वेगळे आहोत विकृत नाही – इंटरसेक्स बाळाचं संगोपन

बाळ जन्माला आलं की पहिला प्रश्न विचारला जातो, मुलगा आहे का मुलगी. पण जेव्हा जन्माल्या आलेल्या बाळाचं लिंग नक्की काय ते स्पष्ट होत नाही तेव्हा पालक, डॉक्टर संभ्रमात पडतात. इंटरसेक्स बाळांचं संगोपन कसं करायचं, ती मोठी होत असताना त्यांना कसा आधार द्यायचा आणि त्यांच्या लैंगिकतेविषयी निर्णय घेण्याचं त्यांचं स्वातंत्र्य कसे जपायचं याविषयी या लेखात माहिती करून घेऊ या.

इंटरसेक्स बाळाच्या संगोपनाबाबल इंटरसेक्स विषयातील तज्ज्ञ डॉ. मिल्टन डायमंड यांनी काही मार्गदर्शक तत्त्वे मांडली आहेत. ही तत्त्वे पुढीलप्रमाणे –

  • जननेंद्रियांतील वेगळेपणाला आजार, विकृती किंवा दोष अशा प्रकारचे शब्द वापरू नयेत. जननेंद्रियांत वेगळेपण आढळलं तर त्या बाळाची संपूर्ण शारीरिक तपासणी, चाचण्या करणं आवश्यक आहे. त्याच बरोबर आईवडिलांच्या कुटुंबांमध्ये असं वेगळेपण कोणामध्ये दिसलं होतं का याचा तपशील मिळवावा.
  • जर नवजात बालकाचं लिंग कोणतं आहे हे लगेच सांगता येत नसेल तर आई वडिलांना विश्वासात घेऊन वस्तुस्थितीची कल्पना द्यावी. त्यांचं समुपदेशन करावं. त्यांना सांगावं की अशा वेगळेपणाचं प्रमाण खूप कमी असलं तरी काही प्रमाणात असं वेगळेपण आढळतं. तसंच त्यांना सांगितलं पाहिजे की यामध्ये त्यांचा कसलाही दोष नाही व त्यांनी बाळाला प्रेमाने वाढवावं.
  • यात लाज वाटण्याजोगं काही नाही पण इतरांसाठी हा कुतुहलाचा विषय बनू नये म्हणून डॉक्टरांनी गोपनीयता बाळगली पाहिजे.
  • जिथे मुलगा आहे की मुलगी हे ठरवणं अवघड असेल तिथे त्या बाळाचं लिंग अंदाज घेऊन ठरवावं व त्या बाळाला असं नाव द्यावं की जे मुलाला किंवा मुलीला दोघांना लागू होतं. उदा. सुहास, किरण, इत्यादी
  • बाळाच्या जिवाला धोका असेल तर जरूर तेवढीच कमीत कमी शस्त्रक्रिया करावी. मुलगा-मुलीसारखी दिसणारी जननेंद्रिये घडवण्यासाठी म्हणून ‘कॉस्मेटिक’ शस्त्रक्रिया करू नये. समाजात स्वीकार व्हावा म्हणून अशा शस्त्रक्रियेसाठी पालक हट्ट करत असतील तर त्यांना समजावून सांगा की वयात आल्यावर शस्त्रक्रियेमुळे लैंगिक अनुभवांवर विपरित परिणाम होऊ शकतो म्हणून नुसतं ‘बरोबर’ दिसण्याचा हट्ट करू नका.
  • तारुण्यात आल्यावर त्या मुला-मुलीचा लैंगिक पैलू प्रकट होणार आहे. जननेंद्रियांचे लैंगिक कार्य, वापर, संवेदनशीलता या सर्व गोष्टी कोणती शस्त्रक्रिया केली-कशी केली यावर अवलंबून असणार आहेत.
  • ती व्यक्ती मोठी होऊ लागल्यावर हळूहळू त्याला, तिला आपल्या लिंगभावाची व लैंगिक कलाची ओळख होणार आहे.
  • मूल वाढवताना पालक बाळाला मुलगा मानत असतील तर त्याला मुलगा म्हणून वाढवावं. मुलगी मानत असताील तर मुलगी म्हणून वाढवावं. इंटरसेक्स म्हणून वाढवलं जाऊ नये. कारण हे नाव अजून समाजात प्रचलित नाहीय या काळात बाळाला त्याच्या आवडीनिवडी ठरवण्याचं स्वातंत्र्य द्या. उदा. खेळणी निवडणं, इ. बाळाला सक्तीनं किंवा दडपणाखाली मुलासारखा किंवा मुलीसारखा वाग म्हणून हट्ट करू नका. अशाने त्या मुलाचा लिंगभाव नीट विकसित होत नाही.
  • काही बाळांच्या बाबत ते बाळ मुलगा आहे का मुलगी आहे हा अंदाज लावणं अवघड असतं व लावलेला अंदाज चुकू शकतो.
  • मुला/मुलीला समजू लागल्यापासून त्याला कळेल अशा सोप्या शब्दात ही माहिती सांगायला सुरुवात करा.
  • मुला/मुलींना आधार द्या. क्रूर, दुष्ट मित्र-मैत्रिणींपासून त्याचं संरक्षण करा.
  • कुटुंबातील व्यक्तींचं व या मुला/मुलीचं योग्य त्या टप्प्यात काउन्सिलिंग करा. उदा. ते मूल शाळेत जायच्या वेळी, तारुण्यात प्रवेश करताना, इत्यादी. काउन्सेलिंग तीन वेगवेगळ्या गटात केलं जावं. फक्त पालक, फक्त मुलगा/मुलगी, एकत्रितपणे पालक आणि मुलगा/मुलगी
  • जननेंद्रियांची तपासणी कमीत कमी वेळा करावी. ती करण्याअगोदर मुला/मुलीची संमती विचारावी. त्या मुला/मुलीला हा पक्का संदेश मिळाला पाहिजे की त्याच्या/तिच्या जननेंद्रियांवर त्याचा/तिचाच अधिकार आहे. ना पालकांचा, ना डॉक्टरांचा.
  • जेवढं शक्य आहे तेवढं मुलाला/मुलीला इतरा मुला-मुलींसारखं वाढवा. मुलगा/मुलगी प्रौढ झाल्यावर औषधोपचार, शस्त्रक्रिया इत्यादी सर्व माहिती व पर्याय द्या. लैंगिकता, लैंगिक अनुभव या विषयांवर मोकळेपणाने त्याच्याशी/तिच्याशी संवाद साधा.
  • बहुतेक जननेंद्रियांच्या वेगळेपणासाठी शस्त्रक्रिया केलीच पाहिजे अशी परिस्थिती नसते. जर प्रौढपणी त्या व्यक्तीने SAS (सेक्स असाइनमेंट सर्जरी) करायची ठरवली तर त्याला/तिला दुसऱ्या लिंगाची (घडवल्या जाणाऱ्या लिंगाची) जीवनपद्धती काही काळ जगण्यास सांगा. अशाने त्या व्यक्तीला ती, ही नवी जीवनपद्धती स्वीकारू शकेल का नाही हे उमजेल व मग त्या अनुषंगाने ती व्यक्ती त्या दिशेने पाऊल टाकायचं का ते ठरवेल.
  • पालक, इंटरसेक्स व्यक्तीने व डॉक्टरांनी केसचे संपूर्ण डॉक्युमेंट्स/रिपोर्ट्स/केसपेपर्स नीट जपून ठेवावेत.
  • लक्षात ठेवा की डॉक्टर्स या विषयातले जाणकार असले तरी उपचारांच्या बाबतीत (अत्यावश्यक व तातडीची शस्त्रक्रिया वगळता) औषधोपचार, शस्त्रक्रिया करायची का, कोणती करायची कधी करायची याचा अधिकार त्या व्यक्तीचा आहे, डॉक्टरांचा किंवा पालकांचा नाही. ती व्यक्ती सज्ञान झाल्यावर तिला या विषयावर विचार करू द्या. अभ्यास करू द्या व त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार कृती करा. औषधोपचार/शस्त्रक्रियेसाठी त्या व्यक्तीवर कोणीही सक्ती करू नका, दबाव आणू नका. शक्यता आहे की ती व्यक्ती कोणतीही शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेईल. अशा निर्णयात काहीही गैर किंवा चुकीचं नाही.
बाळाचं लिंग काहीही  असलं तरी बाळ आपलंच असतं, आपल्याच पोटी जन्माला आलेलं असतं त्यामुळे त्याच्यावर माया करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं. नाही का?

इंटरसेक्स – एक प्राथमिक ओळख, ले. बिंदुमाधव खिरे, समपथिक प्रकाशन या पुस्तकातून साभार
अधिक माहितीसाठी – www.samapathik.org

(क्रमशः)

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap