मीरा म्हणाली, “आकाशदादा, मागच्या वेळी तू म्हणाला होतास की, कोणतीतरी भीती, प्रेशर मुळे मुलांना आपण सेक्स करावा असे वाटू शकते. पण या कोणत्या गोष्टी आहेत हे जरा तू आम्हाला एक्स्प्लेन करून सांग ना…”
“जरूर! सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पियर प्रेशर. जी तुम्ही खूप छान हाताळली आणि त्याबद्दल मला तुमचं खूप कौतुक वाटतंय. आपल्या मित्र मैत्रिणींचा दबाव हाताळणं आणि आपल्या मतावर ठाम राहणं ही सोपी गोष्ट नाहीये. अनेकदा मुलामुलींना सेक्स करायचा असतो तो आपण समूहातलेच आहोत हे दाखवण्यासाठी, आपण वेगळे पडू नये, आपल्याला कोणी ‘अंकल किंवा आंटी’ समजू नये म्हणून ही धडपड चाललेली असते. अगदी लेक्चर बंक करण्यापासून ते जीएफ, बीएफ मिळवणं, पहिली नशा करणं आणि सेक्स करणं या सगळ्या गोष्टी पियर प्रेशरमुळेच होतात. त्यामुळेच आपल्याला हे सगळं खरंच हवं आहे का हे तपासणं आणि नको असेल तर त्यामुळे होणाऱ्या परिणामांना तोंड देण्याचं धैर्य ठेवून ठामपणे ‘नाही’ म्हणणं हे खूप महत्त्वाचं असतं.
त्यानंतर मागे खेचणारी दुसरी गोष्ट म्हणजे भीती वाटत असते. ही भीती अज्ञानाची आणि अर्धवट किंवा विपरीत माहितीची असते. सेक्सबद्दल शास्त्रीय आणि अचूक माहिती बऱ्याचदा नसते. पोर्न क्लिप्स किंवा सिनेमे बघून जी माहिती मिळते ती शास्त्रीय माहितीपासून खूप लांब असते. हे बघून मनात उलट काही गंड, विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ त्यात दाखवलेले पुरुष लिंगाचे आकार, जाडी, खूप काळ लांबलेला सेक्स, एका जोडीदाराबरोबर एकच वेळी चार पाच जोडीदारांनी केलेला सेक्स, जोडीदाराला मारहाण करून केलेला सेक्स, या मारहाणीचा त्या जोडीदाराला होत असलेला आनंद, इ. इ…. या पद्धतीच्या गोष्टी अशा प्रकाराने चित्रित केलेल्या असतात की कुमारवयीन मुलं त्याच्या प्रभावाखाली झटकन येतात. चित्रपट, विज्युअल जाहिराती यामधून आपल्या आवडत्या हीरो – हिरोईनची नक्कल आणि त्यांच्या सिनेमामध्ये, जाहिरातींमध्ये असलेले सेक्शुअल ओव्हरटोन यांचाही प्रभाव खूप मोठा असतो.
एक मोठी भीती परिणामांची पण असते. म्हणजे सेक्स केला तर गर्भधारणा होते आणि कधी कधी एचआयव्ही आणि त्याच्यासारखी इतर लैंगिक संक्रमण होण्याचे पण धोके असतात. हे ऐकून, वाचून, आजूबाजूला पाहून माहीत असतं. तसंच ओळखीचा जोडीदार नसेल आणि पैसे देऊन सेक्स करायचा असेल तर कोणी पाहिलं, पालकांना, ओळखीच्या कोणाला कळलं तर काय करायचं, असे पण विचार असतात. गम्मत म्हणजे मागे खेचणाऱ्या या ज्या काही गोष्टी असतात त्याच सेक्स करायला प्रवृत्त पण करणाऱ्या असतात आणि या गोंधळामुळेच मुलं मुली सेक्स करू का नको या विचारात असतात. म्हणून अगोदर सेक्स खरंच करायचा आहे का याचा तुमच्या मित्रांना विचार करायला सांगा. करायचा असेल तर मागे खेचणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत हे त्यांना एका कागदावर लिहून काढायला सांगा. एकदा हे समजलं म्हणजे मग त्यावर त्यांना मार्गदर्शन करता येईल.”
“म्हणजे आकाशदादा,” निखिलने विचारलं, “समजा, ही सगळी प्रोसेस एखाद्या मित्र – मैत्रिणीने पूर्ण केली. त्यांनी स्वतःला नीट तपासलं, त्यांना त्यांचं कारण सापडलं, आपण त्यांना त्यावर मार्गदर्शन केलं, योग्य आणि अचूक माहिती दिली, होणाऱ्या परिणामांपासून स्वतःचं कसं संरक्षण करायचं हे समजावलं. आता जर त्याला वाटलं आपल्याला सेक्स करायचा आहे. मग पुढे काय? आता तो सेक्स करू शकतो का?”
“वा! फारच छान प्रश्न…” आकाशने मनापासून कौतुक केलं. “तुझ्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्या या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कसा ते सांगतो… पण पुन्हा एकदा मी माझं आधीचं वाक्य रिपीट करतो. सेक्स ही खूप आनंद देणारी, स्पेशल, पण गुंतागुंतीची आणि कधी कधी आपल्याला खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. आणि आता या वाक्यात मी पुढची भर टाकणार आहे…ती म्हणजे या गोष्टीला खूप साऱ्या वेगवेगळ्या बाजू आहेत. त्या कोणत्या हे बघण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. जरी शारीरिक पातळीवर याची अभिव्यक्ती होत असली तरी सेक्स म्हणजे नुसती एक यांत्रिक, शारीरिक क्रिया नाहीये तर त्यात भावना आणि नातेसंबंध यांचाही समावेश असतो. म्हणूनच ही विचार करून आणि काळजी घेऊन करण्याची गोष्ट आहे.
तुम्ही व तुमचा जोडीदार शरीराने व मनाने पूर्णपणे या संबंधासाठी तयार असाल तरच तुम्हाला यातला आनंद घेता येईल. आता आपण तुमच्या काही मित्रांचे अनुभव ऐकले, ते म्हणतात की त्यांचा जोडीदार तयार आहे किंबहुना तोच त्यांना फोर्स करतोय. आता मी जे सांगतो ते लक्षात ठेवा, एक जोडीदार जर दुसऱ्याला सेक्ससाठी जबरदस्ती करत असेल, उत्तेजित करत असेल किंवा इमोशनल ब्लॅकमेल करत असेल, आपले नातेसंबंध टिकावेत म्हणून जर कोणी तडजोड म्हणून सेक्ससाठी तयार होत असेल वा आपण पुरुष आहोत आणि आपण जर आपल्या मैत्रिणीला सेक्स करत नाही म्हटलं तर ती आपल्याला ‘पुरुष’ समजणार नाही अशा खोट्या पुरुषार्थाच्या कल्पनेच्या आहारी जाऊन कोणी सेक्सला तयार होत असेल तर हे सर्वस्वी चुकीचं ठरणार आहे. म्हणून नीट विचार करा आणि आपल्या किंवा आपल्या जोडीदाराच्या तयारीमागे ही किंवा यापैकी जर एखादं कारण असेल तर समजून घ्या की आपले नातेसंबंध निरोगी, निकोप नाहीत आणि म्हणूनच अशावेळेस आपण केलेला सेक्स देखील एन्जॉएबल असणार नाही. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सेक्स ही खूप आनंद देणारी गोष्ट आहे, हे कधीही विसरू नका…याबरोबरच आणखी पण एक गोष्ट लक्षात घ्या…”
“कोणती आकाशदादा?” मुलांनी उत्सुकतेने विचारलं…त्यांना ही चर्चा इंटरेस्टिंग वाटतेय आणि मांडलेले मुद्दे पटतायेत हे त्यांच्याकडे बघून आकाशच्या लक्षात आलं.
“आनंद घेणं हा जर आपला हक्क असेल तर तशीच त्या कृतीतून जे काही निष्पन्न होईल त्याची जबाबदारी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. याला म्हटलं जातं, ‘सेक्शुअल राईट्स विथ सेक्शुअल रिस्पोन्सिबिलीटी’. म्हणजे असं की आपण काय करतो आहोत, त्याचे परिणाम काय होणार आहेत हे समजून घेऊन त्याची जबाबदारी घेण्याची ताकद ठेवणं. थोडक्यात सगळ्याची समरी सांगायची झाली तर आधी मी म्हटल्याप्रमाणे सेक्स म्हणजे निव्वळ शारीरिक क्रिया नसून त्यात भावना, विचार, आपल्या श्रद्धा, विश्वास, आपली मूल्य, ध्येय या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो आणि म्हणूनच या गोष्टी नीट समजून घेऊन, तपासून घेऊन मग सेक्स करणं गरजेचं असतं.”
“आकाशदादा,” मुलांनी विचारलं, “आम्हाला बाकी समजलं पण आपल्या श्रद्धा, विश्वास, मूल्य यांचा पण यात समावेश असतो असं तू म्हणतोस…हे काय प्रकरण आहे? याचा काय संबंध?”
“मुलांनो, जन्मापासून आणि समजायला लागल्यापासून आपल्याला आपल्या घरातली लोकं, आपले नातेवाईक, शेजार पाजारचे, आपले शिक्षक आपण घरात, समाजात कसं वागायला पाहिजे, कसं वावरायला पाहिजे, कोणकोणते नीतीनियम पाळले पाहिजेत हे सांगत असतात. मोठं होत असताना, कळत नकळत हे ऐकून, पाहून, समजून घेऊन आपल्या पण काही श्रद्धा, विश्वास, मूल्यं तयार झालेली असतात. आपली कोणतीही कृती या नियमांच्या बाहेर तर नाही ना, अशी मनाच्या एका पातळीवर आपण सतत तपासणी करत असतो आणि जिथे शंका वाटते तिथे आपण ती कृती करण्यापासून स्वतःला रोखत असतो. आणि म्हणूनच आपला जोडीदार आपल्याला सेक्स करू म्हणतो पण आपल्याला मात्र प्रश्न आहे की सेक्स करायचा की नाही? तेव्हा त्यात बऱ्याचदा आपल्या या विश्वास, श्रद्धेच्या संकल्पना, आपली मूल्यं यांना कुठेतरी धक्का बसतो असं आपल्याला वाटतं असतं आणि म्हणून मनाची चलबिचल होत असते. जर आपण दबावाखाली येऊन आपल्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सेक्स केला तर आनंदाऐवजी नंतर मनात अपराधीपणाची भावनाच वाढीला लागलीये असं लक्षात येतं.”
हे सगळं ऐकून मुलं चांगलीच गंभीर झाली. काही वेळाने अक्षय म्हणाला,
“बापरे! आकाशदादा, हे सगळं ऐकल्यानंतर जाणवतं, हा विषय आणि ही गोष्ट किती गंभीर आहे आणि विचारपूर्वक करायची आहे. पण आमच्या पिढीची आणि वयाची बहुसंख्य मुलं याकडे किती वरवर बघतात…”
“पण मग आकाशदादा,” अनन्या म्हणाली, “आमच्या वयाच्या ज्या मुलांनी सेक्स केला असेल त्यांचं काय? त्यांना हे असे प्रश्न पडले नसतील? त्यांनी काहीच विचार केला नसेल? की आता तू सांगितलं तसा सर्वांगीण विचार त्यांनी केला असेल?”
“ते आपण कसं सांगणार? त्यांनी ती कृती केलीये, करून टाकलीये किंवा अजून करतही असतील…कारणं काहीही असू शकतात…आपण मगाशी चर्चा केली त्यापैकी किंवा इतरही म्हणजे कुतूहल, आपण काहीतरी थ्रिल करतोय ही भावना, माहितीचा आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव, पियर प्रेशर, आपण बाकी सगळ्यांपेक्षा ‘लय भारी’ आहोत हे दाखवण्याची हौस, किंवा असुरक्षितता, मानसिक, भावनिक ताणतणाव, रिकामपण, भावनिक पोकळी, इ. इ…आपण आता बोलतोय त्या सगळ्या गोष्टींच्या विचारापेक्षा या गोष्टी कदाचित डॉमिनेट झाल्या असतील आणि त्यांनी सेक्सची कृती विचार न करता, किंवा भावनेच्या भरात केली पण असेल…कृती केल्यानंतर त्या माणसाचं वागणं कसं आहे यावर त्याने ती कृती विचाराने केली की अविचाराने हे समजतं.”
“हं” मुलांनी समजल्यासारखी मान डोलावली, “आता आम्हाला यातले धोके पण सांग ना…”
“शारीरिक धोक्यांबाबत तर आपण बोललो आहोतच. म्हणजे काळजी घेतली नाही तर नको असलेली गर्भधारणा, एचआयव्ही आणि इतर लैंगिक संसर्ग हे धोके आहेतच पण आणखी एक धोका म्हणजे काहीवेळा कोणीतरी सांगितलेलं, वाचलेलं, पोर्न फिल्म्समध्ये पाहिलेलं अशा सगळ्या गोष्टींचं डोक्यात मिश्रण होऊन मुलं सेक्स करताना अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे आपल्या जोडीदाराला इजा किंवा वेदना होण्याची शक्यता असते. पहिल्या दोन गोष्टींसाठी आपलं संरक्षण करणारी साधनं आहेत आणि शेवटच्या गोष्टीसाठी साधन म्हणजे योग्य, अचूक आणि शास्त्रीय माहिती मिळवणे हे आहे.
याशिवाय अजून एक धोका आहे म्हणजे तो शारीरिक नाही. हा आपापसात स्पष्ट संवाद नसण्याचा आहे. म्हणजे असं होतं की काही वेळा एक जोडीदार सेक्ससाठी ‘नाही’ म्हणत असला तरी दुसरा जोडीदार मात्र त्याचा अर्थ ‘हो’ असाच घेतो. किंवा जोडीदाराने सेक्सशी संबंधित अशा एखाद्या कृतीला मान्यता दिलेली असली की तो पुढच्या सगळ्या कृतीला वा फायनल सेक्सला तयारच असणार आहे असं गृहीत धरलं जातं. पण मित्रांनो लक्षात घ्या, यात आपली चूक असू शकते. कारण बहुतेकवेळा माणसं त्यांना जे ऐकायचं असतं तेच ऐकतात आणि त्यांना जो अर्थ काढायचा असतो तोच काढतात. जोडीदाराला तसं म्हणायचं असतंच असं नसतं. विशेषतः लैंगिक नातेसंबंधांच्या बाबतीत तर हे हमखास होतं. त्यामुळे आपल्याला काय हवंय आणि आपण कुठपर्यंत जायला तयार आहोत याबद्दल अत्यंत स्पष्टपणे, निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे आपल्या जोडीदाराशी चर्चा करणं खूप आवश्यक असतं…आणि जर जोडीदार तुमच्या या निर्णयाचा आदर ठेवत नसेल, तुमच्या मर्यादांना समजून घेत नसेल तर मग खुशाल समजा की तुमच्या नातेसंबंधाचा निरोगीपणा तपासण्याची वेळ आली आहे….”
No Responses