मागील लेखांमध्ये आपण पाळी चक्रादरम्यान गर्भाशय आणि संपूर्ण शरीरात काय काय बदल होतात ते पाहिलं. या लेखात आपण हे बदल कसे नोंदवून ठेवायचे ते पाहणार आहोत.
गर्भाशय, ग्रीवा, योनीमार्गातील स्राव आणि संवेदना नोंदवून ठेवल्याने पाळीचक्रामध्ये नक्की काय होतंय हे समजायला मदत होते.
हे बदल नोंदवून ठेवण्यासाठी पुढील खुणांचा वापर केला जातो.
पाळीचे दिवस
कोरडे दिवस – कोणत्याच प्रकारचा स्राव नाही.
चिकट-दाट, ताणला न जाणारा स्राव. अपारदर्शक, दह्यासारखा स्राव.
ताणणारा पण तुटणारा श्लेष्मा – पारदर्शक, ताणला जाणारा पण तुटणारा श्लेष्मा
ओला, ताणणारा, निसरडा श्लेष्मा – पूर्ण पारदर्शक, अंड्यातील पांढऱ्या भागासारखा निसरडा श्लेष्मा
रोज आपल्या शरीरात, योनीमार्गात काय संवेदना होत आहेत, कशा प्रकारचा स्राव आहे याचं निरीक्षण करून या नोंदी ठेवल्या जातात. सलग ३ महिने अशा नोंदी ठेवल्यावर पाळी चक्रात कोणते दिवस कोरडे (जननक्षम नसणारे) आणि कोणते दिवस ओलसर स्रावाचे (जननक्षम असणारे) हे समजू लागतं. ओलसर, ताणणारा स्राव असणारे दिवस म्हणजे गर्भधारणेची शक्यता सर्वात जास्त. कोरडे, तुटणारा, चिकड-दाट, अपारदर्शक स्राव असणारे दिवस म्हणजे गर्भधारणेची शक्यता कमी.
पाळी सुरू होते तो पहिला दिवस असं समजून रोज एक खूण करायची. पाळी संपल्यावर काही काळ योनीमार्गात कसलाच स्राव नसतो. ते कोरडे दिवस असतात. त्यानंतर योनीमार्गामध्ये चिकट आणि दाट असा स्राव तयार व्हायला लागतो. हा स्राव अपारदर्शक असतो. दह्यासारखा दाट असतो. हळू हळू स्रावाचं स्वरुप बदलतं. तो अधिक निसरडा आणि पारदर्शक होऊ लागतो. सुरुवातीला बोटांमध्ये घेतल्यावर हा श्लेष्मा ताणला जातो मात्र मध्ये तुटतो. यानंतर काही दिवसात स्राव खूप निसरडा आणि पारदर्शक होतो. ताणला जातो, तुटत नाही, निसरडा असतो. हा स्राव जननक्षम असतो. यामध्ये पुरुष बीजं जिवंत राहतात आणि स्त्री बीजापर्यंत सहज पोचू शकतात. अंडोत्सर्जनाच्या आसपास असा स्राव असतो. अंडोत्सर्जन झाल्यावर हा श्लेष्मा तयार होत नाही आणि परत कोरडा काळ सुरू होतो. १०-१२ दिवसानंतर पाळी परत सुरू होते.
शरीराच्या आत काय चाललंय हे समजून घ्यायला डॉक्टरांनाच जमतं किंवा सोनोग्राफीसारखं आधुनिक तंत्रज्ञान गरजेचं असतं असं आपल्याला वाटत असतं. मात्र आपलं आपल्या शरीराकडे बारीक लक्ष असेल, शरीरातले बदल आपल्याला टिपता येत असतील आणि मुळात आपल्या शरीरात आत नक्की काय चाललंय हे जाणून घ्यायची आपल्याला इच्छा असेल तर आतमध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टी आपण सहज ओळखू शकतो. आपलं शरीर, आपली लैंगिकता आणि आपलं आरोग्य आपल्या हातात असू शकतं.
या पद्धतीला इंग्रजीमध्ये Fertility Awareness असं म्हणतात. आपल्या जननचक्राबद्दल, जननक्षमतेबद्दल जागरूक असणे. तुम्हाला हे शिकायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
https://letstalksexuality.com/fertility-and-sexuality-awareness/
https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/
4 Responses
Mazya lagnala 2 year zale ahe, mazya patnila masik pali yetach nahi kay karu upay sanga
पाळी न येण्याची बरीच कारणे असतात, पण जर सलग 2 वर्षे पाळी येत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना भेटा.
गर्भपात आपण किती महिनेनंतर करू शकतो
भारतामध्ये २० आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याला कायद्याने मान्यता आहे. त्यातही १२ व्या आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात सुरक्षित मानला जातो. मात्र गर्भपात ही नियमितपणे वापरण्याची गर्भनिरोधक पद्धत नाही. गर्भपात डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. कृपया कोणताही घरगुती उपाय वापरू नये.
गर्भपात करण्याच्या मुख्य पद्धती विषयी तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कोणती गर्भ निरोधके वापरावीत हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/contraception/