नकार कसा स्वीकारायचा?
- तुम्हाला कोणी नकार दिला तर तुम्हाला राग येतो का?
- तुमचा प्रस्ताव किंवा मागणी समोरच्या व्यक्तीने धुडकावून लावली तर तुम्ही अस्वस्थ होता का, तुम्हाला संताप येतो का?
- तुमची हार झाली आहे किंवा तुम्ही अपयशी आहात असं तुम्हाला वाटू लागतं का?
- तुम्ही ठरवलेली एखादी गोष्ट जर झाली नाही तर तुमच्या मनात काय विचार येतात?
- तुम्ही नव्याने ती गोष्ट करू शकता का?
आपल्याला नकार पचवता येतो का हे तपासण्यासाठी या वरील बाबींचा विचार करा.
आपल्या मित्राने/मैत्रिणीने, जोडीदाराने किंवा प्रिय व्यक्तीने दिलेला नकार पचवणं अवघड असू शकतं. त्यामुळे दुःखी होणं, थोडंसं निराश होणं किंवा रागावणं साहजिक आहे. पण त्यातून बाहेर पडणं गरजेचं असतं. आपण तिथेच अडकून राहू शकत नाही. तुमची आणि त्या व्यक्तीची स्वप्नं कदाचित वेगळी असतील, तुमचे रस्ते वेगळे असतील आणि कदाचित तुमच्या कल्पना तिला किंवा त्याला खरंच पटल्या नसतील.
समोरच्याचा नकार मान्य करणं आणि त्याबाबत आदर ठेवणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. दिल कहता है एक दिन हसीना मान जायेगी हे फक्त सिनेमात ठीक आहे. खऱ्या आयुष्यात आपण पुढे जात रहायचं असतं.
एकतर्फी प्रेम
तुम किसी और को चाहोगी तो मुश्कील होगी
किंवा
तू है मेरी किरन
असं नवं गाणं असो, एकतर्फी प्रेमाच्या (की आकर्षणाच्या?) अतिरेकाच्या कहाण्या सिनेमातून कायम रंगवून सांगितल्या गेल्या आहेत. हिरोच असं वागत असल्यामुळे या एकतर्फी प्रेमाला (की आकर्षणाच्या?) ग्लोरीफाय करण्यात आलं आहे. पण त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात आणि देशातही गेल्या 20 वर्षात एकतर्फी प्रेमातून (की आकर्षणातून?) किती तरी मुलींचे खून झाले आहेत.
तुमचं कोणावर प्रेम असेल पण त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम नसेल तर ते मान्य करण्यातच शहाणपण आहे. कितीही त्रास झाला, राग आला, दुःख झालं तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. किमान तुमच्या प्रिय व्यक्तीला दुखवायचं नाही इतकं तरी नक्की ठरवा. तुमचं प्रेम तुम्ही जपू शकता मात्र त्याचा विपरित परिणाम तुमच्यावर किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीवर होणार नाही याची काळजी निश्चित घ्या. ज्या व्यक्तीवर आपण जिवापाड प्रेम केलं त्या व्यक्तीला हानी आपण कशी पोहोचवू शकतो? जर त्या व्यक्तिला मिळवणं म्हणजेच प्रेम अशी तुमची प्रेमाची व्याख्या असेल तर तुम्हाला तुमच्या प्रेमाकडे जरा व्यापक दृष्टीने पाहणं गरजेचं आहे.
अशा प्रकारच्या प्रसंगात जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल तर खालील लिंक मध्ये दिलेल्या हेल्पलाईन वर संंपर्क करा.
Comments are closed.