शरीरातील स्राव

1,488

शरीरातील स्राव

आपलं शरीर विशिष्ट कारणांसाठी स्राव तयार करत असतं. विविध प्रकारे शरीराच्या विविध भागात काही खास पेशींपासून तयार होणारे पातळसर पदार्थ म्हणजे स्राव. सर्व स्राव शरीरास उपयोगीच असतात. शरीराच्या आत काम करणाऱ्या स्रावांना अंतःस्राव किंवा संप्रेरके म्हणतात. पिच्युटरी, थायरॉईड, अड्रेनल, अंडाशय व वृषण या ग्रंथींमधून संप्रेरकं निर्माण होऊन रक्तात पसरतात. इतर स्राव अवयवांमध्ये किंवा शरीराच्या बाहेर काम करतात. त्यांना बाह्यस्राव म्हणतात. त्वचेतून पाझरणारं तेल, घाम किंवा डोळ्याच्या ग्रंथींमधून पाझरणारे अश्रू, मूत्र, जठर आणि आतड्यातला पाचक रस तसंच प्रजननमार्गात काम करणारा श्लेष्मा असे अनेक स्राव शरीरात काम करत असतात. शरीराच्या विविध कामांमध्ये या स्रावांची महत्त्वाची भूमिका आहे. शरीराच्या बाहेर येणारे स्राव आपण पाहू शकतो, त्यांचा वास घेऊ शकतो किंवा त्यांचा रंग पाहू शकतो.

योनीतील नैसर्गिक स्राव

आपल्या योनीमार्गामध्ये कशा प्रकारचा स्राव आहे हे तपासून पाहू या.

डोळे मिटून लक्ष केंद्रित करा. तुमच्या मायांगामध्ये किंवा मांड्यांमध्ये काही संवेदना जाणवतात का? योनीमार्गात ओलसरपणा जाणवतो का कोरडेपणा?

गर्भाशयमुखाच्या आतील बाजूस खास पोकळीत श्लेष्मा (म्युकस – एक विशिष्ट प्रकारचा स्राव) तयार होतो. इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉनच्या प्रभावामुळे यात दोन वेगळ्या प्रकारचे स्राव निर्माण होतात. पातळ, बुळबुळीत, पारदर्शक (सुपीक किंवा जननक्षम) आणि घट्ट, चिकट आणि पांढुरका (नापीक किंवा जननक्षम नसणारा). बुळबुळीत किंवा निसरडा श्लेष्मा पुरुषबीजांना स्त्री बीजापर्यंत पोचण्यात मदत करतो तर घट्ट श्लेष्मा पुरुषबीजांना लांब ठेवतो. दर पाळीचक्रामध्ये असे दोन प्रकारचे स्राव तयार होत असतात. पाळीच्या मध्यावर किंवा अंडोत्सर्जनाच्या वेळी पारदर्शक आणि ताणणारा स्राव पाझरत असतो तर पाळी संपल्यानंतर लगेच किंवा पाळी येण्याच्या आधी घट्ट स्राव येत असतो.

आपल्या योनीत कसा स्राव आहे हे पाहण्यासाठी योनीमार्गातून थोडा स्राव बोटांमध्ये गोळा करा. बोटं स्वच्छ असायला पाहिजेत.

Sticky breaky– स्राव कसा आहे? कोरडा का ओला?

– तो तुटतो का ताणला जातो का?

– स्रावाची घनता कशी आहे? स्राव घट्ट आहे की पातळ, पारदर्शक आहे का अपारदर्शक?

 

Stretchy mucus hand– स्रावाचा पोत कसा आहे? का सायीसारखा, दह्यासारखा, लोण्यासारखा का अंड्यातल्या पांढऱ्या भागासारखा? स्राव बुळबुळीत आहे का चिकट आहे?

– स्रावाचा रंग कसा आहे?

– स्रावाचा वास कसा आहे?

योनीमार्गातले नैसर्गिक स्राव नीट ओळखता यायला लागले की त्यातले बदल पटकन लक्षात येऊ शकतात. स्रावाचा रंग, वास, प्रमाण किंवा घनता बदलली तर ती लगेच कळू शकते.

 

Comments are closed.