भाग १ : पीडोफिलीया – एक मनोलैंगिक आजार

0 1,661

किशोरावस्था म्हणजे माणसाच्या आयुष्यात खूप सारे बदल घडून येण्याचा काळ. ह्या काळात बहुतेकजणांना स्वतःविषयीच्या वेगवेगळ्या पैलूंचा शोध लागतो. आपल्याला कुणाबद्दल कामभावना किंवा प्रेमभावना जाणवतात, लैंगिक आकर्षण वाटते, हे पण उलगडू लागते. उदाहरणार्थ, आपल्या वर्गातल्या मुलाविषयीच्या किंवा खेळाच्या टीममधल्या आवडत्या मुलीबद्दलच्या दिवास्वप्नात कुणी रमून जाईल, किंवा दुसरा एखादा लैंगिक संबंधांची मनोराज्ये रचत बसेल.

अशी ही अवस्था चैतन्याने सळसळून टाकणारी असू शकते, पण त्याचबरोबर काहीशी घाबरवून टाकणारी पण ठरते. तरीही, या अवस्थेतली बहुतेक मुले-मुली अशा मिश्र अनुभवातून जातात, ही गोष्ट बऱ्याचदा समवयस्कर मित्र-मैत्रिणींबरोबरच्या गप्पांमधून, नात्यातल्या कुणाकडून, किंवा “Let’s Talk Sexuality” सारख्या माध्यमांतून समजून येते. ही अवस्था काही मुला-मुलींसाठी मात्र खूपच खळबळ माजवणारी किंवा मानसिक ताण आणणारी ठरू  शकते. आणि याचं कारण असं असतं की या मुलांना आपल्या वयाच्या मुला-मुलींऐवजी आपल्यापेक्षा खूपच लहान अशा मुला-मुलींबद्दल कामभावना किंवा लैंगिक आकर्षण वाटत असते. समाजाच्या चाली-रीतींपेक्षा वेगळ्याच अशा या आकर्षणामुळे आणि मनोराज्यांमुळे त्यांना खूपच अपराधी वाटत राहते, आणि मग ते आपल्या भाव-भावनांविषयी कुणाशीच बोलू शकत नाहीत. साहजिकच ते आपल्या लोकांपासून आणि इतर समाजापासून एकटे पडत जातात. यामुळे त्यांचे भावनिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मनोलैंगिक आजारांच्या वर्णनानुसार अशा लैंगिक आकर्षण आणि मनोराज्यांना “पीडोफिलीया” असे म्हणतात. संशोधनाच्या आधारे असं सांगता येईल की, दर शंभरातल्या एका पुरुषाला मुलांविषयी लैंगिक आकर्षण किंवा कामभावना असू शकतात. कुणाला स्वतःला ठरवून पीडोफिलीया निर्माण करता येत नाही, किंवा केवळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यात बदलही घडवता येत नाही. अर्थात, जोपर्यंत हे आकर्षण नुसतं मनोराज्यांच्यापुरते मर्यादित राहील, तोपर्यंत फारसे काही बिघडत नाही. म्हणून लहान मुलांबद्दल केवळ लैंगिक आकर्षण वाटणे, हा काही गुन्हा ठरू शकत नाही, पण त्यावर कृती करणे, प्रत्यक्षात मुलांशी तसे वागणे हा मात्र दंडनीय अपराध ठरतो.

बरेचदा असे दिसते की, पीडोफिलिया आणि बाल लैंगिक शोषण हे समानार्थी शब्द म्हणून समजले जातात. समाजातल्या या चुकीच्या समजुतींमुळे अशा स्वतःचा पीडोफिलिया लक्षात आलेल्या युवकांना आणखीच जास्त ताणाला सामोरे जावे लागते. कारण त्यांचा असा पूर्वग्रहच होउन बसतो की, मोठे झाल्यावर त्यांच्या हातून मुलांवर लैंगिक अत्याचार केलेच जातील. हे खरे नाही, हे फक्त थोड्याच लोकांना ठावूक असते. पीडोफिलिया असलेली अशी कित्येक माणसं समाजात असतात की, ती आयुष्यभर आपल्या लैंगिक भावनांवर ताबा ठेऊन, आणि कधी कधी अगदी त्या दडपून ठेवून, कुणाही मुलाबरोबर कोणत्याही प्रकारे लैंगिक व्यवहार न करता, अथवा आपले असले आकर्षण व्यक्त न करता आपले जीवन जगत राहतात.

असा पिडोफिलीया असलेल्या व्यक्तींचा हा त्रास कमी व्हावा आणि त्यांचा एकाकीपणा कमी व्हावा यासाठी अशा लोकांना मदतीची गरज असते. ही मदत कशी आणि कुठे मिळेल हे जाणून घेण्यासाठी या मालिकेतील पुढील भाग जरूर वाचा- “पिडोफिलिया: म्हणजे काय आणि त्याचा त्रास कमी करून कसे जगता येईल.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.