‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग ३) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या लेखाचे पहिले दोन भाग तुम्हाला आवडले असतीलच. युवक-युवतींनी त्यांच्या मनातील या विषयाबद्दलच्या प्रश्न आणि डॉ. मेघा पानसरे यांनी दिलेली उत्तरे दुसऱ्या लेखात वाचली असतील. युवकांनी या विषयाबद्दलचे इतरही काही प्रश्न अगदी मनमोकळेपणाने विचारले होते, ते प्रश्न आणि डॉ. मेघा पानसरे यांनी दिलेली उत्तरे वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

आंतरजातीय लग्न करताना मुलांनी आईवडिलांचाही विचार करायला पाहिजे. वयाची १७ ते १८ वर्षे आईवडील सांभाळतात. त्यांचा विचार न करता १ -२ वर्षाच्या ओळखीसाठी आईवडिलांची इज्जत धुळीस मिळवणे योग्य आहे का? एखाद्या व्यक्तीची मुलगी पळून गेली तर गावात पालकांना खूप वाईट वागणूक दिली जाते. शिवाय  भविष्यात आईवडील लग्न लावून देताना कोणाशीही लग्न लावून देणार नाहीत. त्यांनाही मुलांची काळजी असतेच. तेही मुलगा चांगला आहे का? आत्मनिर्भर आहे का? करिअर चांगले आहे का? घरातील लोक हे सर्व पाहून योग्य तो जोडीदार निवडतील म्हणून मुलांनीही आंतरजातीय लग्न करण्यापूर्वी आईवडिलांचा विचार करावा.

त्याचं एक मत आहे आणि आपण त्याच्या मताचा आदर केला पाहिजे. प्रत्येकजण आपापल्या मतानुसार आपल्या आयुष्याचे निर्णय घेत असतो. त्याच्या बोलण्यातून काही मुद्दे येतात आणि त्या मुद्द्यांचा आपण विचार केला पाहिजे.

आपलं आयुष्य आपल्याला कसं जगायचं आहे, याची प्रत्येक माणसाची एक कल्पना असते. तू म्हणतोस ते अगदीच बरोबर आहे. आईवडील आपल्याला शिक्षण देतात, लहानपणापासून अगदी आपल्या हाताला धरून चालवण्यापासून आईवडील आपलं करत असतात, स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत आपल्याला साथ देतात, हे सगळं अगदी बरोबर आहे. प्रश्न कुठे येतो तर यामागची मानसिकता काय आहे? आईवडील लहानपनापासून आपल्याला सांभाळतात, हे करत असताना खूप प्रेम देतात. पण मुलगा-मुलगी आणि मालमत्ता यामध्ये फरक आहे.

जर आईवडिलांनाचं मुला-मुलींवर इतकं प्रेम असेल तर त्यांच्या आनंदामध्ये पालकांनाही आनंद मिळाला पाहिजे. आपल्या मुलाला जर एखादी मुलगी आवडत असेल आणि भविष्यात तो तिच्यासोबत आनंदात राहू शकत असेल तर खरंतर आईवडिलांनाही आनंद झाला पाहिजे. मात्र, तसं होताना दिसत नाही आणि त्यामागे आईवडील कारणीभूत आहेत असं मला आजिबात म्हणायचं नाही. मी आईवडिलांना दोष देत नाही. त्यांना हा समाज असं शिकवतो की, जातीबाहेर लग्न करणं, आपल्या मुलाला कोणत्याही मुलीशी लग्न करण्याचं स्वातंत्र्य देणं हे वाईट आहे. असं लग्न करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला समाज प्रतिष्ठा देत नाही.

शाहू महाराजांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीला आंतरजातीय लग्न लावून दिली. तसा कायदा देखील केला. स्वतःच्या चंद्रभागा नावाच्या चुलत बहिणीचं लग्न त्यांनी धनगर समाजातील मुलासोबत लावून दिलं. त्या काळात हे करत असताना त्यांना किती त्रास झाला असेल? दोन्ही कुटुंबियांना त्यांनी पटवून दिलं. स्वतःच्या घरात प्रचंड विरोध असताना देखील, त्यांनी हे लग्न ठरवलं. त्यांनी त्या काळात एकूण १०० आंतरजातीय लग्न ठरवली व त्यातील २५ ते स्वतः हयात असताना लावून दिली आणि उरलेली लग्न त्यांच्या पश्चात झाली.

आमच्याकडे जी मुलं-मुली येतात ते अक्षरशः रडतात. त्यांना एकीकडं आपल्या आईवडिलांना दुखवायचंही नसतं आणि दुसरीकडं आपल्या मर्जीने लग्नदेखील करायचं असतं. कोणत्या मुला-मुलींना आपल्या आईवडिलांना दुखवायला आवडेल? कोणालाही नाही आवडणार. मात्र एका टप्प्यावर जेव्हा मुला-मुलींना वाटतं की, आईवडील जिथे लग्न लावून देतील, तिथे मी सुखी राहणार नाही. माझ्या आयुष्याच्या कल्पना वेगळ्या आहेत आणि मला माझ्या मर्जीनं लग्न करायचं आहे, तिथे संघर्ष सुरु होतो.

आजकालच्या आधुनिक युगात मुलं-मुली स्वतंत्रपणे वावरत असतात. विशेषतः मुलींना आणि काही वेळा मुलांनादेखील असं स्वतंत्र आयुष्य सोडून शिक्षण झाल्या झाल्या पारंपारिक विवाहाच्या बंधनात अडकणं त्रासदायक होतं. एखाद्या मुलीला जर वाटत असेल की, ‘मी निवडलेला जोडीदार माझा मित्र आहे, तो मला माझं आयुष्य माझ्या मर्जीप्रमाणे जगण्यासाठी साथ देईल तर काय हरकत आहे’. असं जेव्हा एखाद्याला वाटायला सुरुवात होते तेव्हा संघर्ष सुरु होतो.

आमच्याकडं एक मुलगी आली होती. ती मुस्लीम मुलाच्या प्रेमात आहे म्हणून तिच्या कुटुंबियांनी तिला एक वर्ष खूप त्रास दिला. तिनं एक वर्ष खूप हाल सहन केले. मारहाण, उपासमार, वाळीत टाकणं, कुणाशीही कसलाच संपर्क नाही असं आयुष्य एक बी. एड. झालेली मुलगी जगली. जे आईवडील आपल्या मुलांवर इतकं प्रेम करतात ते इतकं हिंसक का होतात? करण त्यांच्या दृष्टीने जातव्यवस्था आणि ती टिकवण्याचा संस्कार जास्त महत्वाचा असतो.

म्हणूनच आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांना साहजिकच संघर्ष करावा लागतो. हे प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे लोक आहेत. ज्यांना प्रवाहाच्या विरुद्ध जगायचंय त्यांना सहजासहजी काही मिळत नाही त्यांना त्रास सहन करावाच लागतो.

परवाच घडलेला किस्सा आहे. नुकतीच १२ वी पास झालेली मुलगी ४० वर्षाच्या विवाहित पुरुषासोबत पळून जाते. मग हे कसलं प्रेम आणि हा कसला निर्णय? यावर घरच्यांनी काय करायला पाहिजे?

असा निर्णय घेणाऱ्या लोकांना कुटुंबीय, नातेवाईक आणि समाज याच्याकडून प्रचंड अपमान आणि घृणा सहन करावी लागते. समाज त्यांना अनैतिक ठरवतो. अशा प्रकरणांमध्ये, असा निर्णय घेण्यामागची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. आमच्याकडं जेव्हा अशी लोकं येतात तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माझा असा अनुभव आहे की, लहान वयात प्रेमात पडून अशा प्रकारचं टोक गाठणाऱ्या व्यक्ती या बहुतेक वेळा त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात समाधानी नसतात. त्यांना घरात प्रेम मिळत नाही. अशा निर्णयापर्यंत ते का आले याच्या खोलात जायला पाहिजे. कदाचित त्यांच्या लेवलवर त्यांनी हा निर्णय घेण्यामागे त्यांचा काहीतरी विचार असतो. काहीजण भरकटलेले पण असतात. विचार न करता अपरिपक्वपणे निर्णय घेतात आणि मग आयुष्यभर त्यांचे पटत नाही. म्हणूनच समुपदेशनाची आणि लग्नाचा निर्णय घेताना एकमेकांना वेळ देण्याची गरज असते. तो वेळ कुटुंबाकडून, समाजाकडून  मिळाला नाही तर घाईघाईने निर्णय घेतले जातात.

यांसारख्या अनेक प्रकरणांमध्ये, शेवटी आपण समाज काय म्हणेल इथेच येऊन पोहचतो. समाज खोलात जाऊन समाज जातधर्माच्या पलीकडं जावून विचार करत नाही. घरातले, नातेवाईक, समाज यांचा विचार जरूर करायला पाहिजे. मात्र, निर्णय घेताना आपण आपला ‘आतला आवाज’ ऐकायला पाहिजे. आपल्याला एकच आयुष्य आहे, ते आपल्या इच्छेप्रमाणे जगण्याचा अधिकार सगळ्यांना असायला पाहिजे आणि आईवडिलांनी आनंदाने तो मुलांना दिला पाहिजे.

काही गट स्वतःचा हेतू सिद्ध करण्यासाठी ‘लव जिहाद’ सारख्या गोष्टींचा वापर करतात. दोन्ही धार्मिक गट आपापल्या बाजूने आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तुमचं काय म्हणणं आहे?

मी अलिकडंच हिंदू जनजागृतीची वेबसाईट बघितली. तुम्ही पण बघू शकता. ती सगळ्यांना दिसू शकते. त्यांच्या वेबसाईटवर लव जिहाद चा मुद्दा आहे. अगदी सविस्तरपणे लव जिहाद, त्याची कारणे, परिणाम, कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात हे देखील दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात आमचा अनुभव असा आहे की, आमच्याकडे आंतरधर्मीय लग्न करण्यासाठी येणारी मुलं-मुली एकमेकांना बरीच वर्षे ओळखत असतात. कोणीतरी पाच-सहा वर्षे ठरवून, एखादी मुलगी शोधून ठेवली आणि मग लग्न, लव जिहाद असं होत नाही. आंतरराष्ट्रीय ‘आयसीस’सारख्या संघटना असं करत असतील तर माझ्याकडे त्याची आकडेवारी नाही. मात्र, भारतामध्ये आमच्यासारख्या या विषयांवर काम करणाऱ्या संस्थांकडे एकही अशा प्रकारची घटना आली नाही. लव जिहादचा होणारा प्रासार आपण तपासून बघितला पाहिजे. ‘लव जिहाद करणारे लोक कोण आहेत?’ हे विचारलं तर नावं वगैरे काहीही दिलं जात नाही. मात्र, काहीही आधार नसताना प्रचार केला जातो.

बऱ्याचदा अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. आपल्या आजूबाजूच्या घटनांचादेखील आपण विचार केला पाहिजे. अफवांवर किती विश्वास ठेवायचा याचा विचार आपण केला पाहिजे. आजकाल वेगवेगळया धर्माच्या लोकांमध्ये एकमेकांविषयी जाणीवपूर्वक अविश्वास आणि द्वेष पसरवला जातोय. त्यामुळे विश्वासाने, मोकळेपणाने एकमेकांशी कुणी बोलतच नाही. एकप्रकारे संवादच थांबला आहे.

पूर्वी मुस्लीम-हिंदू एकाच वस्तीत राहायचे, सणांमध्ये सहभागी व्हायचे, त्यांची मुलं एकमेकांबरोबर वाढायची. शाळेत एकत्र. आता जाती धर्माच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत. हे खूपच भयानक आहे.

प्रपोज करताना आयुष्यभराची साथ देणार याची खात्री असेल तरच नात्यात पडायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते?

खरंतर आयुष्यभराची खात्री कशी देणार? कुणीच नाही देऊ शकत. मात्र तशी प्रामाणिक इच्छा आणि प्रयत्न नक्कीच असायला पाहिजे. एकमेकांची जबाबदारी देखील घेतली पाहिजे. प्रेम, मैत्री आहे, काही काळ नातं आहे आणि नंतर आईवडिलांच्या मर्जीने लग्न करते किंवा करतो असं म्हणतात. तेव्हा मुलं-मुली दोघांनाही त्रास होतो. मात्र, त्या नात्यामध्ये समाधान नसेल तर ओढून-ताणून ते पुढे ठेवण्यात काहीही अर्थ नाही. नकाराचा अधिकार मुलाला आणि मुलीलाही असला पाहिजे.  मात्र हे करत असताना प्रामाणिकपणा महत्वाचा. प्रेम आहे मात्र घरून परवानगी मिळत नाही म्हणून, लग्नाला नकार देणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या जास्त आहे की मुलींची याचाही आपण विचार केला पाहिजे.

या आधीचे दोन भाग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap