गरमी : सिफिलिस

सामान्य भाषेत याला गरमी (उष्णता) असे नाव आहे. हा निरनिराळया स्वरुपात उमटतो आणि नाहीसा होतो. परत येतो परत दिसेनासा होतो. पण शरीराच्या आत याचे दुष्परिणाम चालूच असतात. या आजाराचे मुख्य प्राथमिक स्वरुप जननेंद्रियावर व्रण (अल्सर) आणि अवधाण असे आहे. हा एक गंभीर रोग असला तरी वेळीच निदान आणि उपचार झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.

लक्षणं

सिफिलिसची लागण झालेल्या व्यक्तीबरोबर लैंगिक संबंधानंतर सुमारे १० ते ९० दिवसांत कधीही याची लक्षणे दिसतात.

  • रोगाचा व्रण पुरुषांच्या शिश्नावर किंवा त्यावरच्या त्वचेखाली येतो.
  • स्त्रियांमध्ये हा व्रण योनिमार्गात किंवा गर्भाशयाच्या तोंडावर उठतो.
  • गुदमैथुन करणाऱ्यांमध्ये व्रण गुदद्वाराच्या आत येऊ शकतो.
  • मुख मैथुनामध्ये तोंडाच्या आत व्रण येण्याची शक्यता असते.
  • हा व्रण१-२ से.मी.व्यासाचा, न दुखणारा, बुडाशी जाडसर व निबर असतो.
  • व्रण आल्यानंतर एका आठवडयात एका किंवा दोन्ही बाजूंच्या जांघेत अवधाण येते. या गाठी न दुखणा-या आणि रबरासारख्या सटकणा-या असतात. हळूहळू एकमेकांत गुंतून एकच मोठी गाठ तयार होते.
  • जननेंद्रियावरील व्रण उपचाराशिवायही १-२ महिन्यांत नाहीसा होतो. परंतु गरमी (सिफिलिस) रोग आत वाढतच राहतो.
  • हा व्रण हाताने चाचपून तपासताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. (यासाठी रबरी मोजे वापरावे लागतात) स्पर्श झाल्यास तपासणा-यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.
वेळीच उपचार न झाल्यास

अंगावर न खाजणारे चट्टे येणे, तोंडात व्रण तयार होणे, शरीरात ठिकठिकाणी अवधाण येणे, इत्यादी त्रास सुरू होतो. गुदद्वाराच्या बाजूलाही व्रण उठतात. ही लक्षणे प्राथमिक आजार बरा झाल्यावर १-३ महिन्यात उमटतात आणि१-३ महिन्यांत बरी होतात. यानंतर काही महिने काहीच होत नाही. यापुढे रोग शरीरावर न दिसता आत पसरतो. काही वर्षानंतर या आजाराचे हृदय, मेंदू, हाडे यांवर दुष्परिणाम दिसतात. हाडांमध्ये या रोगाचे व्रण किंवा गाठी तयार होतात. हृदयाच्या झडपा निकामी होणे, महारोहिणीला फुगार येऊन ती कमकुवत होणे, मेंदू व चेतासंस्था निकामी होत जाणे, इत्यादी दूरगामी परिणाम होतात.

निदान कसं करायचं?

जननसंस्थेच्या तपासणीत न दुखणारा व्रण असणे, जांघेत गाठी येणे यावरून प्राथमिक सिफिलिसचे निदान सोपे असते. मात्र नंतरच्या अवस्थेत तो ओळखणे अवघड असते. स्त्रियांमध्ये व्रण आलाच तर तो आतल्या भागात असल्याने सहसा लक्षात येत नाही. वारंवार गर्भपात होणे, उपजत मृत्यू, बाळास जन्मजात व्यंगे इत्यादींवरून स्त्रियांमध्ये या आजाराची शंका घ्यायला पाहिजे.

या आजाराच्या निदानासाठी व्रणाच्या द्रवाच्या सूक्ष्मदर्शक तपासणीत जंतू चटकन ओळखू येतात. पण रक्तावर व्ही.डी.आर.एल. तपासणी ही जास्त प्रचलित आहे. लागण झाल्यावर महिन्याभरात ही तपासणी उपयुक्त ठरते. दोघाही जोडीदारांची तपासणी आवश्यक असते. उपचारही दोघांवर करावे लागतात.याचबरोबर एचआयव्ही-एड्ससाठी एलायझा तपासणी करावी. हे दोन्ही आजार एकत्र येऊ शकतात. दोन्ही आजार एकत्र असतील तर उपचारांमध्ये अर्थातच बदल करावा लागतो.

उपचार

सिफिलिसवर प्रतिजैविक (अॅण्टीबायोटिक) औषधांचा उपचार करावा लागतो. या आजारात पुष्कळ गुंतागुंत असते. अर्धवट उपचार झाले तर रोग शिल्लक राहतो व दुष्परिणाम टळू शकत नाहीत. उपचार योग्य झाले तर व्रण लगेच बरा होतो. पण व्रण सहा ते आठ आठवडयांत आपोआपही जाऊ शकतो. यामुळे रुग्णाचा गैरसमज होतो. ब-याच रुग्णांना योग्य उपचार मिळू शकत नाहीत आणि रोग आत वाढत राहतो.

समजून घ्या

लैंगिक जोडीदारांपैकी कोणालाही आजार असला तरी प्रत्येकाने उपचार घेणे आवश्यक आहे. एकदा सिफिलिस होऊन गेला म्हणजे परत होणार नाही असं नाही. त्यामुळे एकदा बरं झाल्यानंतरही सिफिलिस असणाऱ्या व्यक्तीबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध झाले तर रोगाची लागण परत होऊ शकते.

(या माहितीसाठी – www.arogyavidya.net, www.lovematters.in या वेबसाइट्सची मदत घेण्यात आली आहे)

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap