सरोगसी हवीच कशाला? _ डॉ. मोहन देस

सरोगसी तंत्रज्ञानाने अपत्यप्राप्ती हे जरी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रचंड झेपेचे निदर्शक असले, तरीही त्यात गुंतलेल्या सर्वसंबंधितांचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे अध:पतन आणि शोषणच त्यात प्रामुख्याने आढळून येते.

तुषार कपूरचे खरे तर आभारच मानायला हवेत. अलीकडे कोणत्याही महत्त्वाच्या विषयाकडे किंवा प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर आपल्याला सेलेब्रिटीची मदत लागते. यापूर्वी आमिर खान आणि शाहरुख खान यांनी सरोगसीच्या मार्गाने मुले मिळवली होती. पण ते विवाहित होते. तुषार कपूरने.. एका अविवाहित पुरुषाने पितृत्व मिळवले ही घटना तशी अपवादात्मक आहे. तिचे स्वागत कसे करावे, हा प्रश्न आहे. यापुढच्या काळात तुषारचे अनुकरण काही अंशी आधुनिक, श्रीमंत तरुणांकडून केले जाईलच. अविवाहित तरुणी मात्र असे धाडस इतक्या उजळ माथ्याने करू शकतील असे नजीकच्या काळात तरी शक्य दिसत नाही. एक वेगळी पुरुषप्रधानता याही क्षेत्रात दिसू लागेल. पण ही पुढची गोष्ट.

सरोगसीचा अर्थ काय?

एखादे जोडपे काही कारणाने बाळाला जन्म देऊ शकत नसेल आणि आयव्हीएफ म्हणजे टेस्ट टय़ूबच्या पद्धतीनेसुद्धा बाळ होत नाही तेव्हा सरोगेट आईच्या माध्यमातून आपले- म्हणजे आपल्या गुणसूत्रांचे बाळ त्यांना होऊ शकते. जोडप्याचेच स्त्रीबीज आणि पुरुषबीज बाहेर एकत्र करून तो गर्भ दुसऱ्या एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडून नऊ महिने तो तिथे वाढवणे. गर्भाची पूर्ण वाढ करून त्या अपत्यास जन्म दिल्यावर ती स्त्री ते बाळ त्या जोडप्यास परत करते. म्हणजे त्या स्त्रीचे गर्भाशय काही काळापुरते भाडय़ाने घेणे म्हणजे सरोगसी! कधी कधी गरज पडल्यास एखाद्या दुसऱ्या दात्या स्त्रीकडून स्त्रीबीज घेता येते. जोडप्यातील पुरुषाचे बीज वापरून गर्भ तयार करून पत्नीच्या किंवा आणखी दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात तो वाढवता येतो.

अजूनही आपला समाज ‘मुलगी नको, मुलगाच हवा’ ही जुनाट कल्पना मात्र उरी बाळगून आहे. कायदा काही का म्हणेना, मुलीचा गर्भ सोनोग्राफीच्या आधुनिक तंत्राने बरोब्बर ओळखून गर्भपात करण्याची नवी प्रथा आपण निर्माण केली आणि गेली अनेक वर्षे जोपासलीसुद्धा. आपल्या घरी मुलगी नको, पण सरोगसीमध्ये स्त्रीचाच उपयोग आम्हाला ‘गर्भ-कपाट’ म्हणून करायचा आहे.

आपल्याकडे ९९ टक्के सरोगसी ही व्यापारी तत्त्वावर चालते. सरोगसीमध्ये सरोगेट बाईचा मानुष विचार अभावानेच केला जातो. पण हे पूर्णपणे खरे नाही. एका अर्थाने तिचा विचार अगदी खूप निगुतीने केला जातो, अगदी शास्त्रीय रीतीनेही केला जातो असे म्हणता येईल. पण तो फक्त काही महिन्यांपुरता. बाळ होईपर्यंत फक्त! आपले आणखी एक वास्तव आहे. ते म्हणजे या देशात असंख्य गरीब स्त्रिया आहेत आणि त्यांची आर्थिक निकड असतेच नेहमी. त्यांच्यामध्ये प्रजननक्षमता आहे. म्हणजे त्यांच्याकडे गर्भाशय आहे आणि ते भाडय़ाने देता येते. खरे तर ही प्रजननक्षमता असते- अगदी बाळंतपणासह! बाई म्हणजे नुसतेच गर्भाशय नसते- की एखाद्या खोलीसारखे दिले वापरायला. निव्वळ आर्थिक करारावर भाडय़ाने ही संपूर्ण प्रजननक्षमता देणे आणि घेणे आज शक्य झाले आहे. स्त्रीबीजेदेखील विकता येतात. त्यातूनही काही हजार रुपये मिळू शकतात. ज्यांना बाळ हवे असते ते बाळ मिळाल्याने आनंदित होतात. आणि या गरीब, गरजू स्त्रीलाही पैसे भरपूर मिळतात म्हणून तिचाही फायदा होतो, असे सोयीसोयीने (विन-विन) समजले जाते. बोललेही जाते तसे. या मार्गाने आता एखादा भारतीय अतिश्रीमंत पुरुष आधुनिक धृतराष्ट्रदेखील होऊ शकेल. सारेच चमत्कार! वैद्यकीय आणि आर्थिकसुद्धा!

सरोगेट मातेला योग्य मोबदला मिळाला की झाले- असे उघड बोलले जाते. जसे इतर व्यवसाय असतात, तसाच हाही एक व्यवसाय! शिक्षक शिकवतात, नर्सेस  नर्सिंग करतात, तसेच हे. गर्भाशयाच्या मालकिणीचे आर्थिक हक्क सांभाळले की मग काय हरकत आहे, असेही म्हटले जाते. गरिबीतून वर येऊन चांगले उत्पन्न मिळवण्याची ही संधी आहे- तीही स्त्रीला- असेही म्हटले जाते.

एक बाजूला जगभर सुसंस्कृत लोकांची मागणी अशी आहे की, आता आम्हाला मनाजोगते काम करायला मिळावे. केवळ आर्थिक फायदा, मोबदला नाही, तर कामातून समाधान, आनंद हवा आहे. पण बाईला हे काम आवडो- न आवडो; तिने दुसऱ्याच्या मालकीचे आणि दुसऱ्या कुणाच्या गुणसूत्रांचे बाळ आपल्या शरीरात वाढवायचे आणि ते त्याला परत देऊन टाकायचे. अनेकदा तिच्यावर हे काम तिच्या नवऱ्याकडूनही लादले जाते. तिने त्याची मुलेही जन्माला घालायची आणि दुसऱ्याचीही. नवऱ्याचा वंश वाढवायचा आणि नवऱ्याचा पैसाही वाढवायचा!

खरे तर इतर व्यवसाय आणि ही प्रक्रिया यांची आपण तुलना तरी कशी करू शकतो? गर्भारपण हा अतिशय वैयक्तिक, शारीरिक  आणि मानसिक निर्णय असतो. यात संपूर्ण शरीर आणि मन गुंतलेले असते. यात बाईच्या जिवाला त्रास, कळा, वेदना सगळे असते. बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म म्हणतात. अनेकदा पुरुषसत्ताक समाजात स्त्रीवर पुरुषांकडून गरोदरपण लादले जाते, हे अगदी खरे आहे. पण त्या नऊ महिन्यांच्या काळात आणि नंतर तिचे आणि तिच्या बाळाचे मायेचे, वात्सल्याचे नाते तरी असते. ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही. याच गर्भारपणाचा जेव्हा व्यवसाय होतो, तेव्हा मात्र हे सारे एकदम नाहीसे होते. बाळंतपणाच्या कळा सोसून बाळाला जन्म दिला जातो. (सरोगसीत बहुतेकदा सिझेरियन सेक्शनच केले जाते.) पण नवजात बाळाला अंगावरचे दूधदेखील पाजू दिले जात नाही. बाळाला नुसते पाहूही दिले जात नाही. बाळाचा ताबा लगेच त्याच्या मालकांकडे दिला जातो. मग ही बाळहीन आई आपल्या छातीतले दूध नाहीसे करण्यासाठी औषधे घेत राहते. त्याचेही दुष्परिणाम आहेत. यात बाळाचा आईच्या दुधावरचा नैसर्गिक हक्क नाकारला जातो. आईचा स्तन्यपानाचा हक्क नाकारला जातो. जगभरचे बालरोगतज्ज्ञ सांगतात की, पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचे दूधच द्या म्हणून. पण आमच्याकडे मानवी दुधाच्या बँका आहेत. आम्ही कोणत्याही आईचे दूध विकत घेऊ शकतो. कशाला हवी ती सरोगेट बाई? उगीच भावबंध निर्माण व्हायला नकोत. नको ती सेंटीबेंटी कटकट.

सरोगेट आईचे श्रम हे अशा रीतीने पूर्ण परात्म (alienated ) होतात. म्हणजे तिच्या श्रमापासून, तिच्या श्रमाच्या ‘प्रॉडक्ट’पासून तिला पूर्णपणे वेगळे काढले जाते.
आता आतापर्यंत जे जे म्हणून चुकीचे आणि गैर मानले गेले होते ते आता सर्वदूर पसरलेल्या मार्केटच्या छायेत आले की छान, चकचकीत, शायनिंग वाटू लागते. अगदी बाजारू मूल्येदेखील ‘प्रॅक्टिकल’ म्हणून सुयोग्य वाटू लागतात याचे हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. Commercialization of everything under the sun including the ‘son’ is cool! (आपल्या देशात सरोगसीत बहुधा मुलगेच होतात! कसे? ते शुक्राणूंची निवड करणाऱ्यालाच ठाऊक!)

सरोगसीला पैशासाठी तयार होणाऱ्या स्त्रीचे अनेकदा पुरेसे समुपदेशन- म्हणजे मानसिक तयारी, सबलीकरण वगैरे केलेच जात नाही. गरीब स्त्रीला मन, मानसिक ताण, अंतर्विरोध, स्वसन्मान वगैरे असण्याचे फार कारण नाही असेच जणू मानले जाते. तिला सुरुवातीला महिनाभर तिचे शरीर, रक्त आणि गर्भाशय बाळाच्या आगमनासाठी जय्यत तयार करायला काही औषधे दिली जातात. त्यांचे अर्थातच काही दुष्परिणाम असू शकतात. या बाईला गर्भधारणा झाल्यावर तिच्या घरापासून दूर एखाद्या होस्टेलमध्ये ठेवले जाते. काही वेळा एखाद्या छोटय़ा फ्लॅटमध्ये दोन-दोन स्त्रियांना ठेवले जाते. तिला बाहेर जरूर जाता येते; पण फक्त डॉक्टरी तपासणीसाठी. तिची स्वत:ची मुले आणि नातेवाईक फक्त रविवारी तिला भेटायला येऊ शकतात. एखाद्या जेलसारखे असते हे! मात्र, एक गोष्ट चांगली असते. तिला अगदी पोषक आहार आणि तोही भरपूर आणि वेळेवर, विनासायास दिला जातो. या स्त्रीवर एक प्रचंड मोठी जबाबदारी असते- की अगदी चांगले आरोग्यपूर्ण बाळ ग्राहकास देणे. मदर मशीनच ते जणू! काही वेळेस मात्र असे होत नाही. निसर्गच तो! सगळी काळजी घेऊनही कधी मधेच नैसर्गिक गर्भपात होतो, किंवा बाळात काही दोष निर्माण होतो. काही वेळा गर्भपात करावा लागतो. मग पुनश्च तेच सर्व करायचे.

दुसऱ्या बाईचे बीज घेऊन गरोदर राहिलेल्या बाईला एकलॅम्पसिया (गरोदरपणातली एक अतिशय गंभीर अवस्था) आणि अधिक रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते असे आढळून आले आहे. या बाईचा विमा असतोच असे नाही. तिला अपयश आले तर सगळे पैसे मिळतील असेही नाहीच. सगळे काही नीट पार पडून बाळ झाल्यावर ते ग्राहकास देऊन ही बाई घरी परत येते. एका वेगळ्या जगात नऊ महिने राहून ती तिच्या माणसांत आणि नेहमीच्या परिस्थितीत परत येते. पैसे अर्थात नवऱ्याकडे! या तिच्या प्रवासाकडे आणि प्रयासाकडे आपण कसे पाहतो?
या प्रक्रियेत जर एखादी स्त्री स्त्रीबीजदाती असेल तर तिच्या बीजांडकोषातून एका वेळी अनेक बीजे निर्माण व्हावी लागतात. त्यासाठी काही बीजांड-उत्तेजक औषधे तिला दिली जातात. (एरवी महिन्यातून फक्त एकच बीज निर्माण होते.) या औषधांचे काही दुष्परिणाम अतिशय गंभीर असू शकतात.

ज्या देशात हजारो महिला अॅनियमियाग्रस्त आहेत, अनेक स्त्रिया बाळंतपणात नीट उपचार न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात, लाखो बाळे कुपोषित आहेत अशा देशात असा हा अवास्तव खर्च करणे हे आपल्या एकूण प्राधान्यक्रमाचे अनेक प्रश्न उपस्थित करते.
सरोगसीचा अशा अनेक कारणांसाठी विरोध करायला हवा. त्यासाठी बंदीचा कायदाही हवा. पण कायदा येण्याआधीदेखील डॉक्टरांनी यावर अघोषित बंदी टाकायला हवी. मला आठवते की जेव्हा स्त्रीलिंगी गर्भपातविरोधी कायदा अस्तित्वात नव्हता तेव्हाही असे काही चांगले स्त्रीरोगतज्ज्ञ होते- की जे स्त्रीलिंगी गर्भपात करत नसत. चांगल्या कामाला कायद्याचा आधार हवा कशाला?

आजच्या गरीब सरोगेट माता मग काय करतील, याची काळजी करू नये. त्यांच्यासाठी इतर मानाची, सन्मानाची कामे निश्चितच शोधता येतील. अशी कामे खूप आहेत.
सरोगसी वगैरे इतके सारे कशासाठी करायचे?  तर आपल्याच जैविक बीजाचे बाळ मिळवण्यासाठी. तेही दुसऱ्या गरीब स्त्रीच्या जोरावर! ही मानसिकता किती सेल्फी सेल्फी म्हणजे नार्सिसिस्ट आहे! पण अपत्यप्राप्तीची अगदी कितीही खोलवरची इच्छा असली तरी दुसऱ्या कुणा स्त्रीच्या देहाचा व्यापार करून ती पुरी करावी, हे कोणत्या नीतीत बसते? बाळ आपले होण्यासाठी त्यात आपले जैविक बीज महत्त्वाचे नसते, तर त्यासाठी आपले प्रेम आणि वात्सल्य असण्याची गरज असते.
टीव्हीवरच्या एका फोन-इन् कार्यक्रमात एका प्रेक्षकाने खूप काळजीच्या सुरात विचारले होते की, ‘डॉक्टर, त्या सरोगेट बाईचे गुण आपल्या बाळात उतरत नाहीत ना?’ तेव्हा डॉक्टरांनी अगदी छान प्रसन्न हसून उत्तर दिले, ‘नाही हो. त्याची काही काळजी करू नका. जस्टेशनल सरोगसीमध्ये असे काही होत नाही. सरोगेट स्त्रीचा डीएनए बाळात उतरत नाही!’ यावरून ग्राहक आणि विक्रेती सरोगेट स्त्री यांच्यादरम्यानचे सर्व प्रकारचे आर्थिक, सांस्कृतिक, भावनिक अंतर किती प्रचंड आहे हे अगदी स्पष्ट होते. सरोगेट आईच्या मनात कदाचित आपण चांगले काम केल्याची, पुण्याची भावना असेल. पण ग्राहक असे म्हणतो की, त्यात काय विशेष? केवढे तरी पैसे घेतले तिने!
आपल्या देशात आज सव्वा कोटी अनाथ बाळांना प्रेमाच्या घराची, प्रेमाच्या माणसांची गरज आहे. त्यांच्या गरजांकडे नीट लक्ष द्यायला हवे. असे असताना असल्या अवाजवी तंत्रज्ञानाचे खर्चीक आणि स्त्रियांच्या शोषणावर आधारीत असलेले मार्ग आपल्याला का हवेत?

डॉ. मोहन देस  mohandeshpande.aabha@gmail.com

साभार: लोकसत्ता वृत्तपत्राच्या ‘ लोकरंग’ पुरवणीमध्ये १० जुलै २०१६ प्रकाशित झालेल्या लेखाचा काही भाग.. मूळ लेखासाठी http://www.loksatta.com/lekha-news/reasons-for-surrogacy-1264904/ या लिंक वर क्लिक करा.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. सुनील says:

    सरोगसी बंद करा सर्व हिरो हिरोईन सेलेबर्टी याना मुलगाच कसा होतो मुलगी का होत नाही यावर विचार व्हावा

  2. खरं आहे! आजपर्यंत 6 सेलेब्रिटीनी आपल्याकडे सेरोगसी मार्फत अपत्य प्राप्ती केली, त्यात फराह खान खान ला 2 मुली व 1 मुलगा झाला. बाकी लोकांना मुलगाच झाला.
    आपल्या इतर वाचकांना काय वाटतं? नक्की लिहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap