लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय? भेट घ्या +९१-७७७५००४३५०

 “लग्नाआधी शारीरिक जवळीक झालेली चालते का? मला ते नकोसं वाटतं, आपण अजून तयार नाही वाटत. मात्र त्याची सतत चिडचिड होते. तो रुसतो. म्हणतो तुझं माझ्यावरती प्रेमच नाहीये. दिवसदिवस बोलत नाही. सारखा संशय घेतो. म्हणतो तुझा दुसरा कोणीतरी असणार. मी काय करावं?”
“आमच्या दोघांचं एकमेकांवर खरंखरं प्रेम होतं. टाईमपास नाही की कॅज्युअल नाही. एकमेकांच्या शपथा घेतलेल्या होत्या. पण शेवटी त्याची आई नाही म्हणाल्यावर तो फिरला. सगळं विसरला. 1 वर्ष झालं त्याचं लग्न होऊन, तरी अजून मधूनच रडायला येतं. मित्र-मैत्रिणी म्हणाल्या तो वाईटच होता, त्याला अक्कल नव्हती, तो भित्रा होता. पण मला त्याची आठवण येते, हातातलं काम गळून पडतं त्याचं काय करू?”
“नाते सुरु होण्याआधी आमची खूप घट्ट मैत्री होती. पण नाते सुरु झाल्यानंतरच्या सहा महिन्यांमध्ये तिने मला सारखे-सारखे मेसेजेस पाठवणे व माझी खबर ठेवणे सुरु केले. रोजच्या रोज भेटण्यासाठी तिचा आग्रह सुरु झाला आणि मला माझ्या मित्रांसमवेत संध्याकाळ घालवायची असल्यास धुसफूसही सुरु झाली. मला या सगळ्याचा त्रास होतो आहे मात्र याविषयी काय करावे ते कळत नाही?”

लैंगिकता आणि मन यांचा एकमेकांशी अगदी जवळचा संबंध आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहेच. विशेषतः वयात येण्यापासून आपण ते अनुभवलेले आहे. तरीही लैंगिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य, या दोन गोष्टी नेहमी वेगवेगळ्या ठेवून त्यांच्याकडे पाहिले जाते. खरे पाहता, त्या एकच जरी नसल्या तरीदेखील एकमेकींवर कमालीचा परिणाम करणार्‍या आहेत आणि आपले आरोग्य चांगले राहावे याकरिता दोन्हींमध्ये निरोगी संतुलन असणे आत्यंतिक गरजेचे आहे. या दोन्हींबद्दल मात्र खुलेपणाने बोलण्याची, चर्चा करण्याची आणि वेळ पडल्यास मदत मागण्याची मुक्त मुभा आपल्या समाजात असल्याचे दिसत नाही.

मानसिक आणि लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत मागणे, हे आपल्याकडे अजून तितकेसे रूढ नाही. स्वास्थ्यासाठी मदत वा उपचार घेतले जातात, ते एखादा मोठा आजार झाल्यावरच. आपले दैनंदिन ताणतणाव व प्रश्न याविषयी बोलणे हेदेखील आपल्या स्वास्थ्यामध्येच येते, याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यास बऱ्याचदा कमी लेखले जाते; पण अशी मदत कुठेच उपलब्ध नसण्याचे परिणाम वाटतात तितके साधे नाहीत. हा ताण मात्र बऱ्याचदा नियंत्रणाबाहेर असू शकतो, त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप काळ लागू शकतो आणि  त्यातून स्वतःचे स्वतः बाहेर पडता येतेच, असे नाही. अशावेळी मोकळेपणाने मदत मागणे-देणे आणि मानसिक व लैंगिक स्वास्थ्याभोवती निर्माण झालेले निषिद्धतेचे, गूढतेचे आणि गुप्ततेचे वलय मोडून काढणे अत्यंत गरजेचे आहे. ‘नेस्टस् फॉर युथ’ हा तोच प्रयास आहे, जिथे तरुणाईला आपले मन मोकळे करता येईल आणि कुठलीही भीती न बाळगता मदत मागता येईल!

प्रयास आरोग्य गट, पुणे आणि ब्रिस्टलकोन इंडिया यांच्या सहयोगाने ‘नेस्टस् फॉर युथ’ या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे.  नेस्टस् फॉर युथ ही जागा तरुणाईला स्वतःच्या हक्क-जबाबदारीची जाणीव करून देणारी, आपल्या प्रश्नाचे स्वरूप समजून ते स्वतःचे स्वतः सोडवता यावेत, यासाठी मदत करणारी आहे. वेळ पडल्यास वैद्यकीय मदत कुठे आणि कशाप्रकारे मिळू शकेल, याचीही माहिती इथे मिळते.

18 ते 40 या वयोगटातील कुठलीही व्यक्ती या उपक्रमात भाग घेऊ शकते. भेटीची वेळ अगोदर ठरवून, पुण्यातील डेक्कन कॉर्नर येथे असणाऱ्या प्रयास आरोग्य गटाच्या कार्यालयात येऊन ‘नेस्टर’ची भेट घेऊ शकते. आपल्या मनातील सर्व प्रश्न विचारू शकते आणि मन मोकळे करून बोलू शकते. एक तरुण संवेदनशील नेस्टर त्यांच्या मदतीस तत्पर असेल. या भेटी संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क असतील. तुम्ही भेटीची वेळ  ठरवण्यासाठी 7775004350/ 9561744883 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा :  https://www.instagram.com/tv/CRlUm1fJoJ2/?utm_medium=copy_link

 

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

4 Responses

  1. Dhananjay says:

    माझी पत्नी शारीरिक सबंधास कंटाळते. तिच्यात आॅर्गेजम / सेक्स ची पण कमी नाही, पण शरीर संबंधाची मागणी केल्यास लवकर तयार होत नाही. शारीरिक सबंध टाळते. खुप विनंती करावी लागते. शक्यतो ती मी बोलाविल्या शिवाय स्वत: येत नाही, पण माझ्या आॅर्गेजम / सेक्स ला ती फार समजून घेत नाही. तिच्या अशा वागण्याने आता मी कंटळलोय, परिणामी रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही त्यामुळे माझे आरोग्य धोक्यात येईल असे मला वाटते.
    मी पत्नीची समजत कशी काढू किंवा यावर उपाय, टिप्स सुचवा ही विनंती

    • तुम्ही त्यांच्याशी या विषयावर बोललात का?
      संवाद हे खूप महत्वाचे माध्यम आहे अशा प्रकारच्या समस्यांवर. म्हणूनच जर तुम्ही बोलून काही परिणाम होत नसेल तर यामागे नक्की काय कारण आहे हे शोधलं पाहिजे. तसेच मानसिक कारण आहे की शारीरिक कारण हे कळालं तरच त्यानुसार उपचार करता येतील. तेव्हा तुम्ही समुपदेशकांची व डॉक्टरांची मदत घ्या.

  2. Manoj says:

    माझे अडिज वर्ष एका तरुणी सोबत प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी तिने दुसऱ्याच मुलाशी लग्न केलं.. मी तिला विसरण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पण शक्य होत नाही.. आमच्यात शारीरिक संबंध सुद्धा झाले होते. माझ्या घरी तिच्याबाबत पूर्ण कल्पना असून सुद्धा तिने भलत्याच मुलाशी केलेलं लग्न मला उध्वस्त करून गेलंय. काय करावं सुचत नाही. वाटतं सगळं सोडून द्यावं आणि निघून जावं कुठेतरी लांब मग घरातल्यानंचा विचार येतो आणि स्वतः ला सावरतो. मित्र मैत्रिणी कुणीच नाही. एकटाच बसून असतो मी. माझ्याच विश्वात…

    • तुम्हाला समुपदेशनाची गरज आहे. तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर वरील नंबर वर फोन करुन भेट घ्या.
      जर कुणाशी फोनवर बोलायचे असल्यास ०२२ २५५२११११ आयकॉल इथे फोन करा.
      अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा. https://letstalksexuality.com/icall_helpline/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap