भाग २ : पीडोफिलीया – एक मनोलैंगिक आजार

1,803

मागील भागात आपण पहिले की, वयात येताना आपली लैंगिक जाणीव कशी आकाराला येऊ लागते आणि त्यानुसार कशाप्रकारे शारीरिक आकर्षण देखील वाटू लागते. या भागात आपण पीडोफिलियावर उपचार असतात का? तसेच पीडोफिलिया असलेल्या व्यक्तींसाठी वैद्यकीय मदत कोठे मिळू शकते? या विषयी माहिती घेणार आहोत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्याख्येनुसार “पीडोफिलिया म्हणजे व्यक्तींना बालकांबद्दल लैंगिक आकर्षण वाटणे”.

पीडोफिलिया सारख्या आजाराबाबत असे म्हणता येईल की, अशा लोकांच्या मनातील लैंगिक आकर्षण आणि जोडीदाराबद्द्लची पसंती त्यांच्या वयाच्या इतर मुलां/मुलींपेक्षा बऱ्याच बाबतीत वेगळी असते. आपल्या एकूणच समाजात आपल्या लैंगिक गरजा/पसंती काय आहे याच्या बद्दल जागरूकता कमी असतेच शिवाय याबद्दल सहजपणे बोललंही जात नाही. एखाद्याने आपल्याला मुलांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते, असे सांगितल्यास सामाजिक कलंक लागण्याची किंवा समाजातून बहिष्कृत केले जाईल अशी भीती त्याला वाटू शकते. याच्यामुळे एकाकी आयुष्य जगावे लागेल आणि लोकांच्या आपल्याकडे बघण्याच्या नजरा बदलतील असे वाटू शकते.

पीडोफीलिया असलेल्या व्यक्तींना बालकांबद्दल आणि नुकत्याच वयात येऊ लागलेल्या मुला-मुलींबद्दल लैंगिक आकर्षण वाटत असल्यामुळे ते सतत अस्वस्थ असतात किंवा इतर कोणालातरी हे समजेल आणि हे उघड होईल असे सततचे दडपण त्यांना असते. ह्या  समस्यांमुळे उदासीनता, नैराश्य, चिंता असे मानसिक त्रास त्यांना होऊ शकतात.

ताण दूर करण्यासाठी त्या व्यक्तीकडून बालकाचे लैंगिक शोषण करण्याची शक्यता वाढून त्यांना जोखमीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. अशा जोखमीचे क्षण ओळखणे आणि त्यांना कसे सामोरे जायचे, आणि स्वत:वर नियंत्रण कसे मिळवायचे हे शिकणे हे आवश्यक ठरते अणि म्हणूनच अशा व्यक्तीने स्वत:हून पुढे येऊन उपचार घेणे हे अत्यंत महत्वाचे ठरते.

के. ई. एम् .हॉस्पिटल संशोधन विभाग, पुणे यांनी शॅरीटे बर्लिन ह्यांच्या सहयोगाने पीडोफिलिया असणाऱ्या व्यक्तींना मदत मिळावी म्हणून तपासणी आणि उपचार योजना सुरु केली आहे. ह्या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन तपासणी आणि उपचार व्यवस्थापन हे ट्रबल डीझायर डॉट कॉम (troubled-desire.com) ह्याच्या माध्यमातून केले जाणार आहे, जे निनावी, गोपनीय आणि निःशुल्क आहे. ज्यांना त्यांच्या स्वतःच्या लैंगिक पसंतीबद्दल किंवा लहान मुले आणि नुकतीच वयात येऊ लागलेली मुले याबाबत लैंगिक आकर्षण  आहे का हे जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हे ऑनलाईन टूल आहे. एखाद्या व्यक्तीला पीडोफिलिया असल्यास म्हणजेच बालकांबद्दल लैंगिक आकर्षण वाटत असल्यास त्याला किंवा तिला  एकतर  ऑनलाईन उपचार घेता येतील किंवा त्या व्यक्तीला पुणे किंवा मुंबई येथील  तज्ञांकडून उपचार दिले जातील. पण लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कायद्यानुसार अशा व्यक्ती ज्यांच्या हातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अद्याप बाल लैंगिक शोषणाचा अपराध घडलेला नाही तसेच ज्यांना बालकांचा समावेश असलेल्या लैंगिक चित्रफिती पहाव्याशा वाटतात केवळ तसेच अशा व्यक्तीनांच हे उपचार उपलब्ध करून दिले जातील. ह्या उपचारपद्धतीबद्दल अथवा त्यांच्या तपासणीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आमचा पीडोफिलिया वरील पुढील भाग नक्की वाचा…

Comments are closed.