‘अ’ प्रकारची कावीळ अन्नमार्गातून पसरते. तर ब आणि क प्रकारची कावीळ रक्तावाटे (दूषित इंजेक्शने, दूषित रक्त, इ.) आणि लैंगिक संबंधातूनही पसरते असे सिध्द झाले आहे. या प्रकारच्या काविळीचे स्वरूप सौम्य पण यकृताच्या दृष्टीने घातक असते. यापासून काही रुग्णांना कायमचा यकृतविकार जडतो. यामुळे पुढे जलोदर, कर्करोग, इत्यादी होऊ शकतात. हे आजारही एड्ससारखेच धोकादायक आहेत.
लक्षणं
ब काविळीची लागण झालेल्या बहुतेक व्यक्तींमध्ये काही ना काही लक्षणं दिसतात. मात्र ३० टक्के व्यक्तींमध्ये कुठलीच लक्षणं दिसत नाहीत तरीही त्यांच्यामध्ये विषाणू असतो. ब काविळीची लक्षणं जंतुलागण झाल्यापासून ६ आठवडे ते ६ महिन्याच्या आत दिसायला लागतात. ताप आणि थकवा ही मुख्य लक्षणं आहेत. काही जणांना मळमळ, उलट्या, जुलाब, भूक मंदावणे, वजन घटणे अशीही लक्षणं जाणवतात. पोटदुखी, गडद रंगाची लघवी, सांधेदुखी आणि काविळीप्रमाणे पिवळसर त्वचा आणि डोळ्याचा रंग पिवळा होणे अशीही लक्षणं दिसू शकतात.
निदान कसं करायचं?
ब काविळीची लागण झाली आहे अशी शंका असेल तर दोन महिने वाट पाहून रक्त तपासणी केली जाते. जुनाट किंवा क्रॉनिक प्रकारची ब काविळ असेल तर रक्त तपासणीबरोबरच यकृतावर काय दुष्परिणाम झाले आहेत किंवा यकृताचा कर्करोग आहे का हे पाहण्यासाठी अल्ट्रासाउंड सोनोग्राफी आणि बायोप्सीसारख्या इतर तपासण्या करण्यात येतात.
उपचार
९५ टक्के लोकांमध्ये ब काविळीचा विषाणू कोणत्याही उपचाराशिवाय किंवा लसीशिवाय दोन महिन्यांमध्ये शरीरातून निघून जातो. मात्र या दरम्यानच्या काळात इतरांना या जंतुची लागण लैंगिक संबंधांद्वारे किंवा रक्तावाटे होऊ शकते. उरलेल्या ५ टक्के लोकांमध्ये मात्र विषाणू निकामी होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे यकृताचा कर्करोग होऊ शकतो, यकृत निकामी होऊ शकते आणि त्यातून मृत्यू ओढवू शकतो.
हे समजून घ्या
ब प्रकारची कावीळ लक्षात आली नाही तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे रक्त तपासणी करून घेणं फायद्याचंच ठरतं.
P.C. https://www.avert.org/sex-stis/sexually-transmitted-infections/hepatitis-b
No Responses