जननेंद्रियांतील वेगळेपण

“आमच्या नात्यातील एका मुलीला गर्भाशय नाही. असं असू शकतं का? किंवा “ लिंगाच्या टोकाऐवजी लिंगाच्या मध्ये छिद्र असू शकतं का?” अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न कार्यशाळेत विचारले जातात. विचारणाऱ्यांना जननेंद्रिय सोडून इतर अवयवातील वेगळेपण स्वीकारण्यास एवढी अडचण येत नाही. उदा. पाचाच्या ऐवजी सहा बोटं इत्यादी. पण त्यांना जननेंद्रियांमध्ये वेगळेपण असू शकतं हे स्वीकारायला खूप अवघड जातं.

जननेंद्रियांची घडण

कोणतं पुरुषबीज स्त्रीबीजाला फलित करता यावर मुलगा होणार की मुलगी होणार हे अवलंबून असतं. गर्भाची जननेंद्रिय सहाव्या आठवड्यापासून घडू लागतात. सुरुवातीला गर्भातील ‘गोनॅड्स’, ‘मूलेरियन’ रचना व ‘वुल्फियन’ रचना असतात.

मुलाच्या जननेंद्रियांची घडण होताना ‘मूलेरियन’ रचनेचा नाश होतो व ‘वुल्फियन’ रचनेचा विकास होतो. वुल्फियन रचनेपासून पुरुष बीजवाहिन्या, वीर्यकोष, पूरस्थ ग्रंथी तयार होतात. ‘गोनॅड्स’ चे वृषण बनतात व हे वृषण वृषणकोषात उतरतात. लिंगाची घडण होते.

मुलीच्या जननेंद्रियांची घडण होताना ‘वुल्फियन’ रचनेचा बऱ्याच अंशी नाश होतो व ‘मूलेरियन’ रचनेचा विकास होतो. ‘मूलेरियन’ रचनेपासून स्त्रीबीजवाहिन्या, गर्भाशय तयार होतं. ‘गोनॅड्स’ची स्त्रीबीजांड बनतात. शिस्निका व योनीची घडण होते.

जननेंद्रियांच्या वेगळेपणाची कारणं  

काही गर्भांमध्ये विविध कारणांमुळे जननेंद्रियांच्या या घडणीत वेगळेपण येऊ शकतं. काही वेळा अगदी सूक्ष्म स्वरूपात वेगळेपण असतं तर काही वेळा मोठ्या प्रमाणात वेगळेपण असतं. जनेंद्रियांच्या वेगळेपणाची सर्व कारणं अजून शास्त्राला कळलेली नाहीत. जी मोजकी कारणं कळलेली आहेत त्यात असं दिसतं की गुणसुत्रातील वेगळेपणामुळे, संप्रेरकांतील वेगळेपणामुळे किंवा गर्भारपणात काही विशिष्ट निषिद्ध असलेली औषधं घेतल्यामुळे अशी वैविध्यं दिसू शकतात.

गुणसूत्र

स्त्रीबीज व पुरुषबीजांची निर्मिती होताना गुणसूत्रांचं विभाजन योग्य प्रकारे व्हावं लागतं. स्त्रीबीज व पुरुषबीज फलित होताना त्यांचं मीलन योग्य प्रकारे व्हावं लागतं. (फलित बीजांत २३ गुणसूत्रांच्या जोड्या असाव्या लागतात), या प्रक्रियेत जर वेगळेपण आलं तर फलित बीजांतील गुणसूत्रांची संख्या अपेक्षित ४६ न होता वेगळी होते किंवा गुणसूत्रांची रचना (‘क्रोमाझोम स्ट्रक्चर’) बदलते. अशा वेळी खूप शक्यता असते की तो गर्भ वाढू शकणार नाही व गर्भ पडतो. काही वेळा गुणसूत्रांची मात्रा ४६ नसली तरी मूल जन्माला येतं. त्याच्यात शारीरिक किंवा मानसिक वेगळेपण असू शकतं. उदा.१ ‘टर्नर सिंड्रोम’. हे वेगळेपण असलेल्या मुलींच्या गुणसूत्रांच्या २३व्या जोडीच्या ठिकाणी ‘xx’ ऐवजी एकच ‘x’ गुणसूत्र असतं.

उदा.२. ‘क्लीनफेल्टर सिंड्रोम’,  हे वेगळेपण असलेल्या मुलांच्या गुणसूत्रांच्या २३व्या जोडीच्या ठिकाणी’XY’ऐवजी ‘xXY’ असतात.

जसं गुणसूत्रांच्या आकड्यात फरक असू शकतो तसंच त्यांच्या रचनेतही फरक असू शकतो. काही वेळा एखाद्या गुणसूत्राचा अर्धा भाग नसतो, म्हणजे गुणसूत्राच्या २३ जोड्या असल्या तरी एखाद्या जोडीत एक गुणसूत्र अर्ध असतं.

संप्रेरक/स्त्राव

आपल्या शरीरात काही ग्रंथी संप्रेरक निर्माण करतात. विशिष्ट संप्रेरक विशिष्ट कार्य करतात. शरीराची घडण, वाढ, लैंगिक इच्छा या सर्व गोष्टी विविध संप्रेरकांवर अवलंबून असतात. गर्भाची वाढ होताना योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य काळापुरते ठरावीक संप्रेरक गर्भात उपलब्ध व्हावे लागतात. गर्भाची वाढ होताना यातील विशिष्ट संप्रेरकांच्या निर्मितीत फरक पडला, त्यांच्या प्रमाणात/नियंत्रणात/कार्यपद्धतीत बदल झाला तर जननेंद्रियात वेगळेपण येऊ शकतं. उदा. १. ‘CAH’ (कॉनजनायटल अॅड्रेनल हायपरप्लेसिया). उदा.’AIS’ (एण्ड्रोजन इनसेंसिटीवीटी सिंड्रोम).in

औषधं

काही औषधं आहेत, जी गर्भधारणा झाल्यावर स्त्रीनं घ्यायची नसतात. जर अशी औषधं कळत-नकळत घेतली गेली तर गर्भाच्या वाढीत/जननेंद्रियांच्या घडणात वेगळेपण येऊ शकतं.

जननेंद्रियांतील वेगळेपण

जर वेगळेपणा सूक्ष्म असेल तर ते त्या व्यक्तीच्या व इतरांच्या ध्यानी येत नाही. जर बाह्य जननेंद्रियात लक्षात येईल असं वेगळेपण दिसलं तर तो इतरांसाठी कुतूहलाचा विषय बनतो. सारखी चेष्टा, टवाळी केली जाते. म्हणून अशा व्यक्तीच्या मनात लहानपणापासून न्यूनगंड निर्माण होतो. याच्यामुळे काही झालं तरी हे वेगळेपण समाजाला कळता कामा नये अशी दृष्टी बनते. कोणाला कळणार तर नाही?” अशी २४ तास काळजी लागून राहते. या विषयाबद्दल कोणापाशीही मोकळेपणाने बोलता येत नाही. भावनिक घुसमट होते. म्हणून लोकांनी संवेदनशीलता दाखवून अशा वैविध्यांबद्दल कुतूहल दाखवणं व त्रास देणं कटाक्षानं टाळावं.

जननेंद्रियांतील काही वेगळेपण किरकोळ स्वरूपाचे असते तर काही मोठ्या स्वरूपाचे असते. काही थोड्या व्यक्तींमध्ये दिसतात, काही क्वचित दिसतात, काही अत्यंत दुर्मीळ आहेत.  पुढिल भागात  काही मोजक्या वैविध्यांबद्दल माहिती घेणार आहोत. 

संदर्भ: ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’ या बिंदुमाधव खिरे लिखित पुस्तकातील काही भाग ( सदर पुस्तक रसिक साहित्य किंंवा  साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, वा  मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे इथे  विक्रीसाठी उपलब्ध).

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

 1. सुनिल अंकुश says:

  माझे लिंग पहिल्या पासूनच उत्तेजित असताना देखील खालच्या बाजूला राहते वर होत नाही त्यामुळे संभोगाच्या वेळी योनीतील शिस्नीकेला स्पर्श होत नाही 28 वर्षाच्या वैवाहिक जीवनात माझ्या पत्नीला ऑरगेजम चरमसुख मिळाले नाही असे पत्नी म्हणते त्यामुळेच तिने गेल्या 6 वर्षात विवाह बाह्य संबंध ठेवले आहेत असे ती म्हणते
  लिंगास उठाव येण्यासाठी काही उपाय करता येईल का?
  माझे वय 54 आहे मधुमेह, रक्तदाब नाही 10 वर्षे अँटीडिप्रेशन वर औषधी घेत आहे

  • तुमच्या पत्नीचे अन तुमचे नाते व संवाद छान आहे, त्यांना ऑरगेझम मिळवण्याचे आणखीही काही मार्ग आहेत. जसे की हाताचा वापर (हस्तमैथुन) वा लैंगिक साधनांचा वापर, इ.
   लिंगाला ताठरपणा न येण्यामागे बरीच कारणे आहेत, अधिक माहितीसाठी सोबतची लिंक पहा. https://letstalksexuality.com/penis-erection/
   आम्ही आपल्याला सुचवू की, डॉक्टरांना भेटून योग्य ते निदान करुन घ्यावे व त्यानूसार उपचार घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap