१. ‘नसबंदी केलायस व्हय?’ गावाकडून आलेल्या फोनवरून मला विचारणा झाली. मी म्हणालो, ‘हो’. पलीकडून आवाज आला ‘काय गरज होती?’ मी म्हणालो, ‘कुटुंब नियोजनासाठी. माझ्या कुटुंबाचं नियोजन मी करणार नाही तर कोण करणार? ’ ‘काही तरीच करतोस.’ एवढ्यावर हा विषय बंद झाला. त्यांना आणखीही बोलायचं/विचारायचं असणार. पण विषयच असा होता की आम्हा भिन्न वयाच्या दोन पुरुषांना वापरता येईल असा या संदर्भातला शब्दसंग्रहच आम्हा दोघांकडेही नव्हता.
२. ‘मी माझ्या वाढदिवशी वासेक्टमी (नसबंदी) करून घेणार आहे.’ मी माझ्या पत्नीसमोर जाहीर केलं. तिला कदाचित ते खरं वाटलं नाही. म्हणून मी परत म्हणालो, ‘मी दवाखान्यात चौकशी करून आलो आहे. एक दिवस दाखल व्हावं लागेल असं म्हणत होते. मी ऑफिसात सुट्टीचा अर्ज दिला आहे.’ गांभीर्य ओळखून ती म्हणाली, ‘हे या क्षणी ठरवण्याचं काय कारण आहे? मी तर मागची दोन वर्षे झालं तुला सुचवित होते. मला वाटलं आता तू काही करणार नाहीस.’ मी म्हणालो, ‘आता ठरवलं आहे. कधी तरी करायची आहे मग करून टाकू. आणि आपली मुलगीही तीन वर्षांची झाली आहे.’ ‘त्याचा काय संबंध?’ ती म्हणाली. मी म्हणालो, ‘डॉक्टर तितका वेळ थांबायला सांगतात कोणालाही. पहिली काही वर्षे मुलांसाठी महत्वाची असतात.’ तिला काही हे कारण पटल्यासारखं वाटलं नाही. अर्थात मला स्वतःला डॉक्टरांनी असं काही सांगितलं नव्हतं. मी स्वतःच असं डॉक्टर सांगू शकतात हे ठरवून होतो.
३. मी आईवडिलांना गावाकडे फोन लावला आणि माझ्या निर्णयाविषयी सांगितलं. सांगितलं, विचारलं नाही. सुदैवाने म्हणा किंवा माझं शारीरिक/मानसिक वय, आर्थिक स्थिती, माझ्या आई वडिलांचा समंजस स्वभाव यामुळे मला माझ्या आयुष्याचे असे बरेच निर्णय स्वतःला घेता आले. त्यांना विचारून किंवा परवानगी घेवून नाही. अर्थात अनेक निर्णयांपैकी हाही एक असा निर्णय होता जो त्यांना समजायला, मग पटायला थोडा वेळ लागला. नेहमीप्रमाणे एका वाक्यात बाबा म्हणाले, ‘काय वेडेपणा आहे हा!’ विषय संपला. आई, तिचा आणि बाबांनी न वापरलेला वाक्यकोटा वापरत, चिंतायुक्त स्वरात म्हणाली, ‘काय गरज आहे. एकच मुलगी आहे. आणखी एखादा चान्स घ्या. बहिणीला भावंड नको का? ती मोठी झाल्यावर तिला तिचं असं कोण असणार आहे? तुमचं वयच काय आहे आत्ता. हा चुकीचा निर्णय आहे. तू असं करू नकोस.’ अर्थात तिच्या प्रत्येक वाक्याला माझं उत्तर होतंच आणि महत्वाचं म्हणजे माझा निर्णय झालेला होता.
४. ‘मला वासेक्टमी करायची आहे’ मी, कडेवरच्या माझ्या मुलीला सांभाळत, समोर बसलेल्या शिकाऊ डॉक्टरला म्हटलं. उडती तबकाडी पहिल्यासारखा चेहरा करून त्यांनी मला डायरेक्ट मोठ्या डॉक्टरांकडे पाठवलं. मोठ्या डॉक्टरांनी मला किती मुलं आहेत, लग्नाला किती वर्षे झाली अशी माहित विचारत विचारत मी ह्या ऑपरेशनबद्दल माझ्या पत्नीला सांगितलं आहे का अशी विचारणा केली. मी म्हटलं, ‘अर्थात’. पण त्याने त्यांचं समाधान झाल्यासारखं दिसत नव्हतं. त्या शेवटी म्हणाल्या, ‘तुमचा निर्णय चांगला आहे पण तुम्ही एकदा तुमच्या पत्नीला घेऊन या. कौन्सिलिंगसाठी.’ मी म्हणालो ‘काही हरकत नाही. पण हा निर्णय आमच्या दोघांचा आहे.’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘हे आपण सामोरासमोर बोलू. आम्हाला ते गरजेचं वाटतं.’ आम्ही दोघं गेलो. त्या म्हणाल्या, ‘एकदा हे ऑपरेशन केल्यास परत वापस घेता येणार नाही.’ आमचा प्रतिसाद पाहून ऑपरेशन करण्याचा निर्णय झाला.
———————–
पहिल्या उदाहरणातील माझ्या त्या जवळच्या नात्यातील व्यक्तीच्या विचारण्यात माझी हेटाळणी किंवा मला किरकोळीत काढायचा प्रयत्न नव्हता. उलट काळजीच अधिक होती. पण त्यांच्यासमोर माझ्या विचित्र निर्णयाने एक अवघड स्थिती निर्माण झाली होती. म्हणजे एकच मूल त्यातही मुलगी, त्यात बायकांच्या नसबंदीची बोद असताना हा खेळाचे नियम तोडतोय. अशा स्थितीला काय प्रतिसाद द्यावा हा त्यांच्या समोरचा प्रश्न होता.
मी ऑपरेशनला घाबरत होतो. हे खरं आहे. आयुष्यातील अनेक महत्वाच्या निर्णयांच्या वेळी सर्वसाधारणपणे पुरुष घाबरतात, जबाबदारी टाळतात, पोस्टपोन करतात. (वाचक पुरुष मित्रानो, तुम्ही तसे नाही आहात याची मला खात्री आहे. मी इतर पुरुषांबद्दल, माझ्यासारख्या, बोलत आहे.) हे माझ्याबद्दलही खरं होतं.
हा असा ‘विक्षिप्त’ निर्णय स्वीकारण्यासाठी माझ्या आईला थोडा वेळ लागला. माझ्या सुदैवाने, एका मुलीवर स्वतःची नसबंदी करून घेणाऱ्या पुरुषाचा वंश कसा वाढणार अशी काळजी माझ्याजवळ कोणीही व्यक्त केली नाही की बायकोनेच भरीस घातले असणार असा ब्लेम गेम कोणी केला नाही. तेवढे माझ्या आजूबाजूचे सर्व समंजस होते. ही अशी स्थिती सर्वच पुरुष मित्रांबद्दल नसणार हेही मला मान्य आहे. पण एक माझा अनुभव मला सांगत आला आहे की अशा निर्णयांमध्ये पुरुष जेवढे खंबीर असतात तेवढे हे निर्णय सोपे होतात. अन्यथा सगळ्या गोष्टीचं खापर बायकांच्या माथ्यावर फोडणं आपल्या इथं सोप्पं आहे.
त्यामुळे तुमची ही होऊन जाऊ द्या…
No Responses