पुरुषी मानसिकता आणि बलात्कार_गौरी सुनंदा

लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. दररोज किमान एकदातरी आपण बलात्काराच्या घटनेबद्दल ऐकत असतो. दिल्लीच्या निर्भया बलात्काराच्या घटनेनंतर देशभर वादळ उठले. देशभरातून मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला गेला. मात्र बलात्काराच्या घटना काही कमी झाल्या नाहीत. उलट दिवसेंदिवस त्या अधिक हिंसक स्वरूपात समोर येत आहेत.

महाराष्ट्रातील एका पहाणीनुसार (Economic Survey Report)  मागील तीन वर्षातील बलात्काराची आकडेवारी

अ.क्र. वर्ष संख्या
२०१३ ३०६३
२०१४ ३४३८
२०१५ ४१७६

आजपर्यंत कानावर पडलेल्या घटनांमधून आपल्या हे लक्षात आले आहे की, बलात्कार हे फक्त अनोळखी, विकृत लोकांकडून होतात किंवा एकटे असताना, निर्जन ठिकाणी असताना होतात, असं नाही. अनेक बलात्कार हे विश्वासातल्या व्यक्तींकडून घराच्या चार भिंतीत, शाळांमध्ये, अगदी धार्मिक ठिकाणीदेखील  होत असतात. आपण वर्तमानपत्रातून तसेच इतर माध्यमांतून विवाहांतर्गत बलात्कार, वडिलांनी मुलीवर केलेला बलात्कार, दत्तक पित्याने मुलींवर केलेला बलात्कार, जवळच्या नातेवाईकाने केलेला बलात्कार, तथाकथित आध्यात्मिक बाबांनी केलेला बलात्कार, जातीय द्वेषातून केलेला बलात्कार, अल्पवयीन मुलीवर केलेला बलात्कार. एखादी मुलगी नाही म्हणाली म्हणून मित्रांसोबत मिळून केलेला सामुहिक बलात्कार… अशा प्रकारच्या अनेक घटना आपण ऐकत-वाचत आहोत. अशा सर्व घटनांचा विचार करता, बलात्कार का होतात आणि बलात्कार करण्यामागची पुरुषांची मानसिकता काय असते, याचा विचार करण्याची तसंच ती मानसिकता बदलण्याची गरज आहे.

आजही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे मूळ कारण नेहमी बाजूलाच राहते आणि इतर कारणांभोवती चर्चा फिरत राहते. तिने कोणते कपडे घातले होते? तिच्याबरोबर कोण होतं ? ती कोणत्या वेळेला बाहेर पडली होती ? मुलीच्या जातीनं जरा जपून वागायला हवं ना ? ‘लडकी मतलब मिठाई का डिब्बा’, ‘लडकी मतलब खुली हुई तिजोरी’ यांसारख्या अनेक गोष्टींभोवतीच ही चर्चा होत असते. सरतेशेवटी महिलांवर होणाऱ्या  अत्याचारांना त्या स्वतःच कशा जबाबदार आहेत, यावरच सर्व चर्चा येऊन थांबते. घराबाहेर मुलगी सुरक्षित नाही म्हणून मुलींचे शिक्षण बंद करतात, स्त्रियांवर नियंत्रणं  लादली जातात. यापेक्षा पुरुषांनी बलात्कार करू नयेत, यासाठी काही विशेष प्रयत्न किंवा उपाय योजना केल्या जात असल्याचे मात्र दिसत नाही.

बलात्काराच्या घटना होण्यामागच्या कारणांविषयी विचार करता असं दिसून येतं की, जवळजवळ सर्वच कारणांचं मूळ आहे आपल्या समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्था आणि स्त्री विषयीचे भोगवादी दृष्टीकोन. पुरुष श्रेष्ठ, स्त्री कनिष्ठ असे मानणारी, या कल्पना जोपासणारी आणि या कल्पना कशा तशाच टिकून राहतील यासाठी आवर्जून प्रयत्न करणारी शोषणावर आधारित आपली पुरुषप्रधान समाजव्यवस्था. बलात्कार हे पुरुषसत्ताक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठीचं हत्यार म्हणूनच वापरलं जातं.

स्त्रिया गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे येत नाहीत, त्यामुळे गुन्हेगाराला भीती रहात नाही आणि तो पुन्हा गुन्हे करतो, असं देखील बऱ्याचदा म्हंटले जाते. पुरुषी मानसिकतेतून आलेल्या पावित्र्य आणि योनीशुचीतेच्या कल्पना, सामाजिक दबाव, तथाकथित प्रतिष्ठा, घराण्याची इज्जत यामुळे स्त्रिया गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे येत नाहीत. किंबहुना त्यांना पुढे येऊ दिले जात नाही. बलात्कार करताना अल्पवयीन मुली किंवा जी स्त्री तक्रार करू शकणार नाही, अशा स्त्रियांना टार्गेट केले जातं, हेही लक्षात येतं. शिवाय तिने कोणाकडे तक्रार करू नये म्हणून धमक्या दिल्या जातात आणि दबाव आणला जातो. अनेक ठिकाणी बलात्कार झाल्यानंतर बदनामी होईल या भीतीने कुटुंबातील लोक पोलिसांत तक्रार करीत नाहीत. त्यामुळे मुलीची बेअब्रू होईल या भीतीने, जणू काही तिनेच फार मोठे पाप केले आहे असं  दर्शवलं जातं व तिलाच समाज दोषी मानतो. तिचं आयुष्यच संपवून टाकलं जातं . कोणताही गुन्हा केलेला नसताना, अपराध्यासारखे जीवन जगावे लागते.

बलात्काराच्या घटना वाढण्यामागे, आपल्या देशामध्ये बलात्काराच्या गुन्ह्याला गंभीर शिक्षा होत नाही, हे कारण देखील बऱ्याचदा पुढं  येतं. अनेक गुन्हेगार पुराव्याअभावी सुटतात. अशा केसेस हाताळताना कमकुवत पडणारी पुरुषसत्ताकतेतूनच आलेली पोलीस आणि न्यायव्यवस्था कारणीभूत आहेच. ‘लडकी मतलब मिठाई का डिब्बा’ असे वक्तव्य करण्याऱ्या वकीलाविषयी आपण सर्वजण जाणून आहोतच.

बलात्काराचे गुन्हे नोंदवले जात नाहीत. गुन्हेगाराला शिक्षेची भीती नसते किंवा  वेळेत शिक्षा न दिल्याने गुन्हेगार पुन्हा-पुन्हा बलात्कारासारखे गंभीर गुन्हे करतात. हे खरं असलं, तरी कडक शिक्षेमुळे असे गुन्हे कमी होतील, असा विश्वास ठेवणंही चुकीचं ठरू शकत. शिक्षेची भीती हा एकमेव उद्देश न ठेवता, बलात्कार करण्यामागची मानसिकता काय? हे समजून घेऊन मानसिकतेत बदल करणं गरजेचं आहे. स्वतःच्या शरीरसुखासाठी, स्वार्थासाठी, सूड उगवण्यासाठी स्त्री देहाचा वापर, स्त्रीला उपभोगणं ही बलात्कार होण्यामागची मानसिकता दिसून येते. दंगलीमध्ये झालेले बलात्कार किंवा जातीयद्वेषातून झालेले खैरलांजी प्रकरण यावरून आपल्याला दिसते की, जातीय-धार्मिक द्वेष, बदला, सूड व्यक्त करण्यासाठी, एखाद्या समुदायावर नियंत्रण आणण्यासाठी  स्त्रियांवर अत्याचार केले जातात. बलात्कार हे हत्यार म्हणून वापरलं जातं. असे सूड म्हणून केले गेलेले सामूहिक बलात्कार, दंगलीतले बलात्कार हे कळत नकळत विशिष्ट समुदायांकडून छुप्या पद्धतीने गौरवले जातात. राजस्थानच्या सिरसा जिल्ह्य़ातल्या एका खेडय़ातली स्त्री सांगते की, ‘माझ्या पतीला सत्ता हवी होती म्हणून तो माझ्याकडे राजकीय पक्षांची माणसं पाठवत होता.’ नवरा त्याच्या बायकोला आपल्याला राजकीय सत्ता मिळावी किंवा उच्चपद मिळावे म्हणून इतरांसोबत तिच्या इच्छेविरुद्ध, तिला गुंगीचे औषध देऊन जेव्हा संबध ठेवायला भाग पाडतो. अशा घटनांमधून स्त्री विषयीचा ‘वस्तुवादी’ किंवा ‘उपयुक्ततावादी’ दृष्टीकोनच याच्या मागे कारण आहे हे दिसून येते. एखादी मुलगी जेव्हा प्रेमाला नकार देते, ते काही पुरुषांना सहन होत नाही. त्यांचा अहंभाव दुखावला जातो आणि मग ‘तिची चांगली जिरवली पाहिजे’ अशा मानासिकतेतूनही बलात्कार घडल्याचे दिसून येते.

पुरुषांमध्ये आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत आणि स्त्रिया म्हणजे मूर्ख, कनिष्ठ, उपभोगाची वस्तू, त्यांना अक्कल नसते अशी समज होण्यामागे कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था आणि माध्यमं कारणीभूत आहेत.

कुटुंबामध्ये अगदी लहानपणापासूनच मुला-मुलींवर पुरुष श्रेष्ठ, रक्षण करणारा आणि स्त्री कनिष्ठ, कमजोर हे बिंबवलं जातं. पुरुषाला सत्ताधारी, श्रेष्ठ, आक्रमक आणि हिंसक रूपात घडवले जाते आणि अशा वागण्याला  समाजमान्यता दिली जाते. ‘पुरुष रडत नाहीत’ हे शिकवले जाते मात्र ‘पुरुष रडवत नाहीत’ हे मात्र शिकवले जात नाहीत. वडीलांचे आईसोबतचं वर्तन हे खूप कमीवेळा प्रेमाचं, आदराचं असतं आणि तेच मुलांवरही आपोआप बिंबवलं जातं. आपल्या ‘मर्दानगी’ चा उदोउदो करणाऱ्या पुरुषी व्यवस्थेमध्ये बलात्कार, छेडछाड, अश्लील हावभाव ‘मर्दुमकी’ ठरतात. मर्दपणाच्या आणि पुरुषत्वाच्या बऱ्याच कल्पनांचा संबंध हा लैंगिक कामक्रीडेशी, संभोगाशी असतो. काही वेळा आपली मर्दुमकी सिद्ध करण्यासाठीही बलात्कार केले जातात. तथाकथित मर्द, आया-बहिणींवरून शिव्या देणे, मुलगी पटवणे, बायकोला ताब्यात ठेवणे, छेडछाड करणे यांसारख्या गोष्टींमध्ये मर्दानगी मानताना दिसतात.

‘तू चीज बडी है मस्त मस्त’,  ‘तू हा कर या ना कर’, ‘आयटम’ अशा उपमा वापरून स्त्रीला नेहमी गृहीत धरायला आपल्याला माध्यमं शिकवतात. बऱ्याचशा चित्रपटांमध्ये पहिल्यांदा ‘नाही’ म्हणणारी स्त्री शेवटी ‘हो’ म्हणते. तिच्याकडून येन-केन प्रकारे ‘हो’ म्हणवून घेणारे हिरो स्त्रियांवरील हिंसेचं, लैंगिक अत्याचारांचं समर्थन करताना दिसतात. स्त्रीचे वस्तूकरण, तिच्याविषयीचा भोगवादी दृष्टीकोन वाढवण्यासाठी माध्यमं कारणीभूत आहेत. एकीकडे लैंगिक शिक्षणाला विरोध तर दुसरीकडे पोर्नोग्राफी मधून होणारे लैंगिक शिक्षण. पोर्नोग्राफी मधून हिंसक लैंगिक संबंधातूनच खरा लैंगिक आनंद मिळतो असे बिंबवले जाते.

बलात्काराची सुरुवात ही मेंदूपासून होते. त्यामुळे बदलही मेंदूपासूनच व्हायला पाहिजे. सगळ्याच गोष्टींकडे लैंगिक दृष्टीने बघणे योग्य नाही. स्त्री-पुरुषांमध्ये मनमोकळा संवाद, मैत्री, एकमेकांविषयी आदर, भाव-भावनांचा, एकमेकांच्या शरीराचा आदर करणे गरजेचे आहे. प्रत्येक पुरुषाने स्त्री उपभोगाची वस्तू ही पुरुषप्रधान मानसिकता बदलणे आवश्यक आहे. स्त्रीला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार सहजासहजी मिळणार नाही आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेत पुरुषांनी मिळणारे फायदे सोडायला ते सहजासहजी तयार होणार नाहीत. म्हणूनच स्त्रियांनी याकरिता व्यवस्थेत गुलामगिरी स्वीकारून परावलंबी जगणे सोडले पाहिजे. स्त्रियांनी ही चाकोरी तोडून आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. बलात्काराच्या घटना खऱ्या अर्थाने थांबायच्या असतील तर समतेवर आधारित समाजनिर्मितीची गरज आहे. लैंगिक संबंधाचे जीवनातील महत्व, तसेच त्याच्यामध्ये अडकलेले नातेसंबंध, अन्याय, अत्याचार याचा विचार करून, त्याविषयीचे योग्य, शास्त्रीय ज्ञान, दृष्टीकोन दिला पाहिजे. प्रेम, विश्वास, संमती, समोरच्या व्यक्तीच्या इच्छेचा, मताचा आदर आणि स्वीकार यांसारखी मूल्यं  जाणीवपूर्वक बिंबवण्याची गरज आहे.

सदर लेख ‘बहिणा दिवाळी अंक २०१६’ मध्ये प्रकशित झाला होता.  

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap