मायाजाल डेटिंग साईटचं

When people cheat in any arena, they diminish themselves—they threaten their own self-esteem and their relationships with others by undermining the trust they have in their ability to succeed and in their ability to be true- Cheryl Hughes

वयात येणाऱ्या बहुतांशी लोकांना, मग ते समलिंगी असोत किंवा भिन्नलिंगी आकर्षण वाटणं अगदी साहजिकच आहे. आदिम आणि नैसर्गिकच आहे ते! पण जेव्हा समाजव्यवस्था या आकर्षणाला धर्म, जाती, वर्ण, संस्कृती अशा गोड नावांखाली बंधनात अडकवते तेव्हा ते आकर्षण कधीकधी विकृत वळण घेऊ शकतं किंवा कधीकधी त्याचे भीषण परिणाम देखील दिसू शकतात. आज या सगळ्यात भर पडली आहे ती इंटरनेटची. आज आपण इंटरनेट आणि फोनच्या माध्यमातून अगदी घरबसल्या एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष न भेटता बोलू शकतो. यासाठी आपली मदत करतात वेगवेगळ्या सोशल नेट्वर्किंग साईट्स. या साईट्सचा वापर करून आपण आपल्या फोनवरून किंवा कम्प्युटर स्क्रीनसमोर बसून एखाद्या व्यक्तीची माहिती काढू शकतो, त्यांच्याशी मैत्री करू शकतो, त्यच्याशी/तिच्याशी चॅट करू शकतो आणि हे सगळं होतं एका आभासी माध्यमातून, इंटरनेट किंवा फोनवरून आणि तेही अगदी घरबसल्या. पण ज्या व्यक्तीचा फोटो/प्रोफाईल आपण बघतोय ती व्यक्ती खरंच अस्तित्वात आहे का? याची आपल्याला खात्री नसते.

पूर्वी जेव्हा इंटरनेट, फोन या गोष्टींच्या मायाजालात लोक फार जास्त अडकलेले नव्हते तेव्हाही आकर्षण होतं. लोक एकमेकांवर प्रेम करत, एकमेकांना भेटत, बोलत आणि त्यातूनच जोड्या जमत. प्रेमविवाह तेव्हाही होते, आजही आहेत. जुळवून आणलेले विवाह तेव्हाही होते आणि आजही आहेत. पण आज एका नवीन गोष्टीची या सर्वामध्ये भर पडली आहे ती म्हणजे वेगवेगळ्या डेटिंग साईट्सची. अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर जोड्या जुळवणाऱ्या साईट्सची. आज इंटरनेटवर Tinder, ओ. के. क्युपिड यांसारख्या अनेक डेटिंग साईट्स उपलब्ध आहेत.

Tinder हे एक असं डेटिंग अॅप आहे ज्यावर आपण आपलं प्रोफाईल बनवू शकतो आणि त्यानंतर ते अॅप आपल्या लोकेशनवर आधारित व्यक्तींचे प्रोफाईल्स आपल्याला दिसतात. जी व्यक्ती आपल्याला इंटरेस्टिंग वाटेल त्या व्यक्तीच्या फोटोला उजव्या बाजूला स्वॅप करायचं आणि जी इंटरेस्टिंग वाटणार नाही त्या व्यक्तीच्या फोटोला डावीकडे स्वॅप करायचं. आपण ज्या व्यक्तीच्या फोटोला उजव्या बाजूला स्वॅप  केलंय, त्याच व्यक्तीनं आपल्या फोटोला देखील उजव्या बाजूला स्वॅप  केलं तर आपण एकमेकांसाठी मॅच होतो. आणि त्यानंतर आपण त्या व्यक्तीला मेसेज करू शकतो आणि एकमेकांनी ठरवून भेटूही शकतो.

माझ्या एका मैत्रिणीनं सांगितलेला किस्सा इथं मांडावासा वाटतो. तिनं तिच्या कॉलेजच्या एका प्रोजेक्टसाठी Tinder या डेटिंग अॅप वर तिचं नाव रजिस्टर केलं. काही काळ Tinder वर वेळ घालवल्यावर तिच्या लक्षात आलं की तिनं ज्या मुलांना लाईक केलं होतं, त्यातल्या जवळपास सर्वच मुलांनी तिला लाईक केलं होतं एवढंच नाही तर पुढं जाऊन एक दोन मुलांनी तिला हे देखील विचारलं की ती हस्तमैथून करते का? तिच्या म्हणण्यानुसार तिला जे अनुभव Tinder वर आले ते एकूणच फार काही आनंददायी नव्हते. ‘तू हस्तमैथून करतेस का?’ अशा प्रकारचे प्रश्न आपण ज्या व्यक्तीला भेटलो देखील नाही तिला विचारणं, कितपत योग्य आहे? तिच्या सांगण्यानुसार जवळपास सर्वच मुलींना डेटिंग साईटवर वाईटच अनुभव येतात. अनेकदा मुलींना   डेटिंग साईट्सवर इमोशनल ब्लॅकमेल केले जाते. मुलींजवळ नग्न विडीओ किंवा फोटो पाठवण्याची इच्छा व्यक्त केली जाते लागते. बऱ्याच मुली अशा प्रकारच्या इमोशनल ब्लॅकमेलला बळी पडून आपले व्हिडीओ किंवा फोटो शेअर करतात. अशा फोटोंचा आणि व्हिडीओचा गैरवापर केला जातो.

मध्यंतरी माझ्या वाचनात एक बातमी आली होती. एका मुलानं, कोणत्यातरी डेटिंग साईटवर अनेक नावांनी फेक प्रोफाईल्स बनवली होती आणि त्याद्वारे तो अनेक मुलींशी बोलत होता. त्यातल्या काही मुलींशी त्याने शरीरसंबंध ठेवले होते, काही मुलींकडून पैसे घेतले होते आणि प्रत्येकीला तो लग्न करणार असं वचन देत होता. अशा प्रकारच्या फसवणुकीला केवळ डेटिंग साईट्स कारणीभूत आहेत की आपली विचारसरणी?

माझ्या एका मित्राला मात्र Tinder वर जो अनुभव आला तो सकारात्मक होता. अनेक मुलींशी या साईटच्या माध्यमातून संपर्क केल्यानंतर त्याला एक मुलगी भेटली जिला तो भेटला, त्यांच्यात छान गप्पा झाल्या. काही दिवस ते इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात होते, भेटतही होते. नंतर ती मुलगी बाहेरदेशी निघून गेली पण त्यामुळं त्यांच्या नात्यात काही फरक पडला नाही. आजही ते दोघं चांगले मित्र – मैत्रीण आहेत.

या उदाहरणांना अनुसरून इथं काही मुद्दे मांडावेसे वाटतात. डेटिंग साईटच्या किंवा कोणत्याही इतर आभासी माध्यमांतून भेटणं, चॅटिंग करणं हे वाईट नाहीये. काळानुरूप झालेला तो एक बदल आहे. आज आपण कामाच्या रगाड्यात इतके जास्त फसलो आहोत, की आपल्याला एकमेकांना भेटणं कठीण झालंय आणि शिवाय आता इंटरनेट आणि फोन आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक झालेत आणि त्यामुळं आपल्याला प्रायवसी देखील अगदी सहजासहजी मिळाली आहेत. परंतु आभासी मिडीयमचा वापर करून एकमेकांशी गोष्टी शेअर करताना काही बाबतीत सावधानता बाळगणं गरजेचं असतं. त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे फेक प्रोफाईल तयार करून, आपण काहीतरी वेगळे आहोत असं दर्शवणाऱ्या लोकांपासून सावधगिरी बाळगणं. माझ्या मैत्रिणीनं केलेल्या एका अभ्यासानुसार जे लोक खूप लवकर पर्सनल होतात त्यांचे प्रोफाईल हमखास फेक असतात आणि त्यांच्याशी बोलताना, त्यांना फोटो शेअर करताना सावधानता बाळगणं गरजेचं असतं.

माझ्या ज्या मित्राचं मी उदाहरण दिलं त्याला कधी संशय देखील आला नाही की तो ज्या मुलींशी बोलतोय त्या कदाचित फेक प्रोफाईलद्वारे त्याच्याशी बोलत असतील. हा मुलग्यांच्या आणि मुलींच्या विचारसरणीतला फरक असू शकतो का? किंवा मुली मुलग्यांच्या तुलनेत आभासी मिडीयमच्या जास्त बळी पडतात का?

टाईम्स ऑफ इंडियाने केलेल्या एका सर्वेमध्ये असं मांडलंय, की आजही भारतामध्ये डेटिंग साईट्सचा वापर करण्यामध्ये मुलग्यांची संख्या मुलींपेक्षा अधिक आहे. त्याचं मुख्य कारण हेच आहे की मुलींना ऑनलाईन मिडीयमची भीती वाटते किंवा बऱ्याच मुलींना त्याचा वाईट अनुभव येतो. हा मुद्दा आपल्याला आणखी एका गोष्टीकडं घेऊन जाऊ शकतो ती म्हणजे मुला-मुलींना, आपल्या आयुष्यात मुलगी किंवा मुलगा असण्याची इतकी जास्त गरज का वाटते? माझ्या परिचित मुला-मुलींमध्ये मी कित्येक मुलं-मुली अशी बघितली आहेत जी त्यांच्या आयुष्यात गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नाहीत म्हणून एकतर फ्रस्ट्रेट तरी होतात किंवा डेटिंग साईट्सच्या माध्यमातून कुणाशीतरी ओळख करण्याचा प्रयत्न करतात.

एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं, त्यांच्याशी जवळीक करण्याची भावना वाटणं या गोष्टी छान आहेत पण त्यासाठी एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं कितपत योग्य आहे? यात भर पडते ती धर्म, जाती, वर्ण यांनी घातलेल्या बंधनांची आणि त्यातून तयार होणाऱ्या विकृतींची. एखादा मुलगा किंवा मुलगी मला आवडते पण तो/ती माझ्या जाती/धर्माबाहेरची आहे. पण त्याच्या/तिच्याबद्दल मला वाटणारं आकर्षण तर संपत नाहीये. मग मी काय करणार? तर फेक प्रोफाईल तयार करून त्याच्या/तिच्याशी संपर्क ठेवणार. पुढं जाऊन ते आकर्षण वाढणार. मग अजून खोटं बोलणं, अजून फसवणं आणि त्यातून आपण एक माणूस म्हणून किती खालच्या स्तरावर जाऊन पोहचतो ते आपलं आपल्यालाच कळत नाही.

मुख्य मुद्दा हा की डेटिंग साईट्सचा वापर करणं चुकीचं नाही. आज आपण एका वेगवान आयुष्याचा भाग बनलोय त्यामुळं एकमेकांना फिजिकली भेटणं कठीण झालंय. त्याचा फायदा डेटिंग किंवा सोशल नेट्वर्किंग साईट्स करून घेतही असतील पण त्यामुळं आपण आपली सदसद्विवेकबुद्धी बाजूला ठेवावी का? जर का विसंवादामधून तयार होणारं कन्फ्युजन तयार व्हायचं नसेल तर पालकांचा आपल्या पाल्याशी, शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी, पती-पत्नी, मित्र-मैत्रीण यांचा एकमेकांशी अशा वेगवेगळ्या स्तरांवर ‘संवाद’ होणं गरजेचं आहे.

चित्र साभार: https://www.hercampus.com/school/conn-coll/dating-apps

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap