लढेन… जिंकेन…

वयाच्या १९ व्या वर्षी आई वडिलांचा विरोध पत्करून एका सजातीय अपंग मुलाशी लग्न केलं. मी स्क्रीन प्रिंटींगचं काम करायचे आणि तो फर्निचरच्या दुकानात काम करायचा. नवरा म्हणून तो काही दिवसच माझ्याशी बरा वागला. लोकांनी माझी स्तुती केलेली त्याला अजिबात रुचायची नाही. मी कुठल्याही पुरुषाशी बोललेलं त्याला चालायचं नाही. काही महिन्यातच तो माझ्यावर संशय घेऊ लागला. शेवटी मला नोकरी सोडावी लागली. सारं बळ एकवटून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण तो जेव्हा दारूच्या नशेत असायचा तेव्हा माझ्या तोंडून एक अक्षर जरी बाहेर आलं की,  तो दातावर पंच मारायचा. दात हलायला लागल्यावर तो काढूनच टाकावा लागायचा. असे दोन दात काढावे लागले. एकट्याच्या पैशावर घराचं भाडं, सासू सासऱ्यांना पैसे द्यावे लागायचे. घर चालवायला पैसे कमी पडू लागले. शनिवार त्याचा उपवास असे पण सहा दिवस रोज त्याला मासे लागायचे. एखाद्या दिवशी मासे शिजवून खाऊ घातले नाही, तर तो स्वत: मासे शिजवून त्याचे झणझणीत कालवण खाताना मला शिव्या घालत, माझ्या अंगावर छीडकायचा. रात्रीचा १२ ते १ या दरम्यान हा प्रकार घडत असे. शेजाऱ्यांना आवाज ऐकू जावू नये, म्हणून मी माझा आवाज बंद ठेवीत असे. अंगाची लाल मिरचीच्या तिखटाने आग व्हायची. डाळीचं /गव्हाचं  पीठ लावून अंघोळ करून माझी इच्छा नसली, तरी त्याची शारीरिक भूक भागवूनच झोपावे लागे. कधी कधी तर मला बाहेर काढून दरवाजा बंद करून घ्यायचा. काळ्या कुट्ट अंधारात पायरीवर बसून थंडीत कुडकुडत रात्र काढायची सकाळी त्याने दरवाजा उघडल्यावर आत जायचे. तोपर्यंत त्याची दारू उतरलेली असायची.

सात वर्षांत आलेले सगळे शनिवार सोडले, तर मला तो रोजच काही न काही कारण काढून रडवत असे. दोन ते तीन तास रडायची. २००५ साली पोलीस स्टेशनला एक लेखी तक्रार दिली पण मी तिथे भावूक झाले आणि पोलिसांना सांगितले त्याला मारू नका फक्त समजवा. काही दिवसानंतर पुन्हा घरात भांडण, मारामारी, संशय. शेवटी २०१० साली लोकन्यायालयात दावा दाखल केला. कोर्टाच्या तीन-चार तारखा लागल्या आम्ही दोघं एकाच घरातून बाहेर पडायचो. दिवसभर कोर्टाच्या बाकावर बसायचो आणि संध्याकाळी घरी परत यायचो. स्वत:च्या इच्छेने केलेले लग्न होते, ते निभवायचे होतेच. संसार अर्धवट सोडून माहेरी जाणे माझ्या दृष्टीने माझी हार होती, असे मला वाटे. कोर्टात मी सांगितले तो जर माझ्याशी सरळ वागला तर मला त्याच्याशी नांदायला काहीच हरकत नाहीये. ‘माझ्या पत्नीला शारीरिक मानसिक त्रास देणार नाही’ असा कोर्टाने त्याचा जबाब लिहून घेतला.

त्याला घेऊन मी पुण्याला त्याची दारू सोडायला गेले. त्याची दारूही सुटली. काम पण व्यवस्थित करू लागला. पैसे येऊन बचतही होऊ लागली. सासू बऱ्याच वर्षांपासून मला देवीला नवस करायला सांगत होती. माझ्या पोटी मुलगा जन्माला यावा म्हणून. पण तिकडे दुर्लक्ष करीत होते. आता मात्र ती तिच्या मुलाला, माझ्यावर दबाव टाकायला सांगू लागली. आता तुझ्या पोटी मुलगा जन्माला यावा अशी उघड मागणी करू लागला. तो मुद्दा घेऊन भांडण करू लागला. माझे शिवनकाम मी बंद केले होते. माझे शिक्षण फक्त दहावी होते. परिस्थिती अभावी शिक्षण घेता आले नव्हते. अठरा वर्षे शैक्षणिक गॅप झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिकायचे ठरविले. त्याने माझ्या शिक्षणाला विरोध दर्शविला. त्यामुळे मी त्याच्या नकळत अभ्यास करू लागले. तो घरी यायच्या आधी मला माझी पुस्तके लपवून ठेवावी लागत असत. एकदा मी एका मित्राकडे इंग्लिश क्लास विषयी फोनवर चौकशी करीत असताना, त्याने मला पाहिले आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने माझा मोबाईल फोडून टाकला आणि माझे पुस्तक हिसकावून घेतले आणि फाडू लागला. बारा वर्षात त्याचा मार खाऊन  जेवढ्या वेदना झाल्या होत्या, त्यापेक्षा जास्त वेदना त्याने माझे पुस्तक फाडल्यामुळे मला झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी दुपारी मी इंग्लिशच्या क्लासला जाताना मला पाहिलं, मी सायकलने जात होते. तो माझ्या पाठोपाठ आला आणि रस्त्यात एक फुट पाणी असलेली नदी होती. ती नदी पार करून जायचे होते. त्याने किनाऱ्यावरच माझी पुस्तके-वह्या फेकून चिखलात टाकली. मला मारू लागला. हा सारा प्रकार नदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या लोकांनी पाहिला. लोक धावत माझ्या दिशेने येऊ लागले. तसा हा टू व्हीलर घेऊन पळाला. मी माझी पुस्तकं गोळा केली आणि तशीच क्लासमध्ये गेले.

केंद्रात पूर्वपरीक्षा जवळ आली होती. अडीच तासाचे लेक्चर केंद्रात घेतले जाई. मराठीचे लेक्चर चालू होते. उदाहरण दाखल सर म्हणाले, “बघा कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता पण कधी? तर तुम्ही ठरवाल तेंव्हाच!” त्याच क्षणाला मी ठरवलं की, नवऱ्यापासून आता वेगळं व्हायचं कायदेशीररित्या. २७/५/२०१३ रोजी परस्पर सामंज्यस करार करून मी नवरा रहात होता, त्याच चाळीत वेगळी राहू लागले.

माझ्या माहेरी मी नवऱ्यापासून फारकत घेतल्याची बातमी गावभर पसरली. जातीच्या नियमाप्रमाणे सोडचिट्ठीचे पेपर गावाच्या वार्षिक मिटींगमध्ये सादर करायचे होते. आईने ते पेपर वाडीतील प्रमुखाकडे दिले होते. मी गाववाल्यांना सोडचिट्ठीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले नाही. या रागापाई त्यांनी ते पेपर तिथे जमा केले नाहीत. उलट आईलाच दटावले. तुमच्या मुलीला गावाच्या जातपंचायतीत हजर करा. तिला स्वत: उभे राहून नवऱ्याला का सोडले त्याचे कारण सांगू दे. जोपर्यंत ती जातपंचायतीत हजर रहात नाही, तोवर हे पेपर पुढे जाणार नाहीत आणि विषय मिटणार नाही.

भावकीच्या मिटिंगमध्ये मी माझी बाजू मांडली, आता जातपंचायतीमध्ये सोडचिट्ठीचे कारण सांगायचे होते. परंतु त्यांनी सांगितलेल्या तारखांना मी हजर राहू शकले नाही, म्हणून त्यांनी माझ्या आई वडिलांकडून ५०० रु. डिपॉझीट घेतले – मला जातपंचायतीमध्ये हजर करण्यासाठी. मी जातपंचायतीत हजर राहिले. सोडचीट्ठीचे कारण सांगू लागले, पण जातपंचायतीला माझे लग्न झाले आहे, मी १४ वर्षे संसार केला आहे, हेच मान्य नाही. त्यांचे म्हणणे होते की, ‘तू लग्न केलेस ते आम्हाला कुठे सांगितले? तुझ्या लग्नाचे गावजेवणही घातले नाहीस. आता तुझ्या सासर माहेरची जातपंचायत एकत्र बोलवायची दोन्ही गावासमोर तू नवऱ्यापासून सोडचिट्ठी का घेतली ते सांगायचे व सासरच्या लोकांचा जेवणाचा, चहाचा खर्च तुझ्या आई वडिलांनी करायचा. हे ऐकल्यावर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. ज्या नवऱ्याकडून मी एकही रुपया न घेता सोडचिट्ठी घेतली त्या नवऱ्याला आणि त्याच्या माणसांना जेवण घालणे मला मान्यच नव्हते. चौदा वर्षांपूर्वी जेव्हा मी लग्न केले तेव्हाही माझ्या आई बाबांना वाळीत टाकले होते. अडीच हजार रुपये दंड घेऊन एक वर्षानंतर गावात समाविष्ट करून घेतले होते. ही घटना माझ्या स्मरणात होतीच.

मी पोलिसांना एक अर्ज दिला. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनला हजर केले. चौकशीत जातपंचायतीच्या अध्यक्षांनी संघटन अलिखित असल्याचे कबूल केले, पण दंड घेत नाही असा खोटा जबाब दिला. त्यावर मी लगेचच दंड म्हणून स्वीकारलेल्या रकमेचा हिशेब त्यांचेकडे लिहिलेला आहे, असे सांगताच अध्यक्षांची बोबडी वळली. महिला दक्षता समितीतर्फे त्यांचे समुपदेशन करण्यात आले. घरी परतल्यावर त्यांनी दंड म्हणून स्वीकारलेल्या रकमेच्या लिखाणाच्या वह्या एका बंद घरात लपवून ठेवल्या.

मी लग्न केल्यानंतर १० वर्षे माझ्या नवऱ्याने मला माहेरी जाऊ दिलं नव्हतं. त्यामुळे एक दशकातली फारशी माहिती नव्हती. कायद्याचा बडगा उगारून का होईना या जाचक रूढी थांबल्या पाहिजेत असे वाटू लागले. म्हणून मी अधिक माहिती गोळा करू लागले. तेव्हा कळलं, एका मुलीने आंतरजातीय लग्न केलं. चौदा वर्ष ती गावात आली नाही. पण तिचे वडील वारल्यानंतर तिला प्रेतावर येण्यासाठी जातपंचायतीनं आडवलं. दुसऱ्या एका मुलीनं जातपंचायतीला न सांगता लग्न केलं. ती दोन वर्षांनी माहेरी यायला निघाली असता, चुलात्यानेच जात पंचायतीच्या भीतीने येण्यास नकार दिला. तिचं प्रेत त्याच रात्री विहिरीत सापडलं. तिसरे, एकाच आडनावाच्या मुलगा मुलगी यांचे प्रेमसंबंधातून तिला दिवस गेले. त्याच लग्नाला जात पंचायतीने विरोध केला. त्या मुलीच्या बापाने आपल्याला समाज ‘कुमारी मातेचा बाप’ असं हिणवेल, म्हणून त्याने गळफास लाऊन घेतला. त्याच्या मुलाला 5००० रुपये दंड ठोठावला. घरगुती कारणास्तव एका कुटुंबाला दोन वर्षे वाळीत ठेवले होते. या अशा हिंसक घटना ऐकल्यावर, बघितल्यावर मला प्रश्न पडला की, ‘मी स्वस्थ का?’ हे बंद होण्यासाठी ठोस उपाय शोधू लागले.

मुळात ही संस्था रजिस्टर आहे की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात आरटीआय अंतर्गत अर्ज केला. त्यामध्ये ज्या ४२ गावांच्या संघटनेच्या अधिपत्याखाली ही संघटना सक्रीय आहे त्याची नोंदणी आहे की नाही याची माहिती मागविली होती. संघटनेची नोंद नसल्याची माहिती समोर आली. मग मी धर्मादाय आयुक्ताकडे अर्ज पाठविला. त्यामध्ये लिहिले की,  ‘जातपंचायतीचे स्वयंघोषित कायदे आहेत जे पिडीतांस क्लेशदायक, मानहानीकारक व जीवित स्वातंत्र्यास बाधा पोहचविणारे आहेत. सदर कायद्याप्रमाणे द्रव्यदंड, सामाजिक बहिष्कार यांसारखे दंड व शिक्षा करणारे प्रावधान आहेत’

काही दिवसांनी चौकशीच्या तारखेचे पत्र आले. प्रशासन फारस तत्पर आहे याचे मला थोडेसे आश्चर्य वाटले. परंतु चौकशीच्या आदल्या दिवशी चौकशी अधिकाऱ्यांनी कळविले की, काही कारणास्तव चौकशीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. काही महिने गेल्यानंतर मी आयुक्तांशी संपर्क करून, ‘चौकशी कधी करणार?’ असे विचारले असता, चौकशी अधिकारी टोलवाटोलवी करू लागले. इकडे माझ्या आईबाबांना कुठल्याही प्रकारे गावात सहकार्य करायचे नाही, असे जातपंचायतीमध्ये सगळ्यांना बजावण्यात आले होते.

एक दिवस आमची गाय लंगडत-लंगडत घरी आली. आई मला म्हणाली, ‘बघ, तुझीही गाईसारखी अवस्था होऊ शकते, याचा हा संकेत असावा. हे लोक चिडलेत तुला मारून टाकतील.’ आईला मी एवढंच म्हणाले, ‘मी कदाचित मरेन, पण माझं मरण अनेकींना अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देऊन जाईल एवढं नक्की ! कधीतरी मरायचेच आहे, पण अन्यायाविरुद्ध लढायचं असतं, वाळीतपण काय असतं, हा मेसेज ते भोगलेल्यांना आणि न भोगलेल्यांना देऊनच!” चौकशी अधिकारी कर्तव्यात कसूर करीत असल्यास काय कारवाई करता येते याची माहिती त्याच कार्यालयातून आरटीआय द्वारे मागविली. तो आरटीआय कार्यालयात दाखल झाल्यावर लगेचच  चौकशी लावण्यात आली. पंधरा दिवस आधी चौकशीचे पत्र मला व जातपंचायतीला आले.

आतापर्यंत पिढ्यानपिढ्या अशी प्रस्था होती की, जातपंचायतीचा अलिखित नियम कुणीही मोडायचा नाही. मी मात्र ही प्रथा मोडीत काढायची असा निश्चय केला होता.

आजवरच्या माझ्या जातीच्या इतिहासात नवऱ्याने बायकोला सोडण्याच्या अनेक घटना होत्या. परंतु मी मात्र नवऱ्याला सोडणारी पहिलीच बाई असावी, असा जनक्षोभ उसळला होता. गावोगावी माझी ‘सोडचिट्ठी’ हा एक गंभीर चर्चेचा विषय बनला होता. मी केलं तेव्हाही जातपंचायतीला जुमानलं नव्हतं आणि नवरा सोडला तेव्हाही जात पंचायतीची भीती बाळगली नाही. म्हणूनच की काय, जातीचे पुढारी माझ्यावर खवळले होते. त्यांनी एक पत्र लिहिले त्यामध्ये “ वेदिका पडवळ हिचा घटस्फोट झाला आहे. ती एक वैफल्यग्रस्त महिला आहे तरी तिच्या अर्जाचा विचार केला जाऊ नये’ असे बरेच काही लिहिले होते. ते पत्र मिटिंग बोलावून भावाच्या हातात दिले. ‘तुम्ही भावंडांनी सह्या करा आणि बहिणीचीही सही यावर करून घ्या आणि ते पत्र चौकशीच्या आधी धर्मादाय आयुक्त कार्यालयात पोहोचते करा. जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या-येण्याचा जातपंचायतीचा खर्च, तुम्ही भावंडांनीच करायचा, कारण की ही अशी समाजाला वेठीस धरणारी, भुर्दंड लावणारी, धाब्यावर बसवणारी नास्तिक बहिण तुमची आहे’ असे म्हणून अध्यक्षांनी भावाला दटावले. दुसऱ्या दिवशी चौकशीला सामोरे जायचे होते.

एका बाजूला फक्त मी एकटी आणि दुसऱ्या बाजूला अडीच हजार लोकांचं जनमत, पैकी काही आजी-माजी पदाधिकारी व महिला माझ्या विरोधात कसे आणि काय बोलायचे याचे धडे शिकवून आणले होते. जेणेकरून माझी हार होईल आणि त्यांचा विजय, असे चित्र उभे करण्यात आले. जाब-जबाब चालू असताना चौकशी अधिकारी मॅनेज  झाले असल्याची मला शंका येऊ लागली. मी स्पष्ट शब्दात चौकशी निरीक्षण अधिकारी यांना म्हणाले, ‘तुम्ही त्यांच्या चुकीच्या गोष्टीना बळ मिळेल असे का बोलताय? तुम्ही त्यांचे वकील असल्यासारखे बाजू मांडताय. तुम्ही अधिकारी आहात आणि तुमच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या नियम कायद्यांना अनुसरूनच चौकशी करा.’ त्यांना खणखणीत शब्दांत जागेवर आणल्यावर अधिकारी शब्दांची सारवासारव करू लागले. जातपंचायतीने ५०० रु. डिपॉझीट घेतल्याचा जबाब भावाने दिला. गोळा केलेल्या पैशाबद्दल आम्ही मासिक १० रु. वर्गणी काढतो. त्याचे दोघांच्या नावावर व्यक्तिगत बँकेत खाते उघडलेले आहे असे अध्यक्षांनी जबाबात म्हटले. ‘तुम्ही ती रक्कम व्यक्तिगत न ठेवता संघटनेचे तत्काळ रजिस्ट्रेशन  करून घ्या. दंड करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बहिष्कृत करणे कायद्याने गुन्हा आहे’ असा आदेश झाला. दोन-चार महिन्यांनी एका मुलाने आंतरजातीय मुलीशी विवाह करून तिला गावात आणले, गावकऱ्यांनी स्वतः त्यांना गृहप्रवेश करून दिला. मला अपेक्षित असणारा बदल घडत आहे, असे वाटत आहे. १५ मे २०१६ च्या जातपंचायतीमध्ये घोषणा करण्यात आली की, आजपासून जातपंचायत बरखास्त !

लेखन-  वेदिका पडवळ, चिपळूण 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap