खरंतर पुरुष नसबंदीमध्येच कुटुंबाचं कल्याण आहे. आपल्याकडे कुटुंबनियोजन म्हणजे ‘बायकांचे ऑपरेशन’ अशी आधुनिक अंधश्रध्दा पसरलेली आहे; आणि पुरुष नसबंदी ही एक बदनाम शस्त्रक्रिया आहे. आणीबाणीत झालेल्या जोर जबरदस्तीमुळे, नेते, नोकरशहा या शस्त्रक्रियेचं नावंही जरा जपूनच घेतात.
मात्र शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा प्रत्येक बाबतीत सरस आहे. पुरूषांतही आता बिनटाक्याची शस्त्रक्रिया निघाली आहे. ही तर आणखी सुरक्षित आणि झटपट आहे, अजिबात त्रासाची नाही. खूपच कमी वेळ लागतो. दवाखान्यात अॅडमीट राहवं लागत नाही. निव्वळ काही तास थांबावं लागतं आणि पुरुषाच्या शारीरिक व लैंगिक क्षमतेवर शस्त्रक्रियेचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. पुरुषांची शस्त्रक्रिया जागेवर भूल देऊन करता येते. त्यामुळे संपूर्ण भूल आणि तत्संबंधित धोके टळतात. लिंगाखालच्या जागेत छोटासा छेद घेतला जातो. पोट उघडावं लागत नाही. यामुळे पोटात इन्फेक्शन; आतडी, मूत्राशय वगैरेला इजा असे धोके टळतात.
स्त्री नसबंदीच्या प्रत्येक केस मध्ये ती स्त्री हे दोन्ही धोके पत्करत असते. बायकांचं अगदी बिनटाक्याचं ऑपरेशनही, पुरुष नसबंदीपेक्षा कितीतरी पट गुंतागुंतीचं आणि धोक्याचं आहे. पण लक्षात कोण घेतो?
या ऑपरेशनमुळे पौरुषाला बाधा येते, तो माणूस एकदम कंडम बनतो, कष्ट करू शकत नाही असे अनेक गैरसमज आहेत. असं ज्या लोकांना वाटतं, त्याबद्दल निव्वळ त्यांना मूर्ख म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. त्यांच्या या गैरसमजामागे त्यांचाही काही युक्तिवाद असतो. तो समजावून घेणं आणि दुरुस्त करणं महत्वाचं आहे.
पारंपारिकरीत्या आपल्याकडे पुरुषत्वाचा संबंध शक्तीशी (आणि स्त्रीत्वाचा सहनशक्तीशी) जोडला आहे. शारीरिक कष्ट करणं, मूल होणं आणि संभोगसूख देता-घेता येणं या वास्तविक तीन स्वतंत्र क्रिया आहेत आणि एकमेकांशी फारशा संबंधित नाहीत!
शारीरिक कष्टासाठी शरीर सुदृढ हवं, पुरुष बीजाची किंवा लिंगाला ताठरता येण्याची अजिबातच आवश्यकता नाही.
मूलं होण्यासाठी पुरुष बीज तयार होणं आणि शरीरसंबंध जमणं हे आवश्यक आहे, पण यासाठी तुम्ही बॉडी बिल्डर असायची गरज नाही. बरेचसे पुरुष बॉडी बिल्डर नसतात आणि बऱ्याचशा पुरुषांना मुलंही होतात. उलट अगदी धडधाकट असलेल्या, सैन्यात अधिकारीपदी असलेल्या, बॉडी बिल्डींग किंवा इतर खेळात चॅम्पियन असलेल्या व्यक्तींनाही मूल होण्यात अडचण असू शकते. पुरुष बीज निर्माण करणारी यंत्रणा आणि शारीरिक शक्ती यांचा थेट संबंध नसतो.
कामसुखासाठी, लिंगाला ताठरता येण्यासाठी, पुरूषबीज तयार होण्याची गरज नाही. शरीर संपदाही यथा तथा असली तरी चालते. उलट मन सतेज असावं लागतं. कुस्तीचं मैदान मारणारे गडी, पलंगावर सखीला आस्मान दाखवतीलच असं नाही. कारण पलंग म्हणजे आखाडा नाही. कामसौख्य हे शारीरिक शक्तीचं प्रदर्शन नाही. टेनिस किंवा कबड्डीच्या सामन्यातही जास्त शक्तीची आवश्यकता असते.
म्हणूनच नसबंदी केल्यामुळे पुरुषांची शारीरिक शक्ती, कामेच्छा, कामशक्ती संपतबिंपत नाही. संभोगसूख, वीर्यपतन वगैरे जैसे थे रहातं. वीर्य हे पुरूषबीज आणि इतर अनेक स्त्रावांच मिश्रण असतं. ऑपरेशननंतर त्यात पुरूषबीज मिसळत नाही एवढंच. वीर्यातले बाकी घटक तयार होतच असतात. लैगिक भावना, लिंगाला होणाऱ्या संवेदना वगैरे कशावरच या ऑपरेशनचा दुष्परिणाम होत नाही.
पुरुषांना (आणि बायकांनासुध्दा) मात्र हे पटत नाही. प्रसंगी ऑपरेशन करून घ्यायला तयार झालेल्या पुरुषांना त्यांच्या बायकाच परावृत्त करतात. खरंतर निसर्गाने मुले जन्माला घालण्याची जबाबदारी स्त्रियांवर टाकलेली आहे. मग किमान मुलं न जन्माला घालण्याची जबाबदारी पुरुषांनी आपण होऊन घ्यायला काहीच हरकत नाही. पण पुरुष प्रधान समाजव्यवस्थेमुळे अगदी हृदयविकार वा तत्सम गंभीर आजाराने पछाडलेल्या स्त्रियांचे नवरेदेखील नसबंदी करायला तयार नसतात.
दोन तीन बाळंतपणं, एखादा गर्भपात, या साऱ्यातून जाताना बायका कितीतरी त्रास भोगतात. भूल, ऑपरेशन वगैरेतल्या धोक्यांना सामोऱ्या जातात. मग बायकोवर खरखुरं प्रेम असलेल्या पुरुषांनी तरी हा मार्ग स्वीकारायला हवा. प्रेम व्यक्त करायचा हा नवा मार्ग! नव्या युगातल्या नव्या बायकांनीच यासाठी, नव्या युगातल्या नव्या नवऱ्यांकडे, आग्रह धरला पाहिजे. आधुनिक शहरी जीवनामध्ये स्वतःच्या दिसण्याबद्दल अतिजागरुक, फॅशनेबल, बायकोला सर्वतोपरी मदत करणाऱ्या पुरुषाला आता ‘मेट्रोसेक्शुअल’ असा नवीन शब्द आहे. हे ‘मेट्रोसेक्शुअल’ जोडीदार (आता यांना ‘नवरे’ सुद्धा म्हणणं मागासलेपणाचं आहे!) बाळाच्या लंगोटापासून ते बायकोच्या ब्रापर्यंत सगळ्यात लक्ष घालतात. पुरुषीपणाचा आव न आणता रडू आलं तर मोकळेपणानं रडतात सुद्धा. अशा पुरुषांनी तरी नसबंदी करवून घेऊन पुरुषत्वाचा नवा मानदंड उभारायला हवा.
सरकार, डॉक्टर आणि सामाजिक संघटनांनी याबाबत आता भीड न बाळगता लोकप्रबोधन केलं पाहिजे कारण पुरुष नसबंदीमध्येच कुटुंबाचं कल्याण आहे.
साभार: shantanuabhyankar.blogspot.in
No Responses