स्त्री-चारित्र्य आणि लैंगिकता_ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव

स्त्रीचे चारित्र्य हीच लैंगिकता:        

“मला समदी लय नावाजत्याती. वांजुटी बाय पर कवाबी कुटंबी डोकवून बगितलं न्हाई,” घरकाम करून पोट भरणारी चाळीशीची सगुणा. चेहर्‍यावर अभिमान. नवरा वारल्यानंतर पुनर्विवाह, लैंगिक संबंध, सौभाग्यालंकार, मनासारखे राहणीमान, आनंदोत्सव साजरा करणं म्हणजे मेलेल्या नवर्‍याशी प्रतारणा मानलं जातं. पुरुषाने मात्र बायको मेली की लगेच एका वर्षाच्या आत लग्न करायचे असते. म्हणजे समाजानं ‘त्याज्य’ ठरविलेल्या गोष्टी स्त्रीने केल्या तर ती ‘चारित्र्यहीन’ ठरते. खरं तर, चारित्र्य म्हणजे त्या व्यक्तीचे वर्तन, नैतिक मूल्ये, विचार, स्वभाव, गुण वगैरे वगैरे. पण आपणाकडे एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य म्हणजे त्या व्यक्तीचे लैंगिक आयुष्य एवढाच मर्यादित अर्थ घेतला जातो.

लैंगिकता नियंत्रण:         

स्त्रीला तिचे चारित्र्य हे नेहमीच ‘पुरुषासाठी’ जपावे लागते. कधी तो पुरुष बाप असतो, कधी भाऊ, कधी नवरा तर कधी सासरा. मुलीच्या अगदी जन्मापासूनच तिचे पालक, समाजातील लोक तिच्या कपड्यांपासून ते मुलीच्या हसण्या-बोलण्यावर नियंत्रण आणतात. मुलीची पाळी आली, की तिचे खेळणे, बागडणे बंद. मुलींचं बालपण आखडून जातं. स्वत:च्या शरीराबद्दल प्रचंड अवघडलेपणा आणि तिरस्कार वाटायला इथूनच सुरुवात होते.

एखाद्या मुलीला, मुलगे मित्र अधिक असतील तर ती ‘चालू आहे’ असा अपप्रचार केला जातो. स्त्रीला जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य नाही. ‘पुरुषी असुरक्षिता व नियंत्रणातून’ तिच्या लैंगिकतेस काबूत ठेवले जाते. मंगळ्सूत्र, कुंकू, गोषा, बुरखा ही त्याचीच प्रतीके. भीतीपोटी स्त्रियाही त्या प्रतिकांचा स्वीकार करतात. ती दुसर्‍या पुरुषाकडे आकृष्ट होईल या भीतीपोटी कित्येक पुरुष आपल्या पत्नीवर बंधने घालतात. (मात्र नवर्‍याचे बाहेर संबंध असतील तर त्याला त्याची बायको दोषी). स्त्रीची लैंगिकता तिच्या चारित्र्याशी आणि तिचे चारित्र्य घराच्या प्रतिष्ठेशी जोडले जाते. मुलींनी प्रेम, आंतरजातीय विवाह करून कुटुंबाची समाजातील प्रतिष्ठा (?) घालवू नये म्हणून हत्या केल्या जातात.

विवाह संबंधातील चारित्र्य:           

लग्नापूर्वी आणि लग्नानंतर या दोन शब्दांमधील अंतर मुलीसाठी दोन आयुष्यांमधील अंतरासारखे आहे. लग्नाआधीचे राहणीमान, ओळख, वडिलांचे नाव, आडनाव, घर, कधीकधी स्वत:चेही नाव, सवयी, विचार इ. मध्ये बदल करावा लागतो. मुख्यत: पुरुष मित्रांशी संपर्क तोडावा लागतो. ती नवऱ्याशी प्रामाणिक, बांधील आहे हे सिद्ध करण्यासाठी तिला दुसऱ्या पुरुषाशी संबंध नाहीत हे दाखवावे लागते. ‘बायकोचा चारित्र्यावरून खून’ अशा बातम्या अजूनही मोठ्या प्रमाणात दिसतात. नवर्‍याच्या आयुष्यात मात्र कोणताच बदल होत नाही, नव्हे तो अपेक्षितच नसतो. लग्न बंधनातील शरीर संबंधात सेक्स करताना बायकोने ‘वरचढपणा’ केला तर ती त्याला वेश्येप्रमाणे भासते. तिचे काम फक्त त्याला साथ देणे. काही आवड-निवड असेल, तर ‘कुणाबरोबर झोपली होतीस?’ तिने नकार दिल्यास ‘तुला माझ्याबरोबर मजा येत नाही, दुसऱ्या कुणाबरोबर येते?’ असे विचारून तिच्यावर संशय घेतला जातो.

लैंगिक अत्याचार आणि चारित्र्य:   

लैंगिक अत्याचारालाही नैतिकतेचे कोंदण आहे. बलात्काराने स्त्रीचे ‘कौमार्य’ नष्ट होते, ‘अब्रू’ जाते, असे समजले जाते. त्यामुळे बर्‍याचदा लैंगिक अत्याचाराच्या घटना नोंदविल्या जात नाहीत आणि नोंदविल्या गेल्यास दबावामुळे, व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेमुळे तिला न्याय मिळत नाही. त्यामुळे काही ठिकाणी बलात्कार झालेल्या मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटना आपल्या कानावर पडतात. मुली कमी कपडे  घालून पुरुषांमधील लैंगिक इच्छेला जागृत करून बलात्कार ओढवून घेतात असेही भल्या भल्यांचे म्हणणे असते. मात्र कमी कपडे घातल्याने बलात्कार झाला अशी कोणत्याही केसमध्ये नोंद नाही आणि तीन-चार वर्षांच्या मुलीवर, वृद्धेवर आणि पूर्ण कपडे घातलेल्या स्त्रीवरही बलात्कार होतो हे वास्तव आहे.

शिव्यांमधील चारित्र्यहीन ‘ती’:

आपणाकडे परंपरेनेच पुरुष सहजपणे आई आणि बहीण यांच्या लैंगिक अवयवांना उद्देशून अश्लील शिव्या देतात. अशा शिव्या म्हणजे स्त्रियांच्या लैंगिकतेचा, स्त्रीत्वाचाही अपमान आहे, तो एक प्रकारचा सार्वजनिकरित्या केलेला मौखिक बलात्कारच आहे.

बदलता समाज, स्त्रीची लैंगिकता आणि चारित्र्य:

आता समाज बदलत आहे. स्त्रियांवरील बंधनेही काही प्रमाणात शिथिल होत आहेत. तरीही स्त्री चारित्र्याच्या संकल्पना अजूनही भक्कमपणे तग धरून आहेत. अजूनही मधुचंद्राच्या रात्री नवऱ्याला बायकोचा रक्तस्राव व्हायलाच हवा आहे. अजूनही लैंगिक अत्याचार झाल्यास बदनामीच्या भीतीपोटी तिला ‘गप्प’ बसविले जाते. स्त्रियांनी मोबाईल वापरु नये असे फतवे निघतात. अजूनही ‘करवाचौथ’ला नवर्‍यानंतर जेवून, आणि वटसावित्रीला वडाला फेऱ्या मारून, स्त्री आपली एकनिष्ठता आणि पावित्र्य सिद्ध करीत आहे. अजूनही ‘बाई’ ठेवली जाते, पुरुष नाही. तिला ‘टाकून’ दिले जाते, तिला मूल होण्यासाठी ‘लग्न’ आवश्यक आहे. पण तरीही काही स्त्रिया  समाजाच्या या चारित्र्याच्या निकषांना धुडकावून स्वत:चे आयुष्य स्वत:च्या निकषांवर जगणाऱ्या, चारित्र्याच्या व्याख्या स्वत:च करणाऱ्या आहेत. बदल घडवायचा असेल तर प्रवाहाच्या विरोधात पोहावं लागेल. सीतेसारखं अग्निपरीक्षा देवून पावित्र्य (?) सिद्ध करणं किंवा द्रोपदीसारखं स्वत:ची अब्रू (?) वाचविण्यासाठी कृष्णाच्या मदतीची वाट पाहणं सोडून देऊया. बर्‍याचदा आपणास वाटते की आपल्याला कुणीतरी कोंडले आहे. खरं तर आपणच आतमधून दरवाज्याला कडी घातलेली असते. ती काढून चारित्र्याच्या चौकटीतून बाहेर पडायला हवे. आपली लैंगिकता आणि आपले चारित्र्य याचा संबंध आपण लावावा. ‘मी जी आहे, जशी आहे तशी आहे. माझ्या चारित्र्याचे निकष ठरविण्याचा अधिकार मी कुणालाच देणार नाही हे स्वत:ला आणि सर्वांना ठामपणे सांगेन, मी माझ्या मुलीला जसे स्व-संरक्षण शिकवेन तसेच मुलालाही स्त्रीचा सन्मान करायला शिकवेन, स्त्रीच्या लैंगिकतेचा संबंध तिच्या चारित्र्याशी लावण्याला विरोध करेन’ हा निश्चय प्रत्येकीने करूया. या सगळ्या प्रक्रियेत गरज आहे पुरुषांनी महिलांना कोणतीही ‘लेबलं’ न लावता मुक्तपणे जगू देण्याची आणि हात हातात देऊन सोबत जगण्याची.

 

साभार : ‘पुरोगामी जनगर्जना’ ( मार्च २०१६ ) या मासिकात  अॅड. लक्ष्मी सुभाष यादव यांनी लिहिलेल्या ‘स्त्री चारित्र्य आणि लैंगिकता’ या लेखातील काही भाग.

चित्र साभार:  http://en.people.cn/90882/8189885.html

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap