे. जयदेवाची ही भूमिका पूर्व भारतात त्या काळात प्रचलित असलेल्या बौद्ध तंत्रोपासक सहजयान पंथाशी जोडली जाते. तंत्रोपासना ही स्त्री-पुरुष तत्त्वातील समागमावर आधारलेली आहे. संभोग हा तंत्रोपासनेतील साधनेचा भाग आहे. (गेल्या शतकात ‘ओशो’ यांच्या ‘संभोगातून समाधीकडे’ या पुस्तकावरून गदारोळ झाला होता.) ओडीशा प्रदेशात बौद्ध, शैव आणि नंतर वैष्णव पंथांचा प्रभाव राहिला होता. सहजीय वैष्णव पंथ हा जयदेवाच्या काळात प्रभाव राखून असावा असे दिसते.
या पंथात शरीरधर्म आणि कामादी वासना गौण नसून त्यांच्या पूर्तीतून परतत्त्वापर्यंत पोहचायचे मार्ग सांगितले आहेत. जयदेवावर या धारणेचा प्रभाव असल्याने आपल्या काव्यात तो देहसौंदर्य व शृंगाराचे खुलवून वर्णन करण्यास बिलकुल कचरत नाही. उदाहरणादाखल बाराव्या अध्यायातले हे अखेरीचे पद पाहा.
आपला प्रियतम गोविंद म्हणजे कृष्ण याच्याबरोबर मीलन होऊन मुक्त रतिक्रीडा झाल्यानंतर थकलेली राधा त्याला सांगते की,
माझे केशपाश, वस्त्रप्रावरण, साजशृंगार सारे काही तू उधळून टाकले आहेस, तर आता ते पुन्हा पूर्ववत करून दे पाहू. “केसात फुले माळ, गालावर आकृती काढ, वक्षभागी पाने रेखाट आणि कमरेभवती मेखला बांध” आता या सगळ्याचे तपशीलवार वर्णन करण्यात जयदेव रंगून जातो. हा शृंगाररसाचा अतिरेक वाटल्यामुळे तत्कालीन पंडितांनी गीतगोविंद हे क्षुद्रकाव्य ठरविले असावे. पण जयदेव आपल्या शैलीचे समर्थन करताना म्हणतो की, श्रीकृष्णाच्या ठायी एकचित्त झाल्याने सर्व ललितकला, विष्णुचरणी समर्पणभाव, शृंगार आणि विवेक या तत्त्वांचा कृष्णलीलेतून काव्यमय विस्तार मी केला आहे. सुबुद्ध रसिकांनी त्याचा आनंदाने मागोवा घ्यावा. यातून सहजीय तंत्रोपासना व वैष्णव पंथ यांचा समन्वय साधण्याचा जयदेवाचा प्रयत्न दिसून येतो.
नंतरच्या काळात रामानुज व पंधराव्या शतकात चैतन्य महाप्रभू यांनी वैष्णव पंथाला भक्तिमार्गावर नेऊन ठेवले. त्यातला मानवी प्रेमाचा भाग ईश्वर प्रेमामध्ये आध्यात्मिक रूपात परिवर्तित झाला. राधाकृष्ण ही जीवात्मा–परमात्मा यांची प्रतिके बनली. संसारगती म्हणजे प्रियतमापासूनचा विरह आणि भक्तियुक्त समर्पण म्हणजे परमात्म्याशी मीलन होणे असे मानले जाऊ लागले. वैष्णव पंथाचा उदय हा कृषी संस्कृती स्थिरावली आणि नगरे वसू लागली त्या काळात झाला. वरकड उत्पादनाचा व्यापार सुरू होऊन संपत्तीचा साठा होऊ लागला त्या वेळेस लक्ष्मी विष्णू या देवतांचे माहात्म्य वाढीस लागले.
पशुपालन आणि त्यात गोपालन करणाऱ्या यादवांमधे वस्ती करून शेती करण्याचा प्रघात पडायला बराच कालावधी लोटला. या दरम्यान “सब भूमी गोपाल की” हाच चराऊ कुरणांचा न्याय होता. जमिनीची मालकी ही कल्पना ज्या टोळ्यामध्ये नव्हती, त्यांच्यात टोळी सोडून वेगळे कुटुंब ही कल्पना देखील रुजली नव्हती. त्यामुळे वयात आलेल्या तरुण तरुणींचे परस्परसंबंध हे विवाहबंधनाने नियमित या काळात झालेले नव्हते. म्हणून जयदेवाचा गोविंद हा मोकळेपणाने राधेशिवाय इतर गोपींबरोबर क्रीडा करू शकतो. राधा त्यामुळे खट्टू होते खरी पण त्याला प्रतिबंध करताना दिसत नाही. कारण त्या समाजात या प्रकारचे संबंध मान्य होते. संपूर्ण गीतगोविंदामधे राधाकृष्ण हे पति-पत्नी दाखविलेले नाहीत किंवा विवाहबंधनाचा उल्लेखही कुठे येत नाही.
कृषिप्रधान स्थिर जनपद संस्कृतीत जमीनमालकी, कुटुंबसंस्था व विवाहपद्धती या एकमेकाशी निगडित घटकांचा परिणाम हा स्त्री-पुरुष संबंधांवर होणे अटळ आहे. आधीच्या समाजाच्या अवस्थेत स्त्रीपुरुषांना मिळणारी मोकळीक काही प्रमाणात कुटुंबप्रधान व्यवस्थेत आकुंचित होणे अपरिहार्य होते. त्यामुळे राधाकृष्ण यांच्यातील उन्मुक्त प्रेमसंबंधाचे आकर्षण हे जनमानसाला खिळवून टाकत आले आहे. दुसरे असे की या संबंधात कृष्ण हा खट्याळ आहे. तो राधेची खोड काढतो. मग ती रूसते, रागावते. कृष्ण पुन्हा तिची मनधरणी करायला येतो. ती सहजासहजी दाद देत नाही. शेवटी ती विरघळते आणि दोघांचे मिलन होते. हा सारा क्रम जनसामान्यांच्या अनुभव विश्वाशी निकटचा असल्याने मधुर आणि चित्तवेधक आहे.
आणखी वेगळ्या दृष्टीने पाहिले तर धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषार्थांची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग कृष्णाच्या व्यक्तिरेखेत कवींनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. इतर कुठली पौराणिक व्यक्तिरेखा तिन्ही पुरुषार्थांचा इतका सुंदर समन्वय दाखवीत नाही. जनसामान्यांना तो आपला प्रियोत्तम व आपल्यातला सर्वोत्तम वाटतो. म्हणून जयदेव आत्मविश्वासाने म्हणतो की मी पूर्ण भक्तिभावाने कृष्णाच्या व्यक्तिरेखेत सर्व रंगछटा भरल्या आहेत. त्यांचा मागोवा घेण्याची जबाबदारी तुम्हा रसिकांची आहे. कदाचित म्हणूनच पंडितांनी केलेल्या अवहेलनेला न जुमानता गेली आठशे वर्षे लोकांनी जयदेवाच्या गोविंदाला डोक्यावर घेतले आहे.
जयदेवाची लैंगिकतेची कल्पना विकासाची पुढची पायरी दाखविते. महाभारतकाळातील शरीरसुख व संतानप्राप्तीसाठी समागम या कल्पनेपासूनपुढचा टप्पा हा परस्परांना संपूर्णपणे समागमातून दिलेला सौंदर्यानुभव या रूपात वात्स्यायनाच्या काळात गाठला गेला. जयदेवाने शृंगाराच्या माध्यमातून घेतलेला परमोच्च प्रेमाचा उत्कट अनुभव हा समागमाचा आणखी एक आविष्कार आपल्याला दाखविला.
No Responses