अनेकदा बायकांना बाळंतपणाच्या पुरेशा सेवा मिळत नाहीत किंवा त्याची योग्य माहितीदेखील मिळत नाही. बाळंतपणाच्या वेळी त्रास झाल्यास व त्यावर उपचार न झाल्यास नंतर काही आजार उद्भवू शकतात. बाळंतपणानंतर बाईला विश्रांतीची गरज असते पण तीही अनेकींना मिळत नाही. त्यामुळेदेखील काही आजार निर्माण होतात. अनेकदा असे आजार होतात पण बाया त्याबद्दल बोलत नाहीत. त्यांना बोलायची लाज वाटत असते आणि तसा वेळ किंवा संधीही त्यांना मिळत नाही. अशाच एका आजाराची आपण माहिती घेऊ या. या आजारांवर वेळीच उपचार झाले तर त्यातून पुढे निर्माण होणारी गुतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते.
अंग बाहेर येणे (Prolapse of the Uterus )
अंग बाहेर येणे म्हणजे गर्भाशय त्याच्या मूळच्या जागेवरुन खाली येणे, खालच्या दिशेने घसरणे. अंग बाहेर येण्याचे तीन टप्पे आहेत. त्यानुसार बाईला काही लक्षणं जाणवू शकतात.
टप्पा १. पहिल्या टप्प्यात गर्भाशयाच्या पिशवीचे तोंड त्याच्या नैसर्गिक जागेहून थोडे खाली सरकते. याच्या जोडीला ओटीपोटात रग लागणे, कंबरदुखी, अंगावरुन जास्त पांढरे जाणे, शारीरिक संबंधांच्या वेळी त्रास ही लक्षणं दिसतात.
टप्पा २. दुसऱ्या टप्प्यामध्ये गर्भाशय योनीमार्गामध्ये येते. यामुळे ओटीपोटात जड वाटू लागते. काही तरी निसटल्यासारखे, सुटत असल्यासारखे वाटत राहते.
मायांगामध्ये सतत काही तरी असल्यासारखे वाटते. ओटीपोटात ओढ लागल्यासारखे दुखते. मायांगावर ताण पडल्यासारखे वाटते. मांड्यांना रग लागते. अंगावरुन पांढरे जाते. शरीरसंबंध करणे अवघड जाते किंवा संबंध करताना खूप दुखते.
पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये व्यायाम (लिंक पहा ) आणि औषधं घेऊन अंग मूळ जागी जायला मदत करता येते.
टप्पा ३. तिसऱ्या टप्प्यामध्ये गर्भाशय योनीच्या बाहेर दिसायला लागते. विशेष करुन खोकला आला किंवा दोन पायावर बसले की अंग योनीच्या (मायांगाच्या) बाहेर पडलेले दिसते. याच्या जोडीने ओटीपोटात जड वाटणे, चालताना दोन मांड्यांमध्ये काहीतरी आल्यासारखे वाटणे, ओटीपोटात आवळून धरल्यासारखे दुखणे, कंबर दुखणे, अंगावरुन जास्त प्रमाणात पांढरे जाणे आणि संबंधांच्या वेळी खूप दुखणे अशी लक्षणे दिसतात. या टप्प्यामध्ये गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करावी लागते.
बाळंतपणाच्या वेळी कळा यायला लागल्यावर लगेच बाईने जोर केला तर गर्भाशयाच्या स्नायूंवर ताण पडतो. गर्भाशयाचं तोंड उघडेपर्यंत जोर लावू नये. तसे केल्यास स्नायू सैल पडतात. बाळंतपण झाल्यावर किंवा गर्भपातानंतर बाईने किमान दीड महिना विश्रांती घ्यायला हवी. या काळात कोणतीही जड कामं करु नयेत. बाळंतपणानंतर लगेच कामाला सुरुवात केल्यास गर्भाशयाच्या स्नायूंवर ताण पडतो आणि त्यामुळे गर्भाशय मूळ जागी येणे अवघड होते. परंतु बायकांना अशी विश्रांती मिळत नाही त्यामुळे गर्भाशयावर ताण येतो. लहान वयामध्ये गरोदर राहणे, एकामागोमाग एक अनेक बाळंतपणं होणं, मुलगा व्हावा यासाठी सततची बाळंतपणं किंवा वारंवार गर्भपात ही देखील अंग बाहेर येण्याची कारणं आहेत.
अनेकदा स्त्रिया आपले आजार अंगावर काढतात. असे आजार अंगावर न काढता, वेळीच उपचार घेणे गरजेचे असते.
P.C. : https://www.med.unc.edu/cares/gynecologic-surgery/prolapse-treatment/
2 Responses
Best is best
Thanks for your feedback. Keep writing your feedback