जोडीदाराची विवेकी निवड उपक्रमानिमित्त खास टिपण
जोडीदाराची विवेकी निवड करताना इतर सर्व बाबींप्रमाणे शारीरिक संबंध आणि त्या बद्दलची एकमेकांची मते, कल, आवड-निवड हे माहित असेल तर विवेक राबवणं सोपं जाईल नाही का? पण हे मुळी माहितंच नसतं आणि माहीत होणंही शक्य नसतं. अशी सत्य माहिती हवी असेल तर एकच मार्ग आहे लग्नाआधीच काही काळ प्रत्यक्ष प्रचीती घेणे! अर्थात हा मार्ग मान्य होणे शक्य नाही. ओशो रजनीश यांनी अशी ‘ट्रायल’ विवाहाची कल्पना मांडली आहे, असो. अव्यवहार्य कल्पनांची इतकी चर्चा पुरे.
स्त्री पुरुषांच्या कामभावनेमध्ये अनेक फरक आहेत पण कळीचा फरक हा की, स्त्री ही प्रत्यक्ष संभोगापेक्षा प्रेम भावनेला अधिक भुलते तर पुरुषाचे सारे लक्ष संभोगावर केंद्रित असते. ‘नाही प्रेमभावना तर नाही संभोग’ हे जणू स्त्रीचे ब्रीदवाक्य असते तर, ‘नाही संभोग तर नाही प्रेमभावना’, हे पुरुषाचे.
प्रथम रात्री संभोग झालाच पाहिजे आणि तो आनंददायीही असलाच पाहिजे असा कित्येकांचा गैराग्रह असतो, नव्हे तसे आपोआपच होत असतं असाच गैरसमज असतो. असं काही नसतं. पहिली रात्र ही सिनेमा, नाटकात, काव्यात वर्णन करतात तशी गुलाबी गुलाबी असतेच असं नाही. किंबहुना बहुदा नसतेच. लग्नसमारंभाचा शारीरिक मानसिक ताण आणि थकवा, नव्यानेच झालेली ओळख आणि ‘देख’, एखाद्या पूर्णतः परक्या व्यक्तीसमोर विवस्त्र होण्याचा संकोच, शरीराबद्दल घोर अज्ञान आणि गैरसमज, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांचे सद्हेतूने दिलेले पण निव्वळ स्व-ज्ञानाधारित सल्ले, असे सगळे घटक एकत्र आल्यावर दुसरे काय होणार? खरंतर लग्नाआधीच मानवी शरीर, शरीरसंबंध आणि पुनरुत्पादनाची क्रिया याबद्दल किमान माहिती असणे, ती मिळवणे गरजेचे आहे. आपल्याकडे अशी माहिती फक्त पोर्न व्हिडीओ बघून प्राप्त झालेली असते. बॉलीवूडचा सिनेमा बघून, त्यानुसार स्वतःचा संसार बेतण्याइतकंच हे मूर्खपणाचं आहे.
एखादी भाषा शिकावी तसं हे. आधी मूळाक्षरं, मग जोडाक्षर विरहीत शब्द, मग अवघड शब्द, मग वाक्य… त्या भाषेत खंडकाव्य लिहायचं म्हणाल तर बराच पल्ला गाठावा लागतो. तसंच हे आहे. पहिल्याच रात्री, पहिल्याच प्रयत्नात, लिंगाचा योनीमार्गात प्रवेश झालाच पाहिजे; अमुक इतका वेळ संभोग चाललाच पाहिजे अशा पूर्वनिश्चित निकषांनुसार आपण वागायला बघतो. स्वतःच ठरवलेल्या अनावश्यक मापदंडावर स्वतःला जोखत बसतो. मग काय गोची झालीच म्हणून समजा. संभोग म्हणजे काही एव्हरेस्टवर चढाई नाही की तुम्ही शिखरावर झेंडा गाडलात तरच जिंकलात, अन्यथा आख्खी मोहीम फुका! आपणच ठरवलेली उदिष्टे साध्य करता आली नाहीत की विषाद दाटून येतो. नैराश्य, चिडचिड, भांडण हे ठरलेले. उलट असा काही गोल, काही एंडपॉईंट ठरवणेच मुळी गैर आहे. नव्यानं रुजू पहाणारं हे नातं, त्याला आपल्या गतीनी वाढू द्यावं, बहरू द्यावं. कोणतीही खास अपेक्षा न ठेवता, समान पातळीवर येऊन एकमेकांच्या शरीराचा आनंद देणे-घेणे शिकायचे आहे, असा विद्यार्थी-भाव जागृत ठेवावा. बाकी आपोआप जमून जाते. त्यातून नाहीच जमले तर मग वैद्यकीय सल्ला घ्यावा. सार्वजनिक मुताऱ्यातून मिरवणाऱ्या, जाहिरातबाज, लिंगवैदूंची मदत मुळीच घेऊ नये.
सेक्सचा स्टॅमिना वाढवण्यासाठी काय करता येईल याही शोधात बरीच मंडळी असतात. कामसौख्य जास्तीजास्त वेळ मिळावं अशी अपेक्षा काही गैर नाही. ताकद वाढवण्यासाठीची बक्कळ औषधे बाजारात आहेत, त्यांचे कर्ते आणि विक्रेते, बक्कळ पैसे मिळवून आहेत; पण त्यातील एकही औषध सिद्ध झालेले नाही. शक्तीची आणि सुखाची अशी गुटिका मुळी नाहीच्चे; जरी त्या बाटल्यांवर अबलख घोड्याचे चित्र छापले असले तरी. तेंव्हा स्टॅमिना वाढवण्यासाठी एरवी जे आपण करू तेच करणे गरजेचे आहे. निर्व्यसनी असणे, नियमित व्यायाम करणे, योग्य आहार, उल्हसित चित्तवृत्ती हेच कामसुखाचे रहस्य आहे. पोर्नोग्रोफिक फिल्ममध्ये अर्धा-अर्धा तास चालत असले तरी प्रत्यक्षात मानवी संबंध अगदी अल्प काळ टिकतात. ‘लवकर वीर्यपतन होतं’ ही तक्रार ग्राह्य धरायची तर ‘लवकर’ची शास्त्रीय व्याख्या म्हणजे एक मिनिटाच्याही आत वीर्यपतन होणे!! याहून अधिक काळ संभोग समाधी टिकत असेल तर तो संभोग दैवी नसला तरी मानवी खचितच आहे. उगीच खंतावण्यात अर्थ नाही.
सेक्सच्या बाबतीत मुलांनीच पुढाकार घ्यावा, सर्व काही ‘करावं’ अशी अपेक्षा असते. मुळात मुलांत कामेच्छा जास्त असते आणि मुलींचा निव्वळ सहनशील सहभाग असतो, अशीही प्रचलित समजून आहे. हे ही सत्य नव्हे. पुरुषप्रधान व्यवस्थेत या बाबतीत पुढाकार घेणारी, मोकळेपणाने इच्छा, अनिच्छा, व्यक्त करणारी मुलगी ही फारच फॉरवर्ड, ज्यादा, किंवा चवचाल वगैरेही समजली जाते.
एखाद्या मुलीचे व मुलाचे पूर्वी शरीरसंबंध झाले होते अथवा नाही हे समजण्याचा कोणताही खात्रीचा मार्ग नाही. त्या व्यक्तीचा शब्द आणि तुमचा विश्वास, बस्स एवढंच. जशी आर्थिक अथवा इतर व्यवहारात फसवणूक होऊ शकते तशी ती लैंगिक व्यवहारातही होऊ शकते. कोणी समलिंगी असूनही घरच्यांच्या दबावापोटी लग्न करतात आणि मग दोघांचीही आयुष्य उध्वस्त होतात. कोणी एकनिष्ठतेचा आव आणतात आणि हा केवळ आव असल्याचं उशिरा लक्षात येतं…किती प्रकार वर्णावेत? प्रेमविवाह असेल, पूर्व-परिचयातून लग्न ठरले असेल, तर हे प्रकार घडण्याची शक्यता कमी, पण शून्य नाहीच. यावर काही प्रतिबंधक उपायही नाही.
‘जोडीदाराची विवेकी निवड’सारख्या उपक्रमातून या प्रश्नांची चर्चा होते, या प्रश्नांची जाणीव होते, एकमेकांची मते, स्वभाव ‘चहा-कांदेपोहे’ प्रकारापेक्षा जरा अधिक कळतात; त्यामुळे अशा सारखे उपक्रम निकडीचे ठरतात.
पूर्व प्रकाशित : http://shantanuabhyankar.blogspot.com/2018/12/blog-post_20.html
आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…
One Response
हा लेख- जोडीदाराची विवेकी निवड आणि लैंगिकता. खरच खुप छान आणि मनाला पटण्याजोगा आहे. माझ्या बाबतीत मला सांगावस वाटते की मी 1 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलाय. लैंगिक अनुभव आम्हा दोघांना पण नव्हताच. म्हणजे आम्ही जवळपास 3 वर्षे प्रेमात होतो पण कधी अस काही केलं नाही. बायको म्हणायची लग्नानंतर सगळं आधी काहीच नाही. मग काय गेले असेच 3 वर्षे निघून आणि शेवटी लग्न झालं. पण लग्नांन्टर आम्ही दोघे पण लैंगिक संबंधाचे वेळी खुप जास्त बिथरलेले होतो,घाबरलेले होतो. नेमकं काय करावं, कोठून सुरू करावं, माझ्याकडून होईल की नाही आणि जर नाही जमल तर कस? खुप सारा गोंधळ उडत होता मनात. पहिल्या दिवशी माझ्या लिंगामध्ये ताठरताच नाही आली, दुसऱ्या वेळी ताठरता आली पण वीर्य लगेच काहीही करायच्या आत बाहेर आले. मला संकोच वाटू लागला. जवळपास 5 ते 7 दिवस मी बायकोजवळ पण नाही गेलो. मित्रमंडळी वेग वेगळे उपाय,हकीम इत्यादी बद्दल सांगत होते. सेक्स च्या गोळ्या घेऊन आधी कर नंतर सवय झाली की जमते असे एक ना एक उपाय सांगत होते. पण मी ठरवलं की बायकोशी याबद्दल बोलावं. तस पाहिलं तर ती नाराज होतीच पण तरी हिंम्मत करून बोलायला सुरुवात केलीच. प्रेम विवाह असल्यामुळे म्हणा किंवा तिची विवेकी वृत्ती म्हणा तिने मला समजून घेतलं. त्यानंतर मी हळूहळू लैंगिक संबंध हिमतीने आणि एकमेकांशी बोलून करायला सुरुवात केली. सांगायचं झालं तर दोघांमध्ये असलेली विवेकी वृत्ती आणि लैंगिकता याचा खूप जवळचा संबंध आहे. नाहीतर आजकाल नवऱ्याकडून जर काही झालं नाही तर त्याला समजून न घेता माहेरी निघून जाऊन सोडचिट्ठी द्यायला तयार असणाऱ्या बायका कमी नाहीत. असो … पण हा लेख खरच खुप छान आहे.