लग्नापूर्वीचा प्रणय – भाग २ _ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव

लग्नाअगोदरील प्रणयाबाबत ‘तो कुठे करायचा?’ हा मोठा प्रश्न आ वासून उभा असतो. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध असते (तीही कशीबशी), त्यांचे ठीक; पण लाख लफडी करूनही चार घटका एकांतात घालविण्यासाठी ज्यांना ठिकाण मिळत नाही, त्यांचे हाल होतात. बगिच्यात बसलं की नैतिकतेचे रक्षक लगेच दंडुका दाखवून हाकलून लावतात. ट्रेन, बस, समुद्राचा बीच, कधी कधी शहराबाहेरील एखादी जागा, मित्र-मैत्रिणीची खोली (किती प्रयत्न करावे लागतात ना!) असं कुठलंही ठिकाण त्यांना आपलंसं करून आपल्या जोडीदाराबाबोबर हितगुज करावं लागतं, लोकांच्या वटारलेल्या डोळ्यांना न जुमानता. ग्रामीण भारतात तर अजूनही जिथे एक मुलगा आणि एक मुलगी नुसते बोलताना जरी दिसले तरी त्यांचे ‘लफडे’ आहे, असे समजले जाते, तिथे तर युवा पिढीची गोचीच होते. कधीमधी शेताचा, झाडा-झुडपांचा आधार घ्यावा लागतो (मात्र सेक्सविषयक योग्य माहितीच्या अभावाने असे संबंध बऱ्याचदा ‘बदनामीत’ रुपांतरीत होताना आढळतात, मुलगी ‘वाईट चालीची’ तर मुलगा ‘बिघडलेला’ अशी बिरुदे लावली जातात.). बऱ्याचदा चोरून होणाऱ्या निसटत्या स्पर्शावर भागवून घ्यावे लागते. आणि ज्या गोष्टीबद्दल मोकळेपणा नसतो, ती जास्त करावीशी वाटणे, हा मानवाचा निसर्ग गुण असावा, त्यामुळे या जोडप्यांना आपल्या भावना उपलब्ध असलेल्या ठिकाणी व्यक्त कराव्या लागतात. असं ठिकाणच नसतं की जिथे निवांत बसून प्रेमाच्या चार गोष्टी बोलल्या/केल्या जावू शकतात. घरी पालकांची बंदी/भीती, तर बाहेर लोकांचा धसका, अशा वर्तुळात अडकलेली आजची पिढी. उच्चभ्रू समाजात ही समस्या जास्त प्रमाणात जाणवत नसली तरी या संबंधाना असणारे नैतिकतेचे कोंदण कमी-जास्त प्रमाणात सर्वत्र आहे. मी ऐकलंय की भारतात कुठेतरी ‘फक्त प्रेमिकांसाठी’ असे उद्यान आहे. कदाचित लैंगिकतेचा, प्रेमाचा सन्मान करणारं ते राज्य असावं. मात्र अशा उद्यानामुळे एकांतही मिळत असावा आणि त्याचा इतरांना त्रासही होत नसावा. सार्वजनिक ठिकाणी प्रणय करावा की नाही हा प्रत्येकाच्या निवडीचा मुद्दा आहे. मात्र त्याला ‘अश्लीलतेचे ओंगळवाणे प्रदर्शन’ असे स्वरूप प्राप्त होवू नये, याची खबरदारी घेणं नक्कीच आपल्या हाती आहे.

याबाबतीत जाणविलेला आणखी एक मुद्दा म्हणजे तरुण वर्गाची याबाबतीत निर्णय घेण्यातील द्वंद्व अवस्था. जागतिकीकरणाच्या जोरदार आणि वेगवान वाऱ्यामुळे एकीकडे आपली तरुण पिढी माहितीच्या (उदा. सेक्सविषयी माहिती, विडीओ, चित्रे आणि अशी सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींची सहज उपलब्धता, जाहिरात-मालिका-सिनेमातील उत्तेजक चित्रण इ.) जंजाळात एक पाय रोवून उभी आहे तर तिचा दुसरा पाय भारतीय संस्कृतीत अडकला आहे. एका बाजूला आधुनिक युवक-युवती म्हणून ‘वैयक्तिकपण’ (Individualism) आणि ‘स्वातंत्र्य’ या गोष्टींचा ‘मनसोक्त’ आस्वाद तर घ्यायचा आहे, पण दुसऱ्या बाजूला भारतीय समाजात संगोपन झाल्यामुळे जुन्या परंपराही सोडवत नाहीत अशा द्वंद्वात ही पिढी जगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आधुनिक विचाराचे म्हणून किंवा तसा निर्णय घेण्याची परिस्थितीजन्य मोकळीक मिळाली म्हणून असेल, लग्नाअगोदर शरीरसंबंधांकडे एक गरज (कधीकधी नात्यातील) म्हणूनचा निर्णय ते घेतात; मात्र शरीरसंबंध आणि लग्न यांची अतूट जोडी लावणाऱ्या समाजात वाढल्यामुळे ‘आपले शरीरसंबंध लग्नाअगोदर यायला नको होते, ते आले म्हणजे आपल्या लग्नाच्या (भावी) जोडीदाराशी आपण प्रतारणा केली, आपले कौमार्य नष्ट झाले,’ हा न्यूनगंड  किंवा पश्चाताप भावना (विशेषतः मुलींना) तयार होण्याची शक्यता असते. शिवाय आपले संबंध लग्नाचा जोडीदार सोडून दुसऱ्याच कुणाशीतरी आले, ही ‘कसनुशी’ भावना आयुष्यभर घर करून राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या ‘शरीरसंबंध’ या प्रेमळ नात्यात दुरावा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ‘पापी’ भावनेतूनच सेक्स एक्स्पर्टला ‘माझ्या लग्नाअगोदरच्या शरीरसंबंधाची माहिती माझ्या पतीला/पत्नीला होईल का?’ अशा स्वरूपाचे प्रश्न सर्रास विचारले जातात. दोन्ही डगरीवर पाय एकाचवेळी पाय ठेवू नये आणि ठेवलाच तर इतका भक्कम ठेवावा की पडण्याची भीती वाटू नये. या मुद्द्यावर आपले एक पक्के मत ठरवून घ्यावे, परत पश्चाताप करू नये. एकतर कौमार्याची, नैतिकतेची संकल्पना फेकून द्यावी नाहीतर लग्नाअगोदर ‘ब्रह्मचर्य’ पाळावे (नाहीतर स्वतःची ‘हातगाडीच’ आहेच, नाही का?). सगळ्यात महत्वाचे, आपल्याला झेपेल तेवढीच रिस्क घ्यावी, नाही का?

 माझ्या एका मित्र-मैत्रिणीच्या मते, जी जोडपी प्रेमात असतात त्यांनी एकमेकांशी शरीरसंबंध जरूर ठेवावे. त्यामुळे आपण ‘sexually comfortable (शरीरसंबंधाना अनुकूल)’ आहोत की नाही, लग्नानंतर एकमेकांना शरीरसुख देवू की नाही हे अगोदरच ठरवता येते, म्हणजे लग्नानंतर त्यावरून संसार मोडला जाणार नाही, हाही युक्तिवाद नाकारण्यासारखा नाही (स्वीकारण्याची सक्तीही नाही हं!). (ते दोघे ‘comfortable’ नव्हते म्हणून वेगळे झाले आणि भविष्यकालीन मोडू शकणाऱ्या नात्याचा अगोदरच शेवट केला.) अशा संबंधासाठी जोडप्यातील दोघांचीही इच्छा आणि संमती असणे गरजेचे आहे. मुलींची मानसिक आणि शारीरिक तयारी नसताना बऱ्याचदा मुले आपल्या ‘प्रेमाची आणि विश्वासाची’ शपथ देऊन (थोडक्यात ‘प्रेम सिद्ध करण्यासाठी सेक्स करायलाच हवा,’ असं म्हणून) मुलींचे लैंगिक शोषण करतात, त्या ‘भावनिक आवाहनाला’ मुलींनी कदापी बळी पडू नये. अशा नात्यातून फसवणुकीशिवाय काहीही हाती लागणार नाही. प्रेमात स्पर्श महत्वाचा असला तरी शरीर संबंधाची सक्ती नक्कीच नाही, नव्हे ती प्रेमाची कसोटीच होवू शकत नाही.

शरीरसंबंधासाठी भावनिक गुंतवणूक असावी की नाही हा ज्याच्या त्याच्या समजेचा आणि जीवनपद्धती अंगीकारण्याचा प्रश्न आहे. आपण शरीरसंबंध ज्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे त्याच्याशी ठेवावे की केवळ गरज पूर्ण करण्यासाठी कुणाशीही (one night stand, स्त्री अथवा पुरुष वेश्या इ.), हे प्रत्येकाने ठरवावे. शरीरसंबंध म्हणजे दीर्घकालीन नात्याच्या बांधणीतील पायरी की माणसाची मुलभूत गरज भागविणारी, आनंद देणारी विनाअट क्रिडा हा प्रत्येकाच्या विचाराचा भाग आहे. यात हे चूक, ते बरोबर असे होवू शकत नाही. आपण ज्या पद्धतीच्या आयुष्याचा विचारपूर्वक अंगीकार करत आहे, त्यावर आपण ठाम आहोत आणि त्यात आपण समाधानी आणि सुखी आहोत हे महत्वाचे.

ज्यांचा ‘जेंडर’ (स्त्री, पुरुष असा) आणि शरीरसंबंध समाजाने मान्य केले आहेत, त्यांच्या लग्नाअगोदरील शरीरसंबंधाचा विषय समाजासाठी वादग्रस्त आहे तर, ज्यांचा ‘जेंडर’च समाजाला मान्य नाही (ज्यांना ‘बाई ही नाही आणि पुरुषही नाही’ असं अमानवीय आणि अपमानास्पदरित्या हिणविल जातं.) अशा तिसऱ्या जेंडरच्या शरीरसंबंधांबद्दल तर समाज चकार शब्द काढीत नाही; त्यामुळे अशा व्यक्तींच्या किशोर किंवा तरुण अवस्थेतील शरीर संबंध अतिशय गुप्त पद्धतीने चालतात. शिवाय समाजमान्यता नसल्या कारणाने ‘छुप्या’ पद्धतीने हे संबंध आल्याने आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाही आणि त्यामुळे अतिशय गंभीर लैंगिक आजारांची लागण अगदी तरुण वयातच होते. कायद्यानेही त्यांच्या या लैंगिक अभिव्यक्तीला ‘अनैसर्गिक’ आणि ‘गुन्हा’ ठरविलं होतं. काही महिन्यांपूर्वी राज्य घटनेतील या कलम ३७७ वर सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करून अशा शरीर संबंधाना (‘दोन सज्ञान/१८ वर्षांवरील व्यक्ती,संमतीने आणि खाजगी जागेत करतील’ अशा स्वरुपात) ‘गुन्हा’ नसल्याचा निकाल दिला आहे (ज्याला बाबा रामदेवसकट १५ लोकांनी केस फाईल करून विरोध केला आहे. खरं तर जी गोष्ट स्वीकारता येत नाही, तिचा विरोधतरी करू नये.). अशा व्यक्तींच्या शरीसंबंधांना (‘लग्नापूर्वीचे’ असा शब्द वापरता येत नाही, कारण आपल्या देशात इतर काही देशांसारखे त्यांचे लग्न ‘कायदेशीर’ मानले जात नाही.) स्वीकारणे ही लोकांच्या पातळीवर अजूनही सोपी गोष्ट वाटत नसली तरी तेही एक ‘नैसर्गिक’ सत्य आहे, जे आपण अमान्य केल्याने बदलणार नाही (‘हे सत्य स्वीकारले जाते का?’ या प्रश्नाची सुरुवात स्वतःपासून करावी.).

प्रणयाचा आपला अधिकार बजावत असताना एक विसरू नये ते म्हणजे ‘कामजीवन महत्वाचे असले तरी ते म्हणजेच जीवन आणि कशाही पद्धतीने त्याचा परिपूर्ण आनंद घेतलाच पाहिजे,’ असा अट्टाहासही आयुष्य अधोगतीकडे नेऊ शकतो (अशा विचारामुळे कधी कधी अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शोषणासारखा गंभीर गुन्हा करण्यापर्यंत अशा तरुण किंवा अल्पवयीन मुलांची मजल जाते.). प्रणय एकमेकांच्या संमतीने होणारा आनंदी संवाद आहे, ती कसेही, कुठेही ओरबाडून घेण्याची, ‘टाईमपास’ करण्याची गोष्ट नाही, हे समजणे जरुरीचे. सगळ्यात महत्वाचे आपल्या या भावनेला, नात्याला ‘बाजारू’ स्वरूप प्राप्त होवू नये याची खबरदारी घेणं आवश्यक. तरुण पिढी प्रणयासाठी ‘उत्सुक’ जरूर असते, ‘आसुसलेली’ नाही, हे कृतीतूनच दिसायला हवं ना? बगिच्यात बसून आपले मित्र आपल्या जोडीदारासमवेतच्या चुंबनाचे/इतर क्षणांचे चित्रीकरण करून इतर मित्र-मैत्रिणीत ‘ब्लू फिल्म’ म्हणून वाटतात आणि तेही चवीनं पाहून इतरांना ‘शेअर’ करतात हे उदाहरण कशाचे द्योतक आहे? आणि या ‘बाजारीकरणावर’ असणारा आक्षेप योग्यच आहे. बहुतेक पालकांची तर हीच मुख्य चिंता असते, जी सार्थ आहे. आपल्या व जोडीदाराच्या भावनांची, शरीराची कदर, सन्मान आपणच ठेवला पाहिजे. शेवटी कशाचाही आहारी जाणे, धोक्याचेच नाही का? स्पर्श, प्रणय हे प्रेम, भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे, केवळ ‘वासनांचे उद्दिपिकरण आणि विरेचन’ नाही, ही पालकांची भूमिकाही समजून घेतली पाहिजे. आपल्या कामजीवनाचा आपणच नव्हे तर इतरांनीही आदर ठेवला पाहिजे, हा विचारही नाकारण्यासारखा नाही. शिवाय कामजीवनात आनंदाबरोबरच जबाबदारीही असते, ही जाणीव असणे गरजेचे असते. या मुद्द्याला धरूनच आपणाकडे लग्नाचे आणि शरीसंबंधाचे वय याचा संबंध लावतात (आपणास कायदेशीर वयाच्या वादात न पडता एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की सेक्समध्ये त्याच्या होणार्‍या परिणामांची जाणीव असणे, हेही तितकेच महत्वाचे आहे.) हं, त्यासाठी थोडया संवादाची, समजुतदारपणाची आणि संयमाची (संयम म्हणजे ब्रम्हचर्य, अशा अर्थाने नाही तर भावना योग्य रीतीने आणि नात्याच्या विशिष्ट पडावावरती बाहेर पडणे, जास्त फायदेशीर.) गरज आहे. शिवाय मागच्या पिढ्यात आणि पुढच्या पिढ्यात असणारे अंतर समजून घेऊन, त्याची कारणमीमांसा करून समजुतीने आणि संवादाने हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास उद्रेक आणि विरोध याचा संघर्ष हळूहळू कमी होईल. (‘अमेरिकन पाई’ नावाच्या हॉलिवूड सिनेमासिरीजमध्ये अत्यंत कल्पकतेने हा विषय हाताळलेला दाखविले आहे.) आपणाकडे मागच्या पिढ्यांपेक्षा नवीन पिढ्यांना जास्त शहाणपणाची भूमिका घेण्याची गरज आहे, कारण ‘लवचिकता आणि आव्हान पत्करण्याची आणि त्याला सामोरं जाण्याची ताकद’ आमच्याकडे जास्त आहे. मागच्या पिढ्यांनी जसं आपल्या पाल्याची बदलते शरीर आणि त्याच्या गरजा लक्षात घेणं महत्वाचं आहे, तसचं पुढच्या पिढ्यांनी आपल्या पालकांची ताठर भूमिका (त्यांच्या मते, पाल्याचे आयुष्य ‘त्या’ गोष्टीमुळे उध्वस्त होवू शकते (उदाहरणे पाहिल्यामुळे), अशा भीतीतून तयार होणारी) समजून घेऊन खुबीने आपले विचार मांडून (आणि त्यावर ठाम राहून) त्यांना थोडा वेळ देऊन त्यासाठी व्यासपीठ निर्माण करता यायला हवे. आणि हो, प्रणयाचा निखळ आनंद घेणं आणि त्यात सगळं विसरून वाहून जाणं यातील सीमारेषा लेकरांना समजते, हक्काबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव आहे, तुमच्या अपत्याविषयीच्या काळजीची त्यांना कदर आहे, कुटुंबाच्या सन्मानाची फिकीर आहे. भगतसिंग, महात्मा गांधी हे तरुण पिढीचे आदर्श आहेत; त्यांनाही कुटुंबासाठी, देशासाठी काहीतरी करायचे आहे, लैंगिकतेच्या आविष्काराचा त्यावर परिणाम होणार नाही (खरं तर त्याचा त्याच्याशी काही संबंधही
नाही.), यावर पालकांनी विश्वास ठेवला पाहिजे. दोन्ही पिढ्यांना एकमेकांच्या सोबतीने जगायचे असते, वेगवेगळे नाही; फक्त एक-दोन पाऊले मागे पुढे चालून. ‘आमच्या वेळी असं नव्हतं, (लग्नाच्या रात्री नवऱ्याचे/बायकोचे पहिल्यांदा तोंड पाहिले ही दंतकथा सांगणे पालकांनी टाळले पाहिजे.)’ अशी विभाजनिकरणाची भूमिका पालकांनी घेण्यापेक्षा ‘काळ बदलला आहे; पण सांभाळून’ हे म्हणणं जास्त संयुक्तिक, नाही का? विरोधाने, एकमेकांना दुखावून ‘सत्य’ बदलत नसते, म्हणून त्याच्या स्वीकाराची हळूहळू तयारी केलेली बरी.

क्रमशः

(या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी १९ जुलै २०१६ ला वेबसाईटला अवश्य भेट द्या. )

(साभार: सदर लेख ‘मिळून साऱ्याजणी’ (फेब्रुवारी २०१३) च्या अंकामध्ये प्रकाशित झाला होता)

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

3 Responses

 1. sadhana says:

  खूप मस्त लेख आहे. मला lलेख खूप आवडला. माझ्याही मनात यासंदर्भात बरेच प्रश्न होते. माझा दृष्टीकोन बदलायला मदत मिळाली.

  • I सोच says:

   धन्यावाद… वेबसाईट नियमित वाचत जा… तुमचे विचार सूचना आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत…

 2. Your Name says:

  very nice yadav madam ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap