सुंदर कोणाला म्हणायचं याच्या कल्पना देशागणिक, समाजागणिक बदलतात. प्रत्येक समाजाच्या, संस्कृतीच्या आणि देशाच्या सौंदर्याच्या, शरीराच्या प्रमाणांच्या कल्पना एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात. त्या समजून घेण्यासाठी नुकताच एक भन्नाट अभ्यास करण्यात आला. अमेरिकेतल्या सुपरड्रग या औषध कंपनीने केलेला अभ्यास अगदी शास्त्रीय आणि काटेकोर नसला तरी त्यातून स्त्री देहाबद्दलच्या काही देशांमधल्या कल्पना काय आहेत हे मात्र समोर आलंय.
त्यांनी काय केलं तर एका मुलीचा फोटो घेऊन पाच खंडातल्या 18 देशांमधल्या 18 ग्राफिक डिझायनर्सना काही सूचना दिल्या. या मुलीचा आकार आणि तिचं रंगरुप फोटोशॉपमध्ये बदला. तुमच्या देशातल्या लोकांना ती आवडेल अशा प्रकारे बदल करा. तिच्या शरीराचा आकार, आकारमान, रंग इत्यादी तुम्ही बदलू शकता.
यानंतर या डिझायनर्सनी जे फोटो पाठवले त्यावरून शरीराच्या आकाराबाबत वेगवेगळ्या देशात किती वेगवेगळ्या कल्पना आहेत आणि खरंच आकर्षक आणि सुंदर याची एक व्याख्या होऊ शकत नाही हेच लक्षात येतं. चीन आणि इटली यांनी जे बदल केले त्यातून आकर्षक म्हणजे हडकुळी स्त्री असं म्हणता येईल तर स्पेनमधली आकर्षक स्त्री लठ्ठपणाकडे झुकणारी आहे. त्वचेच्या रंगात, उंचीत, बांध्यामध्ये आणि तब्येतीमध्ये बरेच फरक करण्यात आले असं आढळलं. 18 पैकी चार पुरुष डिझायनर होते मात्र त्यांनी स्त्रियांशी बोलून, त्यांची मतं जाणून घेऊन मगच त्यांची इमेज पाठवावी असा नियम करण्यात आला होता.
सुंदर म्हणजे काय याचा एक साचा कधीच होऊ शकत नाही हेच या अभ्यासाच्या मदतीने सिद्ध झालं. अभ्यास परिपूर्ण नसला तरी डोळे उघडणारा नक्कीच आहे. आणि शेवटी आपण जसे आहोत तसेच सुंदर आहोत. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि तुमच्या दृष्टीने सुंदर स्त्री कशी असावी आणि सुंदर पुरुष कसा असावा हेदेखील कमेंट करून कळवा.
पूर्ण अभ्यासासाठी आणि पाठवलेल्या फोटोंसाठी पहा – https://onlinedoctor.superdrug.com/perceptions-of-perfection/
No Responses