…कारण आम्ही ‘पुरुष’ आहोत – महेशकुमार मुंजाळे 

हुश्श…! एकदाचा ‘जागतिक महिला दिन’ साजरा करून झाला. बायको माहेरी जाण्याची वाट पाहणाऱ्या नवऱ्यांना, ‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्त्री भूमिका करणाऱ्या भाऊ कदम-सागर कारंडे यांना, विमान लँड केल्याप्रमाणे दोन्ही पाय बाहेर काढत स्कुटीचा ब्रेक मारणाऱ्या बायकांना आणि मुलींच्या नावे फेक अकाउंट चालवणाऱ्या पुरुषांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आमची विनोदबुद्धी(?) दाखवत आम्ही महिला दिन साजरा केला.

वर्षातून एकदा का होईना ‘तिचा’ म्हणून दि वस साजरा केला जातोय, तरी त्यादिवशी ‘पुरुष दिन’ का नसतो म्हणून उसासे सोडत आम्ही ‘महिला दिनाची’ खिल्ली उडवत बसलो. कधी स्त्रीचा आदरपूर्वक विचार करणाऱ्यांना आपण ‘फेमिनिस्ट’ म्हणून हिणवलं, तर कधी ‘गावाकडची कमी शिकलेली बायको चालेल भो; पण ‘फेमिनिस्ट’ बायको नको’ असा सूर लावून गप्पांच्या फडात मित्रांच्या टाळ्या मिळवल्या.

“लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे? चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं.’ असं भयाण सामाजिक प्रबोधन करणाऱ्या बुवांच्या कीर्तनात आम्ही जमिनीवर लोळू लोळू हसलो. तर शहरात ट्राफिक मध्ये गाडी चालवताना महिला चालक दिसल्यावर “दहा फुट लांबून गाडी चालव भावा, यांचा काय भरोसा नाय. कधी भसकन ब्रेक मारतील, कधी टर्न मारतील सांगता येत नाय.’ असं आपसूक कित्येकदा बोलून गेलोय कळालं सुद्धा नाही. एकूणात काय आम्ही शहरी असू नाहीतर गावाकडचे, आम्ही पुरुष म्हणून एकसारखेच.

आम्ही पुरुष म्हणूनच काय, आम्ही स्त्रिया म्हणूनही तेवढ्याच पुरुषसत्ताक संस्कारांत वाढलेल्या. कमी कपडे घातलेली हीरोइन आम्हाला ‘हेच बलात्काराचं कारण’ वाटलं. तर कधी पाळीबद्दल उघड बोलणारी मुलगी ‘लाजा सोडून दिल्याली पिढी’ वाटली. ‘मी टू’ म्हणत पुढे आलेल्या सिनेतारका ‘आताच बऱ्या जाग्या झाल्या, काही बिनसलं आसल, पैसा कमी पडला आसल’ म्हणून पुढे आल्याचा पक्का अंदाज बांधून आम्ही मोकळे झालो. पक्षाचे झेंडे घेऊन फिरत आपला मुलगा प्रियांका गांधीला ट्रोल करताना तिच्या फोटोवर ‘वो दो २८-२८ इंच की बात करेंगे, आप ५६ इंच पे अडे रेहना’ असं लिहिलेल्या पोस्टी फोरवर्डतोय याकडं आमचं कधी लक्ष गेलं नाही. उलट आम्ही “बाईने घर सांभाळावं, नटवेगिरी करीत राजकारण काय करावं बया!’ असं म्हणून मोकळे झालो.

‘स्त्रीचा सर्वात महत्वाचा गुण कोणता? संसारदक्षता.’ या संवादाने ट्रेलरला सुरुवात होणारा समीर विद्वान्स दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ सिनेमा. हे वाक्य ऐकलं की आम्हा पुरुषी मनात ‘वाह! काय विचार आहेत’ असा उद्गार  येतो. पण पुढे जाऊन सिनेमा पाहिल्यावर कळतं. या गोपाळ जोशींनी स्वतःच्या बायकोला आनंदीला तत्कालीन समाजाला फाट्यावर मारून शिकवलं, तिच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी तिला संपूर्ण पाठींबा दिला. कडव्या ब्राह्मणांना ‘तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरून वठणीवर येणारा मी नाही, मी हरामखोर मनुष्य आहे हो !’ असं म्हणून त्यांच्या बहिष्काराला सुद्धा भीक घातली नाही. एवढंच काय, तर अगदी धर्म परिवर्तनाची तयारी सुद्धा दाखवली. एवढं सारं करून ‘भारतातली पहिली महिला डॉक्टर’ म्हणून तिला मान मिळाला. हे आमच्या मनाला कसं पटेल? आताच्या काळात पटत नाहीये तर त्या काळात तर विषयच नाही. यशस्वी स्त्रीच्या मागे उभ्या राहिलेल्या पुरुषाचं आम्हाला काही घेणं देणंच नाही. आम्ही फार फार स्त्री दाक्षिण्य दाखवून ‘यशस्वी पुरुषामागे स्त्री असते’ या म्हणीला उलटवून ‘प्रत्येक अयशस्वी पुरुषामागे स्त्रीच असते’ असं म्हणून खदाखदा दात काढतो.

आताच काही दिवसांपूर्वी ऑस्कर पुरस्कार जाहीर झाले. त्यात ‘गुणित मोंगा’ निर्मित, ‘रायका जेहताबची’ दिग्दर्शित ‘पिरियड्स द एंड ऑफ सेंटेन्स‘ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट लघु-माहितीपट पुरस्कार मिळाला. उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यामधील महिलांचं मासिक पाळी बद्दलचं मत, या विषयाबद्दल बोलताना त्यांचं लाजणं ते गावात पॅड तयार करण्याचा उद्योग चालू झाल्यानंतर त्याच गावातील महिलांनी त्यात काम करताना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या विचारांतील बदल दाखवणारी ही डॉक्युमेंटरी. दिग्दर्शिका आणि निर्माती अशा दोघींना ऑस्कर मिळाला तेव्हाचा तो क्षण पाहणं फार सुखद होतं, पण आम्ही फार कट्टर आहोत. त्या दोन बायकांचं उणंदुण काढायला कारण मिळेना म्हणून शेवटी रिअल लाइफ पॅडमॅन ‘अरुणाचल मुरुगनाथम’ यांचं नाव का नाही घेतलं तुम्ही? असं म्हणत सोशल मिडीयावर, यु ट्यूब वर कमेंट्समध्ये त्या दोघींना ट्रोल करत बसलो.

आम्ही एवढे भयाण पुरुषी आहोत की बायकोच्या, गर्लफ्रेंडच्या रजस्रावाच्या काळात त्यांना पॅड आणून देणारे आम्हाला लज्जाहीन संस्कारहीन वाटतात. फोडणीच्या वासाने उलट्या होणाऱ्या गर्भवती बायकोला स्वयंपाकात मदत करणारे नवरे आम्हाला ‘जोरू के गुलाम’ वाटतात. बायको नोकरीला जाते, थकते म्हणून घरगुती कामांना हातभार लावणारा, अगदी डाळ-भाताचा कुकर लावणारा नवरा आम्हाला बाईलवेडा वाटतो. त्याचवेळी सरपंचपदी असलेल्या बाईचा नवरा जेव्हा गावाचा कारभार सांभाळत असतो तेव्हा आपण त्या नवऱ्यालाच ‘सरपंच’ म्हणून हाक मारतोय याबद्दल आम्हाला काहीच वावगं वाटत नाही.

करिअरच्या ध्येयाने झपाटलेल्या बाईला मुल-बाळाच्या आणाभाका देऊन संसारात गुरफटून टाकणारे आम्ही, ऑफिसमध्ये स्त्री सहकाऱ्याच्या प्रमोशनवर तिचे आणि बॉसचे संबंध किती जवळचे आहेत यावर गॉसिप करतो. घटस्फोट झालेली बाई किती चुकीची आहे किंवा आपल्यासाठी कशी अव्हेलेबल आहे यावर आम्ही चर्चा करतो. या न त्या पद्धतीने बाईचा जन्म आमच्याच शारीरिक, मानसिक गरजा भागवण्यासाठी कसा झालाय हे आम्ही सतत अंडरलाईन करतो तरी जगासमोर आम्ही मानवतावादी धर्माच्या, भारतीय संस्कृतीच्या वल्गना करत सुटतो. हा एवढा उफराटा कॉन्फिडन्स आमच्यात कुठून येतो हे आम्हालाच माहित नाही. भारताला, गायीला, देवीला माता म्हणताना जन्मदात्या मायला आपण किती समजून घेतलंय. तिला स्त्री म्हणून, माणूस म्हणून कधी जपलंय, तिचं दुखणं खुपणं जाणून घेतल्याचं आठवणीत नाही.

‘सैराट’ पाहून बरीच प्रेमीयुगुले पळून गेली म्हणे, आताचा ‘मुळशी पॅटर्न’ पाहून गुन्हेगारीत वाढ झाली असं कुणी तरी बोलून गेलं. अर्धनग्न बायकांचे आयटम साँग पाहून देशातले पुरुष चेकाळतात आणि बलात्कारांत वाढ होते असाही निष्कर्ष काढला गेला. हे जर एवढं चित्रपट माहात्म्य असेल तर ‘पार्च्ड’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘अँग्री इंडियन गोडेसेस’, ‘पिंक’, ‘क्वीन’, ‘हायवे’ असे काही स्त्रीविषयी ठोस भूमिका मांडणारे सिनेमे येऊन गेल्यावरही आमच्या पुरुषसत्ताक मेंदूला तडे का गेले नाहीत?

हे सगळे फिल्ममेकर्स तर वेड्यात निघालेच, आता वेबसिरीज मधून आमच्या पुरुषीपणाला चॅलेंज करायला काही मंडळी पुढे आली आहेत. त्यातल्याच काही वेड्या मंडळीनी बनवलेली वेब सिरीज म्हणजे ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’. अॅमेझॉन प्राइमची ओरिजिनल निर्मिती असलेली ‘अनु मेनन’ दिग्दर्शित या दहा एपिसोड्सच्या वेब सिरीजची गोष्ट चार मैत्रिणींच्या आयुष्याभोवती फिरतेय. दामिनी शोधपत्रकरितेत प्रचंड आवड असणारी, नेते मंडळी, बड्या उद्योगपतींबाबत खुलेआम लिहिल्यामुळे ट्रोलधाड पडलेली पत्रकार. तिने स्वतः काढलेल्या न्यूज पोर्टलमध्ये बिझनेसच्या नावाखाली तिला बाजूला काढून बॉलीवूड गॉसिपवर भर देणाऱ्या डिरेक्टोरियल बोर्ड सोबत तिचा झगडा चालू आहे. दुसरी मैत्रीण अंजना, एक वकील. घटस्फोटित असून तीनचार वर्षाच्या मुलीला एकटी सांभाळत आहे. तिचे करिअर, मुलीचे संगोपन आणि घटस्फोटित नवऱ्याची, त्याच्या नव्या बायकोची मुलीशी वाढलेली अति जवळीक यामुळे ती त्रस्त आहे. तिसरी मैत्रीण उमंग, लुधियानावरून मुंबईत आलीय. बायसेक्शुअल आहे. म्हणजेच तिला पुरुष आणि स्त्री दोन्ही लिंगांबद्दल आकर्षण आहे. पण तिच्या या अशा ‘ऑड वन आउट’ असण्याने तिला अक्षरशः घरून पळूनच यावं लागलं आहे. ती जिम ट्रेनर असून ती शारीरिक सुख देणाऱ्या नव्हे तर अभिमानाने नात्याचा स्वीकार करणाऱ्या जोडीदाराच्या शोधात आहे. या चौकडीतील चौथी मैत्रीण म्हणजे सिद्धी पटेल. आकाराने गोलमटोल असल्याने लग्नाच्या मार्केट मध्ये ही पोरगी काही कामाची नाही म्हणून तिला तथाकथित ‘प्रॉपर फिगर’मध्ये आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणारी, तिच्या ड्रेसिंग सेन्स वर, सतत खाण्याबद्दल टोकणाऱ्या आईला ती कंटाळलीय.

जगात मनाप्रमाणे ‘सन्मान’ आणि ‘संभोग’ या दोन्ही गोष्टींसाठी धडपडणाऱ्या एकंदर प्रत्येक मानवी जीवाप्रमाणे या चौघींचा संघर्ष चालू आहे. या संघर्षात त्यांना काय काय अडचणी येतात, काय काय गवसतं आणि काय काय गमती जमती घडतात हे पाहण्यालायक आहे. स्त्रीवादी अंगाने फुलणारी कथा असूनही ‘पुरुष मुक्त समाज’ निर्माण करण्याची किंवा ‘स्त्रीच स्त्रीची शत्रू असते’ अशा आशयाचं काहीच या वेब सिरीज मध्ये नाही हे सर्वात जास्त दिलासादायक. पण कसंय ना, तुम्ही पुरुषांना दोष द्या किंवा स्त्रियांना. बाईने जगाकडून तिच्या अपेक्षेप्रमाणे ‘सन्मान’ आणि ‘संभोग’ या दोन्हींची मागणी करणे हेच आमच्या संस्कारात बसत नाही. त्यामुळे असलं काही पाहण्याचा आमचा संबंधच येत नाही. ‘बाईचं दुखणं बाईलाच कळतं’ म्हणतात. कधी कधी ‘बाईच बाईची शत्रू असते’ असंही म्हणतात. कुणी असंही म्हणतं ‘मुक्या प्राण्यांचं दुःख सुद्धा माणूस जाणून घेऊ शकतो’. मग ‘माणूस’ बाईचं दुःख पण जाणून घेऊ शकत असेल ना? घेतही असेल आपण कुठे ‘माणूस’ आहोत? आपण तर ‘पुरुष’ आहोत, ‘पुरुष’…

 

लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७

maheshmunjale@gmail.com

 

माहितीचा स्त्रोत : https://divyamarathi.bhaskar.com/news/maheshkumar-munjale-rasik-article-in-marathi-6035086.html

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap