कल्की कोएचलिनने स्वतः लिहिलेली कविता “द प्रिंटींग मशीन” आणि तिच्यावरच चित्रित झालेला या कवितेवर आधारित विडीओ गेल्या तीन महिन्यांत खूपच प्रसिद्ध झाला. हा विडीओ पाहिल्यानंतर, महिलांवरील अत्याचार, छेडछाड, बलात्कार आणि याबद्दल माझ्या कानावर आलेल्या चर्चा, ‘आयसोच’च्या सत्रामध्ये सहभागी लोकांच्या प्रतिक्रिया आणि मला अनेकदा पडणारे प्रश्न मला पुन्हा एकदा आठवले.
एकदा पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सत्र सुरु होतं. महिलांवरील अत्याचार, छेडछाड या विषयावर चर्चा सुरु होती. नेहमीप्रमाणेच, महिला आपल्या संस्कृतीप्रमाणे वागत नाहीत, कपडे घालत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होतात हे महिला अत्याचाराचं मुख्य कारण त्यांच्याकडून समोर आलं. हे अगदी सर्रास होतं. आधुनिकतेकडे वळणारा आणि संस्कृतीतील अनेक गोष्टींना फाटा देणारा हा युवावर्ग आणि एकूणच समाज या विषयावर बोलताना मात्र संकृतीचा (?) एवढा विचार का करतो किंवा महिला, मुली या स्वतःच अत्याचारासाठी जबाबदार आहेत असे का म्हणतो?
यासारखी चर्चा अगदी अनेक घरांत, बसमध्ये, सार्वजनिक ठिकाणीही सर्रास होताना दिसते आणि थोड्याफार फरकाने शेवटी मुलींनी कसे जपून राहिले, वागले पाहिजे यावरच येऊन थांबते. अनेकदा तर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीलाही जबाबदार धरले जाते व चर्चेचा शेवट मात्र , पण “त्या मुलीला तरी कळायला नको होतं का?” असा होताना दिसतो.
एखाद्या ठिकाणी चोरी झाली तर ज्याने चोरी केली त्याला जबाबदार धरलं जातं, खून झाला तर ज्याने तो केला त्याला जबाबदार पकडलं जातं. मात्र, छेडछाड, बलात्कार याविषयी बोलताना मात्र आपण जी व्यक्ती अत्याचाराला बळी पडली आहे तिलाच जबाबदार का धरतो?
कल्की कोएचलिनची ही कविता म्हणजे वृत्तपत्रे, मासिके, सोशल मिडिया, पाठ्यपुस्तके, समाज, अधिकारी आणि एकूणच राष्ट्र यांना मारलेली थोबडीतच आहे. या कवितेमध्ये ती महिलांवर होणाऱ्या काही अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख करते व या सगळ्या प्रकारामध्ये वृत्तपत्रे, मासिके, सोशल मिडिया, पाठ्यपुस्तके, समाज, अधिकारी आणि एकूणच राष्ट्र यांची भूमिका यावर टीका करते.
समाजामध्ये आपण पाहतो, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे मूळ कारण नेहमी बाजूलाच राहते आणि इतर कारणांभोवती चर्चा फिरत राहते. तिने कोणते कपडे घातले होते? तिच्याबरोबर कोण होते? ती कोणत्या वेळेला बाहेर पडली होती ? मुलीच्या जातीनं जरा जपून वागायला हवं ना ? लडकी मतलब मिठाई का डिब्बा, लडकी मतलब खुली हुई तिजोरी यांसारख्या एक ना अनेक गोष्टींभोवतीच ही चर्चा होत असते. सरतेशेवटी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना त्या स्वतःच कशा जबाबदार आहेत यावरच सर्व चर्चा येउन थांबते.
दिल्ली गैंग रेप, उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्हय़ातील कतरा सादतगंज या गावात दोन चुलत बहिणींवर सामूहिक बलात्कार करून त्यांना मारून झाडाला टांगले गेले तसेच राजकीय नेत्याने लहान मुलीवर केलेला बलात्कार या हादरवून टाकणाऱ्या घटनांचा कल्की तिच्या या कवितेमध्ये उल्लेख करते.
या व यांसारख्या घटनांनंतर संपूर्ण समाजामध्ये वृत्तपत्रे व इतर माध्यमांतून अशी काय चर्चा होते की त्यामुळे पोटात भीतीने गोळाच येतो. एकंदरीत समाजाची भूमिका (ती कशी तयार होते, केली जाते हा एक वेगळाच चर्चेचा विषय आहे) गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे यापेक्षा स्त्रियांनी कसे बंधनात राहिले पाहिजे अशीच असते. परिणामी स्त्रियांवर बंधने येतात, मनात असुक्षिततेची भावना तसेच एक अनामिक भीती निर्माण होते.
बरं, स्वतःवर अशी बंधने घालूनही अत्याचार थांबतात का? भर दुपारी भर रस्त्यात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण कमी नाही.
खरं तर प्रसारमाध्यमांवर समाजप्रबोधनाची मोठी जबाबदारी आहे. लोकांचा दृष्टीकोन घडवण्यामध्ये माध्यमे खूप मोठी भूमिका बजावू शकतात. अर्थात, ती त्यांची नैतिक जबाबदारीही असायला पाहिजे. वास्तवात मात्र तसं होताना दिसत नाही. आपली बातमी कशी जास्तीत जास्त आकर्षक आणि मनोवेधक होईल याच्याकडेच त्यांचा कल दिसून येतो
एकीकडे महिलांवरील दुखद घटनांना ब्रेकिंग न्यूज बनवले जाते तर दुसरीकडे सौदर्य प्रसाधनांची जाहिरात !
एकीकडे महिलांवरील अत्याचारासाठी त्या स्वतःच कशा जबाबदार आहेत याविषयी चर्चा तर दुसरीकडे मात्र तिचा गोरा पान, हसरा, सुंदर चेहरा सौदर्य प्रसाधने आणि इतर उत्पादने खपवण्यासाठी वापरला जातो.
या जाहिराती इतक्या प्रभावी बनवल्या जातात किंवा त्याच्यावर इतके लक्ष जाते की मग असिड हल्यासारखे प्रश्न दुर्लक्षितच राहतात.
सामाजिक प्रबोधनाची सर्वात महत्वाची जबाबदारी असतानाही प्रसारमाध्यमे मार्केट-धार्जिण्या जाहिरातींच्या भडीमारानं भौतिकवादी, चंगळवादी दृष्टीकोन रुजण्याला खतपाणी घालत आहे. प्रसारमाध्यमे ही समाजाला स्वप्नाळू जगात नेत आहेत. समाजातील अपप्रवृत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यांची मते, मूल्ये, दृष्टीकोन सर्वसामान्य लोकांवर थोपवत आहेत. स्त्रियांना शरीर आणि सौंदर्य याच्या पलीकडे जावूनही अस्तित्व आहे असा संदेश खूप कमी वेळा माध्यमे देतात. स्त्रियांच्या संदर्भात सौंदर्याचे, पूर्णतः शरीर पातळीवरचे थेट संदेश जाहिरातींमधून दिले-घेतले जात आहेत. यातून पुरूषांमध्येही स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू (कमॉडिटी) म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन रुजतो.
प्रसार माध्यमांमध्ये झालेल्या चर्चा, विचार, दृष्टीकोन फेसबुक, ट्वीटर, whatsapp, मोबाईल फोन्स, घराघरात, मित्र मैत्रिणीमध्ये होणाऱ्या चर्चा यातून अगदी जशाच्या तशा लोकांपर्यंत पोहचतात. लिहिणारे , छापणारे वाचणारे आणि त्यावर चर्चा करणारे या सगळ्यांसाठीच महिला अत्याचार हा हेडलाईन, ब्रेकिंग न्यूज आणि दैनंदिन जीवनाचा भाग होऊन बसतो. त्यापलीकडे जावून संवेदनशीलतेने या प्रश्नाकडे कधीच पाहिले जात नाही. या घटनांनंतर सत्ताधारी, अधिकारी मात्र महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुधारणा करण्यासंबंधी भाष्य करताना दिसतात. अर्थातच त्यांचे हे भाष्य, त्यांचा राजकीय दृष्टीकोन आणि धार्मिक भावना (?) यांवर आधारित असतात.
हे इथंच थांबत नाही हेच विचार, हाच दृष्टीकोन आपला पुनर्लिखित इतिहास, पाठ्यपुस्तके यात परावर्तीत होताना दिसतो. (कारण आपला इतिहास, पाठ्यपुस्तके, जास्तीत जास्त लोकांना काय वाटतं, काय आवडतं यावरच लिहिला जातो.)
हे झालं छेडछाड, बलात्कार याविषयी. पण महिलांचे असे अनेक प्रश्न आहेत कि जे आजही आपल्या समाजाला प्रश्न वाटतच नाहीत. आणि वाटले तरी त्याविषयी संवेदनशीलतेने बोलताना फारसं कुणी दिसत नाही. आजही लिंग निदानाचे उघडपणे समर्थन करणारे काही महाभाग आपल्याला दिसतात. कौटुंबिक हिंसाचार, विवाहांतर्गत बलात्कार, मानसिक खच्चीकरण, शिक्षणाच्या आणि करीअरच्या संधी नाकारणं, उच्चशिक्षित मुलीला लग्नानंतर चूल आणि मुल एवढ्यापुरतच मर्यादित ठेवणं हे प्रश्न आहेत आणि यातून एका मोठ्या वर्गावर आपण अन्याय करत आहोत असं आपल्याला अजिबात वाटत नाही.
कल्की कोएचलिनने स्वतः लिहिलेली कविता “द प्रिंटींग मशीन” आणि तिच्यावरच चित्रित झालेला या कवितेवर आधारित विडीओ पाहताना हे संदर्भ आपल्या मनाशी असायला हवेत इतकंच !
No Responses