मागील भागात आपण मूल न होण्यासंबंधीची कारणं पाहिली. तसेच त्यामध्ये जोडप्यातील दोघांमध्ये किंवा दोघांपैकी एकामध्ये काही शारीरिक घटक जबाबदार असल्याचं पाहिलं. मूल होत नसल्यास केवळ स्त्री जबाबदार नसते तर पुरुषामध्येही काही कारणं असू शकतात हे ही पाहिले. आजच्या भागात मूल होण्यासाठी वैद्यकीय पातळीवर काय काय उपाय उपलब्ध आहेत याबाबत माहिती घेऊयात .
पुरुष व स्त्री या दोघांच्या विविध चाचण्यांतून निघणाऱ्या निष्कर्षातून पुढची चाचणी किंवा उपायांबद्दल डॉक्टर मार्गदर्शन करतात. अंदाजे २० टक्के जोडप्यांना चाचण्या करूनही वंध्यत्वाचं कारण कळत नाही.
चाचण्यांचे निष्कर्ष, स्त्रीचं वय, इतर आजार, आर्थिक परिस्थिती, मानसिक तयारी या सगळ्यांचा विचार करून अजून काही काळ वाट बघणं, औषधं, शस्त्रक्रिया, संभोगेतर गर्भधारणेचे मार्ग अशा विविध पर्यायांवर चर्चा केली जाते.
चाचणीच्या रिपोर्टमध्ये एका जोडीदारामध्ये कारण सापडलं की त्याला/तिला नैराश्य येतं. ‘आपल्याच वाट्याला हे का आलं?’ म्हणून चिडचिड होते. त्याचबरोबर माझ्यामुळे माझ्या जोडीदाराला मूल मिळत नाही म्हणून अपराधीपणाची भावना मनात निर्माण होते. जोडीदाराला, आपल्याला असा जोडीदार का मिळाला याचा राग येऊ शकतो.
डॉ. सनत पिंपळखरे म्हणाले, “मी नेहमी जोडप्यांना सांगतो की तो आणि ती असे दोन भाग म्हणून विचार करू नका. तुम्ही मिळून हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. एक युनिट म्हणून विचार करायचा. कोण जबाबदार आहे अशी भाषा होऊ नये अशी माझी धारणा असते.”
चाचण्यांचा व उपचारांचा दोघांवरही ताण पडतो. विशेषतः स्त्रीवर. या समयी दोघांनी एकमेकांना आधार द्यावा. डॉक्टरांनी विशिष्ट वेळी वीर्य तपासणीसाठी मागितलं किंवा ठरवून दिलेल्या दिवशी संभोग करायला सांगितला की, त्यावेळी आपली मानसिक तयारी असेलच असं नाही. कामावरून दमूनभागून आलं की दोन घास खाऊन कधी झोपतो असं झालेलं असताना, आज संभोग करणं महत्त्वाचं आहे असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे संभोग केला पाहिजे याचं वेगळं दडपण येतं.
संभोगाचा ‘मूड’ असा बटणासारखा ऑन-ऑफ करता येत नाही. या दडपणामुळे अनेक वेळा पुरुषाच्या लिंगाला ताठरपणा येण्यास अडचण होते. त्याला संभोग जमला नाही, तर ‘मी स्त्रीला साथ देऊ शकलो नाही’ याचं अपराधीपण वाटतं. तर दुसरीकडे औषध/तपासण्यांमुळे स्त्रीची मन:स्थिती बिघडलेली असते. पाळीच्या तारखा, इंजेक्शन, औषध या सगळ्या गोष्टींमुळे संभोगाचा आनंद विरून जातो. (पूर्वी या सगळ्यांबरोबर स्त्रीबीज परिपक्व कधी होतं याकडे लक्ष द्यायला स्त्रियांना दररोज ‘बेसल टेंपरेचर चार्ट’ ठेवावा लागायचा. पण ही पद्धत खात्रीलायक नाही म्हणून अनेक डॉक्टर आता याचा वापर करत नाहीत.) चिडचिड होणं, नैराश्य येणं व तणावपूर्ण वातावरण या सगळ्यांमुळे संप्रेरकांचं संतुलन बिघडतं. संभोगानंतर, ‘या खेपेस तरी पाळी चुकू दे’ या दडपणाने दोघांमध्ये तणाव असतो. जर पाळी आली तर खूप नैराश्य येतं. परत एक-दुसऱ्याला सावरायचं आणि पुढच्या महिन्याकडे नव्या आशेनं बघायचं.
डॉ. सनत पिंपळखरे म्हणाले, “सर्वांत महत्त्वाचं असतं ते म्हणजे दोघांनी खूप ‘रिलॅक्स’ असणं, गर्भधारणेला फार महत्त्व न देणं. अगोदरच जोडप्याला कल्पना द्यावी लागते की या अशा अडचणी येणार आहेत मनाची तयारी ठेवा.”
हा प्रवास काही महिने तर काहीजणांसाठी अनेक वर्षांचा असू शकतो. काहीजण शेवटी कंटाळून किंवा आर्थिक परिस्थिती नाही म्हणून प्रयत्न सोडून देतात. डॉ. सनत पिंपळखरे म्हणाले, “मी त्यांना कायम प्रोत्साहन देत असतो. औषधांचा खूप त्रास झाला की त्यांना काही महिने ब्रेक घ्यायला सांगतो. जमत असेल तर घरच्या वातावरणापासून व या चाचण्यांपासून दूर बाहेरगावी सुट्टीवर जा असं सागतो. या अशा ब्रेकमुळेही फायदा होतो. वातावरणात फरक पडतो. ताणतणाव कमी होतो व काही वेळा याच्यामुळे गर्भधारणा होण्यास मदत होते.”
दुसरं मूल
काहींच्या बाबतीत पहिलं मूलं सहज होतं पण नंतर दुसरं मूल हवं असेल तर गर्भधारणा व्हायला अडचण येते. याला काही वेळा ‘इन्फेक्शन्स’, आजारपणं कारणीभूत असू शकतात. उदा. एंडोमेट्रिऑसिस’, परमा, जननेंद्रियांचा कर्करोग इत्यादी. कदाचित पहिल्या मुलाच्या वेळी असा आजार झालेला नसतो किंवा तो मोठ्या प्रमाणात नसतो. पण पहिलं मूल झाल्यानंतर ‘इन्फेक्शन’/ आजार होऊन/बळावून दुसऱ्या गर्भधारणेच्या वेळी अडचण उद्भवू शकते. जोडपं वाटतं की, पहिल्यांदा मूल सहज झालं म्हणजे दुसऱ्यांदाही सहज होणार. तसं सहज होत नाही हे कळल्यावर पहिल्यांदा आश्चर्य, अपेक्षाभंग होऊन मग नैराश्य येण्याची शक्यता असते.
प्रजननाचे संभोगेतर मार्ग
जर पुरुषबीज गर्भाशयामुखातून गर्भाशयात पोहोचायला काही अडचण असेल तर हा मार्ग वापरला जातो. या मार्गात परिपक्व स्त्रीबीज स्त्रीबीजवाहिनीत आलं की पुरुषानं हस्तमैथुन करून मिळवलेल्या पुरुषबीजांवर प्रक्रिया करून (स्पर्म वॉश) ती पुरुषबीजं सिरिंजद्वारे थेट गर्भाशयात सोडली जातात. आशा असते की इथून ती पुरुषबीजं सरकत स्त्रीबीजवाहिनीत जाऊन एखादं पुरुष बीज स्त्रीबीजाला फलित करेल.
जर स्त्रीबीजवाहिनीत अडथळा असेल व शस्त्रक्रिया करून ती अडचण दूर होऊ शकणार नसेल तर स्त्रीबीज व पुरुषबीजाचं मीलन स्त्रीबीजवाहिनीत होणं शक्य नसतं. याला पर्याय म्हणून IVF चे तंत्रज्ञान वापरतात. पुरुषानं हस्तमैथुन करून मिळवलेल्या पुरुषबीजांवर प्रक्रिया (स्पर्म वॉश) केली जाते. स्त्रीची परिपक्व बीजं स्त्रीबीजांडातून बाहेर काढली जातात. ती एका डिशमध्ये ठेवून, प्रक्रिया केलेली पुरुषबीजं स्त्रीबीजांभोवती सोडली जातात. पुरुषबीजांनी काही स्त्रीबीजं फलित केली की ती काही काळ ‘इन्क्युबेटर’मध्ये उबवली जातात. मग ती फलित बीज त्या स्त्रीच्या गर्भाशयात रुजवली जातात. त्या स्त्रीला औषधं देऊन तिची मासिक पाळी बंद केली जाते.
यात पुरुषाने हस्तमैथुन करून मिळवलेल्या पुरुषबीजांवर प्रक्रिया (‘स्पर्म वॉश’) केली जाते. स्त्रीची परिपक्व बीजं स्त्रीबीजांडातून बाहेर काढली जातात. प्रक्रिया केलेलं एक पुरुषबीज इंजेक्शनद्वारे एका स्त्रीबीजात घातलं जातं. अशी फलित केलेली स्त्रीबीजं काही काळ ‘इन्क्युबेटर’मध्ये उबवली जातात. मग ती फलित बीजं त्या स्त्रीच्या गर्भाशयात रुजवली जातात. त्या स्त्रीला औषधं देऊन तिची इन्क्युबेटर मध्ये उबवली जातात. त्या स्त्रीला औषधं देऊन तिची मासिक पाळी बंद केली जाते.
टिपणी : IVF व ICSI तंत्रज्ञान खूप खर्चिक असल्यामुळे एका वेळी २ किंवा ३ स्त्रीबीज पुरुषबीजांबरोबर फलित करून गर्भाशयात रुजवली जातात. आशा असते की २-३ मधील एक तरी गर्भ वाढेल. काही वेळा एकही वाढत नाही थोडी शक्यता असते की सगळी फलित स्त्रीबीज गर्भ म्हणून वाढतील. एका प्रयत्नात यश येण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणून हा पर्याय वापरण्याआधी डॉक्टरांना ‘टेक होम बेबी रेट’ (म्हणजे गर्भधारणा होऊन मग प्रसूती होऊन जिवंत मूल होण्याची शक्यता) विचारावा.
जर एखादया पुरुषाच्या वृषणात पुरुषबीजं निर्माण होत नसतील तर पर्याय म्हणून दुसऱ्या पुरुषाची पुरुषबीज वापरून IUI/IVF/ICSI मार्गाने स्त्रीबीज फलित करता येतं. पाश्चात्त्य देशात स्पर्म बँक्स असतात. या बँकांत पुरुषांचं वीर्य गोठून ठेवलं जातं. एखाद्या जोडप्याला जरूर पडल्यावर पुरुषांचा ‘बायोडेटा’ वाचून, निवड करून यातील कोणाचंही वीर्य गर्भधारणेसाठी विकत घेता येतं. भारतात मात्र अजून अशा प्रकारच्या बँका अस्तित्वात आलेल्या नाहीत.
जर स्त्रीच्या गर्भाशयात दोष असेल, ज्यामुळे तिच्या गर्भाशयात गर्भ वाढू शकणार नसेल, तर अशा वेळी काहीजण सरोगेट मातेचा पर्याय निवडतात. या तंत्रज्ञानात स्त्रीची परिपक्व बीजं स्त्रीबीजांडातून बाहेर काढली जातात. पुरुषानं हस्तमैथुन करून मिळालेल्या पुरुषबीजांवर प्रक्रिया (‘स्पर्म वॉश’) केली जाते. स्त्रीबीजं एका डिशमध्ये ठेवून यांच्याभोवती प्रक्रिया केलेली पुरुषबीजं सोडली जातात. फलित झालेली स्त्रीबीजं काही काळ ‘इन्क्युबेटर’मध्ये उबवली जातात.
नंतर ती फलित बीज एका दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रुजवली जातात व त्या स्त्रीला औषधं देऊन तिची मासिक पाळी बंद केली जाते. त्या स्त्रीच्या गर्भाशयाच्या आधारे गर्भ वाढतो. अशा त-हेने होणारं मूल आईवडिलांच्या गुणसूत्रांतून घडलेलं असतं. त्या मुलात ज्या स्त्रीच्या गर्भाशयात मूल वाढतं तिची कोणतीही गुणसूत्रं नसतात. हा मार्ग अवलंबण्यासाठी काही गोष्टींचा खूप बारकाईनं विचार करावा लागतो, विशेषत: कायद्याचा. ‘सरोगेट’ माता ‘सरोगेट’ मातृत्वासाठी तयार होण्याची विविध कारणं (उदा. आर्थिक व्यवहार), मूल जन्माला आलं की त्याचं पालकत्व कोणाच्या नावे असणार? मल जर काही वेगळेपण घेऊन जन्माला आल (उदा. काही मानसिक, शारीरिक आजार) तर त्याच्या पालकत्वाची जबाबदारी कोणाची?, ‘सरोगेट’ मातेला या गर्भारपणात काही इजा झाली तर तिच्या देखभालीची जबाबदारी कोणाची? अशा अनेक अटी कायदेशीरपणे कागदोपत्री उतराव्या लागतात.
याचबरोबर ‘सरोगेट’ मातेचं तंत्रज्ञान स्त्रियांचं शारीरिक व आर्थिक शोषण करण्यासाठी वापरलं जाईल का? ही एक रास्त भीती आहे.
काहींना कधीच पालकत्व प्राप्त होत नाही. काहींना प्राथमिक तपासणीतच कळतं की त्यांना मूल होणार नाही, तर काहींना खूप प्रयत्न करून या वास्तवाला सामोरं जावं लागतं. काहीजणांना अशा वेळी नातं तोडायची इच्छा होते. हे नातं ठेवून काय फायदा? माझ्यात जर काही कमी नाही तर मी जोडीदारामुळे या नात्यात का अडकून राहायचं? अशी भावना काहींच्या मनात येते. अशा परिस्थितीत जोडीदार एकमेकांना समजून घेणार का? किती दिवस समजून घेणार? काय पर्याय शोधणार? हे सगळे एकमेकांच्या प्रेमावर, समजूतदारपणावर अवलंबून असतं. मूल हवं असेल तर दत्तक मूल घेणं हा पर्याय असतो. कोणाला मूल दत्तक घेता येतं? याची माहिती Central Adoption Resource Authority (CARA) मार्गदर्शिकेत दिली आहे.
संदर्भ: ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’ या बिंदुमाधव खिरे लिखित पुस्तकातील काही भाग. ( सदर पुस्तक रसिक साहित्य किंंवा साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, वा मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे इथे विक्रीसाठी उपलब्ध)
Image Courtesy :
https://www.zeevafertility.com/3-steps-to-increase-success-rate-for-ivf/
http://londonivfvizag.com/what-is-icsi/
http://londonivfvizag.com/what-is-iui/
काही संबंधित दुवे :
पीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार
आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…
No Responses