लेखांक १. मूल होत नाही? जबाबदार कोण?

आपल्या समाजात मूल नसलेल्या स्त्रीला वांझ किंवा वांझोटी म्हटलं जातं आणि तिला नापीक जमिनीची उपमा देण्यात येते. स्त्रीचं शरीर हे शेत आणि पुरुषाचं बीज त्यात रुजून फळतं ही यामागची संकल्पना आहे. पण मुळात ही संकल्पनाच चुकीची आहे. कारण गर्भधारणेमध्ये, बीज फळण्यामध्ये स्त्री बीजही असतं आणि फलित गर्भाचा अर्धा हिस्सा हा स्त्री बीजाचा असतो.

पण स्त्रीला मूल होत नसलं तर ती एक स्त्री म्हणून आणि एक पत्नी म्हणून तिच्या कर्तव्यात कमी पडली, असंच सर्वांना वाटतं. मूल न होणाऱ्या स्त्रीला भुताली, चेटकीण ठरवून इतरांवर करणी केल्याचे घाणेरडे आरोप तिच्यावर लावले जातात. मूल नसलेल्या पुरुषाला मात्र नामर्द असं हिणवलं जातं. हे लक्षात घेऊन आपणही बोलताना साध्या सरळ शब्दात मूल होत नाही असा उल्लेख करावा. कोणत्याही परिस्थितीत त्यांना वांझ म्हणू व समजू नये.

मूल न होणे ही मोठी समस्या आहे. जवळ जवळ १०% जोडप्यांमध्ये आढळून येते आणि आरोग्यसेवांनी तिची पुरेशी दखल घ्यायला पाहिजे. मूल न होण्यासंबंधीची कारणं पाहता जोडप्यातील दोघांमध्ये किंवा दोघांपैकी एकामध्ये काही शारीरिक घटक जबाबदार असल्याचं आढळून येतं.

याशिवाय त्यांच्या नात्यात आणि शारीरिक संबंधांतही काही अडचणी असू शकतात. लैंगिक संबंध आणि गर्भधारणा याविषयी अपुरी माहिती तसंच स्त्रीच्या पाळीचक्रातील जननक्षम दिवसांची माहिती नसल्याने त्या काळात संबंध न येणं अशी कारणंही यासाठी जबाबदार असतात. या समस्या सोडवल्या तर मूल होऊ शकतं. वैद्यकीय क्षेत्रात आता बरीच प्रगती झालेली आहे, नवनवीत पद्धती सध्या वापरात आहेत. त्यांंचे रिझल्टही सकारात्मक आहेत.  पण कधी कधी कुठल्याच उपायाने शारीरिक समस्या सुटत नाही. अशा वेळी मूल दत्तक घेणे हा सर्वात उत्तम पर्याय असू शकतो. कारण मूल वाढवणं आणि त्याचं संगोपन केवळ रक्ताशी संबंधित नाही.

 

हे नेहमी लक्षात ठेवा

  • मूल होत नसल्यास केवळ स्त्री जबाबदार नसते तर पुरुषामध्येही काही कारणं असू शकतात.
  • मूल होत नसल्यास ४०% कारणं स्त्रीशी संबंधित असतात. २५% कारणं पुरुषांशी संबंधित असतात. २०% दोघामध्ये दोष असतो व १५% कारण समजत नाही.
  • मूल न होणं हे पाप किंवा कुठल्याही चुकीची शिक्षा नाही.
  • शारीरिक कारणांवर वैद्यकीय उपाय केल्याशिवाय मूल होऊ शकत नाही. डॉक्टरचा सल्ला व उपचार आवश्यक असतो.

पुढील भागात आपण मूल होण्यासाठी काय काय उपाय उपलब्ध आहेत याबाबत माहिती घेऊयात .

 

संबंधित दुवे :

पीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap