पत्र: अठरावं पूर्ण झाल्यावरचं – मैत्रेयन

अनुवाद: मैत्रेयी कुलकर्णी, सहाय्य: हृषीकेश पाळंदे 

2,847
कनी मैत्रेयीची केरळमध्ये राहणारी एक मैत्रीण. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पंधरा वर्षांपूर्वी त्या केरळमध्ये एकमेकींना भेटल्या. त्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. मैत्रेयी आणि कनी ज्या कला जथ्थ्याचा भाग होत्या तो तिरुअनंतपुरममधून पुढे निघाला त्याच दिवशी कनीचा अठरावा वाढदिवस होता. कनीचे वडील मैत्रेयन तिला भेटायला आले होते आणि बसच्या खिडकीमधून त्यांनी तिला एक पत्र दिलं तेव्हा मैत्रेयी तिच्या शेजारीच बसली होती. तेव्हापासून मैत्रेयीला त्या पत्राबदल उत्सुकता होती…दरम्यान मैत्रेयन, कनीची आई जयश्रीशी मैत्रेयीची चांगली ओळख झाली.  केरळमधल्या अनेक सामाजिक लढ्यांचा, मार्क्सवादी, स्त्रीवादी, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणा-या गटांचा ते भाग होते. अनेक कामे त्यांनी स्वत: सुरू केली, वाढवली. गेल्या वर्षी अशाच एका मुक्कामावेळी मैत्रेयीने त्यांना त्या पत्राविषयी विचारलं. योगायोगानं तेव्हाच केरळमधल्या एका मासिकानं ते पत्र छापून आणलं होतं. मैत्रेयननं ते मैत्रेयीला इंग्रजीत भाषांतर करून तोंडी सांगितलं. संवाद आणि दृष्टी हरवताना दिसणा-या आजूबाजूच्या जगात मैत्रेयनचं हे म्हणणं फार महत्त्वाचं वाटतं. आजूबाजूच्या एकाधिकारी, जातिवादी आणि पितृसत्ताधारी शक्ती जितक्या जवळ येताना भासतात तितकं आशेसाठी या पत्राकडे वळावसं वाटतं. अनेक मित्रांना मैत्रेयीने ह्या पत्राबद्दल सांगितलंय आणि त्यांपैकी कितीतरी जण म्हणाले आहेत की, जर अठराव्या वर्षी त्यांनाही कोणी त्यात लिहिलेलं म्हटलं असतं तर केवढातरी दिलासा, सोबत आणि ताकद मिळाली असती. याच पत्राचा अनुवाद आपल्यासाठी  प्रसिद्ध करीत आहोत.

 

मैत्रेयन

१२/९/२००३

तिरुअनंतपुरम

प्रिय कनी,

आज तुला अठरावं वर्ष पूर्ण होत आहे. भारतीय संविधानानुसार तू आता एक सज्ञान व्यक्ती आहेस. तुला तुझे तुझे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे नि तुझा तो हक्क आहे. तुझ्या पालकत्वामध्ये सहभाग असणारी व्यक्ती म्हणून मी तुला काही वचने देणार आहे, शिवाय अधिकार आणि जबाबदा-या याबद्दलही आपण बोलूया. तुझ्या कुठल्याही निर्णयांमध्ये माझा अदृश्य असा टेकू असेलच. आपला समाज म्हणजे विविध जातीपाती, धार्मिक श्रद्धा, वर्ग, वंश, राजकीय मतभेद यांचं एक जाळंच आहे ते देखील पितृसत्ताधारी मूल्यांशी विणलं गेलेलं. यातच ‘एक मुक्त, स्वतंत्र व्यक्ती म्हणून’ पाय रोवून उभं राहणं सोपं नाही आहे. अशा समाजात वावरताना कित्येक वाटांवर योग्य काय नि अयोग्य काय असा गोंधळ उडू शकतो. अशावेळी खंबीर राहण्यासाठी कदाचित या पत्राची तुला मदत होईल.

स्त्रियांना नेहमीच द्वितीय श्रेणीचे समजत, आपल्या समाजातील कायदे व मूल्ये काबूत राहाव्यात ह्या दृष्टीने पुरुषांनी निर्माण केलेली आहेत. स्त्रियांचे लैंगिक हक्कही त्यांना नाकारले गेलेत त्यांवर वचक ठेवण्यासाठीच. तुझ्या स्वातंत्र्याच्या कल्पना पुरुषकेंद्री सामाजिक मूल्यांच्या पूर्णतः विरोधी आहेत.

 • – अनेक प्रसंगांमध्ये तुला ह्या पुरुषी मूल्यांमुळे खचवणारे अनुभव येतील. ही माझी वचने आणि विनाशर्त तुझ्यासह असणे या शारीरिक व मानसिक चटक्यांची तीव्रता कमी करतील असे मला वाटते.
 • – मी तुझ्या घर सोडून एकटीनं जगण्याच्या स्वातंत्र्याला उचलून धरतो.
 • – मी तुझं लैंगिक निवडीचं स्वातंत्र्यही उचलून धरतो. तुझा जोडीदार पुरुष असो, स्त्री असो, ट्रान्सजेंडर असो वा लिंगभाव न मानणारी व्यक्ती, तुला तुझ्या निवडीचा अधिकार आहे.
 • – सद्य व्यवस्थेनुसार एखादी स्त्री केवळ पुरुषाच्या आधिपत्याखालीच मुलांना जन्म देऊ शकते असे दिसते. त्या विरोधात जाऊन मी तुला सांगतो की एकटी राहूनही तुला तुझं अपत्य वाढवण्याचा हक्क आहे.
 • – बाळाला जन्म द्यायचा की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल. तुझ्या मर्जीविरुद्ध गरोदर राहिलीस तर तुला अबॉर्शनचा हक्क आहेच.
 • – तुला कुठलाही पोशाख कधीही नि कुठेही घालून फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. तुझा तो हक्क आहे.
 • – तू स्वतः निवडलेल्या व्यक्तीसोबत कालांतराने (काही काळ राहिल्यानंतर) न राहण्याचा निर्णय घेण्याचाही तुला पूर्ण अधिकार आहे.
 • – तुला कोणासोबत न राहता एकटं राहायचं असेल तर तू तसं करावसं.
 • -एकाचवेळी एकाहून अधिक व्यक्तींच्या प्रेमात पडणं साहजिक नि नैसर्गिक आहे. त्यामुळे त्याबद्दलही पूर्ण सपोर्ट.
 • – कुठल्याही इतर व्यक्तीप्रमाणेच तुला सिगारेट व दारूचा आस्वाद घ्यायचा हक्क आहे.
 • – ह्या जगात जगण्यासाठी कुठलेही आवडीचे काम निवडण्याचे स्वातंत्र्य तुला आहे.
 • – हे हक्क मिळण्यासाठी समाजाशी झगडावं लागलं तर माझी साथ तुला प्रत्येक वेळी आहे असं वचन मी देतो. या लढ्यात मी नेहेमीच तुझ्या बाजूने उभा असेन.
आता काही विनंत्या –
 • – जर तुझ्यावर बलात्कार झाला तर त्याकडे हिंसक कृती या दृष्टीने पहा व त्या मनस्तापातून बाहेर पड.
 • – सिगरेट ओढणे हे अवतीभवतीच्या लोकांसाठी त्रासदायक व आरोग्यास घातक ठरू शकते त्यामुळे त्याचे व्यसन लागू देऊ नकोस.
 • – दारू प्यायलीस तर अनिर्बंध नको व एखादा गुन्हा केला असल्याप्रमाणे लपूनछपून तर अजिबात नको.
 • – धर्म, जात, वंश, वर्ण, लिंगभाव, रंग, भूगोल, भाषा इत्यादींवर आधारित द्वेष करायला शिकवणारी कोणतीच विचारसरणी स्वीकारू नकोस.
 • – आपल्या नुसत्या असण्यानेही इतरांना त्रास होऊ शकतो, हे मला ठाऊक आहे. पण निदान मुद्दामून तरी कोणाला शब्दानं, कृतीनं, नजरेनं किंवा वृत्तीनंही त्रास देऊ नकोस.
 • – हे सर्व करण्याच्या प्रयत्नांत असफल झाल्यासारखे वाटले तरी मनापासून प्रयत्न करणेही देखील एका अर्थाने सफलताच आहे.
 • – आपण स्वत:सोबतच इतरांच्या स्वातंत्र्यासाठीही संघर्ष करावा. हा संघर्ष कुणा व्यक्तिविरोधात नसून व्यवस्था नि प्रथेविरोधी आहे. इतरांवर प्रेम करण्यास सक्षम आहेस हे मला माहितीये, सर्वांवर जितके शक्य तितके खोलवर प्रेम कर. तुझी प्रत्येक कृती ही प्रेमाच्याच मोजपट्टीनेच पारख.
 • – पृथ्वीवर आपण काही सदैव असणार नाही, अगदी थोडाच काळ असणार आहोत म्हणून तुझ्या ह्या धडपडीसाठी, जगण्यासाठी मी यथ चिंतितो. तुझी ऊर्जा, उत्साह, इतरांवर प्रेम करण्याची आणि त्यांना तुझ्या प्रेमाने आनंद देण्याची ताकद गमावू नयेस यासाठी शुभेच्छा!

वडीलकीचे नाते न मानणारा, वडील या नात्याने कधीच न वागू पाहिलेला

तुझा वडील

******************************

अनुवादक आणि सहाय्यकाचा परिचय:
मैत्रेयी ‘प्रयास आरोग्य गटा’च्या ‘युथ इन ट्रान्सिशन’ या रिसर्चवर काम करत आहे. हा रिसर्च बदलत्या शहरी भागात राहणा-या तरुण व्यक्तींच्या आरोग्यविषयक गरजा समजून घेण्यासाठी केला जात आहे. मानसशास्त्र व समाजकार्य विषयांत तिने शिक्षण घेतले आहे. (maitreyee107@gmail.com )
हृषीकेश पाळंदे हे लेखक आहेत. त्यांच्या तीन कादंब-या प्रकाशित झाल्या आहेत. (hrishpalande@gmail.com)

पूर्वप्रकाशित : पुरोगामी जनगर्जना, फेब्रुवारी २॰१९, पान २९

 

Comments are closed.