स्त्रीचं शरीर

23,188

XX गुणसूत्रं – आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X गुणसूत्रं असतं तर पुरुष बीजांमध्ये X किंवा Y हे गुणसूत्र असतं. स्त्री बीजामधील X आणि पुरुष बीजामधील X एकत्र आले तर मुलगी होते. आणि स्त्री बीजामधील X आणि पुरुष बीजामधील Y एकत्र आले तर मुलगा होतो. ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते. त्यावर पुरुषाचा काहीच ताबा नसतो. आणि बाईचा तर अजिबात संबंधही नसतो. तरी मुलगी झाली तर सारा दोष बाईच्या माथ्यावर येतो. हे चूक तर आहेच पण पूर्णपणे अशास्त्रीय देखील आहे.

female-body1स्तन आणि स्तनाग्रं – आपल्या पिलाचं पोषण करण्यासाठी सस्तन प्राण्यांमध्ये दूध ग्रंथी आणि त्यातून येणारं दूध पाजण्यासाठी स्तनाग्रं किंवा बोडं तयार झाली. स्तनांमध्ये दूध ग्रंथी असतात आणि बाळाचा जन्म झाल्यावर त्यामध्ये दूध तयार होते. पण केवळ दुधाची निर्मिती इतकाच स्तनांचा विचार करता येणार नाही. स्तन आणि स्तनाग्रं लैंगिक संबंधांमध्ये, प्रणयामध्ये मोठी भूमिका निभावू शकतात. स्तनांचा आकार विविध प्रकारचा असतो. गोल, कडक, निमुळते, लोंबणारे, लहान मोठे असे विविध आकार असतात. मुलांमध्येही स्तन आणि स्तनाग्रं असतात. मात्र टेस्टेस्टेरॉन या संप्रेरकाच्या प्रभावामुळे वयात येण्याच्या काळात मुलग्यांमध्ये स्तनांची वाढ थांबते. तरीही बाळाला दूध पाजणाऱ्या पुरुषांची दुर्मिळ उदाहरणं आहेत.

गर्भाशय, बीजकोष, योनि, क्लिटोरिस –  गर्भाशय हा अतिशय चिवट अशा स्नायूंनी बनलेला एक अवयव आहे. गर्भाशय मुलीच्या ओटीपोटामध्ये मूत्राशयांच्या मागे असते. त्याला दोन बीजकोष आणि बीजवाहिन्या जोडलेल्या असतात. गर्भाशयाच्या तोंडाला ग्रीवा म्हणतात. ग्रीवेच्या खाली योनिमार्ग असतो. स्त्री आणि पुरुष बीजाचा संयोग झाल्यास फलित बीज गर्भाशयाच्या अस्तरामध्ये रुजतं आणि काही काळ त्या अस्तरातील रक्तावरच त्याचं पोषण होतं. फलित बीज किंवा गर्भ राहिला नाही तर गर्भाशयाचं अस्तर गळून पडतं. त्यालाच आपण पाळी आली असं म्हणतो. गर्भ वाढत असताना गर्भाशायचे स्नायू ताणले जातात आणि बाळ जन्माला आल्यानंतर काही काळाने पूर्ववत होतात.

स्त्रीच्या शरीरात दोन बीजकोष असतात. वयात आल्यानंतर त्यातील संप्रेरकं कार्यरत होतात. दर पाळी चक्रामध्ये बीजकोषांमध्ये असलेली बीजं परिपक्व व्हायला सुरुवात होते आणि कोणत्याही एका बीजकोषातून एक परिपक्व बीज बाहेर येऊन बीजनलिकांमध्ये पोचतं. याला अंडोत्सर्जन म्हणतात.

स्त्रीच्या जननेंद्रियांमध्ये योनिचा समावेश होतो. योनिमार्गाचं दार, मूत्रद्वार किंवा लघवीची जागा, क्लिटोरिस अशा सर्व अवयवांची मिळून योनी बनते. योनिच्या दोन्ही बाजूस त्वचा असते. त्याला बाह्य ओठ आणि आतले ओठ असं म्हणतात. प्रत्येकीच्या योनिचा आकार, रंग वेगवेगळा असू शकतो.

योनिमार्ग योनिद्वारापासून सुरू होतो आणि ग्रीवेपाशी गर्भाशयाला जोडलेला असतो. पाळीचं रक्त इथूनच बाहेर येतं, समागमाच्या वेळी पुरुषाचं लिंग किंवा शिश्न इथूनच आत जातं आणि बाळाचा जन्मही याच वाटेनं होतो. योनिमार्ग अतिशय लवचिक स्नायूंनी बनलेला असतो. त्याच्या भिंतींमधून पाळी चक्राच्या काळात स्राव तयार होऊन पाझरतात. त्यामुळे तो ओला आणि स्वच्छ राहतो.

योनीच्या वरच्या बाजूला क्लिटोरिस नावाचा छोटा पण अतिशय संवेदनशील असा अवयव असतो. हा पूर्णपणे लैंगिक अवयव आहे. आणि स्पर्शाला अतिशय संवेदनशील असतो. समागमामध्ये क्लिटोरिसला स्पर्श झाल्यास स्त्रीला सुख मिळते. (अधिक माहितीसाठी क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?)

Comments are closed.