माझ्या आयुष्यातील घाणेरडं गुपित_ स्वाती भट्टाचार्य

मी माझे ऑफिस ५.३० ला सोडते.

खरंतर हे माझ्या आयुष्यातील एक घाणेरडं गुपित आहे. जाहिरात क्षेत्रातील माझ्या २२ वर्षाच्या करिअरमध्ये JWT ला मी माझ्या रात्री दिलेल्या नाहीत. कदाचित हे थोडं विचित्र वाटत असेल, नाही ?

मला खूपदा उशिरापर्यंत काम करणारी लोकं निवांत, रोमांचक, आकर्षक आणि कूल वाटायची. असं असूनही मी माझी बॅग, जेवणाचा डब्बा अगदी उशिरात उशिरा म्हणजे ७ वाजता उचलून निघायची. मला माहित आहे, माझ्या वागण्याचे माझ्या सहकाऱ्यांनी वेगेवेगळे अर्थ काढले, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मी आळशी, कामचुकार असल्याचा इशारा दिला. बऱ्याचदा ते मर्मभेदकपणे अगदी जाणूनबुजून संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घड्याळात पाहून मला म्हणालेत, “आता तुझी आवराआवर करायची वेळ झाली असेल नाही?” ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबणे हे खूपच कूल गोष्ट आहे असे अनेकदा पुरुषांना वाटते. “मला आज उशीर होईल” हे सांगयला जेव्हा ते बायकोला किंवा गर्लफ्रेंडला फोन करतात तेव्हा त्यांच्या आवाजामध्ये असा काही अभिमान असतो जणू काही ते जगाचे राष्ट्रपतीच! फोनवरचा हा स्वर अचानक अग्नीशामक दलातील कर्मचाऱ्यासारखा किंवा इमर्जन्सी वॉर्ड मधील डॉक्टरसारखा होतो. असे कॉल नेहमीच संक्षिप्त, कडक शब्दांत आणि संकुचित असतात. मात्र मी अनेकांना असे कॉल केल्यानंतर स्मोकिंग क्षेत्रात रेंगाळताना, कँटीनमध्ये कोणालातरी पाठवताना, सचिनच्या निवृत्तीवर अविरतपणे चर्चा करताना, हळूहळू अगदी निवांत एक एक चहाचा घोट घेत चहा पिताना आणि मग जमलं तर काही कामं घाईघाईने करताना पाहिलं आहे. हे लोक संगणकावर गेम खेळतात.  नवीन लोकांच्या ओळखी काढतात, जुन्या लोकांना भेटतात; पण हे सगळं काहीना काही उद्देश ठेवून.

पुरुषांप्रमाणेच स्त्रिया कामानंतरच्या तासांचा आनंद का नाहीत घेऊ शकत?  आम्ही जेव्हा घरी उशिरा येतो तेव्हा आम्हाला अपराधी वाटतं. आम्ही आमच्या वाट पाहणाऱ्या मुलांच्या आणि आईच्या वेदनेची कल्पना करतो. आम्हाला माहितेय की, जेव्हा ऑफिसचा प्रश्न येतो तेव्हा आमच्या मैत्रिणी सुद्धा संवेदनशील नसतात. त्यांची अपेक्षा असते की, आम्ही ऑफिसमध्ये असावं.

पुरुषांची गोष्टच वेगळी आहे. प्रत्येक भारतीय आईला असं वाटतं की, ‘मेरा बेटा खून पसीने की कमाई करता है I’ माझ्या मुलावर कामाचा प्रचंड दबाव आहे. म्हणूनच पुरुषांना कामाच्या ठिकाणी जास्त वेळ थांबायला आवडतं. ‘पुरुष मेहनती असतात’ हा पुरुषांविषयीचा गैरसमज/ पुरुषांविषयीची साचेबद्ध कल्पना आणखी मजबूत करायला त्यांना याची मदतच होते. अगदी काहीही काम न करता ऑफिसमध्ये फक्त दोन तास जास्त घालवले तर पुरुषांचे घरी जणू काही ते ‘हिरो’ आहेत, त्यांनी काही तरी ग्रेट केले आहे असे स्वागत होते. बायको चहा आणते. मुलं इकडेतिकडे धावत पळत असतील तर आई त्यांच्यावर रागावते. तुम्ही जर रात्री ९ वाजता घरी येत असाल तर छानच कारण मुलं आधीच झोपलेली असतात त्यामुळे कितीही वाटलं तरी तुम्ही त्यांना अभ्यासात मदत करू शकत नाही. आणि जर रात्री १० वाजता घरी येत असाल तर आणखीच छान तुम्हाला कुत्र्याला देखील फिरायला न्यावे लागणार नाही.

पुरुषांना घरी उशिरा येण्याचे खूपच फायदे आणि विशेषाधिकार मिळतात. त्यांच्यासाठी तो एक प्रतिष्ठेचा  बॅज, अभिमानाचा एक क्षण असतो. म्हणूनच त्यांना ऑफिसमध्ये उशीरा थांबण्याचा अभिमान वाटतो. ऑफिसमध्ये थांबण्याचा अभिमान.  अनुपस्थित असल्याचा अभिमान. आम्हा स्त्रियांना मात्र हे लागू होत नाही. आम्हाला न पाहता मुलं झोपी गेली तर आम्हाला जीव द्यावासा वाटतो. आमच्या मुलाचे वर्गशिक्षक कदाचित ‘आज गृहपाठ कसाबसा केलाय’ असा विचार करतील असे वाटून आम्हाला भीती वाटते. मुलगा गिफ्ट न घेता बर्थडे पार्टीला गेला तर आम्हाला भयंकर वाटते. म्हणूनच आम्हाला जी काही कामं करायची आहेत ती करण्यासाठी आम्ही वेळेतच घरी जातो. रात्री उशिरापर्यंत जागून कामं करतो. एकांतात, शांतपणे, कुठलाही गाजावाजा न करता. आमच्याबाबतीत हे असंच आहे. म्हणूनच पुढच्या वेळी ५.३० वाजता आम्ही छातीठोकपणे आणि अभिमानाने बॅग उचलू ! आम्ही स्त्रिया डबल शिफ्ट करतो.

संदर्भ: स्वाती भट्टाचार्य, JWT इंडियाच्या ‘राष्ट्रीय सृजनशील दिग्दर्शक’ यांनी लिहिलेल्या लेखाचा स्वैर अनुवाद. हा लेख सोशल नेटवर्किंग साईट्सवर मिळाला आहे.

स्वैर अनुवाद: गौरी सुनंदा

चित्र साभार http://anthillonline.com

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap