आला तो क्षण आला किंवा छ्या… आजही तेव्हा इतकं छान वाटलं नाही... लैंगिक संबंधानंतर मनात असे विचार येतातच. कारण प्रत्येक वेळी लैंगिक पूर्तीचा किंवा ऑरगॅझमचा अनुभव येईलच असं नाही. लैंगिक सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना आणि जाणिवा वेगवेगळ्या असतात. पुरुषांमध्ये लैंगिक सुखाच्या उच्च क्षणी (याला इंग्रजीत ऑरगॅझम म्हणतात) लिंगातून वीर्य बाहेर येते. स्त्रियांमध्ये क्लिटोरिस या लैंगिक अवयवाला उत्तेजना मिळाली की लैंगिक सुखाचा अनुभव येतो. यामध्ये योनीचे स्नायू आणि गर्भाशय आणि योनिमार्गातले स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावतात.
सेक्स करताना दोन्ही जोडीदारांना लैंगिक सुख अनुभवता आलं पाहिजे. अनेकदा स्त्रियांच्या सुखाचा विचारच केला जात नाही. जर संभोग करण्याआधी प्रणय केला ज्याला फोर प्ले असंही म्हणतात. जसं की, एकमेकांना स्पर्शाने, कुरवाळून, चुंबन घेऊन उद्दीपित केलं तर दोघांनाही लैंगिक सुख मिळू शकतं. अनेक मुलांचा असा समज असतो की बाईच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत ती सुखी होत नाही. मात्र यात तथ्य नाही. दोन्ही जोडीदार जेव्हा लैंगिक सुख अनुभवतात तेव्हाच ते संबंध सुखकर मानता येतील.
लैंगिक संबंधांमध्ये, हस्तमैथुन करताना किंवा कुठल्याही प्रकारे लैंगिक उत्तेजना मिळाल्यावर एक क्षण असा येतो जेव्हा लैंगिक सुखाचा परमोच्च बिंदू गाठला जातो. हा सुखाचा बिंदू गाठल्यावर शरीराला, मनाला एकदम हलकं, शांत वाटू लागतं. यालाच इंग्रजीमध्ये ऑरगॅझम असं म्हणतात. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही ऑरगॅझमचा अनुभव येतो.
लैंगिक उत्तेजना मिळाल्यावर पुरुषाचं लिंग ताठर होऊ लागतं. हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक प्रकारचा ताण निर्माण होतो. पण हा ताण हवाहवासा वाटत असतो. लिंग ताठर झाल्यानंतर काही काळाने हा ताण अगदी टोकाला पोचतो आणि त्याच क्षणी लिंगातून वीर्य बाहेर येतं. याला वीर्यपात म्हणतात. किंवा इंग्रजीमध्ये याला इजॅक्युलेशन म्हणतात. ऑरगॅझमनंतर लिंग परत शिथिल होतं आणि शरीराला मोकळं, हलकं वाटू लागतं. पुरुषांचा ऑरगॅझम वीर्य बाहेर येण्याशी निगडित आहे.
स्त्रियांना अशा प्रकारची संवेदना किंवा जाणीव असते हेच अनेक स्त्री पुरुषांना माहित नसतं. त्यामुळे अनेक स्त्रियांना ऑरगॅझमचा अनुभवच आलेला नसतो. स्त्रियांच्या योनिमध्ये क्लिटोरिस नावाचा एक पूर्णपणे लैंगिक अवयव असतो. क्लिटोरिस अतिशय संवेदनशील अशा स्नायूंनी बनलेला असतो. त्याचं टोक मूत्रद्वाराच्या किंवा लघवीच्या जागेच्या वरच्या बाजूला असतं पण त्याची आतली रचना संपूर्ण योनिमध्ये असते. क्लिटोरिसला स्पर्श झाला, ते घासलं गेलं की ते उत्तेजित होऊन थोडं ताठर होतं. हळूहळू त्यातील संवेदना वाढतात. स्त्रीच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि लैंगिक सुखाचा बिंदू गाठला की योनि व योनिमार्गातील, गुदद्वाराचे स्नायू प्रसरण आकुंचन पावतात आणि स्त्रीला लैंगिक सुखाचा अनुभव येतो. अनेकदा स्तनाग्रं किंवा शरीरातील इतर अवयवांना कुरवाळल्याने किंवा स्पर्श केल्यानेही ऑरगॅझम यायला मदत होते.
स्त्री आणि पुरुष जर संबंध करताना एकतान झाले असतील, एकमेकांच्या कलाने संबंध करत असतील तर दोघांनाही एकाच वेळी ऑरगॅझमचा अनुभव येतो. मात्र दर वेळी असं होईलच असं नाही. मात्र लैंगिक संबंधांमध्ये दोघांनाही हे सुख अनुभवण्याचा अधिकार आहे.
म्हणूनच आहा…पर्यंत पोचाच. दोघं किंवा एकटे!
———————————————————————————————–
2 Responses
अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Sex विषयी अज्ञान ही भारतीय तरुणवर्गाची समस्या आहे
यातुन अनेक गैरसमज व विकृति निर्माण होतात,
तरुणांनी उस्फुर्त प्रतिक्रिया देने, प्रश्न विचारणे, समजुन घेणे येथे अपेक्षित आहे
धन्यवाद.. .