एक सर्वसाधारण गृहिणी मला म्हणाली, ‘ताई, आता माझा तिसरीतला मुलगा मला विचारतो, आई बलात्कार म्हणजे काय असतंय?’
एक आजीबाई म्हणाल्या, ‘पोरी शिकत्यात, पुढं जात्यात हे बघवतच न्हाय गडीमाणसांला. पण एक सांगते पोरी, अशे तर लई तरास व्हतेत बायांना रोज. पण त्या घाबरून बोलत न्हाईत. इथं खून झाला म्हणून इतका गलबला तरी झाला.’
एक तरुण पोरगा म्हणाला, ‘आरोपीला आमच्या हातात द्या. त्याचे हालहाल करतो जमावासमोर. मग बघा कसा वचक बसतो इतरांवर ते.’
या प्रतिक्रिया आहेत गेल्या पंधराएक दिवसांपासून बातम्या आणि अफवांच्या मध्यवर्ती असलेल्या, अनेक वस्त्यांत विखुरलेल्या कोपर्डी गावातल्या सर्वसामान्यांच्या.
भारतात दर बावीस मिनिटांना एक बलात्कार घडत असल्याचं एका सर्वेक्षणामधून समोर आलंय. अशा वेळी या हिंसेमागची मानसिकता शोधणं कुणालाच का गरजेचं वाटत नाही? दरवेळी निवडून येणारं सरकार लैंगिक शिक्षणाबाबत सोयीस्कर मौन का धारण करतं?
सध्या अनेकजण एक आक्षेप घ्यायलेत की दलित स्त्रीवर अत्याचार झाला तर तिची जात पत्रकार स्पष्टपणे सांगतात, मग आमच्या जातीच्या स्त्रीला वेगळा न्याय का? जात आणि धर्म ही आपल्या समाजाची दुर्दैवी ओळख आहे. त्याला जोड मिळाली ती पुरुषप्रधान विचारांची. या तीन आव्हानांना तोंड देत भारतीय स्त्री चालत राहते. त्यात जर ती बाई दलित असेल तर तिचं शोषण दुहेरी पद्धतीन होतं. एक बाई म्हणून आधीच दुय्यम स्थान, त्यात दलित म्हणूनही अजूनच ती तळाशी जात राहते. दलित स्त्रीच काय, दलित पुरुषासमोरही फणा काढून उभं असणारं जातवास्तव भयानक आणि गुंतागुंतीचं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जातीनिहाय होणाऱ्या शोषणाला इथल्या धर्मव्यवस्थेची पूर्वापार मान्यता मिळालेली आहे. दलित स्त्रीवरच्या अन्याय-अत्याचाराला स्वतंत्रपणे हाताळणारे वेगळे मथळेही यामुळेच होत राहतात. आणि ते तसं होणं सामाजिक न्यायाच्या दृष्टीनंही महत्त्वाचं आहे.
आपापल्या जातीधर्माची बाई ही आपापली इज्जत मानणारे लोकच खरे स्त्रीविरोधी आहेत. बाईवर लैंगिक, सामाजिक, सांस्कृतिक मालकी सांगत ती सिद्ध करणारे लोक तिच्यावर दैनंदिन अत्याचारच करत असतात. बलात्कार हे त्याचं फक्त एक तीव्र टोक आहे. बाईसंबंधीची कुठलीही बरीवाईट घटना हा मला एक आरसा वाटतो. त्या घटनेनंतर समाजात ज्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटतात ना, त्यात समाजाचा चेहरा दिसतो. बहुतेक वेळा हा चेहरा भयानक विद्रूप असतो. बलात्कार करणाऱ्या आरोपीसारखाच. या प्रकरणातले चारही आरोपी जातीने दलित आहेत. गावातल्या दलित वस्तीने यातल्या लपून बसलेल्या आरोपीला पकडण्यास संपूर्ण सहकार्य केलं असं वृत्त सर्वच माध्यमांमधून समोर आलंय. सर्वच दलित संघटना आणि नेत्यांनी अत्याचाराचा तीव्र निषेध करत आरोपींना शिक्षेची मागणी नोंदवलीय. या प्रकरणात पिडीत मुलीच्या जातीशी नातं सांगणाऱ्या काही मराठा संघटना ‘आमच्या लेकी-बाळींची अब्रू धोक्यात’ म्हणत आक्रमक झाल्या. त्यांच्या अजेंड्यांचं जहर फेसबुक व्हॉट्रसॅपवरही वेगानं पसरलं. ‘अॅ ट्रॉसिटी कायद्यावर बंदी घाला.’ ‘सैराट चित्रपटावर बंदी घाला.’ अशा मूळ प्रकरणाशी काहीएक संबंध नसलेल्या मागण्या सुरू झाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीने तर सत्ताधार्यांना बांगड्या दाखवत ‘बांगड्या घातलेल्या आम्ही अबला, नाजूक आहोतच, तुम्हीही आमचे ‘रक्षण’ करू शकत नाही म्हणून त्या घाला.’ असा भयानक स्त्रीविरोधी मेसेज दिला.
मराठ्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीतही मोठं योगदान दिलंय यात शंका नाही. मात्र कुठल्याही समाजाची प्रगती त्या समाजातल्या स्त्रियांच्या स्थितीवरून जोखली जाते असं विचारवंत म्हणतात. मराठा समाजातली स्त्री आज किती स्वतंत्र आहे? इथं मला फक्त आर्थिक स्वातंत्र्य म्हणायचं नाही. स्वजातीतल्या बाईवर बलात्कार झाला की खवळणाऱ्या प्रत्येक पुरुषासह त्यांच्यात्यांच्या संघटनांनीही आज या प्रकरणाच्या निमित्तानं स्वत:ला काही अवघड प्रश्न विचारले पाहिजेत. मी माझ्या जातीतल्या, कुटुंबातल्या नात्यागोत्यातल्या स्त्रीला मनासारखे करियर आणि मुख्य म्हणजे जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य देतो का? कारण आजही गावागावातला मराठा आपल्या मुलामुलींच्या आंतरजातीय विवाहांना प्रचंड विरोध करत असल्याची उदाहरणं खूप आहेत. अर्थात याला अपवाद आहेत, पण ते बोटावर मोजण्याइतके. स्त्री सक्षमीकरणाची व स्त्रीमुक्तीसाठी मराठा संघटनांकडे कुठला कृतिकार्यक्रम आहे? मराठा स्त्रियांचे बहुसंख्य प्रश्न हे थेट पुरुषाच्या पुरुषीपणाशी जोडलेले आहेत हे त्यांना मान्य आहे का? असेल तर मराठा पुरुषांमध्ये स्त्रियांसंबंधी समता व समजूत रुजवण्यासाठी आजवर मराठा संघटनांनी काय काय केलंय? युद्धजन्य परिस्थितीत आक्रमक होत विध्वंसाची, द्वेषाची भाषा बोलण्यापेक्षा शांततेच्या काळात युद्धच होऊ नाहीत म्हणून तुम्ही काय करता हे महत्त्वाचं. महाराष्ट्रातली सत्ताधारी असणारी प्रभावशाली जात म्हणून मराठ्यांनी आता समाजप्रबोधनाची सूत्रं हातात घेतली पाहिजेत. त्यांनी मराठ्यांसह सर्व जातीतल्या स्त्रियांच्या प्रश्नाची व्यापक मांडणी करत सर्वांना उत्तरांची दिशा दाखवावी.
या प्रकरणातल्या चार आरोपींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. पण ती एकदाची झाली की देशातल्या महिला कायमच्या सुरक्षित होणार असं कोण म्हणू शकंल? हे थांबवायचं असेल तर सोपी उत्तरं शोधण्याचा मोह टाळावा लागंल. खूप दूरचा, खूप मूलभूत विचार करावा लागंल. आपली जात, धर्म आणि संस्कृती म्हणजे नेमकं काय हे एकमेकांना विचारावं लागंल. पुन्हापुन्हा विचारत राहावं लागंल. कारण बलात्कार फक्त शारीरिक गरजेपोटी केलेली कृती नसते असं अभ्यासक सांगतात. बलात्कार स्त्रीला आणि ती ज्या जातीत जन्मली त्या जातीलाही तिची जागा दाखवून देण्यासाठी केला जातो. तिला धडा शिकवण्यासाठी आणि पुरुष म्हणून असलेलं स्वत:चं वर्चस्व टिकवण्यासाठी केला जातो. युद्धात सैनिक आणि दंगलीत हल्लेखोर उन्मादानं बलात्कार करतात त्यामागे हीच तर मानसिकता असते. अजून एक, ते लागलीच साध्य होईल असं नाही. पण बाईनं आणि पुरुषानंही आपापल्या शरिरांसंबंधीचे ‘टॅबू’ हळूहळू तरी सैल केले पाहिजेत. त्याच्याभोवती विणलेल्या गूढ, पवित्र कल्पनांचा कोश हटवला पाहिजे. शरीराची भौतिकता आपण पूर्णांशानं स्वीकारली पाहिजे. स्त्री व पुरुष म्हणून एकमेकांशी खूप थेटपणे ती स्पष्ट केली पाहिजे.
शरीर, लैंगिकता आणि स्त्री-पुरुष संबंध याबाबतची चर्चा मोकळेपणाने होत नाही. आणि त्यामुळेच ती गोसिपाच्या पातळीवर, सवंग आणि स्त्री व प्रसंगी पुरुषदेहालाही अवमानित करून होत राहते. दिल्ली आणि नगर अशा दोन्ही शहरांतल्या ‘निर्भया’ म्हणवल्या गेलेल्या अत्याचारग्रस्त तरुणी मरण पावल्या. दिल्ली बलात्कारानंतर एक ‘कॅण्डल मार्च’ फेम तरुणी मला म्हणाली, ‘एका अर्थानं बरंच झालं ती गेली. या प्रकरणाचा इतका गवगवा झाला होता, की यातून बरी झाल्यावर तिचं रोजचं जगणं अवघड झालं असतं.’ आता हे सारं ‘जगणं अवघड होणं’ कुठून येतं? ते शोधायला आपणच आपल्या शारीर जाणिवांची, त्याला जोडलेल्या पावित्र्याची निर्दयी चिरफाड केली पाहिजे सतत. तुमच्या आजूबाजूला जरा पहा, स्त्री आता तिच्या सौंदर्याच्या, मर्यादांच्या चौकटीतून बरीच मुक्त झालीय. बाईपणाची चौकट ओलांडून ती आता माणूसपणाकडे निघालीय. येत्या काळात मुक्तीची गरज पुरुषाला आहे. क्रोधापासून, हिंसेपासून, पुरुषी अहंकारापासून मुक्ती. पुरुषानं आता हा प्रवास बाईचा हात हाती घेत सुरु करावा. पुरुषाला त्याची हार स्वीकारता यावी, नकार पचवता यावेत, खूप दाटून आलं तर रडताही यावं मोकळेपणानं. त्याला त्याच्या मुक्तीचा पत्ता शोधणं जमावं, त्याला माणूसपणाच्या मुक्कामावर पोचता यावं.
जागतिकीकरणाच्या अवाढव्य रेट्यामुळे असेल, किंवा परिवर्तनवादी प्रयत्नांमुळं, पण गावाखेडी जातधर्माची सनातनता हळूहळू तरी मागे सोडत निघालीत, हे निश्चित. मुलीच्या शिक्षणाबाबत गावं स्वागतशील व्हायलीत. तिला शिकायला शहरातही धाडायलीत. हे असं अंधुक उजाडत असतानाच कुठल्यातरी गावात एका मुलीवर अमानुष बलात्कार झाल्याची बातमी येते. अक्षरवाटा शोधायला धडपडणाऱ्या कित्येक कोवळ्या पोरींचे हात जबरीनं पिवळे होतात. चावडीवरचा तरुण बोलता-बोलता मला दबक्या आवाजात म्हणतो, ‘ते लोकं बैलाचं मटन खातेत ना, मग असंच क्रूर वागतेत त्यामुळं.’ बलात्कार प्रकरणांच्या तव्यावर जातीय ध्रुवीकरणाची पोळी खरपूस भाजता येत असेलही. पण त्या सगळ्यात बदलाच्या वाटेवर मोठा पल्ला चाललेली ही गावं पुन्हा कित्येक कोस मागं येतात. आता निव्वळ आरोपींना फाशी देऊन हे सगळं थोडंच थांबणार आहे?
साभार: शर्मिष्ठा भोसले लिखित ‘कोपर्डी :आपण कमावलेल्या सामंजस्याची परीक्षा’ या लेखातील काही भाग. मूळ लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://sumbaran.com/author/sharmishtha-bhosale
Article Courtesy http://sumbaran.com
Image Courtesy: Credit : http://badmetaphor.net
No Responses