व्यभिचाराचे वास्तव – छाया दातार

1,258

सध्या केरळच्या न्यायालयात एक याचिका आहे. व्यभिचाराबद्दल स्त्री व पुरुष यांना समान शिक्षा का नाही, हा प्रश्न विचारला आहे. घटनेत जर दोघे समान तर इथे लिंगभाव का, असा मुख्य सवाल आहे…

व्यभिचाराची सर्वसामान्य व्याख्या आणि या कलमाखाली आलेला गुन्हा यात थोडा फरक आहे. पतीने पत्नीला न विचारता, न सांगता जर एखाद्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवले तर आपण तो व्यभिचार मानतो. मग ती स्त्री अविवाहित असू दे किंवा विवाहित असू दे. तसेच एखाद्या स्त्रीने नवऱ्याला न सांगता असेच परपुरुषाशी संबंध ठेवले तर तोही व्यभिचार मानला जातो. आपल्याकडे पती-पत्नीच्या नात्यात प्रतारणा हा मोठा नैतिक गुन्हा आहे. कारण ते नाते पवित्र आहे. देवाधर्माच्या साक्षीने जुळलेले आहे आणि म्हणून ते अभेद्य आहे, असे मानले गेले आहे. त्यामुळे बराच काळ घटस्फोटालाही परवानगी नव्हती. पुष्कळदा नवऱ्याबाबत बायकोने तक्रार केली नाही तरी समाज तिला छळतो, वाळीत टाकतो. मुलांना त्याचे परिणाम भोगायला लागतात. या उलट बायकोचे बाहेर कोणाशी तरी ‘अफेअर’ किंवा लैंगिक संबंध असतील आणि नवऱ्याला त्याबाबत काही म्हणायचे नसेल तरी समाज तिला ‘व्यभिचारी’, ‘स्वैराचारी’ अशा तऱ्हेची विशेषणे लावतो. नवऱ्याला स्वैराचारी म्हटल्याचे फारसे ऐकले नाही आपण. पण बाईला चारित्र्याचे ओझे सतत बाळगावे लागते आणि तिचा सन्मान आणि नीतिमत्ता त्यावर तोलली जाते.

४९७ या कलमाखाली जी व्यभिचाराची व्याख्या आहे ती खूपच मर्यादित आहे आणि त्याचवेळी या व्याख्येमुळे जगभरातील इतिहासामध्ये स्त्रीचे स्थान काय होते ते दिसते. हे कलम म्हणजे ब्रिटिशांचा वारसा आहे, यामध्ये असे म्हटले आहे की एखाद्य नवऱ्याला जर कळले की त्याच्या बायकोचे दुसऱ्या पुरुषाबरोबर लैंगिक संबंध आहेत तर तो त्या पुरुषावर खटला भरू शकतो आणि त्याच्या संमतीशिवाय तो त्याच्या बायकोशी कसा ‘रत’ होऊ शकतो, असा प्रश्न विचारू शकतो. येथे बायकोने या पुरुषाच्याबद्दल त्याने बळजबरी केली, फसविले अशा प्रकारची तक्रार केलेली नाही. ती कदाचित आपणहून या संबंधांसाठी तयार झाली असेल. त्यामुळे त्या दुसऱ्या पुरुषावर नवरा बलात्काराचा किंवा पळविल्याचा आरोप करत नाही आहे. किंवा बायकोवरही व्यभिचाराचा आरोप नाही आहे, खटलाही नाही आहे. यातील मेख अशी की जगभरच्या सगळ्याच संस्कृतींमध्ये स्री ही वस्तू समजली जात होती. ती वडिलांची संपत्ती होती आणि म्हणूनच आपल्याकडे आदिवासींमध्ये नवऱ्याला तिच्या वडिलांना दहेज द्यावा लागतो, त्यानंतर ती नवऱ्याची संपत्ती होते. ब्रिटीश काळातही ही प्रथा चालू होती. त्यामुळे पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असणे हे त्या पुरुषाने एखाद्याची संपत्ती पळविली, असे समजले जात होते. यात योनिशुचितेचा, मालकीचा मुद्दाही असेलच. याच कायद्याची दुसरी बाजू अशी की, व्यभिचारी पुरुषाच्या बायकोला मात्र नवऱ्यावर किंवा तिला त्या बाईवरही खटला भरता येत नाही, की तिने माझ्या नवऱ्याला फितवले, जाळ्यात ओढले वगैरे वगैरे. या सर्वांचा अर्थ एकच की बाईला माणूसपण बहाल केलेले नाही. ती स्वत: एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तिला स्वत:चे मन आहे, मत आहे, कर्तृत्व आहे, हे मान्य केले गेले नाही.

पूर्वी एखाद्या स्त्रीवर एखाद्या पुरुषाने बलात्कार केला तर त्याला शिक्षा न होता केवळ तिच्याशी लग्न करण्याची सक्ती होत असे. ती भ्रष्ट झाली आता तिचे लग्न होऊ शकणार नाही आणि तिला कोणी समाजात स्वीकारणार नाही. तिचा प्रतिपाळ तिला करता येणार नाही तेव्हा त्या बलात्कारी पुरुषाची ही जबाबदारी आहे, असे सर्वसाधारण मत होते. आजही काही न्यायाधीश ही भूमिका घेतात. इतकेच नव्हे तर महिला आयोगाचीही हीच भूमिका असते. तिचे नाव प्रसिद्ध करायचे नाही कारण तिच्या नावाला बट्टा लागला आणि तिची चर्चा झाली तर तिचे लग्न कसे होईल हीच काळजी सर्वांना असते. स्त्रीला मानवी अधिकार आहेत. तिच्या आत्मसन्मानाचा हा प्रश्न आहे. शरीराच्या पूर्णत्वाचा हा प्रश्न आहे. स्त्री बलात्काराने दुखावली जातेच, पण केवळ शरीर इजेमुळे नाही तर तिला तिचे स्वातंत्र्य हिरावले गेले असे वाटते. एरवी स्वतंत्रपणे हिंडणारी फिरणारी ती भीतीच्या छायेखाली दबून वागू लागते. पण आपण जर ही पावित्र्याची कल्पना सोडून दिली तर दादा धर्माधिकारी म्हणतात तसे हा अपघात समजून ती पुन्हा नव्याने आयुष्य जगू शकते.

आणखी एक उदाहरण, पूर्वीच्या बलात्काराच्या व्याख्येचे देता येईल. प्रत्यक्ष थेट लैंगिक कृती झाली तरच तो बलात्कार मानला जात असे. लैंगिक हेतूने केलेली अन्य कृती असेल तर त्यासाठी कमी शिक्षा होती. तसेच, वेश्येवर बलात्कार होऊ शकत नाही, असेही मानले जात होते. याचा अर्थ असा की योनीशुचिता हा शब्दप्रयोग आणि त्याचे पावित्र्य हे फक्त नवऱ्यासाठी आवश्यक मानले गेले होते. तेही मुख्यत: ह्या संबंधातून जे मूल प्राप्त होईल ते नवऱ्याचेच आहे याची खात्री असावी म्हणून. नवऱ्याचा पत्नीवर मालकी हक्क होता तो तिच्या श्रमांवर तर होताच कारण मुख्यत: तिचे पालन पोषण नवराच करेल अशी योजना होती. तिला शिक्षणही नव्ह्ते आणि संपत्तीत अधिकार नव्हता. पण तो तिच्या शरीरावर मात्र होता.

आता पूर्वीच्या समाजव्यवस्थेची पायाभूत चौकट बदलली आहे. घटनेने शास्त्रीय विचारांचे स्वागत करत स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व स्वीकारले आहे. स्त्रीचे ‘वस्तूपण’ संपले आहे. त्यामुळे आता या कायद्याची आवश्यकता नाही आणि पत्नीवरही व्यभिचाराची केस का घालू नये हा मुद्दाही निकालात निघाला आहे. त्यामुळे अनेकांना वाटते की न्यायाधिशांनी ही सर्व पार्श्वभूमी समजावून घेऊन हा कायदा रद्दबादल करण्याचा सल्ला सरकारला द्यावा. अशा प्रकारे प्रतारणा केली गेली तर नवऱ्याने दुसऱ्या पुरुषाला जाब विचारण्यापेक्षा आपल्या बायकोला जाब विचारावा. प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्याहूनही पलीकडे जर हे प्रकरण जात असेल तर घटस्फोटासाठी अर्ज करावा, पण सूडाची भावना कोणाप्रती असता कामा नये. बायकोबद्दल नको आणि त्या पुरुषाबद्दलही नको. तीच गोष्ट बाईची. तिलाही असे काही आढळल्यास तिने नवऱ्याशी संवाद साधून, समुपदेशकाकडे जाऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर घटस्फोटाचा अर्ज करावा.

आपल्याकडे विसाव्या शतकाच्या सुरवातीला र. धों. कर्व्यांसारखे पुरोगामी सुधारक झाले आणि त्यांनी लैंगिक स्वातंत्र्याची भूमिका दोघांसाठीही मांडली. एकदा पावित्र्याची संकल्पना रद्द केली की बाईच्या मनावरचे ओझे खूप कमी होईल. जातीय व धार्मिक दंग्यामध्ये दुसऱ्या जमातीमधील पुरुषांचा अपमान व्हावा म्हणून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाणही कमी होईल. स्त्री ही पुरुषाची प्रतिष्ठा नव्हे. तिला स्वत:ची प्रतिष्ठा असते आणि निर्णय घेण्याची क्षमता असते हे एकदा कळले की सूड म्हणून केले जाणारे बलात्कार कमी होतील. त्यानंतरच घटनेत वर्णन केलेली माणूस म्हणून तिची प्रतिष्ठा खऱ्या अर्थाने प्रस्थापित होईल.

लेख साभार : https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/the-reality-of-adultery/articleshow/65026001.cms

चित्र साभार : https://www.rudranews.com/is-legal-action-in-case-of-adultery-against-women/

Comments are closed.